अवघ्या ७२ तासात तब्बल ४००० निष्पाप बळी घेणारी भारतातील दंगल…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
फोडा आणि राज्य करा..! इंग्रजांची खासियत…
भारतातून सत्ता लोप पावतेय असं दिसल्यावर किंबहुना हातघाई वर आल्यावर हीच नीती वापरून इंग्रजांनी स्वतःची राजनैतिक पोळी भाजून घेतली.
भले त्यांना हिन्दुस्थानवरील सत्ता तर सोडावी लागली, परंतु त्यांच्या विषारी फुट-नीतीमुळे भारतीयांचं कायम स्वरूपी नुकसान झालं.
भारतावर कायम परकीय आक्रमणं होत राहिलीयेत. अगदी सिकंदर पासून मुघल इंग्रजांपर्यंत. हे परदेशी परतून त्यांच्या देशात गेले तरी त्यांच्यातील काही मंडळी इथेच स्थायिक झाली.
अशाप्रकारे भारतात हिंदूंव्यतिरिक्त मुसलमान, पोर्तुगीज, ख्रिश्चन वसत गेले. स्वातंत्र्य पूर्व काळात हिंदू मुस्लिम असा भेद विशेष नव्हता.
मुसलमान देखील स्वदेशाला गोऱ्यांच्या तावडीतून सोडवायला हिंदू देशभक्तांच्या हातात हात घालून लढत होते. कित्येक मुस्लिम बांधवांनी देशासाठी आपले बलिदान दिले.
एकजुटीने एकदिलाने या हिंदुस्थानातील हिंदू आणि मुसलमान, शत्रू असलेल्या इंग्रजांना सळो की पळो करून सोडत होते. मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकमेकांसोबत भारताचे स्वातंत्र्य मिळवायला धडपडत होते.
नेमके हे इंग्रजांनी हेरले आणि हळू हळू त्यांच्यात फूट पाडायची कारस्थानं आखली..!
इंग्रजांना संख्येनी हिंदूंपेक्षा कमी असलेल्या मुसलमानांचे कान भरायला सुरुवात केली. मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिन्ना त्यांच्या जाळ्यात अलगद अडकले. भारताला स्वातंत्र्य तर आम्ही देऊन जाऊ.
पण स्वतंत्र्य भारतात तुमची आणि तुमच्या मुस्लिम बांधवांची काय पत असेल..? तुम्हाला इथे सुखाने कोण राहू देईल..?
हिंदू संख्येने जास्ती असल्यामुळे तुम्हाला राजकारणात काहीही अधिकार नसतील. अशा प्रकारचे विष जीन्ना आणि त्यांच्यामार्फत इतर मुसलमानांच्या मनात कालवले गेले.
आग भडकायला इतकीशी ठिणगीही भरपूर होती. १९०५ च्या बंगाल विभागणीच्या वेळी जे हिंदू आणि मुसलमान एकत्रितपणे ब्रिटिशांशी दोन हात करण्यात, देशासाठी जिवाची बाजी लावण्यात पुढे होते त्यांना आता एकत्र नांदायचे नव्हते.
इंग्रजांच्या आगलाव्या धोरणामुळे मुसलमान आणि हिंदू ह्यांच्यात उभी फूट पडली.
एकमेकांना साथ द्यायच्या ऐवजी ते एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. अशात काँग्रेसच्या मुख्य सदस्यांनी म्हणजेच गांधीजी आणि नेहरूंनी पूर्ण स्वराज्य आणि संपुर्ण भारताची मागणी ब्रिटिशांकडे केली.
संपूर्ण भारत सोडून ब्रिटिशांनी जायचं आणि पूर्ण भारताची जबाबदारी भारतीयांच्या हातात सोपवायची. थोडक्यात काँग्रेसकडे सत्तेच्या किल्ल्या द्यायच्या.
सत्तांतरच्या बोलाचालीसाठी इंग्लंडच्या राष्ट्रपतींनी ३ सदस्य असलेले एक शिष्टमंडळ भारतात पाठवले. त्यांनी मुस्लिम लीग आणि काँग्रेसच्या सदस्यांबरोबर चर्चा करून भारताला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे कबूल केले.
पण मोहम्मद अली जीन्नाना हे मान्य नव्हते. त्यांची एक महत्वाची अट होती. म्हणजे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासोबत आणखी एक अजबच मागणी केली. त्यांना मुसलमानांसाठी वेगळा देश हवा होता.
त्रीसदस्यीय मंडळाने त्यांच्या पुढे अजून एक पर्याय ठेवला. ते म्हणाले आम्ही हिंदूंसाठी भारत आणि मुसलमानांसाठी भारतातून एक मोठा तुकडा पाकिस्तान म्हणून करून देतो..! जिन्ना ह्याला लगेच तयार झाले. पण काँग्रेसने मात्र विरोध दर्शविला.
हिंदू आणि मुसलमान हे ह्याच देशाचे नागरिक आहेत आणि त्यांनी वेगळं का व्हावं? एकाच घरात दोन भावांनी वेगवेगळी चूल थाटावी ह्याला कोण कशी मान्यता देईल?
काँग्रेसच्या सगळ्या सदस्यांनी असाच प्रचंड विरोध दर्शविला. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय माऊंटबॅटन ह्यांच्या कडे जिन्नाना समजवायची जबाबदारी दिली. पण जिन्ना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रासाठी अडून राहिले.
समेट घडवायचा प्रयत्न जितका झाला तितका किंवा त्यापेक्षा जास्तीच जीन्नानी वेगळ्या पाकिस्तानसाठी जोर लावला. ते कोणालाच बधले नाहीत. त्यांना भारतभरातील मुसलमानांकडून खूप पाठिंबा मिळाला.
मुसलमान भारताच्या स्वातंत्र्य साठी नव्हे तर आता वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले.
जिथे जिथे हिंदू मुसलमान गुण्यागोविंदाने रहात होते तिथे तिथे कलह निर्माण झाले. सगळे एकमेकांशी भांडू लागले.
एकेकाळी काँग्रेसचे सदस्य असणारे आणि देशभक्त असे जिन्ना आता मात्र मुस्लिम लीगचे अध्यक्ष बनून धर्माच्या नावावर समाजात फूट पाडत होते.
एकट्या मुस्लिम लीग विरुद्ध काँग्रेस + हिंदू महासभा + कॉम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असे गट पडले. कुठेच मुस्लिम लीग आणि काँग्रेसचे एकमत होईना म्हणून जीन्ना नी ‘डायरेक्ट ऍक्शन डे’ म्हणजेच ‘धडक कृती दिन’ करण्यास मुस्लिमांना भाग पाडले.
प्लॅन ठरवला गेला. तारीख ठरली १६ ऑगस्ट १९४६. भारतीय स्वातंत्र्याच्या बरोबर एक वर्ष आधीच दिवस.
आधीच काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये विस्तव जात नव्हता. त्यात त्या दिवशी मुस्लिम बहुल बंगालमध्ये हरताळ पाळण्यात यावा असे लीगने ठरवले. काँग्रेसने रथातच ह्याला पाठिंबा दिला नाही.
ज्या हिंदूंना ह्यात म्हणजेच नवीन मुस्लिम राष्ट्राच्या पाठिंब्याच्या हरताळत भाग नाही घ्यायचा त्यांनी आपापली कामे चालू ठेवावीत असे सांगण्यात आले.
१६ ऑगस्ट चा दिवस उजाडला. सकाळ पासूनच वातावरण कलुषित झाले होते. मुस्लिम नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे बऱ्याच मुस्लिम लीग कार्यकर्त्यांची माथी फिरली होती.
बंगाल हा मुस्लिम बहुल प्रदेश होता. त्यामुळे या माथेफिरूंना हिंदूंवर अत्याचार करणे सहज शक्य होते आणि झालेही असेच.
तलवारी, सुरे, कोयते, लाठ्या, काठ्या जे मिळेल त्याने हिंदू आणि शीख समुदायांवर हल्ले सुरू झाले. दिसेल त्याला कापून काढण्यात आले. बेसावध असलेले हिंदू आणि शीख लोक सुद्धा नंतर गाड्या भरून हत्यार घेऊन आले आणि दिसतील त्या मुसलमानांना कापू लागले.
१६ ऑगस्टपेक्षा जास्ती विध्वंस १७ ऑगस्टला झाला.
एकच आग भडकली. जन्मोजन्मीचे वैरी असल्या प्रमाणे कत्तली सुरू झाल्या. पुरुष, बायका, मुले, म्हातारे, तरुण कोणालाही सोडले गेले नाही. स्त्रियांवर बलात्कार झाले, मृत शरीरांची विटंबना केली गेली. अमानुषपणे लोकांना मारले गेले.
बंगालचे लोण बिहार मध्ये पोचले. बिहार मधील बहुसंख्य हिंदूंनी मुसलमानांच्या कत्तली केल्या.
हेच लोण पंजाब आणि आत्ताच्या पाकिस्तान परिसरात पोचले. तिथे शीख आणि मुसलमान एकमेकांना भिडले. प्रचंड प्रमाणात जाळपोळ आणि जीवित हानी झाली. शिरच्छेद झाले.
४००० माणसे २-३ दिवसांत म्हणजे अगदी ७२ तासांत हा हा म्हणता मरण पावली. लाख भर माणसे देशोधडीला लागली, बेघर झाली, जखमी झाली.
Time मॅगझीन ने ‘सर्वत्र पसरलेल्या मृतदेहाचे ढीग आणि त्यावर बसलेली गिधाडे’ असे फोटो देखील प्रसारित केले होते. हृदय पिळवटून टाकतील अशी दृश्ये होती. बायकांनी भीतीने आत्महत्या देखील केल्या होत्या.
रस्त्या रस्त्यावर छिन्नविच्छिन्न मृतदेहांचे खच होते. कोण कोणासाठी रडायलाही उरले नव्हते.
खूपच अमानुष दंगल घडली. स्वतंत्र राष्ट्र देण्यामुळे भारतीयांचे खूप नुकसान झाले. त्यांना एक धडा ही मिळाला की भविष्यात अशा लोकांसोबत राहणेही किती कठीणच असेल.
शेवटी काँग्रेसने मुस्लिम लीग पुढे हात टेकले. मुस्लिम बहुल प्रांत घेऊन नवीन राष्ट्र उभारण्याचे महंमद अली जीन्नाचे स्वप्न आता सत्यात उतरणार होते.
पण त्यांना हवे तितके मोठे प्रदेश दिले गेले नाहीत. जे मिळालं त्यावरच समाधान मानणे लीगला भाग होतं.
शेवटी फाळणी झाली. धर्माच्या नावावर २ राष्ट्रे निर्माण झाली. तेव्हाही असंख्य लोक मारले गेले. रेल्वे भरून मृतदेह देशात आले. तसेच तिकडे पाकिस्तानातही पाठवले गेले.
असंख्य बेघर झाले. दंगलींनंतर, जाळपोळीनंतर, रोग राई नी, गरीबीनी आणि जेवायला अन्न न मिळल्यानेही अनेक लोक मेले.
अजूनही दोन्ही राष्ट्रांतील विवेकी माणसांना हा प्रश्न पडत आहे की, ह्या दंगलीतून, ह्या द्वेषातून आपण नक्की काय मिळवलंय..?!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.