आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
आयुष्यात कधीकधी अचानक एखादी विचित्र परिस्थिती उद्भवते. ही परिस्थिती आपल्याला नेहमीच्या शिस्तबद्ध चाकोरीमधून बाहेर काढते. थोड्या अवधीनंतर,परिस्थितीच्या वैचित्र्याच्या जाणीवेशी आपण जरासे कंफर्टेबल होतो.
आपण जरासे सावरलो, हे नक्की काय आणि का होतंय, माझ्याच बाबतीत का होतंय, इत्यादी विचार करणं थोडं थांबवलं, की रूटीन चाकोरीपेक्षा या विचित्र परिस्थितीच्या नकळत निर्माण झालेल्या अवकाशातून आपल्याला एरवीपेक्षा निराळं आकलन होतंय आणि ते चक्क छान आहे हे जाणवू लागतं.
एरवीपेक्षा वेगळ्या संवेदना जागृत होतात. नव्यानं जाणवलेली ही स्पंदनं आपल्यात हळुवार बदल करत जातात. हा बदल अर्थातच अमुलाग्र नसतो.
पण तो प्रॉमिनंट असतो. आपल्या सुप्त क्षमतांची जाणीव करून देणारा असतो.
‘कारवाँ’ या आकर्ष खुराना दिग्दर्शित नव्या चित्रपटात तीन प्रमुख पात्रे अशाच एका सुरस आणि चमत्कारिक प्रवासाला निघतात. तीनही पात्रांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. त्यांच्या जाणीवा वेगळ्या आहेत. ‘सेट अॉफ आयडियॉलॉजीज’ आहेत. ‘कारवाँ’ हा एक सुखद प्रवास आहे. या प्रवासात आयडियॉलॉजीजचा हलकासा संघर्ष आहे.
या वेगळ्या आयडियाज घेऊन जगणाऱ्या पात्रांची एकमेकांशी होणारी नोकझोंक आहे. विश्वास-अविश्वासाची आवर्तनं आहेत. किंचित हेवेदावे आहेत. मौजमजा आहे. मस्ती आहे.
तिनही प्रमुख कलाकारांची कामं जबरदस्त झाली आहेत.
दुलकीर सलमान हा मल्याळम सिनेमांचा हँडसम बादशहा बॉलिवूडमधेही राज्य करेल असं माझं गट फीलिंग आहे.
त्याचा वावर सहज आहे. संवादफेक प्रभावी आहे. मुद्राभिनय संयत आहे. व्हॉईस मॉड्युलेशन ऐकत रहावं असं आहे. जवळपास सगळे पंच असणारे डायलॉग्ज इरफानकडे जाऊनही, दुलकीर जबरदस्त छाप पाडतो. हा ‘बॉय नेक्स्ट डोअर’ ट्रूली लव्हेबल आहे.
मिथिला गोड दिसली आहे. तिचं कामही उत्तम झालंय. मुरांबा मधे तिची व्यक्तीरेखाच बरोबर लिहिलेली नसल्यानं, ती त्यात विशेष प्रभाव पाडू शकली नव्हती, असं तेव्हाही मी लिहिलं होतं. यातली तिची भूमिका आणि फूटेज व्यवस्थित आहे. तिनं या संधीचा फायदा घेऊन आपली चमक दाखवली आहे.
इरफान तर जबरदस्तच. महत्वपूर्ण भूमिका, भावखाऊ पंचवाले डायलॉग्ज, सहज वावर, प्रभावी मुद्राभिनय आणि मिश्कील भाव त्यानं सुरेख कॅरी केला आहे.
बाप माणूस ! कॅरेक्टर्सची गर्दी असूनही ती दिग्दर्शकाने व्यवस्थितपणे बॅलन्स केली आहे. हे पाहून झोया अख्तरच्या सिनेमांची खूपदा आठवण येते. सिनेमाची कथा दमदार आहे. अभिनेते तगडे आहेत. डायलॉग्ज हा या सिनेमाचा पाया आहे. दिग्दर्शन ताकदीचं आहे. एडिट लिनिअर आणि शार्प आहे. यातला विनोद अतिशय निर्मळ आणि खुसखुशीत आहे.
इतका चांगला विनोद हल्ली दुर्मिळ झाला आहे. कसलाही पाचकळपणा नाही. हिणकसपणा नाही. प्रसन्न, स्वच्छ विनोद.
तरूण पात्रे असूनही सगळीच अतिशय मॅच्युअर. कायिक चाळे नाहीत की भसाभस चुंबनं नाहीत. सगळं साफसुथरं. सॉर्टेड. मॅच्युअर.
पटकथा कथेला पूरक आहे. पटकथा शिस्तबद्धपणे चालते. एकही क्षण सिनेमा रेंगाळत नाही. त्याचबरोबर भरधाव वेगाने धावत नाही. तो एक ठराविक पेसने चालतो. आस्वाद घेत पाहता येतो. पाहताना फारसं डोकं घालावं लागत नाही. साधी सरळ फिलॉसॉफी आहे. ती तितक्याच साधेपणाने व खुबीनं सांगितली जाते.
ही सुंदर रोड मूव्ही, जाता जाता नातेसंबंध, मैत्री, फ्रीडम, यूथ, करियर, इंट्रेस्ट, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, प्लास्टिसिटी, मोराल व्हॅल्यूज, कॅरेक्टर जजमेंट, इंपॉर्टन्स अॉफ बिईंग सॉर्टेड, स्किल डेव्हलपमेंट इत्यादी गोष्टींवर प्रभावी भाष्य करते.
राजकपूरच्या ‘हीना’ मधे, अश्विनी भावे फर्स्ट हाफ मधे भयंकर आवडते. सेकंड हाफच्या आसपास झेबा बख्तियारची एंट्री होते तेव्हा अश्विनीचा प्रभाव झटक्यात कमी होतो, तसं काहीसं कारवाँ पाहतानाही झालं. मिथिला माझी आवडती अभिनेत्री आहे. ती सुरेख दिसली आहे. पण तिचं कॅरेक्टर बिल्ड होता-होताच, कीर्ती खरबंदा समोर येते आणि मिथिलाला चक्क विसरायला होतं.
ही अभिनेत्री कमालीची देखणी आहे. तिच्याकडे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं. कमीतकमी स्क्रीन टाईममधे ती कलेजा खलास करते.
नंतर येते ती अमला अक्कीनेनी. सूपरस्टार नागार्जुनची बायको. अमलाही कमालीची सुंदर आहे. मिथिलाच्या आईच्या भूमिकेत असणारी अमला या वयातही सुरेख आणि फिट दिसते.
तिनं आईची भूमिका अतिशय ग्रेसफुली वठवली आहे. इरफानचं मजाकिया पात्र, त्यानं जातायेता मारलेल्या कोपरखळ्या, दुलकीरच्या पात्राचा गंभीरपणा आणि मिथिलाच्या पात्राचा ‘सो व्हॉट अॅटिट्यूड’ पांघरून असणारा वावर हे डेडली कॉम्बो ठरलंय.
इरफानचे हॉस्पिटलमधले आणि रिसॉर्टमधले प्रसंग, दुलकीर-मिथिलामधले हॉटेलमधले प्रसंग, दुलकीर-कीर्ती मधले प्रसंग, दुलकीरच्या शेवटच्या छोट्याशा भाषणाचे प्रसंग विशेष महत्वाचे आहेत. सिनेमात काही फ्लॉज आहेत. काही क्लीशेज आहेत. पण कथेच्या ओघात ते खपून जातात. मला ते इग्नरेबल वाटतात.
कथा पटकथेचं उत्तम लेखन, मुद्देसूद बांधीव दिग्दर्शन, अविनाश अरूणची दृष्ट लागण्याजोगती सिनेमॅटोग्राफी, हुसैन दलाल यांचे खुसखुशीत संवाद ,या सगळ्याला सुरेख साथ देणारं पार्श्वसंगीत, श्रवणीय गाणी आणि सहजसुंदर अभिनय या सर्व घटकांच्या उत्कृष्ट मिलाफामुळे कारवाँ एक सुरेख सिनेमा ठरतो.
या वर्षीच्या सर्वोत्तम सिनेमांच्या माझ्या यादीत क्रमांक एकचा सिनेमा.
‘कारवाँ’ ही कमीतकमी वेळात बरंच काही सांगू पाहणारी, मूल्यव्यवस्था – नातेसंबंधांवर सहज सुंदर टिप्पणी करणारी, कुठलाही कृत्रिम आव न आणता, डोस न पाजता, आयडियालॉजीज आणि ह्यूमन सायकी अलगद उलगडणारी एक अप्रतिम अनुभूती ठरते. कारवाँ शक्यतो चुकवू नका. होल हार्टेडली रेकमेंडेड !
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.