“अरे मूर्खांनो, कुणी सांगितलं तुम्हाला ती चेटकीण आहे?” : आसामच्या बिरुबालाचा अंधश्रद्धेविरुद्ध लढा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
बिरुबाला – एक साठ-सत्तर वर्षीय महिला. भारतातील एका सर्वांत मागास मानल्या जाणाऱ्या गावात राहणारी. खरंतर नावालाच शिक्षण घेतलेली.आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि समाजाकडून कायमच हिणवली गेलेली.
पण या बाईने या परिस्थितीवर मात करून समाजातील अंधविश्वास दूर करण्यासाठी जे इतरांविरुद्ध जाऊन पाऊल उचललं त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. इन्द्राणी रायमेधी लिखीत ‘माय हाफ ऑफ द स्काय’ या पुस्तकातील काही भागातून जाणून घेऊयात भारतातील या महिलेचा तिच्या गावातील अंधश्रद्धेविरुद्धचा लढा.
बिरुबालाने सुनीलाला आपल्या छातीशी कवटाळलं आणि ती ओरडली “लाज वाटायला हवी तुम्हाला. तुम्हाला ही मुलगी चेटकिणीसारखी दिसते? चेटकीणीसारखं हिचं रक्त वाहतंय? चेटकीण बेशुद्ध पडते ?
अरे मूर्खांनो, सुनीला तुमच्यामाझ्यासारखीच एक आहे. तिलासुद्धा आपल्यासारखी भूक लागते. आपल्यासारखीच थंडी वाजते. आपल्यासारखीच सुख-दुःख आहेत. तिचे कपडे आपल्या कापड्यांसारखेच मळलेले आहेत.
तिचं घर जे तुम्ही जाळून टाकलेत ते घरही तर आपल्या घरासारखीच एक छोटी झोपडी होती. जर तिला चेटूक येत असतं तर ती अशी गबाळी राहिली असती का ? तिच्या शक्तींचा वापर करून ती एक बेहतर आयुष्य जगू शकली नसती?
ती त्या शक्तींचा वापर करून कुठे दुसरीकडे जाऊन आयुष्य उपभोगू शकली नसती? काय गरज होती तिला असे गरिबीत दिवस काढायची? कोणी सांगितलं तुम्हाला की ही चेटकीण आहे? त्या ओझाने? आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचं ऐकलंत? आणि जर ती चेटकीण असती तर तुम्ही इतकं सगळं करून ती गप्प बसली असती ? तिने तुम्हाला संपवलं नसतं?
तुम्ही स्वतःच्या डोक्याने विचारच करणार नसाल तर तुम्ही माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचेच नाहीत. तुमच्यात आणि जनावरांत काय फरक आहे?”
हळूहळू गर्दी ओसरायला लागली. ती स्त्री फाटलेले कपडे पाण्यात भिजवून सुनीलाच्या जखमा धुवू लागली. सुनीलाचा नवरा आणि तिची मुलं तिच्याजवळ येऊन हमसाहमशी रडू लागली. बिरुबालाने आपली शाल सुनीलावर पांघरली आणि एका लांबच्या रस्त्याने आपल्या गावाच्या दिशेने चालू लागली.
बिरुबाला, आसाम आणि मेघालयाच्या सीमेवर वसलेल्या गोलपारा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव असलेल्या ठाकुरविला मध्ये राहणारी एका अत्यंत गरीब शेतकऱ्याची बायको आहे. बिरुबालाच्या पूर्वायुष्याकडे पाहून कोणालाही वाटणार नाही की, ही बाई एक दिवस अन्यायाविरुद्ध प्रखर लढा देईल आणि निर्भीडपणे अंधश्रद्धेच्या विरोधात उभी राहील.
पण आज बिरुबाला राभा- मेघालयाच्या सीमेवर वसलेल्या गोलपारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात, ठाकुरव्हीलात अंधविश्वासाविरुद्ध लढते आहे.
बिरुबाला केवळ ६ वर्षांची होती जेव्हा तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. पण इतक्या लहान वयात अनाथ झालेल्या बिरुबालाने हिमतीने त्यावर मात केली.
कुटुंबावर ओढवलेल्या आपत्तीमुळे, आई-वडिलांचे छत्र नाहीसे झाल्याने त्यांना केवळ सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेता आलं. पण शिक्षणातील ही कमतरता त्यांनी इतर गोष्टी शिकून भरून काढली. त्या पाककला, शिवणकाम, विणकाम या गोष्टींमध्ये पारंगत झाल्या.
सोळा वर्षांच्या झाल्यावर त्यांचा विवाह चंद्रेश्वर राभा यांच्यासोबत झाला. लवकरच त्यांना तीन मुले आणि एक मुलगी झाली. मोठा मुलगा धर्मेश्वर, मधला बिष्णु प्रभात, छोटा दोयालू आणि मुलगी कुमोली!
जरी गरिबीमुळे त्यांचे जीवन खडतर होते, पण तरी सगळे एकमेकांसोबत खुश होते. पण त्यांच्या या सुखी परिवाराला एक दिवस नजर लागली. त्यांचा मोठा मुलगा धर्मेश्वर वेगळा वागायला लागला. धर्मेश्वर स्वतःशीच बोलायचा.
कित्येक दिवस गायब असायचा. घरात असेल तर घुम्यासारखा असायचा. घरातली माणसं त्याची शत्रू असल्यासारखा वागायचा. इतकंच नाही तर कधी तो बिरुबालावरही हात उगारायचा.
एक दिवस त्याच्या वडिलांनी घाबरून एका ओझाकडे (बुवाबाजी करणाऱ्या व्यक्तीकडे) याबद्दल मदत मागितली. ओझाने त्याला धर्मेश्वरच्या वागण्याबद्दल अजूनच विचित्र चक्रावून टाकणारी गोष्ट सांगितली.
ते म्हणाले “मला वाटतं की या मुलाने एक चेटकिणीशी लग्न केलं आहे. आता ती ह्याच्या बाळाची आई बनणार आहे. तिच्या मुलाचा जन्म झाला की याचा तेव्हाच मृत्यू होईल. आता तुझ्या मुलाजवळ फक्त शेवटचे तीन दिवस उरलेत.”
ओझाचे हे शब्द ऐकून बिरुबाला आणि तिच्या परिवाराला धक्का बसला. आणि धर्मेश्वरच्या मृत्यूपूर्वीच घरातलं वातावरण सुतकी झालं. तीन दिवस झाले… पाच दिवस झाले… दहा दिवस झाले… धरमेश्वरला काहीच झालं नाही.
बिरुबालाचा जीव भांड्यात पडला. पण ओझाच्या खोटरड्या वागण्याचा तिला खूप राग आला. अशा वाईट आत्म्याचा तिचा मुलगा शिकार बनला या ओझाच्या खोट्या ठरलेल्या भाकितातून तिची अंधश्रद्धेविरुद्ध लढाई सुरू झाली.
बिरुबालाला समाजसेवेचं बाळकडू आपल्या आईकडून मिळालं होतं. तीच परंपरा बिरुबालाने पुढे चालू ठेवली. तिने ‘ठाकुरविला महिला समिती’ या संघटनेची सुरुवात केली. या संघटनेमार्फत त्यांनी सगळ्यात आधी लोकांमध्ये काळी जादू आणि झाडफूकी विरुद्ध जागरूकता निर्माण करण्यास सुरुवात केली.
यानंतर त्या ‘ग्रेटर बोर्झारा महिला समिती’च्या सचिव बनल्या. सन १९९९ मध्ये त्या ‘आसाम महिला समता सोसायटी’च्या सुद्धा सदस्य बनल्या.
त्या म्हणतात,
“अचानक असं काय होतं की, कालपर्यंत आपल्यातीलच एक असलेली सर्वसामान्य व्यक्ती डायन किंवा चेटकीण म्हणवली जाते?”
प्रत्येक गावात एक ओझा असतो. एक हकीम आणि एक ज्योतिषी असतो. या व्यक्ती तुमचं भविष्य कथन करतात आणि यांच्यातल्या कोणीही जर त्यांना म्हटलं की कोणी चेटकीण आहे तर लोकं डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतात.
गावकरी डायन/ चेटकीण किंवा वाईट आत्म्याला शोधून काढण्यासाठी आणखी एक मार्ग वापरतात.
जर कोणी आजारी असेल,आणि त्याच्यावर कोणतेही उपचार काम करत नसतील तर त्याला डोक्यापासून पायापर्यंत एका जाळीमध्ये बांधून ठेवलं जातं आणि सगळे उपस्थित लोक त्याला छडीने मारतात.
आजारी व्यक्ती अंगावर फटके बसल्याने कळवळते, किंचाळते. पण गावातील माणसे तिला वाईट आत्म्याचे नाव विचारत मारत राहतात. पुन्हा-पुन्हा मारत राहतात.
आपल्या स्वतःची या मारातून सुटका करण्यासाठी रुग्ण कोणत्याही ओळखीच्या व्यक्तींपैकी एकाचं नाव घेतो आणि गावकरी त्या व्यक्तीला चेटकीण किंवा वाईट आत्मा म्हणतात. यानंतर सगळ्यांना रांगेत उभं केलं जातं. त्या व्यक्तीने डायन म्हणून जिचं नाव घेतलं तिला गावकऱ्यांसमोर हजार केलं जातं.
आणि मग त्या महिलेला पूर्ण गावभर फिरवत मारलं जातं किंवा पिंजऱ्यात कैद करून भाल्याच्या अणकुचीदार टोकांनी टोचलं जातं.
आणि जर या सगळ्या यातनांनी तिचा मृत्यू तिचा मृत्यू झाला तर तिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी दफन केले जातात जेणेकरून तिचा पुनर्जन्म होऊ नये. तिची सर्व संपत्ती हडप केली जाते.
या बाबतीत तिच्या घरातली माणसं सुद्धा भीतीने काही बोलू शकत नाहीत. असं एखादी स्त्री चेटकीण असल्याचं जाहीर करणं ही प्रथा केवळ सामाजिक कलंकच नाही तर मानावाधिकाराचं उल्लंघन आहे.
बिरुबाला यांच्या या संघर्षाबद्दल त्यांना २००५ मध्ये नॉर्थ ईस्ट नेटवर्कने शांती पुरस्काराने (नोबल पीस प्राइज) सन्मानित केले. त्याच वर्षी त्यांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड तर्फे ‘रियल हीरोज़- ऑर्डिनरी पीपल, एक्स्ट्रॉऑर्डिनरी सर्विस’चा पुरस्कारही देण्यात आला.
पण इतके सारे सन्मान मिळूनसुद्धा आजही बिरुबाला यांचं जीवन तेव्हा इतकंच साधं आणि संघर्षमय आहे. बिरुबाला इतकी स्वाभिमानी आहे की, ती आपल्या आर्थिक बेताच्या परिस्थितीबद्दल एक शब्दही बोलत नाही.
आपल्या परिस्थितीमुळे खचून न जाता ती एक खूप चांगलं काम करण्याचं स्वप्नं पाहतेय.
त्यांचं स्वप्नं आहे की, त्या चेटूक म्हणून वाळीत टाकलेल्या स्त्रियांसाठी एक असा निवारा बनवतील, जिथे या स्त्रियांसाठी मानसोपचारतज्ञ असतील. ते त्यांना या मानसिक खच्चीकरणातून बाहेर काढतील.
पीडितांना इलाज मिळतील, जेवायला मिळेल, अंगावर घालायला कपडे मिळतील, स्वतःच्या हिमतीवर काही करायची उमेद निर्माण होईल, जगाविरुद्ध लढण्याची ताकद मिळेल आणि एक नवीन आयुष्य सुरू करण्याची संधी मिळेल.
त्यांच्या या कार्यात त्यांना यश येवो हेच मागणं आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.