' एका शापित राजपुत्राची गोष्ट – InMarathi

एका शापित राजपुत्राची गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – राज जाधव 

===

‘दि कर्स्ड प्रिन्स’ नावाची एक फँटसी कथा आहे. आपल्या स्वार्थी मुलाला धडा शिकवण्यासाठी एक राजा एका राक्षसीणीमार्फत त्याला शाप देऊन त्याचे व्यथित आयुष्य एकांतात पार पाडायला लावतो, साधारण अशी.

शोधायला गेलो तर अश्या अनेक कथा आपल्याला आपल्याच आजूबाजूला सापडतील.

विचार केला तर कमी-अधिक प्रमाणात अभिषेक बच्चनची कथाही याच ‘शापित राजपुत्राच्या’ साच्यात मोडेल.

हिंदीतले नामवंत कवी हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांचा नातू, सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि एक काळ (थोडासा का होईना) गाजवलेली जया भादुरी यांचा मुलगा.

जन्मताच अश्या मोठ्या मोठ्या नावांचे ओझे वाहत आलेला हा मुलगा, स्वतःला सिद्ध करण्याच्या वयात किती दडपणाखाली असू शकेल, याची कल्पनाच केलेली बरी. आपल्या बापाचे वजनदार नाव आपल्या नावासोबत जोडले गेले आहे, याचे कौतुक काही काळ नक्कीच वाटले असेल.

पण जाणत्या वयापासून, आपण त्या नावाला तितक्याच समर्थपणे पेलू शकू की नाही, याची भीतीही तितकीच वाटली असण्याची शक्यता आहे.

 

bachchan-family-inmarathi

 

सन २००० उजाडले आणि त्याचबरोबर ह्रितिक रोशनच्या कहो ना प्यार हैं चे वादळ आले. ह्रितिकसाठी, राकेश रोशनने सेफ गेम खेळत लव स्टोरीची निर्मिती केली तर याउलट अभिषेकची, बॉर्डरच्या तुफान यशानंतर जे.पी. दत्ता बनवत असलेल्या रेफ्युजीसाठी निवड झाली.

कहो ना प्यार हैं अपेक्षेपेक्षा जास्त लोकप्रिय झाला. ह्रितिककडे भावी सुपरस्टार म्हणून लोक पाहू लागले.

आधीच बच्चन नावाच्या दबावाखाली वाकलेल्या अभिषेकपुढे पदार्पणापूर्वीच एक तगडा प्रतिस्पर्धी उभा ठाकला होता.

 

kaho-naa-pyaar-hai-inmarathi

 

कहो ना प्यार हैं नंतर पाच महिन्यांनी रेफ्युजी पडद्यावर झळकला. तोवर कहो ना प्यार हैं सुपरहिट होऊन, साऱ्यांच्या नजरा अभिषेक बच्चनकडे वळलेल्या होत्या. प्रचंड अपेक्षा असूनही चित्रपट चालला नाही, पण अभिषेक आणि करीना कपूरच्या कामाची तारीफ झाली.

याच रेफ्युजीसाठी कहो ना प्यार हैं अर्धवट सोडलेल्या करीनाला याची सल आयुष्यभर टोचत राहील.

माणसाचे नशीबही कसे खेळ खेळत असते पहा. राकेश रोशनला म्हणावे तसे स्टारडम या इंडस्ट्रीने दिले नाही.

याउलट प्रसिद्धी, पैसा आणि सुपरस्टारपद अमिताभ बच्चनच्या नशिबी आले, अर्थात यात त्याची मेहनत, चिकाटी आणि कौशल्य आहेच, त्यात वाद नाही, पण नशिबाने पुढच्या पिढीत, हेच फासे उलटे फिरवले.

राकेशला स्वतःसाठी पाहिलेले स्वप्न ह्रितिकच्या मार्फत पूर्ण होताना दिसले. तसेच माझ्यासारखे यश अभिषेकच्याही वाटेला यावे यासाठी अमिताभही आतमध्ये कुठेतरी नक्कीच खदखदत असावा.

रेफ्युजीनंतरही तो तीन वर्षे स्वतःला हिट अभिनेता म्हणवून घेण्यासाठी झगडत राहिला.

२००४ हे वर्ष त्याच्यासाठी इंडस्ट्रीत पाय रोवण्यासाठी सर्वार्थाने लक्षणीय ठरले. धूममध्ये तो नावाजला गेला पण त्याला खऱ्या अर्थाने फायदा झाला तो ‘युवा’चा.

 

Yuva-inmarathi

 

२००४ मध्ये आलेल्या युवामध्ये त्याने साकारलेला लल्लन त्याच्या बेस्ट परफॉर्मन्सेसपैकी एक होता आणि सदैव राहील. मणीरत्नमने त्याच्यावर दाखवलेला विश्वास त्याने सार्थ करून दाखवला.

त्याचवर्षी आलेला रन ठीकठाक तर नाचमधला अभिमानसदृश्य रोल आणि फिर मिलेंगेमधील सहाय्यक रोल देखील दखल घेण्यायोग्य होते.

२००५ मध्ये बापबेट्यांची जुगलबंदी असलेला बंटी और बबली आणि पाठोपाठ सरकार आला.

सरकारचा सेकंड हाफ हा त्याने साकारलेल्या शांत आणि संयमी ‘शंकर’ने अक्षरशः खाऊन टाकलाय. ब्लफमास्टर हादेखील एक सरप्राईज पैकेज होता. त्यातील ‘रॉय’ हा त्याचा एक अंडररेटेड परफॉर्मन्स आहे.

२००४ ते २००६ या तीन वर्षी (युवा, सरकार आणि कभी अलविदा ना कहना) त्याला सलग तीन बेस्ट सहाय्यक अभिनेत्याचे फिल्मफेयर मिळाले. सर्व काही ट्रॅकवर आहे असे वाटत होते.

मणी आणि अभिषेक, ही जोडी पुन्हा एकदा समोर आली ती ‘गुरू’ मध्ये. त्याने साकारलेला गुरुकांत देसाई हा त्याच्या करियरमधील पीक पॉईंट राहील. अदाकारीच्या या शिखरापर्यंत तो पुन्हा कधी पोचू शकेल, सांगता येणे अशक्य आहे.

 

abhishek-aishwarya-inmarathi

 

पण, मणी-अभिषेकची ही जादू पुन्हा रावणमध्ये दिसली नाही. तशीच रामू-अभिषेकदेखील “सरकार राज”मध्ये चमक दाखवू शकले नाहीत. त्यानंतर दोस्ताना, पा आणि दम मारो दम सारख्या काही मुव्हीज सोडल्या तर अभिषेकची जादू ओसरत चालली होती.

चांगले, नावाजलेले दिग्दर्शक भेटूनही त्याचे सिनेमे हिट होत नव्हते. सुरुवातीला जे.पी. दत्ता, राज कंवर, सुरज बरजात्यापासून चालत आलेला हा सिलसिला पुढे मनीरत्नम, रामू, प्रदीप सरकार, राकेश ओमप्रकाश मेहरा, गोवारीकर, अब्बास-मस्तान पर्यंत चालू राहिला.

याशिवाय तो कभी अलविदा ना कहना, बोलबच्चन, प्लेयर्स, हॅप्पी न्यू इयर, हाऊसफुल ३ सारख्या मल्टिस्टारर चित्रपटात झळकल्यामुळे त्याला सोलो चित्रपट मिळणे जवळपास बंद झाले, मिळालेले फ्लॉप गेले होते.

अभिषेक संपलाय याची प्रत्येकाने आपापल्या परीने अधिकृत घोषणा देखील केली आहे.

आपल्या बापाच्या कर्तृत्वाच्या वटवृक्षाखाली मूळ धरू लागलेली रोपटी थोड्याच कालावधीत उन्मळून पडतात, याची कितीतरी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात.

दुसरा गावस्कर, दुसरा तेंडुलकर शिवाय दुसरा बच्चनसुद्धा होऊ शकला नाही, ही एका अर्थी खरी बाब असली तरी याची दुसरी बाजू कधीच पडताळून पाहिली जात नाही.

आपल्या बापाने पार केलेला डोंगर आपण सर करू शकू की नाही, या विचाराच्या गर्ततेत त्यांना सोडून दिले तर ते कदाचित रस्त्यावर नॉर्मली देखील चालू शकणार नाहीत, हा विचार आपण का करत नाही?

मुळात ही तुलना सुरू होते, तिथूनच त्या लोकांमध्ये न्यूनगंड तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरी फळी आपल्या बापाएवढे योगदान देत नाही, याचा अर्थ ती कुचकामी आहे का? नक्कीच नाही.

अमिताभ बच्चनने जर २००० मध्ये पदार्पण केले असते आणि अभिषेकने १९७० मध्ये, तर कदाचित ही परिस्थिती वेगळी असायची शक्यता नाकारता येत नाही.

साठच्या दशकात केवळ गाण्यांच्या जोरावर सुपरहिट झालेले राजेंद्र कुमार आणि प्रदीप कुमार आणि सध्या क्षमता असूनही वर्षोनुवर्षे केवळ सहाय्यक रोल्स करणारे पवन मल्होत्रा, दिव्या दत्ता, जिमी शेरगिल यांचे नशीब वेगवेगळ्या दशकात लिहिले गेले असते… तर कुणास ठाऊक, यांचे नशीब परस्पर बदलले असते…!

 

amitab-and-abhishekh-inmarathi

 

अभिषेकदेखील काय ताकदीचा कलाकार आहे हे त्याने वेळोवेळी सिद्ध केले आहे. पण त्याने बापाची उंची गाठावी ही अपेक्षा ठेवणे, हा बेंचमार्क त्याच्यासाठी आपण सेट करणे, हे त्याच्या स्वतःच्या क्षमतेचा अपमान करण्यासारखे आहे.

त्याला वेळोवेळी ट्विटरवरही ट्रोल केले जाते, कबड्डीच्या संघावरून टोमणे मारले जातात.

हेच जर, तो बच्चन नसता, तर त्याने एक प्रतिभावान आणि संवेदनशील अभिनेता म्हणवून घेता यावं, एवढं काम नक्कीच केले आहे, यावर आपला विश्वास बसला असता.

ज्या दिवशी आपण अमिताभपेक्षा त्याची स्वतःशी, जुन्या आणि दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललेल्या, पण नशीबाशी झगडणाऱ्या अभिषेकशीच तुलना करू, त्याच दिवशी या शापित राजपुत्राचा शाप मिटु शकेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?