Site icon InMarathi

बाबासाहेबांची वैचारिक स्मारके – संविधानापासून शेतीतंत्रज्ञानापर्यंत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक :
विश्वास सोपानराव मुंडे (आय. आर. एस.) सह-आयुक्त (आयकर ) , औरंगाबाद.
vmunde @yahoo.com

===

जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही काळाच्या उदरात लपलेली असतात, हेच खरं. १९ व्या शतकात सामाजिक क्रांतीची ज्योत महात्मा ज्योतिराव फुलेंनी पेटवली. ती तेवत ठेवण्याचे कार्य अखंडपणे फुले दाम्पत्याने केले. अखेर १८९० साली ज्योतिराव फुले गेले.

क्रांतीज्योत मंद होण्याची भीती वाटू लागली. पण तसे होणे नव्हते. परिस्थितीने उत्तर शोधले. आणि पुढच्याच वर्षी म्हणजे १८९१ साली बाबासाहेब जन्माला आले.

रामजी आंबेडकरांचं १३ अपत्यानंतर जन्माला आलेल हे १४ वं रत्न ! नंतर बुरसटलेल्या समाजव्यवस्थेला बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं १४ वं रत्न दाखवलं.

हळूहळू बाबासाहेबांनी फुलेंनी पेटवलेल्या ज्योतीचे रूपांतर धगधगत्या अग्निकुंडात केले. अवघे जग दिपून गेले. जन-मन प्रकाशित झाले. शतकांचा काळोख दूर झाला. प्रत्येकाला मूठभर प्रकाश भेटला. अंधाराच्या गावात सूर्य उगवला. अन ज्ञानसूर्य बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व ज्ञानाचा उपयोग पिचलेल्या-पीडित जनतेच्या मुक्तीसाठी केला.

 

 

ज्ञानाच्या बाबतीत साक्षात बृहस्पतीला लाजवणारे बाबासाहेब प्रचंड संघर्ष करून त्या पदाला पोहोचले होते. बाबासाहेबांची प्रतिभा चौफेर होती. म्हणूनच बाबासाहेबांचे योगदान विविध क्षेत्रात आहे.

सामाजिक, आर्थिक, कृषी, कायदा, जलनीती, पत्रकारिता, तत्वज्ञान, राजकारण, धर्म, संस्कृती, परराष्ट्र संबंध, पर्यावरण, भारत-पाकिस्तान फाळणी, शिक्षण, भाषावार प्रांतरचना, सरंक्षण क्षेत्र, छोटी राज्ये -मोठी राज्ये, स्टॉक एक्सचेंज, मानव-वंशशास्त्र, व्यवस्थापन हि त्यातील ठळक उदाहरणे.

 

 

तशीच बाबासाहेबांची ग्रंथसंपदाही विपुल आहे. बाबासाहेबांचे सर्व ग्रंथ, भाषणे, पेपर्स, शोधनिबंध कालातीत आहेत. ते आजही देशाला मार्गदर्शन करतात.

बाबासाहेबांचे विचार मूलगामी आहेत. त्यामुळे भविष्यात या ग्रंथांचे महत्व तसूभरही कमी होणार नाही. त्यातील काही पुस्तकांचा घेतलेला हा ओझरता आढावा…

 

indianexpress.com

 

बाबासाहेब जेंव्हा कोलंबिया विद्यापीठात गेले तेंव्हा १९१३ साली त्यांनी एम ए मध्ये एक शोधप्रबंध सादर केला. त्याचे नाव: ऍडमिनसिट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. आशय होता ईस्ट इंडिया कंपनीने भारताची आर्थिक लूट कशी केली आहे हा.

या शोधप्रबंधात बाबासाहेबांनी अतिशय मुद्देसूदपणे कंपनीने नियोजित लूट कशी सुरु ठेवली आहे हे सांगितले आहे. हे सांगताना प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील भारताची अर्थव्यवस्था,आर्थिक संबध, उत्पादनाची साधने यांचा उहापोह केला आहे.

या पार्शवभूमीवर वर्तमानातील आर्थिक परिस्थिती आणि ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण यांची सांगड घालून आर्थिक शोषण अधोरेखित केले आहे. शेती, उद्योगधंदे, स्वयंपूर्ण खेडी यांची आर्थिक पिळवणूक होऊन कशी अधोगती झाली आहे याची निर्भीड चिकित्सा बाबासाहेबांनी या शोधप्रबंधात केली आहे.

 

 

परकीय कंपन्या देशी संसाधनांची लयलूट करताना देशाची अर्थव्यवस्था व पर्यायाने सामाजिक व्यवस्था कशी कोलमडून पडते याचे यथोचित वर्णन केले आहे.

हाच धागा पकडून दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया हा एक ग्रंथ मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रस्तुत केलेला प्रबंध आहे. हा इ.स. १९१६ मध्ये लिहिलेला प्रबंध इ.स. १९२४ मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला.

हे पुस्तक बडोद्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना समर्पित केले आहे. हे पुस्तक हि आर्थिक व्यवहाराशी संबंधित असून त्यात ब्रिटिश नोकरशाहीचे पितळ उघडे पाडले आहे.

या पुस्तकाचे आधीचे नाव हे नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया : अ हिस्टोरिक अँड ऍनालीटीकल स्टडी असे होते. सोबतच कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले.

पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात १९२३ साली ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला. खरंतर त्या काळात अर्थशास्त्र आणि चलन यावर अतिशय त्रोटक असे लिखाण होते. त्यामुळे कुणीतरी अभ्यासकाने याविषयावर सबंध पुस्तक लिहिण्याची गरज होती.

 

 

या समस्येच्या मुळाशी जाऊन अभ्यास करणे आणि ते सोप्या शब्दात पुस्तकरूपात मांडले ते बाबासाहेबांनी.

या पुस्तकात बाबासाहेबांनी रुपयाचा विनिमय दर पाउंड च्या तुलनेत कसा असावा, यावर चिंतन केले आहे. ज्या काळात ब्रिटिश प्रशासनाचे हितसंबंध आणि भारतीय उद्योगधंदे यांच्या विषम स्पर्धा शिगेला पोचली होती.

त्यावेळी बाबासाहेबांनी विपुल उदाहरणांच्या साहाय्याने ब्रिटिशांनी रुपयाचा विनिमय दार कसा भारतीय उद्योगांना मारक ठरेल असा ठरवला आहे, हे सिद्ध केले.

 

www.thequint.com

 

रुपयाचे एका मर्यादेपर्यंत अवमूल्यन करणे कसे गरजेचे आहे हे बाबासाहेबांनी मुद्देसूद पटवून दिले. विनिमय दर स्थिर असावा का आणि तो कश्या प्रकारे स्थिर करावा यावर बाबासाहेबांनी मंथन केले. यातूनच पुढे रिसर्व बँक ऑफ इंडिया च्या जन्माची बीजे पडली.

आज रिसर्व बँक ऑफ इंडिया हि विनिमय दारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. आजही बाबासाहेबानि केलेले हे चिंतन सद्य आर्थिक परीस्थितीत मार्गदर्शन करते.

यातूनच बाबासाहेबांचे विचार किती मूलगामी आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य ठरवणारे होते हे समजते.

अर्थशास्त्रापासून दूर जाण्याअगोदर बाबासाहेबांनी (१९१८ साली) प्रॉब्लेम ऑफ स्मॉल होल्डिंग्स इन इंडियन ऍग्रीकल्चर या विषयावर अतिशय मूलगामी चिंतन करणारा एक पेपर प्रकाशित केला होता.

प्रत्येक पिढीनुसार शेतजमिनीचे होणारे विभाजन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या (घसरत जाणारी उत्पादकता , यांत्रिकिराणाची समस्या) यावर उहापोह केला आहे.

कृषी क्षेत्रातील छुपी बेरोजगारी कमी करण्यासाठी औद्योगिकीकरणाची गरज बाबासाहेबांनी १९१८ साली सांगितली होती. बाबासाहेब काळाच्या पुढे जाऊन विचार करत ते असे.

 

 

आज २०१८ साली शेतीच्या समस्या पाहता बाबासाहेबांनी किती अचूक भविष्यवाणी केली होती आणि भविष्यातील उत्तरे सुद्धा देऊन ठेवली होती हे आपल्याला कळते.

हळूहळू बाबासाहेबांनी अर्थशास्त्राकडून आपली नजर राजकारण आणि सामाजिक विषयांकडे वळवली. समकालीन सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण बाबासाहेबांनी अतिशय निर्भीडपणे आणि तर्काच्या कसोटीवर केले आहे.

सामाजिक उतरंड आणि तीत दडलेला अन्याय यावर अतिशय तार्किक आणि विश्लेषणात्मक लेखन करताना बाबासाहेबांची लेखणी धारदार होते. इतिहासातील विविध परंपरा, शास्त्रे, ग्रंथ, लोकपरंपरा, रूढी यांचे अतिशय मार्मिकपणे विश्लेषण करताना बाबासाहेब आधुनिक काळातील मूल्यांच्या कसोटीवर ती जोखून पाहतात.

हे करताना ज्या परंपरा काळाच्या कसोटीवर टिकत नाहीत त्यांचा त्याग करण्याचे आवाहन बाबासाहेबांनी केले.

 

 

कास्ट्स इन इंडिया या पुस्तकात बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेची जन्मकथा, जातिव्यवस्थेचे बदलते स्वरूप यावर अतिशय वैज्ञनिक दृष्टीकोनातून भाष्य केले आहे. सती प्रथा, विधवा स्त्रीवर लादलेले नियम, आंतर-जातीय विवाहास विरोध या मार्गांनी जातिव्यवस्थेचे बळकटीकरण कसे होते हे सोदाहरण स्पष्ट केले आहे.

जातीव्यवस्था हि जिना नसलेली इमारत आहे, असे यथार्थ वर्णन बाबासाहेबांनी केले. पुस्तकाच्या सुरुवातीला बाबासाहेबांनी त्यांच्या मतांचे खंडन करणाऱ्यांचे स्वागत केले आहे.

पुढे १९३६ साली बाबासाहेबांना जात -पात तोडक मंडळ , लाहोर यांनी अध्यक्षीय भाषण करण्यास आमंत्रित केले होते. भाषणाची लिखित प्रत बाबासाहेबांनी अगोदर मंडळाकडे पाठवली.

ती पाहून मंडळाने बाबासाहेबांना भाषणात काही दुरुस्ती कारणासी विनंती केली. तेंव्हा बाबासाहेबांनी ती अमान्य करून भाषणातील एक कॉमा सुद्धा कमी करणार नाही असे ठासून सांगितले. मग जात -पात तोडक मंडळाने तो कार्यक्रम रद्द केला.

तदनंतर हे भाषण छापून १९४३ साली प्रकाशित आले. त्याचे नाव आन्हिलिहशन ऑफ कास्ट.

या ग्रंथात बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील जात व्यवस्था, जाती व्यवस्थेचे समर्थन करणारी धर्म शास्त्रे यावर प्रखर टीका करून सर्व धर्म शास्त्रे हि जातिव्यवस्थेला बळकट करणारी आहेत हे सांगितले आहे.

 

 

पुढे “जर तुम्ही जाती व्यवस्थेत छेद करू पाहत असाल तर यासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत वेदांना आणि श्रास्त्रांना डायनामाईट लावावे लागेल. ‘श्रुति’ आणि ‘स्मृति’ ला नष्ट करायलाच पाहिजे. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही.” असे मत मांडले आहे.

जातिव्यवस्थेचा नायनाट करायचा असेल तर जातिव्यवस्थेचा समूळ इतिहास तपासून पाहावा ,लागेल हे बाबासाहेबांना कळले होते. तदनंतर त्यांनी मानवाचा इतिहास अभ्यासावयास सुरुवात केली . बाबासाहेब हे मानववंश शास्त्राचे मोठे अभ्यासक झाले . त्याचा प्रत्यय “हू वर द शूद्राज?” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचताना येतो.

या ग्रंथाचे प्रकाशन इ.स.१९४६ मध्ये झाले. हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी भारतातील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना अर्पण केला आहे. हा एक शोधग्रंथ आहे. ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेलेले आहे.

शूद्र शब्दाची उत्पत्ती शाब्दिक नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे. आज ज्यांना शूद्र म्हटले जाते ते सूर्यवंशी आर्य क्षत्रिय लोक होते, असे या पुस्तकाचे प्रतिपादन आहे.

 

theprint.com

पुढे बाबासाहेब हे मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष बनले. बाबासाहेबांनी जगभरातील राज्य घटनांचा अभ्यास केला . आपल्या देशातील परिस्थिती चा अभ्यास करून एक नवीन संविधान आपल्या देशाला दिले. या संविधानाने भारताला सामाजिक , राजकीय आणि आर्थिक लोकशाही बहाल केली. देशाच्या भविष्यातील प्रवासासाठी मार्गदर्शन केले.

माणसाला माणूस म्हणून दर्जा दिला. सन्मान दिला. समता, बंधुता, स्वातंत्र्य हि महान मूल्ये लोकशाहीचा प्राण बनवली. आज भारतीय लोकशाही हि दिवसे-दिवस मजबूत होत चाललेली आहे ती संविधानाने पुरवलेल्या शिदोरीवरच.

म्हणूनच जगातील सर्वात अर्थपूर्ण आणि सुंदर संविधान म्हणून आपल्या संविधानाचा उल्लेख होतो.

 

 

बाबासाहेबांनी आपल्या देशातील ज्वलंत समस्यांचा सदैव सखोल अभ्यास करून त्यावर उत्तर शोधण्याचे काम केले. बाबासाहेबांचा “थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स” हा ग्रंथ भारताच्या विविधतेतून येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकतो.

भारत हा बहुरंगी , बहुढंगी देश आहे. विविध भाषा या देशाच्या विविध भागात बोलल्या जातात. तेंव्हा राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी “एक भाषा , एक राज्य ” या धोरणा ऐवजी “एक राज्य , एक भाषा ” असे राज्य पुनर्रचना करतानाचे धोरण असावे असे बाबासाहेबानि सुचवले. तसेच उत्तर भारत आणि दक्षिण भारत हा वाद उफाळेल अशी भीती बाबासाहेबांना वाटत होती. जी नंतर खरी ठरली.

उत्तर भारतात अनेक छोटी राज्ये निर्माण करावीत जेणेकरून दक्षिण भारतीयांना उत्तर भारतीयांच्या अधिपत्याखाली आपण आहोत अशी भीती वाटणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते.

 

 

परंतु राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार हि मोठी राज्ये जशीच्या तशी ठेवून बाबासाहेबांना वाटत असलेली भीती कालांतराने खरी ठरली आहे, हे वर्तमान परिस्थितीवरून लक्षात येते.

पुढे बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर बुद्ध अँड हिज धम्म या बाबासाहेबांच्या बुद्ध आणि बौद्ध धर्मावरील लेख आणि भाषणांच्या संग्रहाचे प्रकाशन १९५७ सालींझाले. बुद्धाचे जीवन, बौद्ध धर्म आणि तत्वे यावर समर्पक भाष्य केले आहे.

एकूणच बाबासाहेबांनी आपल्या देशाचा, समाजाचा विविध अंगानी विचार करून भूतकाळात डोकावणारी आणि भविष्यात दिशा दिग्दर्शन करणारी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. इतकेच नाही तर गांधी, जिना, रानडे यांच्यावर तुलनात्मक लेखन करून बाबासाहेबांनी या व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला आहे.

बर्ट्रांड रस्सेल या थोर तत्वज्ञाचे सामाजिक पुनर्रचनेवरील विचार भारताच्या संदर्भात तपासून पहिले आहेत. १९२५ साली लँड रिवेनू कमिटी समोर शेतसारा कशावर बसवावा, यावर मौलिक मार्गदर्शन केले आहे.

हे सर्व कुठून येते ? दिवसाच्या १८-२० तास अभ्यास करून बाबासाहेबांनी आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्ता , प्रचंड इच्छाशक्ती , अथांग करूणा आणि देशावर निस्सीम प्रेम यांच्या जोरावर बृहस्पती ला लाजवणारे ज्ञान प्राप्त केले आहे. आणि त्या ज्ञानाचा वापर सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी आणि सामाजिक क्रांतीचे तत्वज्ञान निर्माण करण्यासाठी केला.

याव्यतिरिक्त बाबासाहेबांचे विपुल लेखन आहे. बाबासाहेबांच्या सगळ्या लेखांचा, भाषनांचा एकाच केंद्रबिंदू आहे. तो म्हणजे माणूस. तळागाळातला माणूस.

जोपर्यंत माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळत नाही, तोपर्यंत जगाच्या काना-कोपऱ्यात बाबासाहेब वाचले जातील. बाबासाहेब रुजतील, बाबासाहेब उगवतील! बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त लाख -लाख शुभेच्छा!

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version