कथा वांझोट्या रेल्वे कोच कारखान्याची
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
मराठवाड्यातील जेष्ठ पत्रकार आणि मूळचे लातूरचेच असलेले विजयकुमार स्वामी यांनी “संधी आणि संकटाचे स्वागत करु या …!”असे म्हणत आजच्या कार्यक्रमाबाबत लिहले आहे की “कधी लाख बेरोजगाराना रोजगार मिळणार, तर कधी पंचवीस, तीस, चाळीस, पन्नास हजार रोजगाराच्या संधी मिळणार म्हणून लातूरकर आणि मराठवाड्यातल्या लाखो बेरोजगार तरुणांची भलामण करणाऱ्या महत्वाकांक्षी रेल्वे बोगी प्रकल्पाच्या भूमिपूजन अर्थात कार्यशुभारंभ समारंभाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प म्हणजे एक संधी आहे, आणि संकटही आहे. काळाची गरज लक्षात घेता संधी आणि संकटाचे सावधपणे स्वागत करणे अनिवार्य आहे.”
मुळात लातूर हे इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी योग्य आहे का? याचा विचार केंद्रआणि राज्यातील “शहाणाक्यांनी” केला आहे का असा प्रश्न पडतो.
कुठलाही प्रकल्प आराखडा तयार करताना तिथल्या पायाभूत सुविधांचा विचार करणे अत्यावश्यक असते. दोन वर्षांपूर्वी ज्या लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा केला गेला तिथे रेल्वे कोच कारखान्याची उभारणी ही केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली शुद्ध थापेबाज घोषणा नाही का? हे संबंधितांनी सप्रमाण सांगावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या दोन-तीन वर्षात पाणी प्रश्नावर मजबूत केले आहे. मात्र, हे काम करताना तांत्रीक त्रुटींमुळे जिल्ह्यातील नद्यांचा ह्रास झाला आहे.
चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामांमुळे धनेगाव धरणाकडे येणाऱ्या आख्या पाण्याचा प्रवाहच बदलल्याची भीती भूगर्भ विभागाच्या अहवालात व्यक्त केली आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जाणार. प्रकल्पासाठी पाणी हा घटक अत्यावश्यक आहे.
यानंतर प्रकल्पासाठी आवश्यक खनिज संपदा लातूरच्या आसपास किंवा मराठवाड्यात कुठे आहे? हे कोणी सांगेल का? उत्तर नाहीच असे असल्यामुळे इतर ठिकाणांवरून हे खनिज येणार याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर वाहतूक खर्च लादला जाणार.
रेल्वे कोच कारखान्यांत आवश्यक अतिकुशल, कुशल मनुष्यबळ मराठवाड्यात उपलब्ध आहे का? पुन्हा उत्तर नाहीच असे आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खात्याने असे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी काय कष्ट घेतले आहेत हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. तसेच हा प्रकल्प लातूरला नक्की व्हायचे कारण संभाजी पाटील असे सांगितले जाते. हे खरे असेल तर संभाजी पाटील यांची विश्वासार्हता तपासावी लागेल.
ज्या संभाजी पाटील यांना बोटाला धरून गोपीनाथराव मुंडे यांनी राजकरणात आणले आज त्यांच्या लेकीला डावलून आपण कसे कृतघ्न आहोत हे पाटलांनी दाखवून दिले आहे.
गोपीनाथरावांनी संभाजी यांना आमदार केले, त्यांच्या मातोश्री रूपाताईंना खासदार केले. स्वतः संभाजी सन २००९ च्या निवणुकीत पडल्यावर गोपीनाथराव मुंडे यांनी संभाजी यांना भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पद बहाल करून पुनर्वसन केले. यानंतर व्यापारात मदत म्हणून वैद्यनाथ बँकेतर्फे कर्जही दिले. शेवटी पैसे परत करत नाही म्हणून बँकेला नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करावी लागली.
कौशल्य विकास मंत्र्यांचे कोणते उद्योग यशस्वी झालेत ते सुद्धा तपासावे लागेल. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वडिलांनी लातूरला सुरु केलेल्या स्पन पाईप कारखाना आज कोणत्या परिस्थितीत आहे? निलंग्यात सुरु केलेले चित्रपट गृह दुसऱ्या व्यक्तीला चालवायला का द्यावे लागले?
शिरूर अनंतपाळ येथील त्यांच्या नातेवाईकांचा व्हिक्टोरिया कारखाना सध्या कोणत्या अवस्थेत आहे? शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी महत्प्रयासाने अंबुलगा येथे एक साखर कारखाना उभारला होता.
ऐंशी – नव्वदच्या दशकात कारखाना उभारणीसाठी आठ ते दहा वर्षे लागली होती. कारखाना चांगला सुरु होता. मात्र, महत्त्वाकांक्षी संभाजी पाटील यांच्या समर्थकांनी कारखान्याच्या एका सभेत गदारोळ घातला. ते प्रकरण इतके पराकोटीला गेले की तिथे झालेल्या गोळीबारात एकजण मृत्युमुखी पडला, तर कोणी गंभीर जखमी झाले. पुढे अंबुलगा कारखाना आपल्या ताब्यात घेतल्यावर संभाजी पाटलांनी किती वर्षे यशस्वी चालवला? संभाजी पाटलांचा कोणता उद्योग यशस्वी आहे हे त्यांच्या चाहत्यांनी सांगावे.
औरंगाबादला राहुल चौधरी काय करतात? मुंबईला डॉ. महेश क्षीरसागर आपले वैद्यकीय केडर सोडून काय करतात? पुण्यात आणि पिंपरी चिंचवड येथे संभाजी पाटील यांच्या सोबत शिकायला असणाऱ्या व्यक्ती नेमक्या करतात तरी काय असा प्रश्न पाटील यांचेच कार्यकर्ते काल मी लातूरला गेलो असताना दबक्या आवाजात बोलत होते. कामगार उपायुक्त म्हणून अतिशय चांगले काम करणारे अभय गित्ते यांना कामगार विभागाने पुण्याला का पाठवले?
या प्रश्नाचे उत्तर मंत्री महोदय सामान्य जनतेला देतील का? देवगीरी प्रांत प्रचारक असलेल्या एका व्यक्तीने पाटलांच्या खात्याकडे मराठवाड्यात आय. टी. आय. सुरु करण्याच्या इच्छेने एक प्रस्ताव दाखल केल्याचे समजते. यानंतर संघातील अनेक दिग्गजांनी, विविध मंत्र्यांनी याबाबत शिफारस करून अजून “ती” फाईल पेंडींग का असावी?
जाता.. जाता…
“मराठवाडा रेल्वे कोच कारखाना” कार्यशुभारंभ कार्यक्रमाच्या जाहिरातीत आणि निमंत्रणात काही वर्षे लातूरच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचे नाव नाही. गोपीनाथरावांचे अनंत उपकार संभाजी पाटलांवर असून पाटील हे पंकजांना अशी सापत्न वागणूक देत असावेत. या कृत्याला कृतघ्न याशिवाय दुसरा शब्द वाचकांनी सुचवावा. या कार्यक्रमाच्या काही बॅनरवर मोदी, शहा, दानवे, फडणवीस, गोयल यांचे फोटो असणे समजू शकते. मात्र नितीन गडकरी यांचा फोटो असण्याचे कारण काय असावे? हे संभाजी पाटील निलंगेकर आणि त्यांच्या यंत्रणेलाच ठाऊक.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.