….आणि गीतरामायणातील “या” ओळी ऐकल्यानंतर प्रत्यक्ष स्वा.सावरकरही गहिवरले होते..!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
लेखक : शुभम क्षीरसागर
===
आजकालच्या काळात सुश्राव्य अशी फार कमी गीतं ऐकायला मिळतात. असली तरी ती संगीतामुळे सुश्राव्य होतात, काही अपवाद सोडले तर सहसा त्या गीतांना फारसा अर्थ म्हणून काही नसतोच.
म्हणून आजही जुन्या अजरामर गाण्यांना ऐकणारे लोकं भरपूर आहेत.
अशाच जुन्या गीतांपैकी अजरामर झालेलं एक काव्य म्हणजे गीतरामायण! संगीतकार सुधीर फडके आणि गीतकार गजानन माडगूळकर यांनी मिळून रामायणाचं केलेलं गीत रूपांतरण म्हणजे गीतरामायण!
या काव्याची सुरुवात खरं तर आकाशवाणीवर दर रविवारी प्रसारित होणारा एक कार्यक्रम म्हणून झाली होती. अल्पावधीतच या कार्यक्रमाला अभूतपूर्व यश मिळत गेले.
त्यामागचे कारण होते अवीट गोडी असणारी गीतं आणि संगीत! साक्षात सरस्वती प्रसन्न असणाऱ्या गदिमांनी जेव्हा एक एक गीत रचायला सुरुवात केली, तेव्हा कमीत कमी शब्दांत गहन अर्थ भरण्याची त्यांची हातोटी प्रत्येक गीतात दिसून आली.
एकूण ५६ गीतं असणारा हा कार्येक्रम आकाशवाणी पुणे केंद्रावर रामनवमीच्या दिवशी दि. १ एप्रिल १९५५ रोजी सकाळी १० वाजता पहिल्यांदा प्रसारित झाला.
त्याच वेळी आलेला अनुभव नंतर गदिमांनी व बाबूजींनी सांगितला होता. तो असा,
“पहिलाच दिवस होता, गीतरामायणाचं पहिलं गीत लिहून, चाल लागून तयार होतं. फक्त सादर करण्याचा अवकाश होता.
आकाशवाणीने सर्व वेळा आधीच कळवून ठेवल्या होत्या आणि रामायणाचे गीत रूपांतर ऐकायला अनेक जण उत्सुकतेने वाट बघत होते दहा वाजण्याची.
पण सकाळी ऐनवेळी गाण्याची प्रत सापडेचना.”
भरपूर शोध घेतला पण व्यर्थ. शेवटी वेळ जवळ येत चालली होती. मग केवळ अर्ध्या तासात प्रतिभावान गदिमांनी नवीन गीत लिहिलं, त्याला बाबूजींनी अजरामर चाल लावली.
आणि आपल्यासमोर प्रकटलं एक नितांत सुंदर आणि अजरामर गीत – “स्वये श्रीराम प्रभू ऐकती , कुश लव रामायण गाती”
एक अनुभव सांगताना बाबूजी लिहितात की, शिवाजी मंदिरात एकदा गीतरामायण सादर करताना स्वा. सावरकर त्या कार्येक्रमाला हजर होते. समोरच लोडाला टेकून तात्याराव बसलेले होते.
त्यांच्या समोर गीतरामायण सादर होत होते आणि बाबूजी गाऊ लागले, “दैव ज्यात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा!” तात्याराव तल्लीनतेने ऐकत होते, एकेक कडवं पुढं सरकत होतं आणि नवव्या कडव्याला सुरुवात झाली –
“नको आसू ढाळु आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा,”
एवढं गाताच तात्यारावांना गलबलून आले, त्यांच्या डोळ्यात क्षणभर पाण्याचा थेंब चमकला, आणि बाबूजी म्हणतात “त्या दिवशी मला स्वरांचे सामर्थ्य जाणवले”
असंच पंढरपुरात एकदा विनोबा भावे यांच्या उपस्थितीत गीतरामायण ऐकवायला गदिमा आणि बाबूजी गेले होते. विनोबांच्या समोर गीतरामायण सुरू झाले, बाबूजी शेवटी भैरवी आळवु लागले, शब्द होते,
“काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण”
आणि विनोबांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. अशी ही गीतरामायणाची थोरवी!
विद्याताई माडगूळकर यांनी सांगितलेली एक आठवण सुद्धा अशीच थोर – त्या सांगतात की,
“एकूण ५६ गीतं लिहिली पण गदिमांना गीत सुचायला कधी वेळ लागला किंवा त्रास झाला असं झालंच नाही फक्त एक गीत सोडून. त्या दिवशी रात्री गदिमा गीत लिहायला बसले होते, उशिरा रात्री विद्याताईनी विचारले , “काय झाले का गीत लिहून ?”
गदिमा म्हणले, ” नाही, प्रसूतीवेदना होत आहेत, राम जन्माला यायचा म्हणजे वेळ लागणारच, तो काय अण्णा माडगूळकर आहे का?
दुसऱ्या दिवशी सकाळी सुंदर गीत लिहून तयार होते, शब्द होते,
“चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी,
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती,
दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला “
असे हे थोर काव्य शतकात एखाद्या वेळीच होते, ते ऐकून त्याचा अनुभव घेणे याशिवाय दुसरा आनंद नाही, वेगवेगळ्या रागातील, भावनांतील गाणी तितक्याच सहजतेने समाविष्ट असणे यात गीतरामायणाची थोरवी आहे. नक्की ऐकावे असे.
संदर्भ –
1. जगाच्या पाठीवर – सुधीर फडके
2. इंटरनेटवरून साभार.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.