' एका युवराजाचा खून, अन त्यावरून पेटलेलं “वर्ल्ड वॉर”, अज्ञात इतिहास – InMarathi

एका युवराजाचा खून, अन त्यावरून पेटलेलं “वर्ल्ड वॉर”, अज्ञात इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सेराजोव्हा…

युरोपातील एक शहर…

२४ जून १९१४ रोजी ऑस्ट्रिया-हंगेरी या युरोपियन साम्राज्याच्या राजगादीचा वारस, युवराज आर्चड्युक फ्रान्झ फर्डीनांड पत्नी सोफीसमवेत लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या शहराच्या सफरीवर आले होते. सारे शहर आकर्षक कमानी, रंगबिरंगी पताक्यांनी सजले होते. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी जमली होती.

नागरिक अगदी उत्स्फूर्तपणे जयजयकार करीत सपत्नीक आलेल्या ऑस्ट्रियन युवराजाचे स्वागत करत होते. आपल्या ओपन मोटारीतून आर्चड्युक निघाला होता.

 

First-world-war-inmarathi02

 

तेवढ्यात ब्लॅक हँड या सर्बियन दहशतवादी संघटनेचा एका १९ वर्षाच्या किशोरवयीन तरुणाने बंदूक वर काढली आणि अगदीच वेळ न दवडता नेम धरला तो युवराजावर.

काही क्षणात ही थरारक घटना घडली आणि युवराज व त्यांची पत्नी तिथेच कोसळले. एकच हल्लाकल्लोळ माजला आणि स्वागत करण्यास जमलेला जमाव पांगला. सुरक्षारक्षकांनी युवराज यांना घेरले पण वेळ निघून गेलेली होती आणि युवराजचे शेवटचे शब्द होते,

“सोफी, सोफी… तुला जिवंत राहायचं आहे, आपल्या मुलांसाठी…”

 

First-world-war-inmarathi01

 

या खुनामुळे युरोपातील काळरात्र सुरू झाली होती. एका भयंकर विश्वयुद्धाचा डंका वाजला होता. या खुनामुळे जे युद्ध पेटले ते तब्बल चार वर्षे चालले.

जवळजवळ ३० राष्ट्रे यात ओढली गेली. चार साम्राज्ये उलथून पडली. काही नवीन राष्ट्रे जन्माला आली. एक कोटींच्यावर सैनिक मृत्युमुखी पडले आणि तेवढ्याच संख्येत नागरिक भूकबळी, रोगराई, क्रांत्या यांना बळी पडले. या सगळ्यात आर्थिक नुकसानीची तर मोजदादच अशक्य होती.

इतकी भयंकर आपदा आणि विनाश एकसाथ याआधी कोणीही पहिली नव्हती, म्हणूनच या युद्धाला कालांतराने “पहिले महायुद्ध, द ग्रेट वॉर” असे संबोधले जाऊ लागले.

आता एका युवराजच्या खुनावरून एवढे मोठे महाभारत घडले खरे – पण हा खून कारण ठरण्यापेक्षा जास्त निव्वळ निमित्त ठरले. या आधीच्या काळात युरोपचे रूपांतर एका दारूगोळ्याने भरलेल्या कोठारात होत होते.

 

archduke_assass_ju_inmarathi

 

हा काळ युरोपातील साम्राज्यांचा एकमेकांत वाढीस लागलेला द्वेष, कट्टर बनत चाललेला राष्ट्रवाद, कडवट होत चाललेली स्पर्धा अश्याकाही गोष्टींनी भरून गेला होता. फक्त आता एखादी ठिणगी पडण्याचा अवकाश होता, आणि एका ऑस्ट्रियन युवराजाचा खून ही घटना भडका उडायला पुरेशी ठरली.

तर अश्याप्रकारे सुरू झालेल्या युद्धाची अधिकृतपणे घोषणा २८ जुलै १९१४ साली झाली. ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर युद्ध जाहीर केले होते. नंतर सर्बियाच्या मदतीला रशिया धावून आला, जर्मनांनी ऑस्ट्रिया-हंगेरीला अभय दिलेच होते त्याने त्याच्या फंडामेंटल एनिमी फ्रांसवर युद्ध पुकारले, रशियाने जर्मनीवर युद्ध घोषित केले, परिणामी इंग्लंड, टर्की, इटली आणि सरतेशेवटी अमेरिकाही या युद्धात उतरले. याकाळात निम्म जगच दोन भागात विभागले गेलेलं होत.

एकीकडे जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, टर्की यांची अलायन्स तर दुसरीकडे फ्रांस, ब्रिटन आणि रशिया यांची ट्रिपल इंटेटे तयार झालेली होती. इटलीने यावेळी स्वार्थ साधत इंग्लंडच्या बाजूने लढायचा निर्णय घेतला आणि अमेरिकेला यात नाईलाजाने का होईना उतरावं लागलं. ही काही दशके महाभयंकर परिणामांची होतीच याचा संपूर्ण आढावा घेण्याकरिता आपल्याला युरोपातील किमान ३०-४० वर्षे आधीची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती पडताळली आणि कारणमीमांसा केली पाहिजे.

१) साम्राज्यवाद –

युरोपचा नकाशा त्यावेळी आजच्यापेक्षा वेगळा होता, डेमोक्रेटिक नेशनचे वारे वाहू लागले होते. हे खरं होतं परंतु आणखी काही काळ तेथील बड्या साम्राज्यांचं युरोपभर वर्चस्व नक्कीच होतं. हा साम्राज्यवाद अस्ताच्या काठावर पोचला असला तरी रशिया, ब्रिटन, ऑस्ट्रिया-हंगेरी, इटली फ्रान्स आणि जर्मनी सारखी साम्राज्ये विस्ताराची स्वप्ने पाहण्यात मग्न होती. १८७१ ला झालेल्या जर्मनीच्या एकीकरणानंतर (unification of germany) युरोपातील राजकीय स्थिती बदलत गेली.

 

german-unification-inmarathi
mapshop.com

युरोपातील साम्राज्यवादाचे मुख्य शिलेदार होते ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया. कट्टर राष्ट्रवादाची मुळें रोवली जात होती, आणि याला आद्योगिक क्रांतीचे खतपाणी मिळाल्यामुळे या राष्ट्रवादाने उग्र आणि लढाऊ रूप धारण केले होते. या लढाऊ राष्ट्रवादातूनच कडवट स्पर्धा निर्माण झाली.

ही स्पर्धा मुख्यतः स्वतःच्या राष्ट्राला युरोपात सर्वाधिक राजकीय प्रतिष्ठा मिळवून देण्याची होती. याबरोबरच आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या भागात आपापल्या वसाहती निर्माण करण्यासाठीची होती.

वसाहती निर्माण करणे म्हणजेच देशातल्या वाढत्या औद्योगिकरणाला जमीन आणि मार्केट उपलब्ध करून देणे होय. हेच राजकीय वर्चस्व आणि प्रतिष्ठेचं बनलं होतं. वसाहती निर्माण करण्यात फ्रान्स आणि ब्रिटन ही राष्ट्रे इतरांत अग्रभागी होती. त्यामुळेच की काय ब्रिटन आणि फ्रान्समध्ये हितसंबंध एवढे मित्रत्वाचे उरले नव्हते, हो पण अगदीच शत्रुत्वही नव्हतं.

आता जर्मनीच्या एकीकरणाआधी फ्रँको-जर्मन सीमेवर असलेले अलसेस आणि लॉरेन हे छोटे प्रदेश जर्मनीने १८७० साली झालेल्या युद्धातील फ्रान्सवरील विजयाच प्रतीक म्हणून स्वतःकडे ठेऊन घेतले.

पुढे लगेच जर्मनीचे एकीकरणही पॅरिसच्या वरसाइल्सच्या किल्ल्यात झाले. आता हा वार फ्रान्सच्या मानाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे ठरू नये तर नवलच!

जर्मनी-फ्रान्स हे एकमेकांचे fundamental enemy बनले होते. ऑस्ट्रिया-हंगेरी हे त्यावेळी जर्मनीच्या बाजूलाच असलेलं साम्राज्य. ऑस्ट्रिया-हंगेरी या साम्राज्यात जवळजवळ दहा विविध प्रांतीय एकत्र नांदत होते. जर्मन, हंगेरीयन, झेक, स्लाव्ह, पोलिश, सर्बियन स्लाव्ह इत्यादी बहुप्रांतीय समाजाचा समावेश एका साम्राज्यात झाला होता. परंतु सर्बिया या शेजारच्याच राष्ट्राला वाटत होते की सर्व स्लाव्ह पंथीय आणि त्यांचा प्रदेश एका छताखाली यावा म्हणजेच सर्बियामध्ये विलीन व्हावा, याच कारणाने सर्बिया आणि ऑस्ट्रिया-हंगेरी मध्ये वितुष्ट निर्माण झालेले होते.

 

austria-hungery-inmarathi
britannica.com

यासगळ्यात रशियाच सर्बियाला बॅकिंग होतंच कारण रशिया मूलतः स्लाव्ह रेसला बिलॉंग करत होता, आणि त्याची विचारसरणी पॅन-स्लाव्हिजम ही होती म्हणजेच सर्व-स्लाव्हवाद. यासगळ्यात टर्कीसारख्या विशाल साम्राज्याला विसरून चालणार नाही. टर्कीचे ऑटोमन साम्राज्य हे तेराव्या दशकापासून ते अठराव्यादशकपर्यंत युरोपावरच काय मध्य आशियापर्यंत पसरलेला होता. ब्लॅक सी, Mediterranean Sea ते गल्फ ऑफ इराण पर्यंत प्रवेश होता.

पूर्वी ऑटोमन साम्राज्याला ‘फॉसिल ऑफ पास्ट’ असेही म्हणायचे. परंतु काळ लोटत गेला आणि हे भलंमोठं साम्राज्य तुटू लागलं, एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकांत टर्कीचे ऑटोमन साम्राज्याची पानगळ सुरू झालेली होती.

टर्कीपासून वेगळी झालेली राष्ट्रे बाल्कन म्हणून उदयास आली. याला एकोणिसाव्या शतकाचा उदयोन्मुख राष्ट्रवाद कारणीभूत होता.

या बाल्कन राष्ट्रांवर प्रभुत्व मिळविण्याचा रशियाचा मानस होता. युरोपीय राष्ट्रांच्या बर्लिन काँग्रेसच्या काँफरन्समध्ये बऱ्याच महत्वाच्या गोष्टी निश्चित झाल्या. १८७८ च्या बर्लिन काँफरन्समध्ये ठरल्याप्रमाणे ऑस्ट्रिया-हंगेरीला बोसनियाचा कारभार सोपविला गेला आणि क्रिमियाचा प्रदेश रशियाच्या अधिपत्याखाली गेला, बल्गेरिया आणि रोमानिया हे देश स्वतंत्र म्हणून घोषित करण्यात आले. जर्मनीचा नवा राजा होता बिसमार्क.

 

Otto-von-Bismarck-inmarathi

 

प्रिन्स बिसमार्क कधी युद्धाला घाबरला नव्हता पण तो एक वास्तववादी देशभक्त होता. जर्मनीच्या मध्यवर्ती भौगोलिक स्थानामुळे त्याला जसे फायदे मिळतात, त्याचप्रमाणे त्याची चोहोबाजूंनी कोंडीही केली जाऊ शकते हे तो जाणून होता. जर्मनीच्या विशिष्ठ भौगोलिक स्थानामुळे तिला वसाहती पचणारे नाही आणि व्यापारवाढीपेक्षा त्याला युद्धात गुंतवून घेणे कमी महत्वाचे वाटले.

त्याने स्वतःच्या राष्ट्राला सबळ आणि भक्कम बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याच्या नव्या परराष्ट्र धोरणाने जर्मन राष्ट्र नव्याने पुढे येऊ पाहत होता.

त्याच्या परराष्ट्र धोरणानुसार त्याने कोणत्याही युद्धास नकारात्मक भाव स्वीकारला होता, तर त्याचे ध्येय जर्मनीचे जलद औद्योगिकरण करणे हेच होते. आणि युरोपात शांततापूर्ण मैत्रीचे संबंध निर्माण करणे हा त्याचा हेतू होता.

यानुसारच जर्मनीने ऑस्ट्रिया-हंगेरी सोबत अलायन्स बनवून ब्रिटन आणि रशिया सोबत मैत्रीपूर्ण करार केला. अर्थात ब्रिटन आणि राशियासोबतचा करार टिकला नाही हा भाग वेगळा त्याला कारणेही आहेत. बिसमार्कच्या अधिपत्याखाली जर्मनीने बराच औद्योगिक विकास केला आणि सुकाळ अनुभवला.

ब्रिटनशी वैर येऊ नये याचीही त्याने काळजी घेतलेली, त्याने ब्रिटनसोबत या काळात एक करार केला होता, त्यानुसार जर्मनी युरोपाबाहेरील राजकारणात हस्तक्षेप करणार नाही, युरोपाबाहेर साम्राज्यविस्तार करणार नाही आणि सागरात वर्चस्व गाजविण्यासाठी नौदल आरमार उभारणार नाही.

 

germany-britain-pact
weebly.com

आता ब्रिटन सारख्या बलाढ्य साम्राज्याचं काही बिघडेल अशी कोणतीही धोरणं बिसमार्कने बाळगली नव्हती थोडक्यात त्याला ब्रिटनसारख्या महाशक्तीला आव्हान द्यायचे नव्हते हे कळते. इंग्लंडचेही त्याच्या औद्योगिक विस्तारास सहमती देणे साहजिकच होते.

परंतु हा सुकाळ आणि शांतता टिकणारी नव्हतीच! १८९० ला बिसमार्कचा सत्तेवरून पायउतार करण्यात आला आणि जर्मन सत्तेवर आला होता कायझर विलियम. याचे परराष्ट्र धोरण आणि अतिमहत्वकांक्षा जर्मनीला घातक ठरत गेली आणि युरोपातील सर्व गणितेच बदलली. असे म्हणतात की,

“औद्योगिकरण हे आर्थिक साम्राज्यवादाला जन्म देणारे सर्वात मुख्य कारण असते.”

याचे उद्दिष्ट्य फक्त औद्योगिकरण नसून जर्मनीचा पूर्ण विस्तार असे होते, त्यासाठी त्याने नवीन परराष्ट्र धोरण जाहीर केले. त्यानुसार जर्मनी यापुढे अधिकाधिक औद्योगिकरणावर भर देणार, जागतिक राजकारणात हस्तक्षेप करणार आणि स्वतःच्या राष्ट्राचे नेव्हल एमपावरमेन्ट करणार. याचा परिणाम जगावर न होता राहणार नव्हताच!

 

wilhelm-kaisar-inmarathi
nationalinterest.org

जर्मनीच्या जलद औद्योगिक विस्तार आणि विकास पाहता त्याने लोह आणि स्टीलच्या प्रोड्क्शनमध्ये बाजी मारली, स्वतःचे आरमार तयार केले, राजकीय हस्तक्षेप वाढवले, बर्लिन-बगदाद रेल्वेलाईनचा प्रस्ताव असो की किल (kiel canal) कॅनॉलचा प्रस्ताव, आता हे सगळे ब्रिटनच्या लक्षात न येण्यावाचून राहणारच नव्हते. जर्मनीची ही हालचाल ब्रिटनला घातक वाटत होती. तर ऑस्ट्रिया- सर्बिया आणि रशिया टर्की यांचे प्रांतवाद तर परस्परात कडवटपणा आणणारे होते.

२) हितसंबंधांच्या रक्षणार्थ केलेली गटबाजी आणि आघाडी –

युरोपात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीयदृष्टया मजबूत राहणे गरजेचे झाले होते आणि युरोपियन साम्राज्यात आता मित्रपक्ष तयार करणे आवश्यक होते.

“राजकारण म्हणजे स्वहेतुपुरस्तर, स्वार्थासाठी एकमेकांत हितसंबंध जोपासणे अथवा निर्माण करणे.”

आता या युद्धपुर्व काळात कोणी कोणासोबत कसे आणि कोणते करार केले हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे. तर पुन्हा मागे जाऊन या राष्ट्रांची एकमेकांत कशी गटबाजी झाली ते पाहू.

जर्मनीच्या एकीकरणानंतर (unification of germany) बिसमार्कने त्याच्या काळात भविष्याच्या दृष्टीने बऱ्याच हालचाली करून ठेवल्या होत्या. त्याच्या fundamental enemy फ्रान्सला एकटा पडण्याचा बंदोबस्त बिसमार्कने आधीच केला होता. त्याची सर्वात पहिली अलायन्स होती ती म्हणजे ऑस्ट्रिया-हंगेरी आणि रशिया सोबत. आता ही फळी जास्त काळ टिकू शकली नाही हा भाग वेगळा, कारण मुळात ऑस्ट्रिया आणि रशिया इंपिरियल साम्राज्य होते, आणि रशियाला ऑस्ट्रीयाचा विस्तार आणि सामर्थ्यवान होण्यास विरोध होता.

सर्व-स्लाव्हवाद म्हणजेच पॅन-स्लाव्हिजम या विचारधारेनूसार स्लाव्ह पंथीय सर्व प्रांत स्वतःच्या अधिपत्यात यावा असा रशियाचा मानस होता.

नंतर कायझरच्या जलद विस्तारीकरणाच्या धोरणाने हरकतीत आलेला ब्रिटनही आता फ्रान्ससोबतच्या आपल्या जुन्या हितसंबंधांना पुनःप्रस्थापित करण्यास सज्ज झाला आणि १९०४ साली अँग्लो-फ्रेंच सेटलमेंट करार झाला.

 

britain-russia-pact-inmarathi
static01.nyt.com

ऑस्ट्रियाची पाठराखण करणारा जर्मनी नेहमीच रशियाला खटकत होता आणि दुष्मन का दुष्मन दोस्त होता है! म्हणून रशियाने नाईलाजाने फ्रान्स सोबत १८९४ मध्ये करार केला. ब्रिटन आणि रशियातही १९०७ मध्ये अँग्लो-रुसो करार झाला. अश्या रीतीने युरोपातील युद्धपुर्व फळी तयार झाली. आता यामध्ये इटली आणि टर्कीचा सहभाग नसेल तर नवलच!

फ्रान्सच्या अधिपत्याखाली असलेला ट्युनिशिया प्रदेश मिळवून देण्याचा वादा करून बिसमार्कने त्याच्या काळात इटलीला आपल्या फळीत सामील करण्याची तरतूद केलेली होती.

कालांतराने युद्ध सुरू झाल्यानंतर इटलीने चलाखीने स्वार्थापोटी आपला गट बदलला होता. ब्रिटनने स्वतःच्या आफ्रिकेतील काही वसाहती इटलीला मिळवून देण्याचे आमिष दाखवून वळवून घेतले होते. टर्कीसारख्या साम्राज्याचे या गटबाजीत आगमन झाले ते रशियाच्याबाबतीत असलेलं वैर आणि वितुष्ट.

१२०० च्या काळापासून अस्तित्वात असलेलं भलंमोठं साम्राज्य, कालांतराने वेगळी झालेली राष्ट्रे यामुळे ऑटोमन साम्राज्य कमकुवत बनले होते. बाल्कन युद्धानंतर अस्तित्वाच्या कठड्यावर पोहोचलेल्या टर्कीला आता या युद्धात उतरून काही प्रदेश जिंकून आपले साम्राज्य टिकवायचे होते. तर अश्या पद्धतीने रशिया-इंग्लंड-फ्रान्स-इटली यांची ट्रिपल-अलायन्स तर जर्मनी-ऑस्ट्रिया-टर्की अशी ट्रिपल-इंटेटे अशी फळी तयार झाली.

३) ऑस्ट्रिया-हंगेरी आणि सर्बियामधील प्रांतवाद आणि प्रतिस्पर्धा –

 

First-world-war-inmarathi05

 

ऑस्ट्रिया-हंगेरी आणि सर्बिया ही युरोपातील बाजबाजूची साम्राज्ये होती. तुर्कीच्या अधिपत्याखाली असलेला सर्बिया बंधमुक्त केला पण ऑस्ट्रियामध्ये समाविष्ट न करता या प्रदेशाला स्वतंत्र ठेवण्यात आले होते.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी सर्बियाच्या काही जहाल राष्ट्रवादी नेत्यांमुळे सर्व सर्बियन एका छताखाली आणण्याची स्वप्न सर्बियन्स बघू लागले. याआधीही बर्लिन कॉन्फरन्समध्ये झालेल्या निर्णयानुसार बोसनियाचा कारभार ऑस्ट्रियाकडे देण्यात आला होता, तेव्हाही सर्बियाची नाराजी झालीच होती, पण ऑस्ट्रिया-हंगेरी आणि सर्बिया यांच्या वैराला धार चढली ती १९०८ च्या एका घटनेमुळे.

ती म्हणजे बोसनिया आणि हर्झेगोविना हे प्रांत ऑस्ट्रिया-हंगेरीला कायमचे जोडून घेण्याची ऑस्ट्रियन परराष्ट्रमंत्री यांची घोषणा.

ऑस्ट्रिया-हंगेरी बद्दल वाढता द्वेष एवढीच या प्रकरणाची निष्पत्ती होती.

आर्चड्युकच्या खूनानंतर सर्बियन वृत्तपत्रांत प्रिंसिपचा (युवराजचा मारेकरी) गौरवच करण्यात आला. ऑस्ट्रिया-हंगेरीच्या राज्यकर्त्यांना फ्रान्झच्या खुनाचे दुःख झाले की नाही, हे साशंकच पण या संधीचा फायदा घेऊन आपल्याला सतत सतावणाऱ्या सर्बियाचा कायमचा निकाल लावावा, असे ऑस्ट्रीयाची मनस्थिती झाली होती. आता मात्र एक महिन्याची मुदत देऊन ऑस्ट्रियाने सर्बियावर २८ जुलै १९१४ रोजी युद्ध जाहीर केले.

 

war-against-surbia-inmarathi
amazonaws.com

सर्बियाने यासाठी रशियाकडून पाठबळ मिळवले. जर्मनीला रशियाचा हा हस्तक्षेप रुचला नाही. परंतु आपल्या जुन्या शत्रूला नमविणे जास्त महत्वाचे वाटल्याने जर्मनीने फ्रान्सवर युद्ध घोषित केले, १८९४ मध्ये झालेल्या करारानुसार रशिया फ्रान्सच्या मदतीला धावला आणि रशियाने जर्मनीवर युद्ध पुकारले.

आता फ्रान्सवर हल्ला करण्यासाठी सोपा आणि जलद मार्ग बेल्जियममार्गे होता. परंतु बेल्जियम, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड हे देश न्यूट्रल म्हणून मान्य करण्यात आले होते आणि या प्रदेशांच्या सार्वभौमत्वाची जबाबदारी होती ब्रिटनकडे.

जर्मनीचे वाढते सामर्थ्य मित्रसंघात आधीपासून खुपतच होते, आणि जर्मनीला पराभूत करण्याची संधी चांगली चालून आली होती आणि फ्रान्स या मित्रराष्ट्राला मदत करणे हेही करारानुसार गरजेचे होते. तर इंग्लंडने जर्मनीवर युद्ध पुकारले.

 

Evening-World-August-inmarathi
publicbroadcasting.net

सेराजोव्हा येथील एका खुनाच्या घटनेतून निर्माण झालेली युरोपची शोकांतिका टाळता येणे शक्य नव्हते. युरोपीय राष्ट्रांचा साम्राज्यवाद, उद्योगिक स्पर्धा, प्रांतवाद आणि कट्टर राष्ट्रवादी कल्पना इतक्या पराकोटीला पोहोचल्या होत्या की युद्ध हे अटळ होते. आणि याला पर्याय नव्हता.

१९१४, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात युरोपमधील लक्षावधी सैनिक एकमेकांत लढण्यासाठी रणांगणात उतरले होते. ब्रिटिश परराष्ट्रमंत्री एडवर्ड ग्रे खिन्न होऊन बोलला,

“युरोपात सर्वत्र दिवे मालविले जात आहेत. ते पुन्हा उजळलेले पाहण्याचे भाग्य आपल्याला या आयुष्यात लाभेल असे दिसत नाही”.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?