आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – अभिजित पानसे
चित्रपट, क्रीडा समीक्षक आहेत. विविध वृत्तपत्र, मासिकांमध्ये त्यांचे समीक्षणपर लेख प्रसिद्ध होत असतात.
—
वेलकम चित्रपटात गाडीवर बसलेल्या अक्षय कुमारचं अनिल कपूर चित्र काढत असतो तेव्हा अक्षय कुमार गाडीवरून घसरत म्हणतो, “आय एम नॉट स्लीपिंग, आय एम स्लिपिंग! म्हणजे मी झोपत नाही आहे घसरत आहे. अशीच काहीशी अवस्था स्लिप्समधील भारतीय खेळाडूंची टेस्ट क्रिकेटमध्ये होते आहे. सध्या भारतीय खेळाडू सुद्धा स्लिप्समध्ये घसरत आहेत आणि वेगळ्याच गुंगीतसुद्धा आहेत.
स्लिप फिल्डर्स हे टेस्ट क्रिकेटचे फिल्डिंग करणाऱ्या बाजूचे आधारस्तंभ असतात. त्यांच्यावर फार मोठी भिस्त असते. राहुल द्रविड, लक्ष्मण, अनिल कुंबळे, क्वचित सेहवागसुद्धा हे स्लिपमध्ये फिल्डिंग करण्यात पारंगत होते.
कॅचेस ते ही सोडायचे पण त्यांचं तंत्र किमान अचूक होतं. पण सध्याच्या भारतीय टीममध्ये मात्र कोणीही स्लिप स्पेशलिस्ट नाहीये. आपल्याकडे शाळेत एक पद्धत असते, जो अभ्यासात हुशार मुलगा किंवा मुलगी, त्या विद्यार्थ्याला वर्गाचा मॉनिटर, कॅप्टन, विद्यार्थी प्रमुख बनवतात. भारतीय टीममध्येही हेच होतं.
जे टीममध्ये बॅट्समन असतात, त्यांना स्लिप्सध्ये उभं केलं जातं. जणू स्लिप्समध्ये उभं राहिल्याने त्यांचा अहंकार सुखावतो, भारतीय सिनिअर बॅट्समन्सला दुसरीकडे फिल्डिंग करण्यास कमी समजतात.
आजवर जी टीम मोठ्या काळासाठी कसोटी मध्ये नंबर वन राहिली आहे तिचं स्लिप्स मधील भाग हा नेहमीच पक्का राहिलाय. ऑस्ट्रेलिया टीम जेव्हा कसोटीमध्ये अजेय होती, तेव्हा स्लिप स्पेशालिस्ट ‘क्षेत्ररक्षक’ ठेवले जात. कित्येकदा कॅप्टन रिकी पॉंटिंगसुद्धा मिडऑन किंवा मिडऑफवर उभा राहायचा.
पण भारतीय कॅप्टन्स, सिनिअर खेळाडू नेहमीच यात स्वतःला ‘पाटील’..’साहेब’ समजतात. ते स्लिप्समध्ये उभे राहतात.
मैदानावरील एक चांगला क्षेत्ररक्षक खेळाडू हा चांगला स्लिप फिल्डर असतोच असं नाही. नाहीतर एरवी सर्वच महान क्षेत्ररक्षक ‘विकेट किपर’ बनले असते. स्लिप फिल्डर्स आणि विकेट किपर मध्ये खूप मोठा फरक नसतो. ‘कॉंन्संट्रेशन’ दोघानाही तितकंच द्यावं लागतं. कोणत्याही क्षणी बॅट्समन्सच्या बॅटची कड घेऊन कॅच येण्याची शक्यता शकते, आणि त्या एका क्षणासाठी पाचशे चाळीस बॉलवर लक्ष केंद्रित करावं लागतं.
त्यामुळेच स्लिप्स फिल्डर्सबद्दल क्रिकेटमध्ये एक शब्द सांगितला जातो तो म्हणजे ‘टेम्प्रमेंट’. स्लिप फिल्डर्समध्ये खूप संयम असावा लागतो. शिवाय स्लिपफिल्डर्स मध्ये एक महत्वाची गोष्ट असावी लागते ती म्हणजे “सॉफ्ट हँड्स” असणे.
वीरेंद्र सेहवागने एकदा म्हटलं होतं, मी जेव्हा आजच्या क्रिकेटर्सशी हात मिळवतो, तेव्हा त्यांचे हात खूप राकट वाटतात. कारण ते सतत जिममध्ये ट्रेनिंग करत असतात. यामुळे स्लिपमध्ये वेगाने कॅच आली की बॉल हातावर आदळून कॅच सुटतो.
शिवाय व्ही व्ही एस लक्ष्मणने बरेचदा सध्याच्या भारतीय स्लिप फिल्डर्सच्या चूका सांगितल्या आहेत की ते स्थिर नसतात. शिवाय कंबरेत जरासं न वाकता, “सुंदर ते ध्यान उभे स्लिप्सवरी” असे कंबरेवर हात ठेवून उभे राहतात. विराट कोहलीसुद्धा योग्य स्लिपफिल्डर नाही. तोही बॉलकडे ‘झेपावतो’.
स्लिप फिल्डर्सकडे एक महत्वाची ‘खुबी’ असावी लागते ती म्हणजे कॅच आल्यावर स्वतः बॉलकडे न जाता, बॉलला आपल्याकडे येऊ द्यायचं असतं.
शिवाय विकेट किपर आणि पहिल्या स्लिपमधील फिल्डर यांच्यात योग्य समनव्य असावा लागतो. पहिल्या स्लीपमधील फिल्डरने विकेटकिपरशी संवाद साधून किपर झेप मारताना किती अंतर कव्हर करू शकतो हे माहिती करायचं असतं. तेथे पहिल्या स्लिप फिल्डरने उभं राहायचं असतं. दुसऱ्या टेस्टमध्ये फिल्डिंग करताना विकेटकिपर पार्थिव पटेल आणि पहिल्या स्लिपमधील चेतेश्वर पुजारासोबत कदाचित संवाद झाला नसावा म्हणून ‘तो’ विचित्र प्रकार घडला.
याशिवाय पहिल्या स्लिप आणि दुसऱ्या तिसऱ्या स्लिप्समध्येही एक महत्त्वाचा फरक असतो. व्हीव्हीएस लक्ष्मणने याबद्दल मागील श्रीलंका टेस्ट सिरीजमध्ये खूप महत्त्वाचा फरक सांगितला.
पहिल्या स्लिप फिल्डरला बॉलर धावत बॉलिंगला येत असताना त्याच्या ऍक्शनकडे, फॉलोथ्रूपासून, बॉल सुटल्यावर बॅट्समनकडे येईपर्यंत बॉलवर लक्ष ठेवायचं असतं. आणि दुसऱ्या स्लिपपासून इतर स्लिपफिल्डर्सला बॉलरकडे, फॉलोथ्रूकडे, हातातून सुटलेल्या बॉलकडे न बघता संपूर्ण लक्ष बॅट्समनच्या बॅटवर ठेवायचं असतं.
म्हणून पहिल्या स्लिपफिल्डर आणि विकेट किपर वर जास्त ताण असतो. याशिवाय प्रत्येक बॉलसोबत “ऑन-ऑफ” स्ट्रेटजी अवलंबावी लागते.
स्लिप्स ही अत्यंत महत्वाची जागा क्रिकेटमध्ये असते. आणि त्यासाठी खास प्रशिक्षण, मानसिकता लागते. तेव्हाच टीम अजेय होते. पण कॅच सोडल्यावरही फिदीफिदी हसणारा शिखर धवन दिसला की चीड येते.
भारताचे मोठे दौरे आता विदेशात आहेत. स्लिप फिल्डर्सची इथे कसोटी लागणार. पण बॅट्समन आहेत म्हणून त्यांना स्लिप्समध्ये उभे करणार असेल तर स्लीपिंग आणि स्लिपिंग होत राहील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com |वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com |त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.