' “रॉकस्टार” : हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सहा वर्ष जुनं स्वप्न – InMarathi

“रॉकस्टार” : हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सहा वर्ष जुनं स्वप्न

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

11.11.11 – रॉकस्टार रिलीज होऊन आज सहा वर्षं झालीत. काही चित्रपट तुमच्या डोक्यापेक्षा हृदयाच्या जास्त जवळ असतात, कितीही वेळा बघितले तरी तुम्ही पुन्हा एकदा नक्कीच बघु शकता आणि तुम्हाला काही ना काही शिकवून सुद्धा जातात.

अश्यापैकी एक म्हणता येईल असा रॉकस्टार!

इम्तियाझ अलीच्या मुव्हीजचा एक ठरलेला पॅटर्न असतो : हिरो आणि हिरोईन भेटतात, जवळ यायला लागतात, एकमेकांपासून दुर होतात आणि शेवटी पुन्हा एकत्र येतात. (अपवाद ‘हायवे’ चा.) इथेही फारशी वेगळी कथा नाहीय पण तरीही त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा हा मनाला जास्त भावतो. कारण त्यातला प्रवास.

rockstar 01 inmarathi

रॉकस्टार हा प्रवास आहे साध्याभोळ्या, टॅलेंटेड तरीही एक लोकल गायक असणाऱ्या जनार्दन जाखडपासुन सुरू होणारा आणि प्रसिद्ध रॉकस्टार, वरून अत्यंत उर्मट, अहंकारी वाटणारा, पब्लिक आणि पत्रकारांना खुलेआम मिडल फिंगर दाखवणारा, अनेक वादविवादांत अडकलेला पण तरीही मनातुन हळव्या, संवेदनशील असणाऱ्या जॉर्डनपर्यंत घेऊन जाणारा.

पण तो तिथेच संपतो का? तर नाही. एका पॉइंटला सगळं काही प्रेक्षकांवर सोडुन देऊन, “पुढे काय?” ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाच शोधायला लावतो.

रणबीर आणि इम्तियाझच्या करिअरमधल्या महत्वाच्या मुव्हीजपैकी एक असणाऱ्या रॉकस्टारमध्ये काही फ्रेम्स, काही प्रसंग, काही डायलॉग्ज जबरदस्त घेतले आहेत. आणि ह्या सगळ्यांतून सतत जाणवत राहातं ते रुमी सोबत असणारं कनेक्शन!

चित्रपट सुरू होताना रणबीरचा डायलॉग आहे

“पता है? यहां से बहुत दुर, गलत और सही के पार, एक मैदान है। मै वहा मिलुंगा तुझे।”

“Out beyond ideas of wrongdoing and rightdoing, there is a field. I’ll meet you there.”

 

rockstar ranbir kapoor 02 inmarathi

आणि जसजसा चित्रपट पुढे सरकत जातो, तसतसा आपल्याला रुमीचा हा quote उलगडत जातो.

आपल्याला दिसते ती जॉर्डनच्या कॉन्सर्टची सुरू असलेली तयारी, अत्यंत उत्साहित आणि खुश असणारे त्याचे फॅन्स आणि आत रिहर्सल करणारा त्याचा क्रु. एकीकडे हे सगळं सुरू आहे आणि दुसरीकडे ह्याचा केंद्रबिंदु असणारा, मुख्य परफॉर्मर जॉर्डनच गायब आहे. पुढच्याच फ्रेमला दिसतो तो शहरातल्या आतल्या एका बोळात जुगारात पैसे हरलेला आणि तिथल्या लोकांशी मारामारी करणारा जॉर्डन. कसाबसा तो तिथुन स्वतःची सुटका करून घेतो आणि चेहऱ्यावर जखम घेऊन कॉन्सर्टच्या ठिकाणी पोहोचतो. एन्ट्रीच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत. सिक्युरिटी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि जॉर्डन जोरात लाथा घालुन ते बॅरिकेड तोडुन वाट काढतो. जणू आपल्या मनातलं सगळं दुःख, सगळा रागच तो त्या बॅरिकेडवर काढत आहे असं वाटतं. ह्या फ्रेमपासुनच हा मुव्ही वेगळा असल्याचं जाणवायला लागतं.

सिक्युरिटी गार्ड्स त्याला ओळखतात आणि भोवती कडं करून त्याला लोकांमधून स्टेजवर घेऊन जातात. घाईघाईत तो तयार होतो, जॅकेट चढवतो आणि गायला सुरवात करणार इतक्यांत चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो.

 

rockstar ranbir kapoor 03 inmarathi

उलगडत जातं ते जनार्दन जाखड उर्फ जेजेचं आयुष्य.

जुन्या दिल्लीत राहणारा, छान गाणं म्हणणारा, गिटार वाजवणारा (आणि वेळप्रसंगी बसस्टॉपवर वाजवलं म्हणून पोलिसांचा मारदेखील खाणारा), स्वप्नं बघणारा, मित्रांच्या घोळक्यात रमणारा, त्यांना वेळोवेळी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये समोसे खाऊ घालणारा सरळमार्गी जनार्दन उर्फ जेजे. स्ट्रगल तर करतोय पण म्हणावं तसं यश काही हाताला लागत नाहीय. अश्यातच त्याच्या जीवनात येतात दोन महत्वाच्या व्यक्ती : मार्गदर्शक म्हणुन कॅन्टीन चालवणारा खताना भाई (कुंदन मिश्रा) आणि जवळची मैत्रीण म्हणुन हीर (नर्गिस फाखरी).

जेजेला नेहमी रागावणारा पण आतुन त्याच्या भल्यासाठी झटणारा खताना भाई आणि मनापासुन जवळ असणारी हीर जणू त्याचं आयुष्य बदलून टाकतात.

जॉर्डन आणि हीरची कथा ह्यातला एक अत्यंत महत्त्वाचा factor. हीरचं लग्न होण्यापूर्वी केवळ निखळ मैत्री म्हणुन असणारं त्यांचं नातं, नंतर काही काळाच्या gap नंतर दोघं एकमेकांना पुन्हा भेटतात तेव्हा बदलायला सुरवात होते.

 

rockstar ranbir kapoor 04 inmarathi

 

आपल्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे ह्याची दोघांनाही हळुहळु खात्री पटायला लागते. हीरचं विवाहित असुनही जॉर्डनकडे आकर्षित होणं, जॉर्डनचं तिच्यात अधिकाधिक गुंतत जाणं आणि ह्या सगळ्याला असलेली समाजाची मर्यादांची चौकट दोघांनाही अस्वस्थ करायला लागते. आणि हे गुंतत जाणं केवळ शारीरिक दृष्टीतून आलेलं नसतं तर त्याहूनही महत्वाचं, मनापासुन आलेलं असतं आणि म्हणुनच ते कठीण असतं.

ह्यातली घालमेल ‘और हो’ गाण्यात खुप सुंदर मांडली आहे.

दोघंही वेगळे होतात, एकमेकांपासून दूर राहायचं ठरवतात पण नियतीचे संकेत वेगळेच असतात. एका वळणावर आपण दोघं made for each other आहोत ह्याची जाणीव दोघांनाही होते. मात्र तेव्हांच येतं ते एक अनपेक्षित वळण.

रॉकस्टार मधल्या मला स्वत:ला आवडणाऱ्या गोष्टींपैकी पैकी एक आहे ते म्हणजे स्व. शम्मी कपुरांनी रंगवलेलं पद्मभूषण उस्ताद जमील खान ह्यांचं पात्र. केवळ काही मिनिटांचा हा रोल शम्मी कपुरांनी अक्षरश: जिवंत केलाय. रॉकस्टार त्यांचा शेवटचा चित्रपट होता आणि जणु हीच जाणीव मनात ठेवुन त्यांनी काम केलंय असं त्यांच्या एकूण एक फ्रेममधुन जाणवतं. विशेषत: त्यांचे डोळे.

रॉकस्टारमध्ये The Dichotomy of Fame नावाचं एक instrumental आहे. अत्यंत समर्पक अश्या ह्या Track मध्ये स्क्रीनवर उस्तादजी सनई आणि जॉर्डन गिटार वाजवताना एकत्र दिसतात. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातले भाव खुप काही सांगुन जातात.

 

rockstar ranbir kapoor shammi kapoor 01 inmarathi

 

त्यांनीच जॉर्डनमध्ये असलेलं talent ओळखलेलं असतं आणि जॉर्डनवर कुणाचा भरोसा नसताना अत्यंत विश्वासाने त्याची शिफारस प्लॅटीनम रेकॉर्ड्सच्या धिंग्रा साहेबांकडे केलेली असते. एकीकडे जॉर्डनची वाढत जाणारी लोकप्रियता, दुसरीकडे त्याचं विचित्र, उर्मट वाटणारं वर्तन, त्याच्या मनात असलेलं दु:ख आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे असणारं, अजूनही आत खोलवर निरागसता जोपासणारं त्याचं मन उस्तादजींना ओळखता येत असावं आणि तेच हे सगळं त्यांच्या डोळ्यातून सांगत असावेत असं वाटत राहतं.

रूढार्थाने जॉर्डन जे काही करतोय ते समाजाच्या दृष्टीने चुकीचं आहे. हे त्यालासुद्धा जाणवतं आहे. त्याच वेळी, त्याला व्हायचं काही वेगळं होतं आणि तो जे काही होण्याचा प्रयत्न करतोय ते काहीतरी वेगळंच आहे ही जाणीवसुद्धा आतुन त्रास देते आहे. पैसा, फेम, मिडिया अटेंशन हे एका वळणावर अर्थहीन वाटायला लागतं. मात्र हीरच्या बाबतीत हीच सामाजिक भल्या-बुऱ्याची चौकट तिच्या हितामध्ये अडथळा ठरतेय हेसुद्धा त्यांना जाणवतं. मला वाटतं, सुरवातीला आलेला रुमीचा quote इथे समर्पक ठरतो. (P.S. हे फक्त चित्रपटाच्या संदर्भात, खऱ्या जीवनात त्याला समर्थन असेलच असे नाही. तितकं समजण्याइतकी maturity आपल्यात आहे असं वाटतं, तरीही आधीच खुलासा केलेला बरा…!)

rockstar ranbir kapoor 05 inmarathi

रणबीरने त्याच्या करिअरमधल्या सर्वोत्तम पर्फोर्मान्सेसपैकी एक रॉकस्टार मध्ये दिलाय. कुंदन मिश्रा नेहमीप्रमाणे मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचं सोनं करतो. कच्चा दुवा जर कुठला असेल तर नर्गिसचा अभिनय. ह्या सगळ्यांमध्ये तीचं नवखेपण सहज कळून येतं. अदिती राव हैदरी, पियुष मिश्रा ह्यांनीसुद्धा मिळालेल्या भूमिका उत्तमप्रकारे निभावल्या आहेत.

आणि रहमानचं संगीत! त्याच्याशिवाय रॉकस्टार अपूर्ण आहे आणि त्याच्याबद्दल लिहावं तितकं कमी आहे. ते लिहित बसलो तर एक स्वतंत्र नोट लिहावी लागेल. रॉकस्टार मधलं ते रेबेलीअस फिलिंग, प्रेमातल्या हळुवार संवेदना, बेचैन करणारं रिअलायझेशन आणि ह्यातल्या प्रत्येक गाण्यात जाणवणारं एक दैवी कनेक्शन हे सगळं एकाचवेळी, एकाच अल्बममध्ये इतक्या सुंदर रीतीने रहमानऐवजी कुणाला जमु शकेल असं आज तरी वाटत नाहीय. ओरीअँथीने वाजवलेले गिटारचे पिसेस क्लासच!

सहा वर्षांपूर्वी हे स्वप्न पडलं होतं हिंदी चित्रपट सृष्टीला आणि रसिक प्रेक्षकांना. हे स्वप्न कायम रहाणार आहे.

===

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?