' शेजारील राष्ट्रांशी भारताचं नवं धोरण म्हणजे नव्याने ‘भारतवर्षाच्या’ निर्मितीची नांदी? – InMarathi

शेजारील राष्ट्रांशी भारताचं नवं धोरण म्हणजे नव्याने ‘भारतवर्षाच्या’ निर्मितीची नांदी?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : प्रवीण कुलकर्णी

===

इंग्रजांनी भारताचे अनेक तुकडे केले. पण त्यापैकी आपल्याला फक्त पाकिस्तानच लक्षात राहतो. वास्तविक बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान आहे. या फाळणीची सुरवात १९०५ पासूनच झाली. जेव्हा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. १९१९ ला अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याला इंग्रजांनी मान्यता दिली. त्यावेळी त्याला कोणताही प्रतिवाद झाला नाही. असाच एक शेजारी आहे म्यानमार. याचे पूर्वीचे नाव आहे बर्मा. मूळ नाव ब्रह्मदेश याचा अपभ्रंश होऊन बर्मा नाव तयार झाले. १९३५ च्या कायद्यानुसार ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. ब्रह्मदेश आणि त्याला लागून असलेला सयाम म्हणजे थायलंड, कंबुज म्हणजे कंबोडिया पुढे लाओस या सर्व देशात भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसतात. इथे पूर्वी हिंदू धर्म नांदत होता .बाराव्या शतकात बुद्ध धर्माचा प्रसार सुरु झाला व पुढील काही शतकात त्यांनी बौद्ध धर्माचा अनुनय केला.

india-map-marathipizza
thebetterindia.com

१८६० च्या सुमारास इंग्रजांनी या सर्व भागावर एकछत्री अंमल बसवला. त्याकाळी अनेक भारतीय परीवार तिथे स्थायिक झाले. म्यानमार हा भारताला सर्वच दृष्टीने जवळचा देश आहे. शेवटचा मुघल बादशहा बहादुरशहा जफर इथेच मरण पावला. त्याची कबर इथेच आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातच ‘गीतारहस्य’ लिहिले. नेताजी सुभाषचंद्र बोस जेंव्हा आझाद हिंद सेना घेऊन आले त्यावेळी या सर्व भागातील लोकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले व सैन्यासाठी मोठ्या प्रमाणावर धन, सोने व रोख पैसा दिला.

स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या देशाच्या ईशान्येकडील राज्यांकडेच दुर्लक्ष केले तिथे पूर्वेकडील आग्नेय आशियातील देशांकडे दुर्लक्ष झाल्यास नवल वाटायचे कारण नाही. याचा पूर्ण फायदा चीनने घेतला. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांसोबत करार करून त्यांची बंदरे त्याने ताब्यात घेतली व हिंद महासागरात भारताला घेरून ठेवले आहे. चीनने पाकिस्तानला हाताशी धरून भारताविरुद्ध कारवाया सुरु केल्या आहेत.भारत व चीन दारम्यान ‘बफर स्टेट’ चे काम करणारा तिबेट त्याने गिळला. नेपाळला माओवादाचे बाळकडू दिले आणि जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू देश असलेली त्याची प्रतिमा नष्ट केली. आता त्याचा भूतान घशात घालण्याचा डाव होता.पण डोकलाम भारताने चीनला तोंडघशी पाडले एवढेच नाही तर ब्रिक्स देशांच्या परिषदेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद व त्याला पाठीशी घालणाऱ्या चीनला भारताने खडे बोल सुनावले आहेत.ब्रिक्स देशांनी व आधी अमेरीका,जपान, जर्मनी यांनी भारताची बाजू घेतल्याने दहशतवादाच्या मुद्द्यावर चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडला आहे. म्हणून त्याला ‘पंचशील कराराची’ आठवण झाली व त्यानुसार वागण्याची त्याने तयारी दर्शवली आहे. पण भारताला चीनचा दुटप्पीपणा व धुर्तपणा माहित आहे. यासाठी चीनविरुद्ध शेजारी देशांची सुद्धा आघाडी उघडणे आवश्यक आहे, ही बाब आपल्या लक्षात आली आहे. म्हणूनच भारताने आपल्या शेजारी देशांसाठी नवे धोरण आखले आहे.

china-india-marathipizza01
coalpost.in

आंग सान सु ची या म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आहेत. त्यांचे शिक्षण दिल्लीतल्या लेडी श्रीराम कॉलेज मध्ये झाले आहे. इथेच त्यांना लोकशाही मूल्यं, कायद्याचं राज्य याबाबत माहिती झाली. भारतीय राज्यव्यवस्था हा त्यांचा आदर्श आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या देशात सामाजिक, राजकीय कार्याला सुरवात केली. निवडणुकीत विजय होऊनही तेथील लष्करी राजवटीने त्यांच्याकडे सत्ता सोपवली नाही. तरीही त्या अविरत संघर्ष करीत राहिल्या. आता परिस्थितीत थोडा फरक पडला आहे.

मणिपूर,नागालँड,व मिझोरामला लागून असलेली म्यानमारची एक हजार किलोमीटरची सीमा आहे. शेजारी देश अस्थिर राहिले तर त्याचा परीणाम आपल्यावर होतोच. पण तेथील परीस्थिती बदलावी यासाठी भारताने काहीही प्रयत्न केले नाहीत. आपला सक्खा शेजारी असलेल्या या देशाला भेट देणारे राजीव गांधी हे पहिले पंतप्रधान होते .नंतर पी.व्ही. नरसिंहराव यांनी ‘लूक एट इस्ट’ पॉलिसि सुरु केली. पण त्यावर अंमलबजावणी झाली नाही. वास्तविक या देशांच्या भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण आशिया खंडात भारत ‘मोठा दादा’ आहे. म्हणून एवढे वर्ष केवळ दुरून सहानुभूती दर्शविणाऱ्या भारताच्या भूमिकेवर सु ची यांनी नाराजी व्यक्त केली होती व भारताने शेजारी देशांची काळजी घ्यावी, त्यांची राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी व विकासासाठी पुढाकार घ्यावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली होती. पण त्यावेच्या आपल्या राजकीय नेतृत्वात निर्णयक्षमतेचा अभाव होता.

myanmar-marathipizza
constitutionnet.org

सध्या म्यानमारमध्ये बौद्ध व मुसलमान यांच्या संघर्षातून म्यानमारच्या रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सव्वा लाख रोहिंग्या निर्वासितांनी बांगलादेश मध्ये आश्रय घेतला आहे तर चाळीस हजार लोक भारतात अवैधरीत्या राहत आहेत. इथेही त्यांचा स्थानिकांशी संघर्ष होत असून आयएसआय व कट्टर पंथी अतिरेकी संघटना त्यांना आपल्या जाळ्यात ओढू पाहत आहेत. त्यामुळे भारताच्या आंतरीक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने त्यांना सुरक्षित मायदेशी पाठवणी करण्याची तयारी सुरु केली आहे.

नेपाळ,भूतान,म्यानमार, थायलंड यांचे सामरीक महत्व ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाकडे विशेष लक्ष दिले आहे. भारत-म्यानमार-थायलंड असा रस्ता तयार करण्याच्या प्रकल्पावर काम सुरु केले आहे. पॅगोडांची पुनर्बांधनी, विद्युत निर्मिती व संसाधन विकासासाठी प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे. बंगालच्या उपसागरातील त्याची स्थिती पाहता हे सुरक्षित राहणे व तेथे अंतर्गत स्थैर्य असणे भारताच्या दृष्टीने हिताचे आहे.यासाठी या देशांशी मैत्री वृद्धिंगत करणे व आपल्यासोबत त्यांचाही विकास करणे काळाची गरज आहे. या दिशेने भारताने फार उशीरा पावले उचलली आहेत. भारताची भूमिका ‘देर आये दुरुस्त आये’ अशी असली तरी निश्चित स्वागतार्ह आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, तिबेट, नेपाळ, भूतान, म्यानमार हे सगळं मिळून ‘भारतवर्ष’ तयार होतं. १९४७ ला भारताच्या फाळणीच्या वेळी योगी श्रीअरविंदांनी भारत पुन्हा एक होईल असं भाकीत वर्तवलं होतं. ‘सार्क’ च्या माध्यमातून ते काही प्रमाणात प्रत्यक्षातही आलं.

akhand-bharat-marathipizza
odiasamachar.files.wordpress.com

सांस्कृतिक,सामाजिक व धार्मिक दृष्ट्या या देशांचा ‘आत्मा’ एक आहे. त्यामुळे जसे जर्मनीचे एकीकरण झाले तसा भविष्यात भारत एकसंघ होईल व ‘भारतवर्षाची’ संकल्पना पुन्हा आकाराला येईल अशी शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?