आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक/संकलक: डॉ. अभिराम दीक्षित
===
संदर्भ ग्रंथ :
प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत. या प्रकाशन समितीत रा सु गवई, आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.
बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत.
(८ – ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा.
===
मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :
मुसलमान भारतात का आले? त्यांच्या येण्या मागची कारणे – राज्य स्थापनेचा हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनी केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : –
भारतातील मुस्लिम प्रवेश हे केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत. आर्थिक-राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणामागे महत्वाचे आहे. (८-५५)
बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांची अवतरणे उधृत केलेली आहेत.
उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :
माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धची मोहिम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे.
प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून, सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून, देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल. (८-५६)
भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती. अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता. सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते.
–
हे ही वाचा – शोषितांमध्ये संघर्षाचे स्फुल्लिंग पेटवून, बाबासाहेबांच्या संयमाचे दर्शन घडवणारा सत्याग्रह
–
ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला.
१८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे मत होते (८-४९, २९५)
मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात –
इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे. दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर – दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी. जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे.
येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत. (८-२९५, २९६)
“मुस्लिम आक्रमण- राज्य स्थापना – कर पद्धती यामागचे हेतू ही धार्मिक होते” असे बाबासाहेबांचे मत आहे. हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात.
जिझिया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझीचा संवाद संपुर्णपणे उधृत केला आहे. हा संवाद पुरेसा बोलका आहे –
अल्लाह सांगतो की हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे. कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत आणि प्रेषीतांनीच आपल्याला आज्ञा केली आहे की,
हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा, बंधक बनवा, त्यांची मालमत्ता लुटा. आपण सज्जन हनिफी मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी…
हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे दोनच पर्याय आहेत – “इस्लाम किंवा मृत्यू” (८-६३)
या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतची ७६२ वर्षांची कालकथा ही अशी आहे. (८-६३)
आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया – इस्लाम मध्ये समता आहे का?
पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन. या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे –
“केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे. असा कोणता सामजिक दुर्गुण आहे, जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही?” ( ८ -२२५)
बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातही आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे.
इस्लाम धर्मातील विषमता, गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
“इस्लाम बंधुत्वाची भाषा करतो. सर्वांना वाटते की जणु इस्लाममध्ये गुलामी नाही…
आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशातून झाला होता.” (…support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)
इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात –
गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्यांना मुक्त करा असे म्हणत नाही. इस्लाम धर्मानुसार गुलामांना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाही.
गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता ही वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते.
इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे, हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर दिले आहे. (८-२२९)
मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ, अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत.
मुस्लीमातल्या अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास – पददलित म्हणुन संबोधले आहे.
सेन्सस सुप्रिटेंडंटचे दाखले देत बाबासाहेब म्हणतात “मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध आहे, व्यवसायावर जाती निर्धारण आहे.” (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :
“नक्कीच, हिंदुप्रमाणे मुस्लिमात ही सर्व वाइट चाली आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटही आहेत. अधिकच्या वाईट चालीपैकी एक म्हणजे बुरखा.”
: डॉ आंबेडकर (८-२३०)
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय प्राणी आहे. इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते.
व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेव्हा धर्म घेतो तेव्हा – त्याची चिकित्सा करताना – डॉ. आंबेडकरांच्या लेखणीला वेगळीच धार येत असे.
धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे – सर्व धर्मांची चिकित्सा करत असत. हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे. आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे.
तटस्थ, द्वेष रहित पण धारधार चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे.
डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात : –
रस्त्यावर चालणाऱ्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे (most hideous site ). बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात.
मुस्लिम स्त्रियात ऍनिमिया, टीबी आणि पायरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त, हात-पाय व्याधीग्रस्त, हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत.
पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा- मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही. ( ८ – २३० , २३१)
पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात –
बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभीर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे.
–
हे ही वाचा – बाबासाहेबांची वैचारिक स्मारके – संविधानापासून शेतीतंत्रज्ञानापर्यंत
–
अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याही नितीमत्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री – पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही.
अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयींचा प्रादुर्भाव या समाजात होतो.
बुरख्यामुळे हिंदु मुस्लिम संवादात ही बाधा येते कारण – अतिशयोक्त वाटले तरी – हिंदुचे म्हणणे खरेच आहे की – एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसऱ्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा? (८- २३०, २३१)
जातीय स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष दिसून येतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.