लग्न का करतात : आदिमकालीन इतिहास, समलैंगिक लग्नांचा संभाव्य परिणाम
समलैंगिक लग्नांना “अधिकृत” लग्न म्हणून मान्यता मिळावी ही मागणी जोर धरत असताना अर्थातच लग्नसंस्थेवर चर्चा सुरु झाली आहे.
लग्न का करावं – किंबहुना – लग्न का करतात – लग्न संस्थेचं प्रयोजन काय?! या विषयावर सर्वत्र घमासान होत असताना दोन ठळक वैचारिक प्रवाह दिसून येतात.
सर्वात ठळक प्रवाह आहे समानतेच्या हट्टाने पेटून व्याख्या वा नव-व्याख्या ठरवणारा. हा प्रवाह सर्वांना समान हक्क देण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते सारेकाही करण्यास कटिबध्द आहे. म्हणून फक्त “त्या दोघांना वाटतं” आणि “ते दोघे ही जबाबदारी उचलण्यास समर्थ आहेत” यांत भेद करण्याची गरज त्यांना वाटत नाही. त्यांची इच्छा आहे म्हणून त्यांना करू द्या – बास.
पण इच्छा म्हणजे पात्रता नव्हे. अर्थात, चार भिंतींत जे करायचं आहे ते करू देत, पात्रता ठरवणारे आपण कोण? हा वरील उदात्त (नो सार्काजम) विचारातील अध्याहृत मुद्दा आहेच. पण इथे चार भिंतींचा विषय नसून संपूर्ण समाजात कायदा निर्माण करण्याचा प्रश्न आहे.
चार भिंतींत जे करायचं आहे ते जरूर करा, पण त्या गोष्टीला कायद्याच्या रुपात अधिकृत समाजमान्यता द्यायची असेल तर तुम्ही जे मागत आहात ते तात्विक मायक्रो लेव्हलवर अत्युत्तम असलं तरी व्यावहारिक मॅक्रो लेव्हलवर त्याचे काय बरे वाईट परिणाम होणार आहेत याचा विचार करावा लागणार आहेच.
म्हणजेच, दोन प्रौढ पुरुषांनी वा स्त्रियांनी एकत्र जीवन जगावं का याचा निर्णय त्या दोघांनी वैयक्तिक जरूर घ्यावा. कायद्याने (आणि समाजाने सुद्धा) त्याला विरोध करू नये. हा त्या त्या मायक्रो जोडप्यांनी आपापसात घेण्याचा निर्णय असावा व तो हक्क त्यांना जरूर दिला जावा (जो सध्या आहेच). पण देश, समाज, कायदा – या अतिप्रचंड किचकट व्यापक मॅक्रो लेव्हलवर वरील जोडप्यांना अधिकृत लग्न झालेली जोडपी म्हणून मान्यता हवी असेल तर नवीन यंत्रणेचे संभाव्य सामाजिक दूरगामी परिणाम अभ्यासून मगच ते तसं चालेल की नाही हे ठरवायला हवं.
अन् हेच आदर्श युटोपीयन समानता ओढूनताणून आणायची इच्छा असणाऱ्यांना, फक्त समलिंगी लग्नच नव्हे, जवळपास प्रत्येक मुद्द्यावर मान्य होत नसतं. मायक्रो आणि मॅक्रो फरक त्यांना करायचाच नसतो.
दुसरा प्रवाह आहे सांस्कृतिक एकसंधत्व हवं असणाऱ्यांचा.
कोणताही नूतन विचार पुरातन सांस्कृतिक साच्यात बसत नसेल तर तो धोकादायक आहेच – असं काहीसं यांचं ठाम मत असतं. खरंतर डार्विन सरांचा उत्क्रांती सिद्धांत :
जे अधिकाधिक लाभदायक ते टिकाऊ – जे अनावश्यक ते टाकाऊ – जे गरजेचं ते नव्याने उपजाऊ
सांस्कृतिक रितीभातींवर देखील फर्मास लागू होतो. यूटिलिटी हे फंक्शन मानवी संस्कृतीत फार फार फार महत्वाचं आहे. म्हणूनच कुणीही कितीही आकांडतांडव करू देत – उत्सव एकदम संपत नाही. अन् कुणीही कितीही हट्टाने पेटू देत – उत्सव साजरे होण्याच्या पद्धती बदलत ही जातात!
म्हणजेच, लग्न संस्था एक यूटिलिटी असलेलं टूल म्हणून आपण गेली काही हजार वर्षे का वापरत आलो आहोत – हे संस्कृती प्रेमींनी समजून घेतल्याशिवाय – बदलत्या काळानुसार बदलणारी नेसेसिटी आणि त्यानुसार बदलत जाणारी अपेक्षित यूटिलिटी आवाक्यात येणार नाही. अश्या परिस्थतीत, तुमची इच्छा असो नसो, कायदे निर्माण होवोत न होवोत – समाज बदलत जाणार. आपल्या गरजा बरोबर भागवून घेणार. जर समलिंगी संबंध ही मेजर सामाजिक यूटिलिटी ठरणार असेल तर तिचा झपाट्याने होणारा प्रसार कोणतीच संस्कृती थांबवू शकणारच नाही.
हे सगळं प्रवचन कशासाठी?! तर दोन्ही बाजूच्या लोकांनी “काय असायला हवं” आणि “आजपर्यंत जे होतं ते कसं उत्तमच होतं” फक्त असा विचार न करता – “जे काही असायला हवं असं आम्हाला वाटतं ते सामाजिक दृष्ट्या उत्तम असणार आहे का” असा संपृक्त विचार करायला हवा – हे समजण्या / पटण्यासाठी.
राजकीय हेवेदावे सोडू देत. तुम्ही तुमच्या विचारांशी प्रामाणिक असाल तर – तो जो कुठला विचार असेल – समाजहित हीच तुमची प्राथमिकता असते. आपल्याला पटलेला विचार खरंच समाजाचं हित करेल असं आपल्याला वाटतं म्हणून आपण तो विचार आपलासा करतो. (पुन्हा एकदा – राजकीय हेवेदावे सोडू देत! ते जमलं तरच वरील गृहितक खरं ठरतं. अन्यथा सगळीच चर्चा फोल आहे.)
म्हणून, आधी लग्नसंस्था का टिकली, ती बदलत गेली असेल तर तशी (आणि तशी “च”) का बदलत गेली, त्यातून कोणते लाभ समाजाने उचलले – कोणती किंमत मोजली – हे सगळं सिरीयसली अभ्यासायला हवं. कायद्या काय हवा वगैरे जाऊ देत. अभ्यास म्हणून हा विषय खरंच अभ्यासायला हवा.
मोनोगॅमी अन् त्यातून लग्न व पुढे कुटुंब संस्था हे हजारो वर्षे संथ गतीने घडत आलेल्या मानसिक (शारीरिक, जेनेटिक, सामाजिक) उत्क्रांतीचे प्रॉडक्ट्स आहेत. ही उत्क्रांती घडत असताना आपल्या डीएनएमधे, मेंदूच्या रचनेत ठोस बदल घडत आलेत. ती विशिष्ट मेसेजिंग आणि रिझनिंग आपल्यात हार्ड कोडेड आहे.
काय आहे ही मेसेजिंग आणि रिझनिंग? याबद्दल अनंत मतप्रवाह आहेत.
नवनवे पार्टनर शोधण्यासाठी दरवेळी स्पर्धकांशी सतत मारामाऱ्या करणं जोखमीचं वाटणे, “तू मला संकट, उपासमार यांपासून वाचव – मी तुला तुझी वंशावळ देते” असा व्यवहार करणे, नव्या पार्टनर ने जुन्या पासून झालेली संतती मारून टाकण्याचा धोका नको म्हणून मादीने एकच मजबूत पार्टनर निवडणे, नराला आपली टेरीटरी राखण्यासाठी (आणि हस्तांतरित करण्यासाठी) खात्रीलायक “आपलाच” वंश हवा असणे असं काय काय गणित असण्याची शक्यता आहे.
या मागे नक्की काय होतं हे ठरवणं कमालीचं किचकट आहे. “होमो सेपियन” मधील हुमन – होमोची पहिली प्रजाती शारीरिक दृष्ट्या कशी होती (जे जीवाश्मांवरून कळतं), त्यांचं इतर सस्तन प्राण्यांशी आणि विशेषतः वानर गणाशी असलेलं साधर्म्य, त्यांत नर-मादीतील भेद-साम्य यांतून आडाखे बांधले जातात.
साधारण ७० लाख वर्षांपूर्वी होमिनीस (आपल्या होमो सेपियन्सचं मूळ) वंश पुढे आला. त्याच सुमारास कधीतरी मोनो-गॅमी प्रॅक्टिस जन्मली. काहींचं म्हणणं आहे ६० लाख वर्षे नव्हे, मोनोगॅमी साधारण १० ते १५ लाख वर्षे जुनी असावी. हा काळ देखील अ वा ढ व्य आहे.
कल्पना करा आपलं “आधुनिक” होमो सेपियन्स शरीर (मेंदू – मज्जा यंत्रणा, त्यात साठवलेले फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्सेस इ सगळं) साधारण १,६०,००० ते ६०,००० वर्षं जुनं आहे. ते या १५ लाख वर्ष आधी पासून जन्मत – रुजत – बदलत गेलेल्या विविध रूढी, परंपरांना साठवत होमो सेपियन्सच्या मेंदूत फायनल (?) अपग्रेड होऊन पृथ्वीवर अस्ताव्यस्त पसरलं आणि इथलं सत्ताधीश झालं.
मोनोगॅमी – लग्न – कुटुंब – समाज – शासन व्यवस्था : असा हा अत्यंत किचकट प्रवास आहे. अभ्यासकांमध्ये इतर कितीही मतभेद असू देत. एका सिद्धांतावर सर्वांचं एकमत आहे.
अत्यंत किचकट, जंगली नियमांच्या विपरीत, भासमान तरीही अत्यंत उपयुक्त अश्या व्हॅल्यू-ड्रिव्हन-सोशल स्ट्रक्चर्सची निर्मिती करता येणं : या एका कौशल्यामुळे होमो सेपियन पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली जमात बनू शकला.
कुटुंब – समाज व्यवस्था स्ट्रॉंग झाल्यानंतर अर्थातच आपली राखीव टेरिटरी (घर), त्यात अडल्या वेळी वापरता येण्यासाठी अन्नाची साठवण (संपत्ती संचय), गरज भासल्यास “आपल्या” विश्वासातल्या लोकांबरोबर या संपत्तीची देवाणघेवाण व त्यांची देखभाल, त्यांना आधार देणे (माता-पिता-बंधू-भगिनी-मित्र—असा पसारा) असं हे प्रकरण वाढत गेलं. व्यापक होत गेलं, किचकट होत गेलं. (याच संचयीत संपत्तीचा अधिकृत वारस ठरवता यावा म्हणून एक पार्टनर घोषित केला जाऊ लागला – अशीही एक थियरी आहेच.)
याचवेळी अतीच वाढलेल्या मेंदूमुळे प्रेग्नन्सी अधिकच जटिल झाली. मादी या स्ट्रक्चरवर अधिकच विसंबून रहायला लागली. बाहेरची संकटं अंगावर घेण्यात नर अधिकाधिक पुढाकार घ्यायला लागला. मादी घराची, पिलांची, इतर नात्यांची सोय बघायला लागली. नर “प्रोव्हायडर” बनला, मादी “केअर गिव्हर” झाली. आपला मेंदू हे सगळं साठवत गेला.
पुढची पिढी घडवणे – हे नर-मादी आणि त्या जोडीने बांधून ठेवलेलं कुटुंब – यांचं एकत्रित, सामायिक काम ठरलं. केंद्रस्थानी अर्थातच एक नर आणि एक मादी आहे. शिव आणि शक्ती म्हणा वा यिन अँड यांग म्हणा. ही एकत्रित कंपोझिट परस्परपूरक शक्ती मायक्रो लेव्हलवर एक-एक अपत्य घडवत मॅक्रो लेव्हलवर समाज घडवत, होमो सेपियनचा पृथ्वीवरील डॉमिनन्स रुजवत गेली आहे.
आज, आपल्या अत्यंत गतिमान जीवनात तोच ६०,००० वर्ष जुना मेंदू काम करतोय.
अपत्यांच्या गरजा आजही त्याच आहेत. त्यांचं वरिष्ठांवरील अवलंबित्व तसंच आहे. मेंदू अजूनही काहीच्या काही मोठाच आहे. फाईट ऑर फ्लाईट अजूनही आहे. मादीची केअर, नराचं अग्रेशन – अजूनही ड्युअल गरज आहेच.
पण! या सर्व लक्षण / गुण / मर्यादांवर मात करून पुढे गेला म्हणून तर मानव ग्रेट झाला ना!
हा सगळा प्रवास ज्या संतती-संपत्ती साठी झाला, तेच नाकारूनही (मूल नको, संपत्ती हस्तांतरणही नको – कुणालाही देऊन टाकू!) जोडीने रहाण्याची इच्छा असणारे लोक काही कमी नाहीत. नराचं अग्रेशन आपल्या मुलींनी शिकून घेतलंच (ते तसं आत दडलेलं असतंच, आपण ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट करून ते अधिक ठाशीव केलं.). मादीची केअर बाप लोकांनी अंगिकारलीच. सेम जेंडर कपल्समध्ये एक मॅस्क्युलीन आणि एक फेमिनीन ट्रेट्स असणारे दोघे स्पष्टपणे दिसतातच.
फक्त हे ट्रेट्स इंडीव्हिजुअल लेव्हलवर व्यवस्थित काम करत असले तरी सामाजिक पातळीवर नवीन व्यवस्था रुजवण्यास ते “पुरेसे” आहेत का – हे आपल्याला अजून माहित नाहीये.
उदाहरणार्थ, सिंगल पेरेंट्स ने वाढवलेलं मूल कसल्याही बाबतीत “कमी” असेल असं जजमेंट आपण देऊच शकत नाही. कित्येक सिंगल पेरेंट्सनी आपली मुलं अफलातून घडवली आहेतच. पण ही मायक्रो उदाहरणं, समाजाची मॅक्रो पॉलिसी ठरवण्यास पुरेशी नसतात. काही हजार सिंगल पेरेंटिंग मधली मुलं, त्याच कंडिशन्स, त्याच आर्थिक परिस्थिती, त्याच बुद्धिमत्तेच्या ड्युअल पॅरेंटिंग मधली तितकीच मुलं यांच्याशी पडताळून बघायला हवीत. असे अनेक प्रयोग करायला हवेत – म्हणजे मग – एक समाज म्हणून आपण कशाला प्राधान्य / अधिकृतता देणार आणि कशाला “ना प्राधान्य ना विरोध” देणार हे ठरवू शकतो. (या गोष्टी किती महत्वाच्या असतात हे आपण अनुभवत आहोतच – एकत्र कुटुंब – विभक्त कुटुंब यांमुळे मुलांच्या जडणघडणीत होत असणारे बरेवाईट बदल, त्यातून उभे रहाणारे चॅलेंजेस आपण सर्व बघत आहोत.)
अगदी तसंच, सेम जेंडर कपल्स म्हणून एकत्र रहाणे हा तुमचा इंडीव्हिजुअल हक्क जरी मान्य असला तरी जेव्हा तुम्ही काही लाखांच्या घरात जाल तेव्हा मॅक्रो लेव्हलवर अशी जोडपी समाजात किती मूल्यवृद्धी घडवून आणतील, मूल वाढवू शकणार आहेत का (वैयक्तिक क्षमता म्हणून नव्हे – मॅक्रो लेव्हलवर एक ड्युअलिटी नसलेली, सेम-जेंडर कपल्सची कम्युनिटी म्हणून) आणि इतरही कितीतरी मूलभूत फॅक्टर्स असतील – त्यांत तुम्ही मागत आहात ते स्ट्रक्चर कसं असेल – हे समजून घेणं, अभ्यासणं फार मोठी सामाजिक गरज आहे. कारण पुढचा समाज सर्वांनाच सकस असायला हवाच आहे.
मानवी संस्कृती प्रवाही असायलाच हवी. बदलत्या गरजांनुसार आपण आपले सामाजिक नियम सुधारायला / बदलायला हवेतच. परंतु त्याचबरोबर आपल्या प्रथा परंपरा कोणतीतरी युटिलिटी बाळगून असतात – त्या युटिलिटीज मानवाच्या वांशिक प्रगतीच्या केंद्रस्थानी असतात हेही कसलाही अहंगंड वा न्यूनगंड न बाळगता मान्य करायला हवं. त्या युटिलिटीजना थेट नख न लावता हे बदल घडवून आणायला हवेत.
कारण हे विषय राजकीय अजेंडे किंवा धार्मिक अस्मितेचे नसून इव्होल्यूशनरी सायन्सचे आहेत.
आपल्या मेंदूचे आहेत.
आपल्या अस्तित्वाचे आहेत.
चिअर्स!
ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com