Site icon InMarathi

राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिला होता

baalasaheb thakarey family im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाविकास आघाडी सरकारची स्थापना असो वा आता शिंदे गटानं केलेली बंडखोरी…महाराष्ट्राचं राजकारण कितीही वळणं घेत असलं तरी एक नाव मात्र हमखास चर्चेत असतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशिवाय सध्या राजकारणाच्या बातम्याच अपूऱ्या आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

शिकाऊ पत्रकार, क्राइम रिपोर्टर, त्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेना खासदार अशा अनेक टप्प्यांवर संजय राऊत यांनी ठाकरे कुटुंबियांशी जवळीक साधली. सुरवातीला केवळ कामाच्या निमित्ताने बाळासाहेबांच्या नजिक गेलेले संजय राऊत सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

 

 

 

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणारे राऊत असो वा आता शिंदे गटाला खडे बोल सुनावणारे किंवा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेऊ त्यांची बाजू मांडणार, राऊत आणि ठाकरे हे समीकरण कायम आहे. मात्र हे समीकरण काही आजचं नाही.

आणि मातोश्रीत एन्ट्री झाली

संजय राऊत हे मुळचे पत्रकार! लोकप्रभा मासिकेतून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर काही काळ ते इंडियन एक्सप्रेस समुहात क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत होते.

त्यावेळी राऊत यांचे विश्वासु सुत्र, सनसनाटी बातम्या, लेखणीला असलेली धार यांची चर्चा व्हायची. कामानिमित्त त्यांनी बाळासाहेबांची मुलाखतही घेतली होती. एकंदरित राऊत यांचा धडाडीपणा बाळासाहेबांना भावला आणि त्यांनी राऊत यांना मातोश्रीवर बोलावणं धाडलं.

या भेटीत बाळासाहेब आणि राऊत यांच्यात चर्चा झाली आणि पुढील काही दिवसात राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात रुजू झाले.

 

 

हुबेहुब बाळासाहेब

सामनात रुजू झालेल्या राऊत यांचं लिखाण बाळासाहेबांना आवडायचं. राऊत यांनीही बाळासाहेबांच्या लेखनाची शैली हुबेहुब आत्मसात केली.

बाळासाहेबांशी चर्चा करत, त्यांचे विचार समजून घेत राऊत अग्रलेख लिहायचे मात्र त्यांचं लिखाण इतकं बाळासाहेबांसारखं असायचं की अनेकांना तो लेख बाळासाहेबांनीच लिहीला असावा असा अनेकांना संशय यायचा.

राज ठाकरेंचा राजीनामा

४० आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली तेव्हा शिवसेनेला धक्का बसला, मात्र याहूनही सेनेत भुकंप आला होता तो राज ठाकरे यांनी नाराजीने शिवसेनेला राम राम केल्यानंतर!

राऊत यांची ठाकरे कुटुंबियांशी मैत्री होती, त्यात बाळासाहेबांनंतर सर्वात जवळचं नातं त्यांचं राज ठाकरेंशी होतं. बाळासाहेबांशी मिळतजुळतं व्यक्तीमत्व, तिच धडाडी, सभा गाजवणारी भाषणं यांमुळे राज आणि संजय राऊत यांच्यात बरेच जिव्हाळ्याचे विषय होते. कोणत्याही सभांना दोघंही एकत्र दिसायचे.

शिवसेनेतील अनेक महत्वाच्या योजना, निर्णय, जबाबदाऱ्या या दोघांवर असल्याने त्यांची मैत्रीही वाढत होती.

एकीकडे राजकारण राज यांचं महत्व वाढत असताना एका सभेत शिवसेनेची पुढील धुरा उद्धव यांच्या खांद्यावर सोपवल्याचं बाळासाहेबांनी जाहीर केलं, मात्र त्यानंतर सेनेत फूट पडण्यास सुरुवात झाली.

 

 

बाळासाहेबांचा हा निर्णय न पटल्याने राज आणि समर्थक यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, मात्र या प्रकरणाची कुणकुण लागताच राऊत यांनी राज यांच्याकडे धाव घेतली.

राज यांनी हा निर्णय बदलावा, शिवसेना सोडून जाऊ नये यासाठी यासाठी संजय राऊत यांनी राज यांची समजूत काढली, मात्र अखेरीस राज आपल्या निर्णयावर ठाम होते.

अखेरीस संजय राऊत यांचे प्रयत्न थकले, मात्र त्या परिस्थितीतही त्यांनी राज यांची साथ सोडली नाही. असं म्हणतात, की राज यांच्या सांगण्यावरून त्यांचं राजीनामापत्र खुद्द संजय राऊत यांनी लिहीलं होतं.

खरंतर या प्रसंगी राऊत यांना प्रचंड ताण होता, एकीकडे बाळासाहेबांशी असलेली एकनिष्ठा आणि दुसरीकडे राज यांच्यासारखा जुना मित्र, या कात्रीत अडकलेल्या राऊत यांनी अखेरिस राज यांचा राजीनामा लिहीला.

 

 

खरंतर हा राजीनामा राज यांच्या नावानेच लिहीला होता, त्यात पक्ष सोडण्याची स्पष्ट कारणं देण्यात आली होती.

राज ठाकरे यांनी हा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सोपवला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर जनमानसातही उलथापालथ सुरु झाली. मात्र यावेळीही बाळासाहेब शांत होते.

राजीनामा वाचल्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना जवळ बोलावलं आणि म्हणाले, ”हे शब्द जरी राज यांचे असले तरी हे पत्र तुम्हीच लिहीलंय हे कळलंय मला”.

बाळासाहेबांच्या या विधानावर राऊतही निरुत्तर झाले. केवळ लिखाण्याच्या शैलीवरून बाळासाहेबांनी हे हेरलं होतं.

आजपर्यंत ठाकरे आणि राऊत या कुटुंबातील स्नेह कायम आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या राऊत यांनी राज ठाकरे यांच्याशीही असलेली मैत्री कायम जपली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version