Site icon InMarathi

उज्जैनचा राजा फक्त एकच! म्हणूनच इथे कोणताही राजकीय नेता मुक्काम करत नाही!

ujjain featured 2 IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

श्रद्धा, अंधश्रद्धा, नशीब, योगायोग, भाग्य, नियती या आणि अशा सगळ्याच गोष्टी हातात हात घालून चालत असाव्यात असं सांगणाऱ्या काही घटना जगात घडत असतात. एखादा विशिष्ट माणूस एखाद्या संघात असल्यामुळे त्या संघाने स्पर्धा जिंकणं, एखाद्या व्यक्तीची निव्वळ उपस्थितीच चांगल्या किंवा वाईट घटनांसाठी कारणीभूत ठरणं, इत्यादी बाबी आपण अनेकदा ऐकलेल्या किंवा वाचलेल्या असतात.

खेळ आणि राजकारण या दोन विषयांत तर याबद्दल काहीशा अधिक चर्चा रंगतात असं म्हटलं, तरी ते कदाचित फार चुकीचं ठरणार नाही.

अशीच राजकारणातील एक प्रसिद्ध आख्यायिका आहे. हे सत्य मान्य करण्यामागे लोकांची श्रद्धा आहे, की हे सारं घडण्यामागे निव्वळ योगायोग आहे, याविषयी अनेकांची मतमतांतरं आहेत. मात्र उज्जैनमधील या कथा ऐकणं फारच रंजक आहे हे मात्र नक्की! चला तर मग, जाणून घेऊयात.

 

राजाचा मुक्काम झाला तर…

फार पूर्वापार काळापासून, एक अशी कथा सांगितली जाते की उज्जैन या शहरात कुणीही राजा वास्तव्य करत नाही. याचं कारण असं, की कुठल्याही राजाने इथे वास्तव्य केलं तर त्याच्यावर आपलं साम्राज्य गमावण्याची पाळी येते.

पुढे काळ जसा बदलत गेला आहे, त्यानुसार केवळ राजाच नाही, तर आधुनिक काळातील राज्यकर्ते सुद्धा यात समाविष्ट करण्यात आले आहेत. म्हणजेच, कुणी मंत्री, मुख्यमंत्री, एवढंच काय तर पंतप्रधानसुद्धा उज्जैनच्या सीमाभागात रात्री वास्तव्याला थांबला, तर त्याला त्याची सत्ता गमवावी लागेल, असं आजही मानलं जातं.

तो त्याचा एक अपराध ठरतो आणि त्याची शिक्षा त्याला भोगावीच लागते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. मध्यप्रदेशाचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हेदेखील उज्जैनमध्ये रात्री न थांबण्याचा नियम पाळत असल्याचं म्हटलं जातं.

मध्यप्रदेशातील राजघराणं असणाऱ्या सिंधिया कुटुंबाने सुद्धा हा नियम नेहमीच काटेकोरपणे पाळला आहे. असं म्हटलं जातं, की देशाचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचं सरकार ज्यादिवशी कोसळलं, त्याच्या आदल्या दिवशी त्यांचं वास्तव्य उज्जैनमध्ये होतं.

 

 

याशिवाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ज्यावेळी उज्जैनमध्ये वास्तव्य केलं, त्यानंतर २० दिवसांतच, त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

महाकालच इथला राजा :

या दंतकथा आणि आख्यायिकांचं कारण असं सांगण्यात येतं, की उज्जैन शहरात केवळ एकच राजा राहू शकतो, आणि तो राजा म्हणजे महाकाल! राजा भोज याच्या काळापासूनच ही प्रथा पाळण्यात येते असं मानलं जातं. कुणीही राजा, मंत्री अथवा लोकप्रतिनीनिधी उज्जैनमध्ये राहत नाही. कारण उज्जैनचा राजा आजही महाकालच असल्याचं मानलं जातं.

त्यामुळे त्याला झुगारून जो कुणी उज्जैनमध्ये वास्तव्य करेल, त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. या शिक्षेच्या रूपात त्याची सत्ता जाईल असं मानलं जातं. योगायोगाने किंवा नियतीच्या खेळामुळे याआधी घडलेल्या काही घटना पाहता, यावर अनेकांचा विश्वास सुद्धा आहे.

मध्यप्रदेशातील सिंधिया या राजघराण्याचे वारसदार आणि राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य सुद्धा उज्जैनमध्ये वास्तव्य करण्याचा प्रयत्न करत नाहीत.

 

मंदिराचा इतिहास :

किंवदंती आणि इतर मान्यतांनुसार, उज्जैनमध्ये महाकाल यांचं वास्तव्य असण्यामागे आणि मंदिराच्या स्थापनेमागे एक कथा आहे. उज्जैनमधील नागरिकांना दूषण नावाचा एक राक्षस त्रास देत होता. त्याचा नायनाट करण्यासाठीच शंकर महादेवांनी महाकाल रूप धारण केलं आणि उज्जैनमध्ये प्रकटले.

दूषणाचा नायनाट तर झाला, मात्र उज्जैनकरांनी शिवाला तिथेच वास्तव्य करण्याची गळ घातली. त्यानंतर ज्योतिर्लिंगाच्या रूपात शंकराने तिथे वास्तव्य केलं. हे ठिकाण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं.

पुढे त्याच ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली. रानाजीराव शिंदे यांनी १७३६ साली या मंदिराची निर्मिती केली श्रीनाथ महाराज महादजी शिंदे आणि महाराणी बायजाबाई शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याचे सुद्धा पुरावे आहेत.

 

 

रौद्र सागर तलावाच्या काठावर हे मंदिर वसलेलं आहे.महाकालेश्वर मंदिर हे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. भगवान शंकर-पार्वती आणि त्यांचे दोन्ही पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती इथे पाहायला मिळतात.

भगवान शंकर यांच्या ‘महाकाली’ रूपाचं हे एकमेव मंदिर असल्याचं मानलं जातं. भासम आरती ही येथील खासियत असून, आरतीमध्ये उपस्थित राहण्यासाठी जगभरातून भाविक हजेरी लावतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version