Site icon InMarathi

सुशांतसारखं स्वतःला संपवून टाकावंसं वाटायचं : चंदेरी दुनियेचे काळेकुट्ट भयाण अनुभव

neetu chandra featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणूस गेल्यावरच त्याची किंमत कळते. तो हयात असताना कुणीच त्याची दुःख वेदना याविषयी चौकशी करत नाहीत, अगदी सेलिब्रिटीजच्या बाबतीतसुद्धा असंच होतं. जोवर त्यांना काम मिळत असतं तोवर ते सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये असतात पण जसा त्यांचा इंडस्ट्रीमधला वावर कमी होतो तसं या इंडस्ट्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होतात.

सुशांत सिंगचं उदाहरण आपल्यासमोर अजूनही तसं ताजं आहे. आता तर चक्क बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने याविषयी उघडपणे भाष्य केलं आहे. सुशांतप्रमाणेच तिलाही स्वतःचं आयुष्य संपवावं असा विचार मनात आला होता, पण सुदैवाने तो विचार तिने तसाच झटकला आणि आज ती जाहीरपणे इंडस्ट्रीतल्या या दुजाभावाबद्दल उघडपणे बोलतीये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोण आहे ही अभिनेत्री? इंडस्ट्रीचे दरवाजे तिच्यासाठी का बंद झालेत? कित्येक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमात, तसेच हॉलीवूडमध्ये सिनेमा करूनसुद्धा तिला स्वतःच्याच देशात कामासाठी भीक का मागावी लागतीये? याबद्दलच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

बॉलिवूड हंगामाच्या मंचावर नुकतीच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नितू चंद्रा हीने नुकतीच हजेरी लावली, पण ती कोणत्याही सिनेमाच्या प्रमोशनसाठी नाही तर स्वतःचं मन मोकळं करण्यासाठी.

 

 

या मुलाखतीत तिने बॉलिवूडच्या दुटप्पीपणाबद्दल तसेच इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीबद्दल खुलासा केला असून ती कशी या इंडस्ट्रीबाहेर फेकली गेली आहे यावर तिने भाष्य केलं आहे.

मुळची बिहार असलेली नितू ही एका सामान्य कुटुंबातून मुंबईत मॉडेलिंगचं स्वप्न पूर्ण करायला इथे आली आणि तेव्हा इंडस्ट्रीने तिचं स्वागत केलं. गरम मसालासारख्या कमर्शियल सिनेमात तिला सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी ब्रेक दिला.

नंतर मधुर भंडारकर यांच्या ट्रॅफिक सिग्नल या सिनेमात तिला उत्तम भूमिका मिळाली. या सिनेमाचं खूप कौतुक झालं आणि सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. नितूचंही यात कौतुक झालं आणि नंतर तिने हिंदी तसेच साऊथमध्येसुद्धा काम करायला सुरुवात केली. 

 

 

राम गोपाल वर्मा, सूर्या, माधवनपासून अमिताभ बच्चन अशा दिग्गज कलाकारांसोबतही तिने काम केलं. पण कालांतराने तिला कामं मिळणंच बंद झालं आणि लॉकडाऊन काळात तर ती या इंडस्ट्रीबाहेर फेकली गेली.

या मुलाखतीत तिने तिच्या याच खडतर दिवसांबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितलं की या दिवसांत ती मनाने पार कोलमडून गेली. तिच्या डोक्यात चित्र विचित्र विचार घोळू लागले. कर्जसुद्धा डोक्यावर होतं.

एक दिवस असा आला की  “सुशांतसारखं स्वतःला संपवून टाकावं” असा विचार तिच्याही मनाला शिवून गेला, पण तिच्या कुटुंबाने तिला सांभाळून घेतलं म्हणून ती त्या स्टेजपर्यंत पोहोचली नाही.

 

 

याचदरम्यान तिने स्वतःचं सगळं सेव्हिंग गोळा करून हॉलीवूड गाठलं आणि तिथे तिने एका अॅक्शन हॉलीवूड चित्रपटात स्वतःच्या जोरावर काम मिळवलं. तिथे काम केल्यावर तरी आपल्याला आपल्या देशात जाऊन पुन्हा काम मिळेल या आशेवर जेव्हा ती पुन्हा भारतात परतली तेव्हादेखील तिला खड्यासारखं बाजूला काढलं गेलं.

“आता तर तू हॉलीवूडमध्ये काम केलंयय त्यामुळे तुला आता हिंदीत काम कसं मिळणार?” असं म्हणून तिला काम देण्यास नकार दिला. कित्येकांनी तर तिच्या मेसेजलासुद्धा उत्तर देण्याचं टाळलं.

या मुलाखतीत पुढे बोलताना नितूने आणखीन एक धक्कादायक खुलासा केला. बॉलिवूडमध्ये अजूनही कशाप्रकारे अभिनेत्रीकडे भोगवस्तू म्हणूनच पाहिलं जातं याबाबत नितूने खुलासा केला आहे.

एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने तिला त्याच्यासोबत राहण्याची ऑफर दिली तर एका दिग्दर्शकाने तिला आपली “salaried wife” बनण्याचा सल्ला दिला. या दिग्दर्शकाचं नाव जरी तिने घेतलं नसलं तरी तो सध्या इंडस्ट्रीमध्ये एक यशस्वी दिग्दर्शक आहे.

 

 

salaried wife म्हणजे तो दिग्दर्शक नितूच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये पैसा लावेल, पण त्याबदल्यात समाजात नितूला त्याचे नाव स्वतःचा पती म्हणून लावावे लागेल. खरंतर हे प्रकार बॉलीवूडमध्ये सर्रास सुरू असतात.

कास्टिंग काउच असो किंवा आणखीन काही, कित्येक मुलींना मोठे प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अशा विकृत मनोवृत्तीच्या निर्माते दिग्दर्शकांना सामोरं जावं लागतं. पण नितूने या दोन्ही गोष्टींना साफ नकार दिल्यानंतर तर इंडस्ट्रीचे होते नव्हते तेवढे सगळे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.

आपल्यासोबत घडेलल्या या प्रकारामुळे नितू ही डिप्रेशनमध्ये असून, हे सगळं उघडपणे बोलण्यासाठी तिला बराच वेळ लागला. या इंडस्ट्रीत आपली स्वप्नं उराशी बाळगून असे कित्येक तरुण तरुणी येत असतात, त्यांच्या बाबतीत तर या गोष्टी सर्रास होतात, त्यामुळे यातून डिप्रेस न होता याविषयी उघडपणे बोलण्याचा सल्लासुद्धा तिने सध्या स्ट्रगल करणाऱ्या तरुणांना दिला आहे.

काही निर्माते दिग्दर्शक या इंडस्ट्रीला स्वतःच्या वडिलांची जहागीर असल्यासारखे वापरत आहेत, आणि त्यामुळेच सध्या या बॉलीवूडबद्दल प्रत्येकाच्या मनात एक चीड आहे, संताप आहे, असंतोष आहे.

 

सुशांतसारखे काही कलाकार हे सगळं सहन करू शकत नाहीत आणि स्वतःचं आयुष्य संपवून घेतात तर काही नितू चंद्रासारखे कलाकार असतात जे संपूर्ण धाडस गोळा करून याविषयी उघडपणे बोलतात.

कॉलेजमध्ये असताना जीला अटल बिहारी बाजपेयी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. शालेय जीवनात जीने कराटे ब्लॅक बेल्ट मिळवून हाँगकाँगमध्ये भारताचं नेतृत्व केलं आणि जिचं कौतुक सुप्रसिद्ध अॅक्शन स्टार जॅकी चॅननेही केलं अशा नितू चंद्राला तिच्याच देशात काम नाही ही केवढी मोठी शोकांतिका आहे!

मेनस्ट्रीम होरॉईनप्रमाणे नितू चंद्राकडे काही गोष्टी नसतील, पण एक कलाकार म्हणून तिच्या कामाचं कौतुक आज कित्येकांनी केलं आहे आणि तरी तिला काम न मिळणं हे म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या चेहेऱ्यावर जोरदार चपराक आहे.

जे सुशांतच्या बाबतीत झालं तीच गोष्ट आज नितूच्या बाबतीत होतिये, उद्या आणखीन कोणाच्या बाबतीत घडेल? हे सगळं थांबणार कधी? स्वतःच्याच मस्तीत मश्गुल असणाऱ्या बहीऱ्या बॉलीवूडकरांपर्यंत नितूसारख्या कित्येक कलाकारांचा आवाज पोहोचणार की नाही?

 

 

असे असंख्य प्रश्न यातून आपल्यासमोर उभे राहतात. खरंच नितूने जे धाडस दाखवलं आहे त्यासाठी तिचे आभार आणि जे सुशांतच्या बाबतीत झालं तसं नितू किंवा इतर कोणाच्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल तर खरंच या इंडस्ट्रीला यांचं म्हणणं ऐकून घ्यायलाच हवं.

ही संपूर्ण मुलाखत तुम्ही खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version