' इन्कम टॅक्सचा छापा नेमका कधी, कसा, का : खूपच इंटरेस्टिंग प्रक्रिया असते ही! – InMarathi

इन्कम टॅक्सचा छापा नेमका कधी, कसा, का : खूपच इंटरेस्टिंग प्रक्रिया असते ही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशावर प्रत्येकाचं प्रेम असतं, पण तरीही आलेल्या पगारातून किंवा व्यवसाय उत्पन्नातून ‘इन्कम टॅक्स’ कट झाला की प्रत्येकाला ते डाचत असतं. देश सुस्थितीत सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वेळच्या वेळी कर भरणे आवश्यक आहे हे माहीत असतं, पण तसं वागणं हे प्रत्येकाला आवडत नसतं.

कायदेशीर पद्धतीने इन्कम टॅक्स कसा वाचवावा? हे शिकवणारे कित्येक लोक आपल्या आजूबाजूला उपलब्ध असतात, पण खूप कमी लोक त्यांचा सल्ला घेतात.

माझं उत्पन्न कोणत्याही कागदपत्रांवर दिसू नये असा प्रयत्न आपल्यापैकी कित्येक लोक करतात आणि मग हे लोक रोख व्यवहार अधिक करण्यास सुरुवात करतात.

डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराला ज्याप्रमाणे आपल्याला कोणी बघत नाहीये असं वाटत असतं, तशी या लोकांची गत झालेली असते. कायद्याच्या नजरेत ते नेहमीच असतात. असे लोक काही काळ मजा उपभोगतात, पण जेव्हा त्यांचे आर्थिक व्यव्हार हे ठराविक पातळी ओलांडून पुढे जातात तेव्हा नियती आणि ईडी दोन्ही त्यांना सोडत नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘डोलो ६५०’ ही गोळी तयार करणाऱ्या ‘मायक्रोलॅब्स लिमिटेड’ या कंपनीच्या ४० उत्पादन आणि वितरण क्षेत्रांवर, कंपनीचे मालक दिलीप सुराणा आणि संचालक आनंद सुराणा यांच्या बँगलोर घरावर सध्या सुरू असलेले आयकर विभागाचे छापे आपण टीव्हीवर बघत आहोत.

इतकी मोठी कंपनी आयकर भरण्यात चूक कशी करू शकते? याचं सध्या सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. ‘दैनिक भास्कर ग्रुप’ला सुद्धा मागच्या वर्षी आयकर विभागाच्या धाडीला सामोरं जावं लागलं होतं.

छोट्या व्यवसायिकांनी, सामान्य नोकरदार व्यक्तींनी आयकर विभागाची धाड आपल्या घरावर येऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे एखाद्या वीज पडल्याप्रमाणेच भयानक असलेली इन्कम टॅक्सची धाड नेमकी कुठे पडते? जाणून घेऊयात.

आयकर विभागाची धाड म्हणजे काय?

‘अतिरिक्त किंवा बेहिशोबी मालमत्ता’ असलेल्या ठिकाणावर धाड टाकण्याची परवानगी ही आयकर विभागाला ‘सेक्शन १३२’ मधून मिळत असते. ही धाड कोणत्या वेळेस टाकावी? आणि ती किती दिवस चालावी? याचं पूर्ण स्वातंत्र्य आयकर विभागातील अधिकाऱ्यांकडे असतं.

 

income tax raid im

 

अजय देवगणच्या ‘रेड’ या सिनेमात दाखवल्याप्रमाणे सापडलेल्या संपत्तीचं काय करायचं? त्यावर जप्ती आणायची का? हा निर्णय सर्वस्वी आयकर अधिकाऱ्याचा असतो. या अधिकाऱ्याला पोलिसांच्या मदतीने तुमच्या जागेची झडती घेण्याची, कोणतेही कुलूप तोडण्याची परवानगी असते.

आयकर विभागाची धाड केव्हा आणि का होते?

भारताच्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘आयकर विभाग’ आणि ‘सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अँड द डायरेक्टरेट ऑफ इन्फोर्समेंट (ईडी)’ या दोन संस्था कोणती व्यक्ती, कंपनी कर भरत नाहीये याची सतत पाहणी करत असते.

एखादया व्यक्तीने भरलेला कर आणि त्याचं खरं उत्पन्न हे देखील या संस्थांच्या नजरेतून चुकत नसतं. या दोन्ही संस्थांनी प्रत्येक क्षेत्रात आपले काही गुप्तहेर नेमलेले असतात जे की त्यांना कर चुकवणाऱ्या किंवा केवळ रोख व्यवहार करणाऱ्या, उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करणाऱ्या, अघोषित पैसे किंवा दागिने असलेल्या लोकांची माहिती देत असतात.

आज सर्वांच्या परिचीत झालेल्या ईडीकडे पॅन कार्ड असलेल्या पण आयटी रिटर्न न भरणाऱ्या, फॉर्म १६ नसलेल्या आशा ‘संशयित’ व्यक्तींची यादी ठराविक अंतराने पोहोचत असते.

ईडी या यादीतील व्यक्तीच्या सर्व आर्थिक व्यव्हारांवर पुढील ३ महिने करडी नजर ठेवून असते. या काळात त्या व्यक्ती, कंपनीची अजून एक जरी आर्थिक चूक ईडीच्या नजरेस पडली, की ते ‘सेक्शन १३२’चा आधार घेत धाड टाकत असते. देशातील ‘काळा’ पैसा बाहेर आणणे हा धाड टाकण्यामागे प्रमुख उद्देश असतो.

 

income tax raid im1

 

आयकर धाड पडल्यावर नेमकं काय केलं जातं?

आयकर विभाग हे धाड टाकतांना ती व्यक्ती बेसावध असेल याची पूर्ण दक्षता घेत असते. अर्ध्या रात्री किंवा भल्या पहाटे जेव्हा ती संशयित व्यक्ती घरातील बेहिशोबी मालमत्तेची विल्हेवाट लावू शकणार नाही अशी वेळ ही धाड टाकण्यासाठी निवडली जाते.

‘सर्च वॉरंट’ सोबत घेऊन आलेली ही टीम कधी आपलं काम २-३ तासात पूर्ण करते, तर कधी ही धाड त्या घराच्या, मालमत्तेच्या आकारानुसार २-३ दिवस देखील सुरू असते. या काळात घरातील कोणत्याही व्यक्तीला घरातून हलण्याची, कोणाला संपर्क साधण्याची परवानगी नसते.

तुमच्या घरात सापडलेल्या प्रत्येक बिलाची, डायरीची, मालमत्ता कागदपत्र, कॉम्प्युटर, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह मधील माहिती बघण्याचा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार असतो.

एखाद्या कंपनीवर जर आयकर धाड टाकली असेल आणि जर उपलब्ध झालेल्या प्रत्येक वस्तू, पैशांचा आयकर परतावा भरलेला असेल तर आयकर अधिकारी त्या वस्तूंची केवळ नोंद करून घेत असतात.

 

income tax raid im2

 

आयकर विभागातील व्यक्तींची शहानिशा करूनच त्यांना घरात शिरू देण्याची परवानगी दिली पाहिजे, शिवाय घरातील महिलांची झडती घेण्यासाठी महिला अधिकारीच असावी असा नियम आहे. आयकर विभागातील अधिकारी हे घरातील लहान मुलांना शाळेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत असा देखील एक नियम आहे.

आयकर विभागाची धाड आणि आयकर विभागाची तपासणी किंवा सर्वेक्षण यातील फरक देखील सामान्य नागरिकांना समजणं अत्यंत आवश्यक आहे. इन्कम टॅक्स ऍक्टच्या ‘सेक्शन १३३ए’ मध्ये मोडणाऱ्या आयकर तपासणीची परवानगी ही केवळ व्यवसायाच्या ठिकाणी होऊ शकते.

जर व्यवसायाची कागदपत्र घरी ठेवण्यात आली असतील, तरच आयकर विभागाला घराची तपासणी घेण्याची परवानगी असते. आयकर विभागाची तपासणी ही केवळ कामाच्या दिवशीच केली जाऊ शकते.

आयकर विभागाच्या तपासणीत कोणत्याही पोलिसांना सोबत आणण्याची परवानगी नसते. या तपासणीत आयकर विभागाचे अधिकारी हे कोणत्याही वस्तूवर जप्ती आणू शकत नाहीत किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत वस्तू तपासू शकत नाहीत.

कायदेशीर पद्धतीने आयकर वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणे आणि स्वतःच्या व्यवसायाचं, कुटुंबाचं आयकर धाडीपासून सरंक्षण करणे हे आज प्रत्येक व्यक्तीने आपलं आद्य कर्तव्य मानलं पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?