' महाभारतातील ही ८ अस्त्र आपल्या आधुनिक शस्त्रास्त्रांबद्दल विचार करायला भाग पाडतात! – InMarathi

महाभारतातील ही ८ अस्त्र आपल्या आधुनिक शस्त्रास्त्रांबद्दल विचार करायला भाग पाडतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रामायण आणि महाभारत हे लोकांना पिढ्यान् पिढ्या माहीत असलेले पौराणिक ग्रंथ. अगदी लहानपणापासून आपण रामायण, महाभारतातल्या सुरस कथा ऐकलेल्या असतात. त्यातली काही पात्रंही आपल्या आवडीची झालेली असतात. रामायण हे राम आणि रावणमधल्या युद्धाविषयी आहे तर महाभारत हे कौरव-पांडवांमधल्या युद्धाविषयी. सुष्टांचा दुष्टांवर विजय हाच रामायण-महाभारतातल्या युद्धाचा गाभा.

या दोन्ही युद्धांमध्ये अतिशय शक्तिशाली शस्त्रास्त्रं वापरली गेल्याचं आपण वाचत आलेलो असू. आपल्याच बांधवांना कसं मारायचं या विचाराने अस्वस्थ झालेल्या अर्जूनाला तू तुझ्या भावांना मारणार नसून त्यांच्या वाईट वृत्तींना मारणार आहेस. तू भावनेच्या आहारी जाऊन त्यांना न मारायचा निर्णय घेतलास तर तो तुझा पळपुटेपणा ठरेल. त्यांना मारणं हे तुझं कर्तव्य आहे. शरीर आणि आत्मा यात फरक आहे.

 

mahabharat-yudh InMarathi

 

शरीर नश्वर असलं तरी आत्मा अमर आहे असं श्रीकृष्णाने अर्जूनाला समजावून सांगून त्याच्या मनातला संभ्रम दूर केला होता हे आपल्याला ठाऊक असेलच. धर्माचा अधर्मावर विजय व्हावा यासाठी कुरुक्षेत्र या युद्धभूमीवर महाभारताचं युद्ध झालं होतं. या युद्धात ब्रह्मास्त्र वापरलं गेलं असल्याचं बऱ्याच कथांमधून समोर आलेलं असतं किंवा ऐकिवात आलेलं असतं. पण ब्रह्मास्त्राखेरीज इतर ८ अस्त्रांचा उल्लेख महाभारतात आहे. त्यांची माहिती जाणून घेऊ.

पुराणानुसार, ब्रह्मास्त्र हे अस्त्र बाकी अस्त्रांच्या तुलनेत आणि मानवी इतिहासात वापरलं गेलेलं सर्वात शक्तीशाली अस्त्र असल्याचं समजतं. जो योद्धा एखाद्या व्यक्तीविरुद्ध किंवा सैन्याविरुद्ध हे अस्त्र वापरायचा त्यांचा विनाश अटळ असायचा. कुणालाही त्यावर पलटवार करता यायचा नाही किंवा ब्रह्मास्त्रापासून स्वतःचा बचाव करता यायचा नाही. पण हे ब्रह्मास्त्र वापरण्यावर काही मर्यादा होत्या.

योद्ध्याकडे असलेली बाकी सगळी आयुधं वापरून झाल्यावर मानवतेच्या कल्याणासाठी हे अस्त्र वापरायला परवानगी होती. आधुनिक तंत्रज्ञानाकडे पाहिलं तर ब्रह्मास्त्राची तुलना आण्विक शस्त्राशी करता येईल. मात्र ब्रह्मास्त्राखेरीजही ज्या इतर ८ अस्त्रांचा उल्लेख महाभारतात आहे त्यांच्याविषयी जाणून घेऊ.

१. पशुपतास्त्र :

भगवान शिव आणि काली मातेचं हे वैयक्तिक अस्त्र. संपूर्ण ब्रह्माण्ड उध्वस्त करण्याची ताकद या अस्त्रात होती. तपश्चर्या करून भगवान शंकराकडून हे अस्त्र मिळवता यायचं. धार्मिक नियमांनुसार, कुणीही आपल्यापेक्षा कमकुवत व्यक्तींच्या विरोधात हे अस्त्रं वापरायला परवानगी नव्हती. बऱ्याच चित्रपटांमधून आजवर शंकर आणि अर्जुनातलं युद्ध दाखवलं गेलंय. अर्जुनाने शंकराला प्रसन्न करून हे अस्त्र मिळवलं होतं. अर्थात, त्याने ते कधी वापरलं नाही.

 

pashu im 1

 

२. वासवी शक्ती :

हे इंद्रदेवाचं अस्त्र असून या अस्त्राने हल्ला केल्यानंतर कुणाचाही संहार अटळ असायचा. आपल्या कवचकुंडलांच्या बदल्यात कर्णाने हे अस्त्र विष्णूकडून मिळवलं होतं. त्याला हे अस्त्र एकदाच वापरता येणार होतं म्हणून ते त्याने अर्जुनाकरता वापरायचं ठरवलं होतं. पण भीमाचा मुलगा घटत्कोच याच्याविरुद्ध ते वापरायला त्याला भाग पाडलं गेलं.

 

vasavi im 2

 

३. महेश्वर अस्त्र :

या अस्त्रामध्ये शंकराच्या तिसऱ्या डोळ्याची ताकद असते. ते एकाच वेळी एखाद्याच्या शत्रूंची राख करू शकतं. भगवान शंकराचं किंवा विष्णूचं दुसरं एखादं अस्त्रच या अस्त्राच्या विरुद्ध वापरता येऊ शकायचं.

४. ब्रह्मशीर्ष अस्त्र :

पौराणिक ग्रंथानुसार, हे अस्त्रं ब्रह्मास्त्रापेक्षा ४ पट जास्त शक्तिशाली असल्याचं समजतं. ब्रहमदेवाच्या नावावरूनच या अस्त्राला ब्रह्मशीर्ष अस्त्रं असं नाव दिल्याचं समजतं. या अस्त्राच्या टोकावर ब्रह्मदेवाच्या चारही शीरांची शक्ती असते असं समजलं जातं.

ज्या जागेवर हे अस्त्र वापरलं गेलं होतं ती जागा १२ वर्षं ओसाड झाली होती. १२ वर्षं तिथे पाऊसही पडला नव्हता. शिवाय तो भाग विषारीही झाला होता. या अस्त्रामुळे होणारा संहार हायड्रोजन बॉम्ब किंवा थर्मोन्यूक्लियर हायड्रोजन बॉम्बमुळे होणाऱ्या संहाराच्या तीव्रतेचा असतो.

 

brahm im

 

५. भार्गव / ब्रह्मांड अस्त्र :

या अस्त्रामध्ये ब्रह्मशीर्ष अस्त्रासारखीच शक्ती असते. पौराणिक ग्रंथानुसार, हे अस्त्र वापरल्यानंतर जगाचा असा संहार होईल की राखही उरणार नाही. मात्र, या अस्त्राबाबतची एक चांगली गोष्ट अशी की ब्रह्मास्त्र आणि ब्रह्मशीर्ष अस्त्रांना शक्तिहीन करण्याची ताकद या अस्त्रामध्ये असते. पण जेव्हा हे अस्त्र संहारासाठी वापरलं जातं तेव्हा सगळं काही नामशेष होतं. पांडव धर्मासाठी लढत होते म्हणून पांडवांविरुद्ध हे अस्त्र वापरू नये अशी देवतांनी द्रोणाचार्यांना विनंती केली होती.

 

bhargav im

 

६. नारायणास्त्र :

या अस्त्राच्या नावावरूनच हे भगवान विष्णूचं अस्त्र असल्याचं समजतं. तपश्चर्या करून हे अस्त्र देवाकडून मिळवता यायचं. लाखो प्राणघातक क्षेपणास्त्रांवर गोळीबार करण्याची क्षमता या अस्त्रात होती. या अस्त्राला प्रतिकार केल्यानंतर ते अधिक मजबूत व्हायचं. त्याची तीव्रता अधिकच वाढायची. त्याच्या शक्तीपुढे शरण जाणं हा या अस्त्राचा हल्ला थांबवण्याचा एकमेव मार्ग होता. पण हे अस्त्र आयुष्यात एकदाच वापरता यायचं.

 

narayan im 1

 

७. वरूण अस्त्र :

वरूण देवाचं असलेलं हे अस्त्र इतर कुठल्याही अस्त्राचं स्वरूप घेऊ शकायचं. हे अस्त्र वापरण्यासाठी व्यक्तीकडे उत्तम कौशल्यं असणं आवश्यक होतं. सात्यकी, द्रोणाचार्य, अर्जुन, दृष्टद्युम्न यांसारख्या अनेक महान योद्धयांकडे हे अस्त्र होतं.

 

८. नागा अस्त्र :

नावाप्रमाणेच या अस्त्राचा आकार नागासारखा असून अर्जुनाविरुद्ध हे अस्त्र परिणामकारकपणे वापरण्यात कर्ण अपयशी ठरला. कारण, श्रीकृष्णाने अर्जुनाचा बचाव केला.

 

naga im

अण्वस्त्रांच्या निर्मितीनंतर जगाचा विध्वंस करण्याइतपत तंत्रज्ञान शक्तिशाली आणि धोकादायक झाल्याचं गेल्या शतकातल्या महायुद्धांनी आपल्याला दाखवून दिलंच आहे. पण पुराणकाळातही इतकी शक्तिशाली अस्त्रं होती हे पाहून तेव्हाच्या काळातही तंत्रज्ञान इतकंच किंवा त्याहूनही प्रगत असेल का आणि आता दिसणारी तंत्रज्ञानाची प्रगती ही त्या इतिहासाचीच पुनरावृत्ती असेल का असा प्रश्न पडतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?