' पुण्याहून सुरवात – आता यांचे क्रीमरोल्स परदेशातही चहासोबत खाल्ले जातात! – InMarathi

पुण्याहून सुरवात – आता यांचे क्रीमरोल्स परदेशातही चहासोबत खाल्ले जातात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणताही व्यवसाय सुरू करत असतांना त्या वस्तू किंवा सेवांची संपूर्ण माहिती घेणं अपेक्षित असतं. जर तो व्यवसाय वडिलोपार्जित असेल तर त्या व्यवसायाचे सर्व बारकावे पुढच्या पिढीला सहज उपलब्ध होत असतात.

कोणतीच पार्श्वभूमी नसतांना एखाद्या व्यवसायात उतरणं हे आव्हानात्मक असतं. पण, पुण्यातील ‘सचिन मालपाणी’ यांच्यासारखे लोक ते आव्हान स्वीकारतात आणि एक नवीन इतिहास रचतात.

१९९९ मध्ये सचिन मालपाणी यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ‘रविवार पेठ’ मध्ये त्यांनी ‘बेकरी प्रोडक्टस्’चं दुकान सुरू केलं. या व्यवसायाचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता. ‘संपूर्ण शाकाहारी बेकरी पदार्थ’ हा नवीन ट्रेंड सुरू करण्याचा त्यांनी ठरवलं.

‘शाकाहारी क्रीम रोल’ या पदार्थावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. त्या काळात पुण्यातील कॅम्प या भागात ‘इराणी बेकरी’चा खप सर्वाधिक व्हायचा, पण या स्पर्धेचा विचार न करता सचिन यांनी पुण्याची ओळख असलेल्या ‘अमृततुल्य’ चहाच्या छोट्या टपरी पासून सुरुवात करत छोट्या मोठ्या हॉटेल मध्ये जाऊन आपल्या शाकाहारी क्रीम रोलची त्यांनी लोकांना माहिती दिली, त्याचं मार्केटिंग केलं.

 

sachin malpani im

 

सचिन मालपाणी यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि ‘मालपाणी क्रीम रोल’ आणि ‘मालपाणी खारी’ हे आज केवळ पुण्यातच नाही तर बँगलोर, हैद्राबाद आणि सिंगापूर येथे सुद्धा चवीने खाल्ले जात आहेत.

‘बॅक लाईट क्रीम रोल’ या नावाने मालपाणी यांचे क्रीम रोल हे बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही क्रीम रोल पेक्षा अधिक कुरकुरित असल्याचा दावा केला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेने पुण्यात शाकाहारी व्यक्ती, कुटुंबांचं प्रमाण अधिक असल्याने मालपाणी यांच्या सर्व शाकाहारी बेकरी पदार्थांना पुणे, पिंपरी-चिंचवड येथे कमी काळात मान्यता मिळाली. रविवार पेठ येथे ७० स्क्वेअर फुट जागेत सुरू केलेल्या दुकानाचं आज एका मोठ्या व्यवसायात रूपांतर झालं आहे हा प्रवास प्रेरणादायी आहे.

बेकरी पदार्थांच्या व्यवसायात येण्यापूर्वी सचिन मालपाणी यांनी खाद्यपदार्थांच्या संबंधित ८-९ व्यवसायांमध्ये आपलं नशीब आजमावलं होतं. घरी तयार करण्यात आलेला ब्रेड, बिस्किट्स स्थानिक दुकानदारांना विकणे हे त्यांनी बरीच वर्ष केलं होतं. पण, मोठ्या प्रमाणावर पुरवठा करता यावा यासाठी त्यांनी काही बेकरींसोबत संपर्क साधला.

सुरुवातीला सचिन मालपाणी हे या बेकरींना ऑर्डर देऊन ब्रेड, खारी सारखे पदार्थ तयार करून घ्यायचे. पण, नंतर ‘वेळेवर माल न मिळणे’, ‘वजनात घट’, ‘चवीत फरक’ असे अनुभव त्यांना येऊ लागले.

आजच्या सारखे ‘गुगल रिव्यूह’चं प्रमाण तेव्हा कमी असल्याने कोणती बेकरी विश्वासार्ह आहे ही माहिती त्यांना उपलब्ध होत नव्हती.

२००३ पर्यंत सचिन मालपाणी यांचा हा संघर्ष सुरू होता, ज्यामुळे त्यांच्या मालाची मागणी कमी झाली आणि पर्यायाने त्यांना किती तरी काळ आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला होता. पण, सचिन यांनी धीर सोडला नव्हता.

मालपाणी हे सुरुवातीच्या काळात केवळ १० ते १५ ‘शाकाहारी क्रीम रोल’चे पॅकेट तयार करायचे. आपली उत्पादन क्षमता वाढली तर आपण अधिक ठिकाणी मालाची विक्री करू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं.

 

cream roll im

 

त्यांनी सातारा रोडवर असलेल्या ‘सिटी प्राईड’ सिनेमा समोर ९०० स्क्वेअर फुट इतकी जागा भाड्याने घेऊन त्यांनी तिथे आपल्या खारी, क्रीमरोलचं उत्पादन सुरू केलं. अधिक उत्पादन होऊ लागलेला माल ते लक्ष्मी रोड, डेक्कन, स्वारगेट येथील दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवू लागले. ‘मालपाणी’ यांची खारी आणि क्रीमरोल याची ओळख आता पूर्ण पुण्यात झाली होती.

२०१० मध्ये मालपाणी यांनी आपली उत्पादन क्षमता अजून वाढवली आणि आपलं बेकरी पदार्थांचं उत्पादन केंद्र त्यांनी ‘नऱ्हे – आंबेगाव’ येथे स्थलांतरीत केलं.

‘बॅक लाईट क्रीमरोल’ची वाढती मागणी लक्षात घेऊन मालपाणी यांनी पॅकिंगमध्ये सुधारणा आणली आणि वितरकांची संख्या वाढवली. त्यांनी गव्हाचे बिस्किट्स, टोस्ट, चॉकलेटी टोस्ट, मिल्क केक यासारखे पदार्थ शुद्ध शाकाहारी प्रकारात बाजारात विक्रीस आणले ज्याला लोकांची पसंती मिळाली.

सचिन मालपाणी यांनी सध्या ‘कस्तुरी’ या ब्रँड नावाने चकली, बाकरवडी, शंकरपाळे, ‘खारी-पुरी’ या पदार्थांच्या विक्रीवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.

 

chakali inmarathi

 

“आम्ही आमच्या स्पर्धकांकडे न बघता केवळ आमच्या पदार्थांची गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देत असतो. बेकरी पदार्थ हे शुद्ध शाकाहारी प्रकारात हे आम्हाला सुद्धा एक आव्हान होतं. पण, सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे आव्हान पेललं ” असं सचिन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

२०१० पासून मालपाणी यांची कंपनी ‘पब्लिक लिमिटेड’ झाली आहे. आज त्यांच्याकडे ४ ते ४.५ टन इतक्या बेकरी पदार्थांचं उत्पादन करण्याची क्षमता आहे. २०१४ पासून त्यांनी सिंगापूर या देशापासून आपल्या मालाची निर्यात करण्यास सुरुवात केली. इतर देशांमध्ये सुद्धा आपला माल निर्यात करण्यासाठी सध्या मालपाणी यांचे प्रयत्न सुरू आहेत.

इराणी बेकरीच्या पदार्थांची चव जिभेवर असलेल्या पुणेकरांना शाकाहारी क्रीमरोलचा पर्याय उपलब्ध करून सचिन यांनी मार्केट मध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. ‘अमृततुल्य’ चहाप्रमाणे त्यांचे बेकरी पदार्थ देखील उत्तरोत्तर लोकप्रिय व्हावेत यासाठी खूप शुभेच्छा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?