' राजकीय मंडळींच्या आश्वासनांना कंटाळून अखेर या समाजाने वेगळ्या राज्याची मागणी केलीय – InMarathi

राजकीय मंडळींच्या आश्वासनांना कंटाळून अखेर या समाजाने वेगळ्या राज्याची मागणी केलीय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो आपल्याला शाळेत असताना प्रार्थनेसोबत प्रतिज्ञा देखील म्हटलेली आठवत असेल. ‘भारत माझा देश आहे …पासून विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे…असा काहीसा आशय त्या प्रतिज्ञेचा होता. आणि तो खरा ही आहे. कारण आपला भारत देश खरंच अशा विविध संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध आहे मग ती नागरी असो की आदिम, या परंपरा आणि संस्कृती आपल्या देशाला वेगळेपण देतात. स्वातंत्र्यपूर्व काळात आपला देश अनेक राजे-रजवाडे यांच्या अधिपत्याखाली विखुरलेला होता.

स्वातंत्र्यानंतर एकछत्री प्रशासकीय अमल असावा यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नाने सारा देश एकसंध केला गेला आणि प्रशासकीय सोयीसाठी वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती केली गेली. पण त्यातून अडचण ही निर्माण झाली की राज्यानिर्मितीपूर्वी भारतात विविध संस्कृतींवर आधारित समाजपद्धती अस्तित्वात असल्याने राज्यनिर्मिती काळात या संस्कृतींची पण विभागणी होवून एकाच संस्कृतीचे लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागले गेले.

 

Sardar-Patel-InMarathi

 

भारतात १०० हून अधिक भाषा बोलल्या जातात,सोबत ७००भिन्न जमाती आणि काही प्रमुख धर्म आहेत तसेच जगातील काही महान शहरे आणि लोकसंख्या कमी असलेले दुर्गम प्रदेशही आहेत. या विविधतेमुळेच अलीकडे वेगवेगळ्या राज्यांच्या नवनिर्मितीची मागणी केली जात आहे. जसे की महाराष्ट्रातून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे.

हे एक उदाहरण समोर असतानाच आणखी एका स्वतंत्र राज्याची मागणी जोर धरत आहे राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश,गुजरात यांचा काही भाग आणि छत्तीसगढ अशी मागणीकर्त्यांची राज्यांसंदर्भातली रचनेची कल्पना आहे.

तुम्हाला जर या वर उल्लेखलेल्या राज्यांची माहिती असेल किंवा तुम्ही त्यापैकी एका राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला लक्षात येईल की या इलाक्याचे मुख्य रहिवासी भिल्ल जमातीचे लोक आहेत आणि स्वतंत्र ‘भिल्लप्रदेश’ या राज्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे तीही गेल्या ७५ वर्षांपासून… काय आहे नक्की या कहाणीमागची कहाणी? चला जाणून घेवू.

भिल्ल समाज नक्की आहे तरी कोण? 

भिल्ल, ज्यांना भेल्स असेही म्हणतात, हा आर्यपूर्व वंश असून भारतवर्षातील आदिम अशी जमात आहे. ‘भिल’ हा शब्द द्रविडी शब्द विल्लू किंवा बिल्लूपासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘धनुष्य’ असा होतो. हे लोक तीर-कमाठा किंवा धनुष्य चालवण्यात कुशल असतात. नर्मदा नदीच्या अवतीभवती ह्या लोकांची संस्कृती फुलली-फळली.

महाभारत आणि रामायण या दोन प्राचीन भारतीय महाकाव्यांमध्येही भिल्लांचा उल्लेख आहे. भील भाषा, इंडो-आर्यन भाषांच्या पश्चिम विभागाचा एक उपसंच आहे, २०११ पर्यंत पश्चिम आणि मध्य भारतात सुमारे १०.४ दशलक्ष लोक भिल्ल भाषा बोलत असल्याचे रेकॉर्ड आहे.

राजस्थानमधील दक्षिणेकडील अरवली पर्वतरांगा आणि मध्य प्रदेशातील पश्चिम सातपुडा पर्वतरांगा, वायव्य महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये ही भाषा बोलणारे आहेत.

 

bhilla im

 

अलिकडच्या काळात आता बहुतेक भिल्ल स्थानिक भाषा बोलतात, जसे की मराठी, गुजराती किंवा हिंदी. साधारण २०१३पर्यंत भिल्ल हे भारतातील सर्वात मोठे आदिवासी समुदाय होते. हे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थान (सर्व पश्चिम आणि मध्य भारतात), तसेच त्रिपुरा (सुदूर पूर्व भारतात,बांगलादेश सीमेजवळील भारतातील आदिवासी) या भागातील रहिवासी आहेत. पुढे अनेक प्रादेशिक विभागांमध्ये ते विभागले गेले आहेत, ज्यापैकी प्रत्येकाची स्वतःची कुळे आणि वंश आहेत. आणि आर्यपूर्व काळातील द्रविड किंवा नाग वंशाशी ते जोडलेले आहेत.

बहुसंख्य भिल्ल हिंदू आहेत. भगवान शिव आणि दुर्गा पूजेसह, ते वन देवता आणि राक्षसी आत्म्यांना शांत करतात. त्यापैकी फक्त अल्पसंख्याक ख्रिश्चन आहेत. ते त्यांच्या प्रथा आणि प्रथांनुसार अनेक धार्मिक विधी केल्यानंतर त्यांच्या मृतांचे दफन करतात. नृत्य, चित्रकला. कापड निर्मिती, कशिदाकारी आदि कलांमध्ये हे लोक पारंगत असून पिथोरा चित्रशैली आणि बहुचर्चित ‘घुमर’ नृत्य ही त्यांचीच देन आहे.

वेगळ्या राज्याची मागणी का?

१९१३ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या सहा वर्षे आधी घडलेल्या आणि “आदिवासी जालियनवाला” म्हणून ओळखले जाणारे मानगढ हत्याकांड घडले होते. या हत्याकांडात ब्रिटीश सैनिकांनी १७ नोव्हेंबर १९१३ रोजी राजस्थान-गुजरात सीमेवरील मानगढच्या डोंगरावर शेकडो भील आदिवासींना मारले. हे सारे भिल्ल आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करताना मारले गेले होते. यानंतरच भिल समाजसुधारक आणि अध्यात्मिक नेते गोविंद गुरू यांनी आदिवासींसाठी वेगळ्या राज्याची संकल्पना मांडली होती.

२०१७ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय आदिवासी पक्ष (BTP) या गुजरात-आधारित राजकीय पक्षाने भिल प्रदेशची कल्पना केली आहे, ज्यामध्ये चार राज्यांमध्ये विखुरलेल्या ३९ जिल्ह्यांनी बनलेले एक वेगळे राज्य निर्माण करता येईल ज्यात गुजरातमधील १६, राजस्थानमधील १०, मध्य प्रदेशातील ७ आणि महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांचा समावेश असेल.

 

jaliyanwala-baugh-marathipizza
www.pinterest.com

 

BTP चे संस्थापक अध्यक्ष डॉ. वेलाराम घोगरा यांच्या मते भील प्रदेशच्या मागणीचा स्वातंत्र्यानंतर सातत्याने पुनरुच्चार करण्यात आला. दाहोदचे काँग्रेसचे बहुकालीन खासदार सोमजीभाई डामोर; रतलामचे माजी खासदार दिलीप सिंग भुरिया, आणि राजस्थान विधानसभेचे माजी सीपीआय सदस्य मेघराज तवार, ज्यांनी दशकभर हा मुद्दा पुढे केला आणि पाठपुरावा केला आहे पण तो अजूनही प्रलंबित राहिला आहे.

डॉ घोगरा यांच्या मते, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश डुंगरपूर, बांसवाडा आणि उदयपूर हे प्रदेश पूर्वी एकाच घटकाचे भाग होते. तथापि, स्वातंत्र्यानंतर, राजकीय पक्षांनी आदिवासी बहुसंख्य प्रदेशांचे विभाजन केले, आदिवासींना संघटित होण्यापासून आणि एकत्र येण्यापासून रोखले.

स्वातंत्र्य पूर्व काळात देखील या लोकांवर जबरदस्ती करून इंग्रजांनी त्यांच्या कसत्या जमीनि बळकावल्या होत्या आणि सातबार्‍यावरून त्यांचे नाव कमी करून त्यांचे भारताचे नागरिक असल्याचे कोणतेही रेकॉर्ड ठेवले गेले नाही. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले होते.

आज देश स्वतंत्र झाल्यावर देखील फारसा फरक पडलेला नाही. एखाद्या सेकंडहँड टीव्ही किंवा टूव्हीलर च्या मोबदल्यात त्यांच्या जमिनी आपल्या नावावर करून घेण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

श्री घोगरा यांच्या म्हणण्यानुसार, अनेक केंद्रीय प्रशासनांनी आदिवासींसाठी अनेक दशकांपासून वेगवेगळे कायदे, प्रोत्साहन कार्यक्रम आणि समितीच्या शिफारशी आणल्या आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी करण्यास कचरत आहेत. त्यामुळे ही आदिम जमात आजवर मूलभूत विकासापासून देखील वंचित राहिली आहे..

 

state im 1

पारसी लोकांच्या अंत्यसंस्कारांची ही वेगळीच पद्धत अनेकांना विचारात टाकते!

समाजाची सर्व बंधने झुगारून ही मराठमोळी स्त्री बनली भारताची पहिली महिला डॉक्टर!

आपल्या देशाच्या घटनेतील कलम २४४(१) नुसार पाचव्या अनुसूची द्वारे आदिवासींच्या हिताचे रक्षण करण्याच्या विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत, पण दुर्दैवाची गोष्ट ही की आजवर सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने त्यांची अंमलबजावणी केलेली नाही आणि हेच विकासापासून वंचित ठेवले गेल्याचे कारण वेगळ्या राज्याच्या मागणीमागे मुख्यत्वे आहे. कर्ण आजवर प्रत्येक प्रमुख पक्षाने आदिवासींकडे केवळ आणि केवळ व्होट बँक म्हणूनच पाहिले आहे.

२५वर्षे झाली, तरी या लोकांना कायद्याची माहितीही नाही. की ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्या आमदार आणि मंत्र्यांनाही कायद्याची नीट माहिती नाही. प्रत्येक वेळी या भिल समाजाला विकासासाठी ‘पुढची वेळ’ दाखवली गेली जी आजतागायत आलेली नाही.

BTP च्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक वेगळा भिल प्रदेश निर्माण करणे हे आहे. गेल्या दशकभरापासून या मागणीमध्ये आपला थेट सहभाग असल्याचे घोगरा यांनी सांगितले. आदिवासींना एकत्रित करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी सभा आणि मेळावे BTP कडून नियमितपणे आयोजित केले जातात.

सद्यस्थिती अशी आहे की आदिवासी तरुणांचा देशातील प्रमुख राजकीय पक्षांवरचा विश्वास उडाला आहे, चंद्रावर, मंगळावर जाण्याची भाषा करणार्‍या या देशातील एक समाज वीज, पाणी, रस्ते, शिक्षण अशा मूलभूत विकासापासून आजही कोसो दूर आहे.

हीच कारणे आहेत की भिल समाजाकडून केली जात असलेली वेगळ्या राज्याची मागणी जोर धरते आहे. आजवरच्या इतिहासात डोकावून पहिले असता जिथे समाज विकासपसून वंचित राहिला तिथेच क्रांतीची बीजे रोवली गेली आहेत. वेगळ्या भिल्ल प्रदेशाची मागणी हा त्याचाच परिपाक आहे, तुम्हाला काय वाटते?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?