' KK…आमची पिढी घडवून असं निघून जायला नको होतंस…! – InMarathi

KK…आमची पिढी घडवून असं निघून जायला नको होतंस…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच KK, आजवर कधी या माणसाचं पूर्ण नाव जाणून घेण्याची तसदी आपण कुणीच कधी घेतली नाही, किंबहुना या माणसाविषयी फार कुणी लिहिलंसुद्धा नाहीये, पण कालपासून मात्र सगळेच अगदी भरभरून लिहितायत.

इरफान गेला तेव्हा जसं वाटत होतं अगदी तसंच आत्ताही वाटतंय, आपल्यातली व्यक्ति गेल्याप्रमाणे प्रत्येकजण भरभरून व्यक्त होतोय. खरं सांगायचं झालं तर साऱ्या संगीतविश्वाला पोरकं करून गेलाय KK!

 

KK IM

 

सध्याच्या ऑटोट्यूनच्या जमान्यात हातावर मोजण्याइतक्या काही ग्रेट गायकांपैकी एक होता KK. काल रात्री हा माणूस गेला यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. त्याच्या शेवटच्या concert च्या काही क्लिप समोर येत आहेत, त्या क्लिप बघून खरंच मन सुन्न झालंय!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरं बघायला गेलं तर KK हा तसा ९० आणि त्यानंतच्या जनरेशनचा किशोर कुमारच, पण आज त्याचं हे असं जाणं सगळ्यांनाच चटका लावून जाणारं आहे. आपल्या घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना याचं नाव बहुतेक ठाऊक नाही, पण त्याची अजरामर गाणी त्यांना चांगलीच लक्षात आहेत आणि राहतील.

अगदी माचिस मधल्या ‘छोड आये हम वो गलीयां’पासून अगदी ओम शांती ओम मधल्या ‘अजब सी’ पर्यंत. आज त्याच्या या गाण्यांची किती पारायणं होणार आहेत देवच जाणे.

 

kk 3 IM

 

आज खरंच अशा कित्येक संगीतप्रेमी लोकांची अवस्था बघून काही क्षण परमेश्वरालासुद्धा या अशा हरहुन्नरी गायकाला घेऊन आल्याचा पश्चात्ताप होईल. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच सगळ्यांना राहून राहून वाटतंय.

जसे आमच्या आई वडिलांनी आम्हाला किशोर, रफी लता यांचे बाळकडू पाजले तसेच KK चे बाळकडू आम्ही आमच्या मुलांना देऊ. KK कोण होता? स्वतःच्या आवाजाने आमच्यासारख्या लाखो तरुणांच्या मनातील जखमांवर फुंकर घालणारा एक फकीरच होता.

नैराश्यातून ‘कुछ ऐसा करके दीखा खुद खुश हो जाये खुदा’ असं म्हणत आम्हाला बाहेर काढणारा KK होता. दिल चाहता है सिनेमाइतकंच पाथब्रेकिंग अशा ‘कोई कहे केहता रहे’ या गाण्याशिवाय आजही कोणत्या पार्टीची सुरुवात किंवा शेवट होत नाही.

 

koi kahe kehta rahe IM

 

‘हम रहे या ना रहे कल’ असं म्हणत कित्येकांच्या शाळा कॉलेजेसच्या सेंड ऑफला मैत्रीचं महत्व पटवून देणारा KK होता. ओम शांती ओममध्ये दीपिकाच्या खळीपेक्षा KK च्या गोड आवाजावर जीव ओवाळून टाकावा असं वाटत होतं.

इम्रान हाश्मीचं करियर हे त्याच्या किसिंग सीन्सनंतर त्यांच्या गाण्यांसाठी ओळखलं जातं आणि या त्याच्या अफाट करियरमध्ये हिमेश नंतर खारीचा वाटा उचलला तो KK नेच!

देवदासमधलं ‘डोला रे डोला’ हे गाणं जेवढं माधुरी आणि ऐश्वर्याचं किंवा श्रेया घोषाल आणि कविता कृष्णमूर्तीचं तितकंच ते गाणं KK चंसुद्धा आहे.

‘तडप तडप’ किंवा ‘सच केह रहा है दिवाना’सारख्या गाण्यातून मीसुरडं फुटलेलं नसतानाही प्रेमभंगाच्या भावनेची जाणीव KK ने त्याच्या आर्त आवाजातून आम्हाला करून दिली.

 

tadap tadap IM

 

९० च्या जनरेशनचं बालपण, तरुणपण आणि आता ३० शी नंतरचा काळ फक्त आणि फक्त KK मुळे समृद्ध झाला हे अगदी निर्विवाद सत्य आहे. एवढं होऊनही हा माणूस कधीच प्रकाशझोतात आपल्याला दिसला नाही.

हिंदी नव्हे तर इतरही अनेक भाषेत गाणी गाणारा KK हा कधीच कोणत्याही रिऍलिटी शोच्या मंचावर दिसला नाही, परीक्षक म्हणून नाही आणि पाहुणा म्हणूनही नाही. KK ने कधीच स्वयंघोषित सेलिब्रिटी बनायचा प्रयत्न केला नाही, तो मनोभावे संगीताची सेवा करणारा सच्चा कलाकार होता.

म्हणूनच केवळ स्वतःचे लाईव्ह शो आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देणाऱ्या KK विषयी आज इतकं भरभरून लिहावंसं वाटतंय, पण KK तुझं हे अचानक असं ‘अलविदा’ म्हणून एक्जिट घेणं आम्हाला पटलेलं नाहीये.

अजूनही या धक्क्यातून कुणीच सावरलेलं नसतानाही, सोशल मीडियावर काही ठिकाणी KK चा मृत्यू अनैसर्गिक असल्याचं वाचण्यात आलं आणि एक तिडिक डोक्यात गेली.

 

KK singer IM

 

TRP साठी हापलेल्या या लोकांना माझी एकच नम्र विनंती आहे, आम्हाला आयुष्याचा नेमका अर्थ सांगणाऱ्या KK चा सुशांत सिंह राजपुत करू नका, थोडी संवेदशीलता बाळगा!

खरंतर या अवलियाला श्रद्धांजली वाहायला मन धजावत नाहीये, तरी मनावर दगड ठेवून हे वास्तव स्वीकारावं लागेल. पुढचे काही दिवस आमच्या मोबाइलवर दुसरं काही नसेल पण KK च्या गाण्यांची प्लेलिस्ट लुपवर सुरू असेल हे मात्र नक्की!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?