' ज्या धरणामुळे पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सतत वाद होत असतात ते नेमकं प्रकरण आहे तरी काय? – InMarathi

ज्या धरणामुळे पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सतत वाद होत असतात ते नेमकं प्रकरण आहे तरी काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दोन जिल्ह्यांमध्ये राजकीय वैर असतं हे आपल्याला काही नवीन नाही. आमदार,खासदार किंवा अगदी निवडणुकीच्या जागांवरून जिल्ह्यांत पडलेली फूट किंवा तणाव आपल्याला नवीन नाही मात्र आता जिल्ह्यातल्या तणावाला कारण ठरलंय ते एक ‘धरण’ असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल कसं काय?

सोलापुरातील उजनी धरण हे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील वादाचा केंद्रबिंदू ठरलंय ! कसं ? चला पाहुयात !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

*राजकारणामुळे चर्चेत आलेले उजनी धरण !*

सोलापूर जिल्ह्यात विमानगर या गावामध्ये उजनी धरण आहे. १९६९ साली या धरणाचे काम सुरू झाले १९८० मध्ये धरण बांधून पूर्ण झाले.महाराष्ट्रातील हे एक प्रमुख धरण असून कोयना आणि जायकवाडी या धरणांनंतर या धरणाचा तिसरा क्रमांक लागतो.

या धरणाची उंची ५६.४ मीटर असून लांबी २५३४ मीटर आहे. उजनी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही ११७ टीएमसी म्हणजे ११००००दशलक्ष घनफुट असून त्यातील ५०.८५ टीएमसी म्हणजे५०८५० दशलक्ष घनफुट हा जिवंत साठा आहे. या धरणाला मिळणारे पाणी हे प्रामुख्याने पुण्यातील मुळा आणि मुठासारख्या नद्यांमधून येते.

 

ujani im 1

 

उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असेही म्हणतात.दुष्काळी सोलापुरात उसाची शेती वाढविण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे धरण म्हणून उजनीचा उल्लेख होतो, तर कधी शंभर टक्के म्हणजे ११७ टीएमसी पाणीसाठा असलेल्या या धरणातील पाणी सातत्याने ऊस शेतीसाठी फस्त केले जात असल्याने एका वर्षांतच पाणीसाठा संपून तळ गाठतो, तेव्हा चुकीच्या पाणी नियोजनावरून या धरणाची चर्चा होते. यंदादेखील हे धरण पाणी विचित्र नियोजनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

*सोलापूर-पुणे आणि उजनी नेमका वाद काय ?*

उजनी धरणाचे बरेचसे म्हणजे सुमारे ८२ टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्यातील वंचित भागासाठी नियोजित आहे. उजनीची मूळ उपसा सिंचन योजनाच अर्धवट असल्याने आपल्या हक्काच्या पाण्यापासून बहुसंख्य तालुके अद्यापही तहानलेलेच आहेत.

आतापर्यंत या योजना तातडीने पूर्ण करत सोलापूरच्या तहानलेल्या भागात पाणी पोहोचवणे गरजेचे होते मात्र तसे न करता सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या दत्ता भरणे यांनी आपला इंदापूर तालुक्याचा विचार करून वेगळाच निर्णय घेतला.

तो असा की आपल्या तालुक्याला फायद्याची ठरणारी ‘लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना’ शासनाकडून हळूच मंजूर करून घेतली अशी लोकांमध्ये चर्चा आहे. दत्तामामा असा निर्णय घेतील याची चाहूल मागच्या वर्षीच आल्याने त्यावेळेपासूनच या निर्णयाविरुद्ध आंदोलनास सुरुवात झालेली होती. परंतु अशी कुठलीही चर्चा नसल्याचे सांगत भरणेंनी त्यावेळी हा प्रश्न शांत केला गेला.

 

ujani im 3

 

दरम्यान, नुकतीच ३४८ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट झाले आणि सोलापूरकरांचा संताप बाहेर आला.

तहानलेल्या सोलापूरकरांचे हे पाणी पुन्हा संपन्न असलेल्या इंदापूर आणि बारामती भागांत वळवण्याच्या या निर्णयावर राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य जनतेतूनही रोष व्यक्त होतोय.

राज्यात कितीही सत्ताबदल होऊदे कोणाच्याही हाती सत्ता गेली तरी इकडे सोलापुरात उजनी धरणाच्या पाणीनियोजनाचा उडणारा बोजवारा आजही उडतोच आहे. विविध पक्षांचे मंत्री, नेते ऊस शेतीसाठी ठिबक सिंचनाची केवळ चर्चा करतात. प्रत्यक्षात ठिबक सिंचनाचे बंधन सक्तीचे होण्यासाठी काहीच हालचाल करीत नाहीत, असे दिसते. कारण ही नवी सत्ताधीश मंडळीही सरंजामदार झाली आहेत.

त्यांनीही साखर कारखाने उभारले आहेत, तर काही जण राजकीय आश्रयासाठी सत्ताधारी नेत्यांच्या वळचणीला जाऊन स्वत:च्या साखर कारखानदारीचे हितरक्षण करीत आहेत.

 

sugar im

 

**उजनी सोलापूरसाठी ‘संजीवनी’ !*

मंडळी..इतिहास असं सांगतो की उजनीच्या पाण्यामुळे दुष्काळी सोलापूर जिल्ह्याचा कायापालट होत येथील कृषी क्षेत्रात मोठी क्रांती झाली. फळबागांचे जाळे, मोठ्या प्रमाणावरील ऊस उत्पादन, त्यावर सुरू झालेले भरपूर साखर कारखाने हे सारे या उजनीच्या पाण्यावरचं घडले.

या धरणाचे भूमिपूजन १९६४साली करणारे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांच्या ‘युगांतर’ ग्रंथात लिहितात की ‘भीमा नदी आडवायचे हे जे काम चालले आहे, ते तरी कशाकरिता चालले आहे? ही वाहत जाणारी नदी आम्हाला पाहवत नव्हती म्हणून हे काम चालले नसून तर या नदीच्या पाण्यात जे सामर्थ्य आहे, त्याचा उपयोग आमच्या शेतीला झाला पाहिजे आणि त्या शेतीतून संपत्ती निर्माण झाली पाहिजे, असा या कामाचा अर्थ आहे.’

 

ujani im 2

उजनी धरणाच्या निर्मितीनंतर त्याचे पाणी आजही सोलापूर जिल्ह्य़ातील बहुतांश भागांपर्यंत पोहोचले नाही. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट यांसारख्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अंगणात उजनीरूपी गंगा अजून अवतरलीच नाही. त्यासाठीच्या हाती घेतलेल्या सिंचन योजना अद्यापि अपूर्ण आहेत.

हा बहुतांश भाग उजनीच्या पाण्यापासून वंचित राहात असताना दुसरीकडे धरणातील शंभर टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात म्हणजे तब्बल १२० टीएमसी पाणी आहे त्या परिस्थितीत जर पुरत नसेल तर अवघड आहे?

सोलापूरमधील २२ गावांच्या पिण्याच्या पाणीयोजना अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. या योजना मार्गी लावण्याऐवजी सांडपाणी दाखवून पाच टीएमसी पाणी उजनीतून इंदापूरला देण्यास सोलापूर जिल्ह्याचा विरोध हा तितकासा आक्षेपार्ह वाटत नाहीये.आता राजकारण्यांच्या आणि ‘पक्षाच्या जवळच्या जिल्ह्याकडे’ असलेला ओढा हा सोलापूरकरांचे तोंडचे पाणी पळवणार की राखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?