नॅनो टाटांना चालवायला आवडते, पण लोकांना नकोशी वाटते! एक क्लासिक केसस्टडी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘घरी स्वतःची कार असणे’ हे कित्येक वर्ष श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं. कालांतराने वाहन कर्ज मिळणं सोपं होत गेलं, ऑटोमोबाईल क्षेत्राने सामान्य माणसाची गरज आणि कार विकत घेण्याची ऐपत यानुसार कार तयार केल्या आणि सर्व चित्र बदललं. आज पेट्रोलच्या वाढलेल्या भावामुळे ‘कार वापरणं’ हे नक्कीच श्रीमंतीचं लक्षण आहे. पण, ती विकत घेणं हे ९० च्या दशकापेक्षा आता खूप सुसह्य झालं आहे.
“सामान्य माणसाला सुद्धा कार मध्ये फिरता आलं पाहिजे. आपल्या घरातील इतर ३ माणसांना घेऊन तो स्कुटरवर दाटीवाटीने फिरला नाही पाहिजे” हे स्वप्न टाटा उद्योगसमूहाचे संचालक आदरणीय रतन टाटा यांनी सर्वप्रथम बघितलं.
जसं, एकेकाळी रिलायन्सने ‘५०० रुपयात मोबाईल’ ही योजना आणून भारतातील मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या कैकपटीने वाढवली तसं रतन टाटा यांनी “१ लाखात कार” असं एक स्वप्न बघितलं आणि ते त्याने सत्यात उतरवून दाखवलं. अर्थात, या दोन्ही उद्योगसमूहांमध्ये नैतिकदृष्ट्या कमालीची तफावत आहे हे नेहमीच जाणवतं.
रिलायन्सचे निर्णय हे तद्दन व्यवसायिक असतात, तर टाटा उद्योगसमूह हे व्यवसायिक आणि काही अंशी भावनिक किंवा समाजोपयोगी असतात हे त्यांनी नेहमीच करून दाखवलं आहे.
जून २०१८ मध्ये निर्माण करण्यात आलेली ‘टाटा नॅनो’ ही कार व्यवसायिक फायद्यापेक्षा रतन टाटा यांच्या इच्छेमुळे तयार करण्यात आली होती हे उदाहरण प्रचलित आहे. रतन टाटा आज देखील स्वतः ‘नॅनो’ मधून प्रवास करतात हे त्यांनी परवा मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावतांना दाखवून दिलं. सोशल मीडियावर या गोष्टीचं सध्या प्रचंड कौतुक होत आहे.
कमी किमतीत मिळणारी, छोट्या परिवाराला साजेशी, छोटा आकार असल्याने गर्दीतूनही पटकन निघू शकणारी नॅनो रतन टाटा यांना अपेक्षा होती तितकी लोकप्रिय का झाली नाही ? हा प्रश्न त्यांना, टाटा उद्योगमूहाला नेहमीच पडत असणार.
कमी पेट्रोल लागणारी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा सुचनांचं पालन करणारी , कमी प्रदूषण करणारी असे सर्व पुरस्कार प्राप्त होऊनही ‘टाटा नॅनो’ लोकांना प्रभावित करण्यात कुठे कमी पडली? ही एक केस स्टडी आहे.
नॅनो लोकप्रिय न होण्यामागे कदाचित भारतीय लोकांची ‘मोठी कार असावी’ ही मानसिकता कारणीभूत असेल. पण, वाहन म्हणून ‘नॅनो’ मध्ये काही चुका होत्या का आणि कोणत्या? यावर ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकारांनी अभ्यास करून आपलं मत नोंदवलं आहे. काय आहेत ती तांत्रिक कारणं ? हे जाणून घेऊयात.
१. पहिल्या दोन वर्षात काही ठिकाणी “‘टाटा नॅनो’ने पेट घेतला” अशा बातम्या समोर आल्या होत्या. हा प्रश्न सोडवतांना टाटा मोटर्सने आपल्या वॉरंटी काळात वाढ केली होती. पण, तोपर्यंत लोकांच्या मनात नॅनो बद्दल साशंकता निर्माण झाली होती.
२. टाटा नॅनो ही सिंगुरला तयार होणार होती. पण, ममता बॅनर्जी यांनी त्यामध्ये खोडा घातला. टाटा मोटर्सने नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून गुजरात मधील सानंद येथे नॅनो तयार करण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींमुळे ग्राहकांना बुकिंग केल्यापासून १८ महिन्यांनी कार मिळू लागली. ज्या कारची इतकी जाहिरात झाली होती तिच्यासाठी इतके दिवस थांबणं हे ग्राहकांना पटत नव्हतं.
३. ‘मारुती सुझुकी’च्या कार चालवण्याची सवय असलेल्या भारतीयांमध्ये टाटा नॅनो चालवतांना ती ‘आरामदायक’ भावना निर्माण होत नव्हती. काही ग्राहकांना ४ लोक गाडीमध्ये असले की, गाडी हलत असल्यासारखं वाटलं आणि हा अभिप्राय वाऱ्यासारखा पसरला.
४. “सर्वात स्वस्त कार” हे टॅग ‘नॅनो’ला सुरुवातीपासूनच लागलं होतं. पण, बहुतांश भारतीय लोक हे “सस्ती चिजोंका शौक हम नही रखते” या प्रकारात मोडणारे असल्याने त्यांना ही स्वस्त कार विकत घेणं म्हणजे कमीपणा वाटत होता.
एखाद्या वस्तू, वाहन यांची उपयुक्ततेपेक्षा ती “किती महाग आहे ?” हे सांगण्यात आपल्यापैकी बहुतांश लोकांना आनंद वाटत असतो. महाग कार विकत घेतल्याचं समाधान टाटा नॅनो लोकांना देऊ शकत नव्हती आणि म्हणून लोकांनी तिला नाकारलं. स्कुटर वापरणारे ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण म्हणून नॅनोची निवड करू शकत होते. पण, त्यांनी देखील तो पर्याय निवडला नाही.
५. “एक लाखात कार” अशी बातमी झळकून प्रसिद्ध झालेली टाटा नॅनो ही प्रत्यक्षात एक लाखात कधी मिळतच नव्हती. उत्पादक – वितरक – शोरूम या साखळीतून ग्राहकांपर्यंत येईपर्यंत टाटा नॅनोची किंमत २ ते अडीच लाखापर्यंत जायची. बजेट मध्ये वाटणारी कार लोकांच्या बजेटच्या बाहेर जाऊ लागली आणि लोक त्या ऐवजी ‘मारुती अल्टो’चा पर्याय निवडू लागले.
–
अदानींवर टीका करणाऱ्या Quint ने स्वतःला अदानींनाच विकून टाकलंय!
जाणून घ्या आयफोनच्या मागच्या बाजूला असणाऱ्या व्हाईट लाईन्स मागचा अर्थ!
–
‘टाटा नॅनो’ मध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींमध्ये त्याचं इंजिन मागच्या बाजूला असल्याचा समावेश होतो. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला मिळणारी प्रशस्त ‘लेग रूम’ ही त्या प्रकारच्या गाड्यांमध्ये सर्वाधिक आहे. लडाख सारख्या उंचीवर असलेल्या ठिकाणी सुद्धा टाटा नॅनो ही चांगला ‘पिक अप’ देत असल्याची ग्राहकांनी नोंद केली आहे.
‘टाटा नॅनो’ने ‘युरोपा’ नावाची युरोपसाठी एक आवृत्ती काढली होती जी सध्या तयार होऊन निर्यात केली जात आहे. पण, भारतीय ‘नॅनो ट्विस्ट’चं प्रमाण हे खूप कमी करण्यात आलं आहे.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या नॅनोमध्ये आग लागण्याच्या तक्रारींवर विशेष लक्ष देण्यात आल्याचं कंपनीने जाहीर केलेल्या पत्रकात सांगितलं आहे. लवकरच ‘टाटा नॅनो’ची इलेक्ट्रिक आवृत्ती येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही कार यशस्वी होईल असं जाणकारांचं मत आहे.आज नॅनो किंवा इतर कोणत्याही कारची मागणी कमी होण्याचं कारण हे ‘ओला’, ‘उबर’ यांना लोकांचा वाढता प्रतिसाद हे देखील सांगितलं जात आहे.
एका सर्वेक्षणात असं देखील समोर आलं आहे की, टाटा नॅनो जर लोकांना पैशांचं, स्वस्त वस्तूंचं महत्व पटलेल्या २०२१ मध्ये लाँच करण्यात आली असती तर तिला जास्त प्रतिसाद मिळाला असता. यामध्ये किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे. पण, आता ४ वर्षांनी जरी ‘टाटा नॅनो’ला मिळणारा प्रतिसाद वाढला तर रतन टाटा यांच्याबद्दल मनात आदर असलेल्या लोकांना ते खूप आवडेल हे नक्की.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.