' महागाईने दिला या राज्यांना सर्वाधिक दणका!! महाराष्ट्र कोणत्या नंबरवर आहे जाणून घ्या – InMarathi

महागाईने दिला या राज्यांना सर्वाधिक दणका!! महाराष्ट्र कोणत्या नंबरवर आहे जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अचानक वाढलेली महागाई हे पुन्हा एकदा सर्वसामान्य नोकरदार वर्गाच्या चिंतेचं कारण झालं आहे. लिंबासारख्या रोजच्या जीवनातल्या आणि त्यातही उन्हाळ्यासारख्या ऋतूत आवश्यक असलेल्या पदार्थाच्या किंमती काहीच्या काही वाढल्या तेव्हा साधं लिंबू घेणंही लोकांना परवडेनासं झालं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या पगारानुसार दर महिन्याला आपण खर्चाचं बजेट आखलेलं असतं. आपला खर्च त्याउपर आपण शक्यतो जाऊ देत नाही. पण आता हे बजेट आखतानाच कुठे कुठे काटछाट करायची हे ठरवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे.

 

Inflation and Economy.Inmarathi
indiatoday.in

 

सर्वसामान्य माणूस असं जरी म्हटलं तरी सगळ्याच सर्वसामान्यांचे आर्थिक स्तर सारखे नसतात. थोड्याफार फरकाने वरखाली असतात. त्यामुळे अमुक एका सर्वसामान्य माणसाला परवडणारी गोष्ट त्याच्या सर्वसामान्यच असलेल्या शेजाऱ्यालाही परवडेल असं नसतं.

बाकी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत काटकसर करता येईल, पण जीवनावश्यक खाद्यपदार्थच जर महागले तर काय करायचं असा एक मूलभूत प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालाय.

सध्या वाढलेल्या महागाईने बऱ्याच राज्यांना दणका दिलाय. दुर्दैवाने महाराष्ट्रही यात मागे नाही. सध्याची ही परिस्थिती आणि वेगवेगळ्या राज्यांमधली महागाईची आकडेवारी जाणून घेऊ.

गुरुवारी १२ मे ला एप्रिल महिन्यातली महागाईची आकडेवारी जाहीर केली गेली आहे. या आकडेवारीने मागच्या तब्बल ८ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महागाईचा सरासरी राष्ट्रीय दर ७.७९ % आहे.

भारतातला किरकोळ महागाईचा दर मार्च महिन्यात ६.९५ टक्क्यांवर पोहोचला होता. त्याआधीच्या दीड वर्षाच्या तुलनेत हा दर सर्वाधिक होता. फेब्रुवारी महिन्यात ५.८५ टक्क्यांनी खाद्यपदार्थ महाग होते. मार्च महिन्यात ही टक्केवारी ७.६८ वर पोहोचली. त्याचबरोबरीने इंधन आणि वस्तू आणि सेवांच्या उत्पादनांच्या किंमतीतही वाढ पहायला मिळाली.

 

Inflation and Economy.Inmarathi2
arabnews.com

 

शहरी ग्राहकांच्या तुलनेत ग्रामीण ग्राहकांना या महागाईचा फटका बसला. फेब्रुवारी महिन्यात अन्नपदार्थांच्या किंमतीचा निर्देशांक ५.८१ % होता. तो वाढून मार्च महिन्यात ८.०४% झाला. मार्च महिन्यात खाद्यपदार्थ आणि पेयांच्या महागाईचा दर ७.४७%, तेलं आणि फॅट्स यांच्या महागाईचा दर १८.८% तर भाज्यांच्या महागाईचा दर फेब्रुवारी महिन्यातील ६.१% या दरावरून जवळपास दुप्पटीने वाढून मार्च महिन्यात ११.६% झाला.

मटण आणि माशांच्या महागाईचा दर फेब्रुवारी महिन्यातील ७.४% या दरावरून मार्च महिन्यात ९.६३% झाला. कपडे आणि फूटवेअर्सची महागाई मार्च महिन्यात ९.४ टक्क्यांवर पोहोचली.

 

fish inmarathi

 

गुरुवारी १२ मे ला सरकारने महागाईची जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार खाद्यपदार्थ, पेयं, महागडी खाद्यतेलं, इंधनं, मसाले, कपडेलत्ते, बूट अशा सगळ्या रोजच्या वापरातल्या गोष्टींच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या नाकी नऊ येत आहेत. ही महागाई होण्यामागची बरीच कारणं जागतिकही असल्याचं समजतंय.

देशाच्या ७.७९ % या सरासरी महागाईच्या दरापेक्षा काही राज्यांमध्ये अधिक महागाई आहे तर काही राज्यांमध्ये कमी. महाराष्ट्रातदेखील सरासरी राष्ट्रीय महागाई दरापेक्षा जास्त महागाई आहे. झारखंड मध्ये ७.८०%, पश्चिम बंगालमध्ये ९.१२%, ओडिसामध्ये ८.०८%, उत्तर प्रदेशमध्ये ८.४६%, तेलंगणामध्ये ९.०२%, गुजरातमध्ये ८.२०%, हरियाणा मध्ये ८.९५%, मध्य प्रदेशात ९.१०%, राजस्थानमध्ये ८.१२%, आसाममध्ये ८.५४ % तर महाराष्ट्रामध्ये ८.७८% महागाईचा दर आहे.

या सगळ्या राज्यांमधले महागाईचे दर महागाईच्या सरासरी राष्ट्रीय दरापेक्षा जास्तच असल्याचं आपल्याला दिसून येतं. काही राज्यांमधला महागाईचा दर महागाईच्या सरासरी राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे. उत्तराखंडमध्ये ६.७७%, बिहारमध्ये ७.५६% आणि दिल्लीमध्ये फक्त ६.५८% महागाईचा दर आहे.

महागाईचे हे आकडे बघता सर्वाधिक महागाईने ग्रासलेले राज्य म्हणजे पश्चिम बंगाल असून ते पहिल्या नंबरवर येते तर आपले महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे. 

घाऊक महागाईमध्ये केवळ वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीकडे लक्ष दिलं जातं तर किरकोळ महागाईत वस्तू आणि सेवा या दोन्हींच्या बदलत्या किंमती समाविष्ट केल्या जातात. घाऊक महागाईत उत्पादित वस्तूंचं भारांकन सर्वाधिक असून ते ६४.२३% आहे तर किरकोळ महागाईत खाद्यपदार्थ आणि पेयांना ४५% इतकं सर्वाधिक भारांकन देण्यात आलं आहे.

रोजच्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टी सध्या महागल्या आहेत. दुधाचा ५.४७%, डाळीचा १.८६%, भाज्यांचा १५.४१%, कपडे आणि बुटांचा ९.८५%, फळांचा ४.९९%, धान्यांचा ५.९६%, खाद्यतेलाचा १७.२८%, मटण-माश्यांचा ६.९७%, मसाल्यांचा १०.५६% तर इंधन-लाईट्सचा महागाई दर १०.८०% आहे. जानेवारी २०२२ पासून किरकोळ महागाई सातत्याने ६ टक्क्यांच्या वरच आहे.

 

petrol im

 

गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून अचानक आयोजित केल्या गेलेल्या एमपीसी बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं की वर्तमानातील भौगोलिक-राजकीय परिस्थितीमुळे खाण्याच्या वस्तू चांगल्याच महागल्या आणि देशांतर्गत बाजारावर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसतो आहे. महागाईचा दबाव यापुढेही असाच राहणार असल्याची शक्यता आहे.

महागाईवर आळा घालण्याकरता आरबीआयने इतक्यातच रेपो रेट वाढवला होता. या महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अचानक रेपो रेटमध्ये वाढ केल्याची घोषणा केली होती. महागाईचा एकूण दर पाहता पुढेमागे व्याज दरात वाढ केली जाऊ शकते असं म्हटलं जातंय.

 

RBI InMarathi

संपूर्ण देशाला दिवाळखोरीत काढण्यामागे ‘या’ घराण्याला दोषी ठरवलं जात आहे

पेट्रोलचे वाढते भाव आहेतच, आता मात्र जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ देखील होणार महाग!

महागाई कमी होणार नाही, ती वाढतच राहणार आहे हे आपण केव्हाच गृहीत धरलेलं आहे. पण जीवनावश्यक गोष्टींच्या बाबतीतही महागाईमुळे लोकांचे हाल होत असतील तर परिस्थिती केवळ महागाई होणारच हे गृहीत धरून सोडून देण्याइतकी साधी राहिलेली नाही.

आता अगदी खाद्यपदार्थांसारख्या रोजच्या वापरातल्या गोष्टींच्या बाबतीतही जमेल तितका कमी खर्च करण्यापलीकडे आपल्या हातात दुसरं काहीच नाही. त्यामुळे सरकारनेच या समस्येत गांभीर्याने लक्ष घालून काहीतरी ठोस निर्णय घ्यावेत आणि नागरिकांना काहीसा दिलासा द्यावा हीच अपेक्षा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?