आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘धर्मवीर’ हा आनंद दिघे यांचा जीवनपट बघण्यास सध्या संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे. ठाणे जिल्ह्यात त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यापासून ते जिल्हाप्रमुख हा त्यांनी सर केलेला प्रवास कसा होता ? हे या सिनेमाच्या माध्यमातून चित्र स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार या विचाराने प्रत्येक शिवसैनिक सध्या आनंदी आहे.
राजकारणात काम करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी तुम्ही एखाद्या राजकीय घरातच जन्म घेण्याची आवश्यकता नाहीये हे आनंद दिघे यांनी सिद्ध करून दाखवलं होतं. तुमच्या कार्याबद्दल जर तुमची निष्ठा असेल, तहान-भूक-वेळ विसरून जनतेसाठी काम करण्याची तयारी असेल तर तुम्ही लोकनेते होऊ शकतात हे आनंद दिघे नावाच्या झंझावाताने लोकांना शिकवलं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
‘ठाण्याचे बाबासाहेब ठाकरे’ अशी मानाची पदवी मिळणारे आनंद दिघे हे एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व होते यात शंकाच नसावी. आपल्या प्रभागातील लोकांच्या प्रश्नांसाठी ‘जनता दरबार’ भरवणे, कोणत्याही सामाजिक प्रश्नाचं संयमाने उत्तर देणे आणि आक्रमकपणे ते आमलात आणणे, विकास कार्यासोबत आपली धार्मिक वृत्ती जपणे हे त्यांचे वैशिष्ठय होते.
धर्माविरुद्ध कुठेही काही अनुचित घडतांना दिसत असल्यास ते तिथेच थांबवणे, धर्माबद्दल नुसत्याच घोषणा न देता आपल्या कार्याने धर्म म्हणजे काय ? हे लोकांना शिकवणारे आनंद दिघे हे ‘धर्मवीर’ या सार्थ नावाने ओळखले जातात.
‘धर्मवीर’ आनंद दिघे यांना कमी वयात म्हणजे वयाच्या पन्नासाव्या वर्षी या जगाचा निरोप का घ्यावा लागला असेल ? त्यांची वाढती लोकप्रियता बघून २००१ मध्ये त्यांचा प्रवास थांबण्यात आला का? हे प्रश्न आजही लोकांच्या मनात आहेत.
सध्याचे शिवसेना पक्षाचे शहरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे सर्वात जवळचे मानले जातात. त्यांनी ‘धर्मवीर – मुक्कामपोस्ट ठाणे’ या सिनेमाच्या निमित्ताने बोलतांना दिघे साहेबांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या अकाली मृत्यूवर भाष्य केलं होतं. पण, तरीही कित्येक लोकांना आपल्या लाडक्या नेत्याचं मृत्यूचं हे कारण पचनी पडत नसल्याच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत.
२६ ऑगस्ट २००१ रोजी आनंद दिघे यांच्या मृत्युमुळे शिवसैनिक इतके अस्वस्थ झाले होते की, त्यांनी अख्खं सुनितीदेवी सिंघनिया हे ठाण्यातील इस्पितळ जाळलं होतं. ही घटना समर्थनीय नसली तरी यातून आनंद दिघे यांच्याबद्दल लोकांच्या मनात किती प्रेम होतं हे लक्षात येऊ शकतं. इतकी लोकप्रियता मिळवण्यासारखं या राजकीय नेत्याने लोकांसाठी नेमकं काय केलं होतं ? हे जाणून घेऊयात.
आनंद चिंतामणी दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५१ रोजी टेंभी नाका, ठाणे येथे झाला होता. १९६६ साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा आनंद दिघे हे किशोरवयीन होते. शिवसेना स्थापन झाल्यानंतर ठाण्यात झालेली माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा त्यांनी ऐकली आणि आपण शिवसेना पक्षात सामील व्हायचं असं त्यांनी मनोमन ठरवलं. किमान वयाची मर्यादा पूर्ण केल्यानंतर ७० च्या दशकात ते शिवसेनेचे सक्रिय सदस्य झाले.
समाजकार्याची प्रचंड आवड असलेल्या आनंद दिघे यांनी शिवसेनेत काम सुरू केलं आणि त्यांनी आपलं वैयक्तिक आयुष्य त्यांनी अक्षरशः गुंडाळून ठेवलं. पक्षाच्या कामासाठी वेळ देता यावा म्हणून त्यांनी आई-भाऊ-बहीण असा परिवार असलेलं घर सोडलं.
ठाण्यात त्या काळी तयार करण्यात आलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयात ते राहायला गेले होते. शिवसेनेचे इतर कार्यकर्ते हे त्यांना जेवणाचा डबा आणून द्यायचे. शिवसेना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दिघे यांच्या मनात इतकी समर्पण भावना होती की, कामाचा वेळ विभागाला जाऊ नये म्हणून त्यांनी लग्न सुद्धा केलं नाही.
राजकीय कारकीर्द
आनंद दिघे यांनी टेंभीनाका परिसरात ‘आनंदाश्रम’ची स्थापना केली होती. इथे लोक सकाळी ६ वाजल्यापासून यायचे. दिघे सर्वांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे आणि त्यावर तात्काळ निर्णय द्यायचे आणि ती समस्या सोडवायचे. बघतो, सांगतो सारखे टिपिकल राजकीय उत्तरं ते कधीच द्यायचे नाहीत. लोकांचे प्रश्न सोडवतांना त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे देखील कधीच बघितलं नाही. तब्येत बरी नसतांना देखील ते कधीच अराम करत नसत.
लोकनेते म्हणून आनंद दिघे यांची वाढत जात असलेली लोकप्रियता ही शिवसेनेतील काही अंतर्गत नेत्यांना खुपायची असं त्याकाळात बोललं जायचं. आनंद दिघे यांची कामाची आक्रमक पद्धती आणि स्वतःच्या बळावर निर्णय घेण्याची क्षमता ही शिवसेनेत नवीन गट निर्माण करतो की काय अशी त्यावेळी शंका निर्माण झाली होती.
—
दाढी आणि स्टाईल अगदी आनंद दिघेंची डिट्टो प्रतिकृती, महाराष्ट्राच्या राजकारणात आजही टिकून आहे
गद्दाराला शोधून काढू आणि शिक्षाही देऊ, असा शब्द देणारे बाळासाहेबांचे “ठाणे”दार!
—
काहींना ही देखील शंका होती की, माननीय बाळासाहेब ठाकरे यांना आनंद दिघे यांची वाढती लोकप्रियता डाचत होती. पण, दोघांच्या वयातील अंतर आणि आनंद दिघे यांचं ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित असलेलं कार्य यामुळे ही शक्यता राजकीय विश्लेषक फेटाळून लावतात.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आनंद दिघे यांनी कधीच कोणतीही निवडणूक लढवली नाही. पण, त्यांच्या संपर्कात येणारे एकनाथ शिंदे यांच्यासारखे कित्येक कार्यकर्ते त्यांनी घडवले आणि त्यांना राजकीय पद मिळवून दिलं हे त्यांचं राजकीय यश मानलं जातं.
अखेरचा प्रवास
२४ ऑगस्ट २००१ रोजी एका कार्यक्रमाला जात असतांना आनंद दिघे यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांच्या पायाला, डोक्याला मार लागला. उपचार घेण्यासाठी त्यांना ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीविताला असलेला धोका टाळण्यात डॉक्टरांना यश आलं होतं.
पण, २६ ऑगस्ट २००१ रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावली. शिवसेना खासदार प्रकाश परांजपे हे त्यावेळी आनंद दिघे यांच्या प्रकृतीची काळजी घेत होते.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी हे त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी आले होते. डॉक्टरांसोबत त्यांनी केलेल्या चर्चेत त्यांना हे लक्षात आलं होतं की, आनंद दिघे यांना कित्येक दिवसांपासून हृदयाचा त्रास होता; पण त्यांनी कधीच त्यावर उपचार घेतले नाहीत.
संध्याकाळी ७.१५ वाजता त्यांना ह्रदयविकाराचा पहिला झटका आल्याची बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी सिंघानिया हॉस्पिटल समोर एकच गर्दी केली.
७ वाजून २५ मिनिटांनी आनंद दिघे यांना हृदयविकाराचा दुसरा तीव्र झटका आला आणि त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. रात्री साडे दहा वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची हॉस्पिटल प्रशासनाने अधिकृत घोषणा केली. ही माहिती शिवसेना खासदार प्रकाश परांजपे यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सुद्धा दिली होती.
धक्कादायक, अविश्वसनीय असलेली ही बातमी शिवसेना कार्यकर्त्यांना सांगण्याची जबाबदारी सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पार पाडली. “आनंद दिघे आपल्याला सोडून गेले” हे ऐकताच शिवसैनिकांचे दुःख, राग अनावर झाला आणि त्यांनी रागाच्या भरात हे हॉस्पिटल जाळून टाकलं. तत्कालीन मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर ३४ संशयितांना अटक करण्यात आली होती.
सुरक्षेच्या कारणावरून ‘ठाणे बंद’ची घोषणा देण्यात आली होती. पण, तरीही हजारो शिवसैनिक आनंद दिघे यांच्या अंतिम दर्शनासाठी आले होते. शिवसेना पक्षाने काही दिवसांनी शोकसभेचं आयोजन करून या योद्ध्याला श्रद्धांजली वाहिली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी आपल्या शैलीत “आनंदच्या नादाला लागण्याची कोणातही हिम्मत नव्हती…” असे गौरवोद्गार त्यांनी काढले होते.
२०१९ मध्ये निलेश राणे यांनी शिवसेना पक्षावर थेट आरोप केला की, “शिवसेनेने आनंद दिघे यांचा मृत्यू घडवून आणला.” पण, हे सांगतांना त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते आणि हे केवळ शिवसेनेची प्रतिमा मलिन करण्यासाठी केलेलं उद्गार होतं असा शिवसैनिकांना ठाम विश्वास आहे.
आज ठाण्याची जनता जितके आभार आनंद दिघे यांचे जितकेआभार मानतात तितकेच आभार ते बाळासाहेब ठाकरे यांचे देखील मानतात. कारण, त्यांनी साथ दिल्याने ठाण्यात एक नेता घडतांना लोकांनी बघितला.
आनंद दिघे हे राजकारणात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक आदर्श आहेत. असा नेता आणि संवेदनशील व्यक्ती पुन्हा होणे नाही हेच खरं. मात्र असं असलं तरी आजही अनेकांच्या मनात लाडक्या दिघे साहेबांच्या मृत्युचं कोडं काही सुटलेलं नाही,
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.