Site icon InMarathi

“दहावीत असताना मला स्त्री असल्याची जाणीव झाली”: अभिनेत्री अंजली अमीरचा खडतर प्रवास!

anjali ameer featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या आयुष्यात काय होईल हे बऱ्याचदा आपल्या हातात नसतं. आपण त्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याला कसे सामोरे जातो यावरून आपलं नशीब  घडत असतं. असं असलं तरी बरेच जण फारसे प्रयत्न न करता नशिबाला दोष देत आयुष्य जगत राहतात.

काही माणसं मात्र याला अपवाद ठरत संकटावर मात करून मोठी होतात. आपल्यासारख्या त्रासातून आणणाऱ्या इतरांसाठी आदर्श ठरतात. आपला समाज आजही समलैंगिक व्यक्ती, ट्रान्सजेंडर्सकडे, त्यांच्या समस्यांकडे, हक्कांकडे  म्हणावं तितक्या गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे पाहत नाही.

 

 

अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण आपल्याबरोबरच्या इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी जाणीव होते तेव्हा त्या व्यक्तीची आतल्याआत किती घुसमट होत असेल याची कल्पना करता येणं खरंच अवघड आहे.

समलैंगिक व्यक्तींना आपल्याच लिंगाच्या व्यक्तींविषयी वाटणारं आकर्षण हे वास्तव आणि ट्रान्सजेन्डर्सनी स्त्री म्हणून जन्म घेतलेला असताना ते पुरुष आहेत अशी आतून जाणीव होणं आणि पुरुष म्हणून जन्माला आलेले असताना आपण आतून खरंतर स्त्री आहोत याची जाणीव होणं हे वास्तव आधी स्वतःशी स्वीकारणं आणि नंतर त्याविषयी जवळच्या इतरांशी बोलणं हा सगळाच अत्यंत अवघड आणि वेदनामय टप्पा असेल.

अशात लहानग्या वयात आपण पुरुष म्हणून जन्माला आलेलो असलो तरी खरंतर स्त्री आहोत अशी जाणीव झालेली आणि त्यानंतरही डगमगून न जाता आपल्या प्रवासात आलेल्या सगळ्या अवघड वळणांना समर्थपणे तोंड देणारी व्यक्ती एक यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री होऊन दाखवते तेव्हा तिचा दुर्दम्य आशावाद केवळ तिच्यासारख्या त्रासातून जाणाऱ्या व्यक्तींनीच नव्हे तर इतर कुणीही शिकण्यासारखा असतो.

ही यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री म्हणजे भारतातली पहिलीवहिली ट्रान्सजेंडर मॉडेल अंजली अमीर. अंजलीचं पुरुषाकडून स्त्री होण्याचं अवस्थांतर अतिशय खडतर होतं. तिच्या या वेदनामय आणि तरीही धारिष्ट्यपूर्ण अशा अवस्थांतराविषयी जाणून घेऊ.

 

 

तिचं आताचं नाव अंजली असलं तरी मूळ नाव जमशीर होतं. लहानगा जमशीर केरळमध्ये असलेल्या कोझीकोडेमधील थमारासेरी इथल्या एका पारंपरिक मुस्लिम कुटुंबात जन्माला आला होता. दुर्दैवाने तो अवघ्या ८ महिन्यांचा असतानाच त्यांची आई एका अपघातात मरण पावली.

त्याच्या मावशीने त्याचा सांभाळ केला. अगदी लहान वयापासूनच मुली साधारण ज्या गोष्टी करतात त्या करणं त्याला आवडायचं. त्याला सगळ्या मैत्रिणीच होत्या. दागदागिने घालायला, मेकअप करायला, हाय हिल्स घालायला त्याला आवडायचं. घरच्यांनीही त्याच्या या आवडींना प्रोत्साहन दिलं. पण यात काही गंभीर असेल असं त्यांना वाटलं नाही.

वयाच्या ८व्या वर्षापर्यंतच त्याचं बालपण अगदी आनंदात गेलं. पण ८व्या वर्षापासून आपण आहोत त्यापेक्षा वेगळे असल्याची जाणीव त्याला होऊ लागली होती. याविषयी त्याने वाचायला सुरुवात केली आणि दहावीत असताना आपण खरंतर स्त्री असल्याची त्याला जाणीव झाली.

तेव्हा जमशीर आणि आता अंजली असलेल्या अंजलीच्या मनाची त्यावेळी नेमकी काय अवस्था झाली असेल हे आपल्याला कळू शकणार नाही. अंजलीने आपल्या घरच्यांसमोर हा विषय काढला तेव्हा त्यांच्या तीव्र प्रतिक्रियांना तिला सामोरं जावं लागलं.

 

 

अंजलीच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना त्यानंतर घडली. खरंतर धैर्यवान अंजलीने ती तिच्या मित्राच्या मदतीने घडवून आणली. तिच्या एका जवळच्या मित्रापाशी ती आपलं मन मोकळं करायची. त्याच्या मदतीने ती घरातून पळाली आणि चेन्नईला गेली.

तिथे एका ट्रान्स कुटुंबाने तिला दत्तक घेतलं. त्यांनी तिच्यावर खूप प्रेम केलं आणि पैसे कसे कमवायचे हे शिकवलं. रस्त्यावर भीक मागून आणि सार्वजनिक सोहळ्यांमध्ये नृत्य करून ते आपली कमाई करायचे. पण भीक मागण्याबाबत अंजलीचा लवकरच भ्रमनिरास झाला आणि तिने घरी परतायचा निर्णय घेतला.

तिने घरी परतण्यामागे आपल्या प्रियकराचं आपल्यावर कधीच प्रेम नव्हतं, केवळ सहानुभूतीपोटीच तो आपल्यासोबत होता याची जाणीव होणं हेही एक कारण होतं.

तिने समुद्रात उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला. पण सुदैवाने तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर काहीही झालं तरी दुसऱ्या कुणाहीसाठी आपण आपला बळी देणार नाही आणि स्वबळावर जितकं चांगलं आयुष्य घडवता येईल तितकं घडवू अशी तिने शपथ घेतली. तिने पुन्हा घर सोडलं आणि ती कोईमतूरला गेली.

सुदैवाने तिला तिथे एक ट्रान्स-माता भेटली जिने तिच्या अवस्थांतराच्या प्रक्रियेत तिला पूर्ण पाठिंबा दिला. भीक मागण्यापासून ते कॉल सेंटर, ब्युटी पार्लर अशा बऱ्याच ठिकाणी तिने नोकऱ्या केल्या आणि पै न् पै ची बचत केली. आपली शस्त्रक्रिया, लेझर ट्रीटमेंट, एंडोक्रिनोलॉजिस्ट्सकडे होणाऱ्या खेपा या सगळ्याचा खर्च तिने स्वकमाईतून केला.

पुरुषाकडून स्त्रीमध्ये होणाऱ्या तिच्या अवस्थांतराला तीन वर्ष लागली. २०१५ साली तिला ‘मिस कोईमतून’ आणि ‘मिस स्प्लेंडिड इंडिया’ हे मुकूट बहाल करण्यात आले. अगदी योगायोगानेच ती या स्पर्धांचा भाग झाली होती. या यशामुळे मुळात बुजऱ्या असलेल्या अंजलीचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला.

तिच्या आयुष्यावरची डॉक्युमेंट्री थेट मल्याळी सुपरस्टार माम्मूट्टीने पाहिली आणि ‘पेरानबू’ या चित्रपटासाठी तिचं नाव सुचवलं. या चित्रपटात अंजलीने ट्रान्सवुमनचं काम केलं होतं.

 

 

तिच्या या कामाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आणि अशा रीतीने तामिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतला तिचा मार्ग मोकळा झाला.

आपण ट्रान्सवुमन असल्याचा अंजलीला सार्थ अभिमान आहे. इथवर पोहोचण्यासाठी तिने खूप कष्ट घेतले असून आपल्या या प्रवासाची तिला जराही लाज वाटत नाही. फक्त आपली ‘ट्रान्सवुमन ऍक्टर’ अशी ओळख करून दिली जाण्याविषयी तिला आक्षेप आहे. केवळ अभिनेत्री म्हणूनच आपली ओळख असावी असं तिला वाटतं.

आपलं अवस्थांतर लवकर झाल्याची आपल्याला मदतच झाली असं अंजली सांगते. तिच्यासारख्या त्रासातून जाणाऱ्या इतरांच्या बाबतीतही ही प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन आपल्यादृष्टीने सोईस्कर असणाऱ्या लिंगाचं होऊन आपली एकूणच प्रगती साधायला त्यांना पुरेसा वेळ मिळावा अशी इच्छा ती व्यक्त करते.

भविष्यातल्या योजनांविषयी सांगताना आधी आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि कालांतराने ऑस्ट्रेलियात सेटल व्हायचं आपलं स्वप्न आहे असं ती सांगते. भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियात आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे स्वीकारलं जाईल आणि पाठिंबा मिळेल असं तिला वाटतं.

आपल्याला आपल्या पायांवर भक्कमपणे उभं राहायचं आहे आणि आपल्या मुलांसाठी स्थिर आणि सुरक्षित वातावरण निर्माण करायचं आहे.

 

 

सर्वार्थाने सक्षम झाल्यानंतर कदाचित तिशीत मला मुलांना दत्तक घ्यायला आवडेल असं ती सांगते. तिला पाठींबा देणारा आणि तिच्यावर प्रेम करणारा जोडीदार तिला लाभला असून ती सध्या तिच्या आयुष्यात खूप खुश आहे. “आरशात बघा. तुम्हाला मदत करू शकेल असा सर्वोत्तम माणूस तुम्हाला दिसेल.”, असा कानमंत्र अंजली देते.

आपण ट्रान्सवुमन असल्याची जाणीव झाल्यावर स्वतःच्याच कोशात अंजली राहिली असती, परिस्थितीला दोष देत राहिली असती तर पुढचं काहीच घडलं नसतं.

इतक्या संघर्षमय प्रवासानंतरही अंजली आयुष्याबद्दल जराही कडवट झालेली नाही. अंजलीकडे पाहून कवी अनिल यांची ओळ आठवते, “वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुलाफुलांत चाललो’.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version