' कोण म्हणतं लग्नानंतर करिअर करता येत नाही? वाचा या जोडप्याच्या जिद्दीची गोष्ट – InMarathi

कोण म्हणतं लग्नानंतर करिअर करता येत नाही? वाचा या जोडप्याच्या जिद्दीची गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही कितीही हुशार, तल्लख बुद्धीचे आणि व्यवहार कुशल असाल, तरीही शिक्षणाला पर्याय असू शकत नाही. एखाद्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारी, दैवी देणगी असणारी, त्यासाठी शिक्षण अर्धवट सोडलेली व्यक्ती सुद्धा मार्गी लागल्यावर शिक्षणाचा ध्यास धरते, अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

दर्जेदार इंग्रजी बोलू शकणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यापैकीच एक. त्याचं इंग्रजी ऐकताना, त्याने शिक्षण अर्धवट सोडलंय असं अजिबात वाटत नाही.

 

sachin tendulkar featured inmarathi

 

मुळात शिक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान शिक्षण घेणं अत्यावश्यक आहे असंच म्हणायला हवं. तुम्ही शिक्षण अर्धवट ठेऊन एखाद्या क्षेत्रात व्यवसाय किंवा इतर काही गोष्ट सुरु केलीत, त्यात यशस्वी झालात तरीही शक्य असल्यास अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा नेहमीच असायला हवी.

अशाच एका शिक्षण पूर्ण करणाऱ्याची कहाणी आज जाणून घेऊयात. त्याच्यात ती जिद्द, इच्छा, महत्त्वाकांक्षा कुठून आली, त्याने शिक्षण कसं पूर्ण केलं, हे जाणून घेतल्यावर कदाचित इतरांचा सुद्धा दृष्टिकोन बदलेल.

पुणे तिथे काय उणे…

पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, असं कायमच म्हटलं जातं. याशिवाय ‘पुणे तिथे काय उणे’ हा पुणेरी बाणा सुद्धा तुम्ही अनेकदा अनुभवला असेल. या दोन्हीचा मिलाफ घडवणारी एक घटना पुण्यात घडली आहे; जिथे काही उणेही नव्हतं, आणि विद्येचा आदरही झाला.

 

 

education im

 

विवेक कुमार बनकर नावाच्या एका व्यावसायिकाने अर्धवट राहिलेला त्याचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. तोही थोड्या थोडक्या नव्हे, तर तब्बल ११ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर! शिक्षण पूर्ण करताना, डिप्लोमामध्ये डिस्टिंक्शन मिळेल याचीही त्याने काळजी घेतली.

…म्हणून अर्धवट सोडावं लागलं शिक्षण

२००८ साली विवेक यांनी डिप्लोमाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. मात्र काही कौटुंबिक अडचणी उभ्या ठाकल्या आणि अवघ्या दीड वर्षातच शिक्षणाला ब्रेक लागला. शिक्षण गुंडाळून ठेवलं असल्याने, कमाईचा मार्ग स्वीकारला.

इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसह काम सुरु केलं. फ्रीलान्सिंगची अशी अनेक कामं त्यांनी याकाळात केली.

२०१८ साली स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातूनच त्यांचं ‘मोरया’ हे कपड्यांचं दुकान आकाराला आलं. बारामतीमध्ये हा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय चांगला सुरु होता, दरम्यानच्या काळात त्यांचं लग्न सुद्धा झालं. त्यानंतर मात्र लॉकडाऊनमुळे सारं काही बदलून गेलं. सगळ्यांनाच बसला, तसा विवेक यांनाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. दुकान कायमचं बंद करण्याची वेळ आली. दुकान पुन्हा सुरु करणं शक्यच नाही, हे लक्षात आल्यावर ते पत्नीसह पुण्यातच राहू लागले. सॉफ्टवेअर इंजिनियर असणारी त्यांची पत्नी भाग्यश्री पुण्यातच नोकरीला होती.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे…

दुकान बंद झालं असलं, तरी आयुष्य थांबलं नव्हतं. ते थांबवून चालणार नव्हतं. अशावेळी भाग्यश्रीने नवऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. अर्धवट राहिलेलं शिक्षण विवेकने पूर्ण करावं यासाठी आग्रह धरला.

 

kumar im

 

बाहेरून बारावी देण्यासाठी फॉर्म १७ भरायला गेलेल्या विवेकला लक्षात आलं, की डिप्लोमाचं लिव्हिंग सर्टिफिकेट असल्याशिवाय हे करणं शक्य नाही. ही पंचाईत दूर करण्यासाठी तो त्याच्या डिप्लोमा कॉलेजात पोचला. तिथे ‘कहानी में नया ट्विस्ट’ आला. विवेकला कळलं, की त्याला डिप्लोमाचा अभ्यासक्रम पूर्ण करणं शक्य आहे.

२०१४ साली हीच माहिती मिळवायला गेलेल्या विवेकला असं सांगण्यात आलं होतं, की डिप्लोमा पूर्ण करणं शक्य नाही. मात्र ही संधी मिळतेय म्हटल्यावर याने पत्नीशी चर्चा केली. विवेकने शिक्षण पूर्ण करावं, असं भाग्यश्रीला वाटत होतंच.

स्वतः इंजिनियर असल्यामुळे, तिने विवेकला अभ्यासात मार्गदर्शन करण्याची तयारी सुद्धा दाखवली. पत्नीकडून मिळालेलं हे प्रोत्साहन त्याला फारच कामी आलं. दुसरं, तिसरं, पाचवं आणि सहावं सेमिस्टर अशा सगळ्या परीक्षा त्याने एकत्रच दिल्या. उत्तम गुणांनी पास होत त्याने डिप्लोमा मिळवण्याची इच्छा पूर्ण केली.

थांबायचं नाय आता थांबायचं नाय…

डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर आता आणखी पुढे जाणायचा निर्णय त्याने घेतला आहे. पुढील शिक्षण घेत, ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा निर्धार त्याने केला आहे. शिक्षण मिळवायचं असेल, तर वयाचा आकडा फारसा प्रभावशाली ठरत नाही, याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे विवेक.

 

study im

 

डिप्लोमा पूर्ण करत असताना, पुण्यात नव्याने कपड्यांचं दुकान उघडण्याचं धाडस सुद्धा त्याने केलं आहे. उंदरी भागात लहान मुलांच्या कपड्यांचं हे दुकान चांगल्या पद्धतीने सुरु आहे. शिक्षण पूर्ण करण्यासाठी पत्नीची आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी वडिलांची साथ लाभल्यामुळे हे यश तो संपादित करू शकला आहे. थोडक्यात काय, तर घरच्यांचा पाठिंबा असेल तर मोठं यश मिळवणं अशक्य नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?