आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्याकडे एक प्रसिद्ध म्हण आहे, की ”कानामागून आली आणि तिखट झाली”. ही म्हण तर आजकाल अनेक क्षेत्रातील अनेकांसाठी लागू पडेल. अड्व्होकेट डॉ. गुणरत्न सदावर्ते हे त्यापैकी एक आहेत असे म्हंटले तर त्यात कोणाला नवल वाटू नयेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
चवीने राजकारणाच्या गप्पा मारणार्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला हे नाव परिचित आहेच. मराठा आरक्षणाला न्यायालयात केलेला विरोध असो की सध्या सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची चर्चा नेहमीच माध्यमात असते. तरीही अचानक प्रकाशझोतात आलेले हे सदावर्ते आहेत तरी कोण याची बर्याच जणांना उत्सुकता असेल.
मित्रांनो प्रवाहाच्या विरुद्ध पोहून ध्येय गाठणारे लोक तुम्ही पहिले असतील किवा आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांनी घालून दिलेल्या पायवाटेवर चालणारे लोकही आपण अनुभवले असतील. सदावर्ते हे अशाच कोणत्यातरी आदर्शाला फॉलो करणारे असावेत.
व्यवसायाने विधिज्ञ असलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचे शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झाले. ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ या नावाने संघटना चालवायचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळायचे.
त्यांचे वडील नांदेड नगरपालिकेचे नगरसेवक होते. काही वर्षांपूर्वी सदावर्ते नांदेडहून मुंबईत स्थायिक झाले आणि तेथेच ते वकिली करू लागले. वकिली अगोदर ते शिक्षणाने डॉक्टरेट झाले होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएच.डी केली आहे.
‘मॅट’च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते. ते बार कौन्सिलच्या शिखर परिषदेवर होते.
महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला ‘सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC)’ या प्रवगातंर्गत आरक्षण दिले होते. मात्र हे आरक्षण असंवैधानिक असल्याने ते देऊ नये अशी भूमिका सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. ५ मे २०२१ रोजी, मराठा समाजाला SEBC प्रवगातंर्गत दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने रद्दबादल ठरवले.
मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे असंवैधानिक आहे, त्यामुळे ते रद्द करावे अशी याचिका ॲड. जयश्री पाटील यांनी दाखल केली होती. त्यांनी कायद्यात पीएच.डी केली आहे. २०१४च्या मराठा आरक्षण कायद्यास न्यायालयात आव्हान देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल.के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत. ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास अवैध ठरवले. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला होता.
—
डॉक्टर “पांढरा” आणि वकील “काळ्या” रंगाचाच कोट घालतात, माहीत आहे का?
यांची फी आहे लाखात; भारतातील सर्वात महागडे १० वकील!
—
मराठा आरक्षणासाठी ५२ मोर्चे निघाले. या मोर्चांमध्ये कुठेही वेदना नव्हत्या. हे मोर्चे साखर कारखान्यातले लोक, राजकीय लोकांच्या मदतीने काढलेले होते. त्यामुळे सुप्रिम कोर्टाचा निर्णय योग्य आहे आणि आमचा विजय आहे. जातीच्या विरुद्ध घाणेरड्या राजकारणाचा आज पराभव झाला आहे,” असं देखील मुलाखतीत सदावर्ते म्हणाले होते.
अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणाऱ्या आबाळाची केस, ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस, डॉक्टरांना काम बंद आंदोलन करू न देण्याची केस, प्रशिक्षणानंतरही १५४ पोलिसांना फौजदारपदी नियुक्त न करण्याची केस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची हायकोर्टातली एक केस, ‘मॅट’च्या माध्यमातून चार हजार परिचारिकांना नोकरीत कायम करण्याची केस, सुप्रीम कोर्टात ५० लाख कर्मचाऱ्यांची केस अशा अनेक केसेस त्यांनी हाताळल्या आहेत.
त्याशिवाय हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका तसेच महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात याचिका, ST कर्मचारी संपासंबंधी उच्च न्यायालयात सुरू असलेली केस या खटल्यांमध्ये सदावर्ते यांना प्रसिद्धी मिळाली.
उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यन्त कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण अचानक १०० हून अधिक कर्मचार्यांच्या एका समूहाने शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर मोर्चा नेला. या प्रकरणी पोलिसांनी कामगारांचे वकील सदावर्ते यांना अटक केली.
जोपर्यंत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण होत नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नाही अशी भूमिका आता अॅड. सदावर्ते यांनी मांडली आहे.
मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका न्यायालयात दाखल करणाऱ्या अॅड. जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. त्यांना झेन नावाची मुलगी आहे.
एसटीच्या आंदोलनात सदावर्ते यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा दिल्याने त्यांच्यावर टीका देखील होऊ लागली. यासंदर्भात सदावर्ते म्हणाले, “मी साहित्याचा अभ्यासक आहे. एक मराठा लाख मराठा ही घोषणा प्रेरणादायी आहे. ‘मराठा’ हा शब्द जातीवर आधारीत नाही तर भाषेवर आधारीत आहे. ही कोणाच्याही मालकीची घोषणा नाही. या आंदोलनात कुठलीही जात, धर्म नाही.
‘सदावर्ते यांचा एसटी आंदोलनाशी काय संबंध ? असा आरोप त्यांच्यावर केला जातोय, या आरोपाला उत्तर देताना सदावर्ते म्हणाले, ”मी राज्यघटनेवर पी. एच. डी केली आहे. मी कष्टकऱ्यांच्या अनेक केसेस लढल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मला माझ्या वडिलांसारखे आहेत. आंबेडकर एकीकडे चवदार तळ्याचा सत्याग्रह करत होते तर दुसरीकडे न्यायालयात खटलेही लढत होते. तसेच ते संविधान लिहीत होते. ”
सदावर्ते यांच्यावर ते प्रसिद्धीसाठी आंदोलनात सहभागी होतात असा देखील आरोप केला जातो, त्याविषयी स्पष्टीकरण देताना सदावर्ते म्हणाले, ”पराभूत मानसिकतेतून मी प्रसिद्धीसाठी आंदोलनांमध्ये भाग घेतो असं म्हंटलं जातं. आजपर्यंत मी लढलेल्या ९९ टक्के केसेस मी जिंकल्या आहेत. आणि माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. “
अॅड सदावर्ते यांचा हा लढा, एसटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेली भुमिका योग्य की अयोग्य? याविषयी तुमचे मत नेमके काय आहे? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.