आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
भारतीय आवामच्या मानसिकतेचा अंदाज विराट कोहलीला आला असेल. १८ जून २०१७ च्या संध्याकाळपर्यंत विराट कोहली हा अश्वमेध यज्ञाचा राजा होता. पुढे पाकिस्तानने १९७१ चा सूड उगवायच्या थाटात आपल्या संघाची धूळधाण उडवली आणि कोहलीचे ग्रह फिरले. टॉस जिंकून कोहलीने पहिली बॅटिंग का नाही घेतली? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. सामना संपला आणि लगोलग प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या राजीनाम्याची बातमी आली. अंतिम सामना हरल्यावर प्रशिक्षकाने राजीनामा देणे हे सगळ्याच खेळांमध्ये होत असते. बुडलेल्या जहाजाचा कप्तान ही उपाधी कधीच कोणाला मिरवायला आवडणार नाही. परंतु धक्कादायक भाग पुढे होता. विराट कोहलीने प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेंना अजिबात मान दिला नाही, दोघांमध्ये विस्तव जात नाही आणि इतर बातम्या पसरल्या. सगळ्यात धक्कादायक भाग होता तो म्हणजे पाकिस्तानविरुद्ध जर टॉस जिंकला तर पहिली फलंदाजी घ्यायची असा संपूर्ण संघाचा आणि व्यवस्थापनाचा निर्णय झाला असताना जास्त शहाणपणा दाखवत विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि पुढचं आक्रीत घडलं. हे सगळे अहवाल खरे मानले तर विराट कोहलीला चार गोष्टी भारतीय लोकांकडून ऐकून घेण्याची वेळ आलेली आहे.
सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल, ती म्हणजे विराट कोहली हे भारतीय क्रिकेटला पडलेलं एक भन्नाट सुंदर स्वप्न आहे. या माणसाचा लढण्याचा बाणा, जिगर आणि अंदाज काहीच्या काही आहे. विराट कोहलीची तुलना अनेकजण सचिन तेंडुलकरशी करतात. प्रत्यक्षात कोहली हा रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह वो यांचं अद्भुत मिश्रण आहे. रिकी पॉन्टिंग, कारण त्याचा खेळतानाचा उद्धटपणा, फलंदाजीच्या वेळचा अंदाज, कमालीची विजिगिषु आणि मेहनती वृत्ती, चित्याच्या चपळाईचं क्षेत्ररक्षण आणि एकंदरीत वलय. आणि स्टीव्ह वो, कारण खडूस वृत्ती, आपली विकेट अत्यतं मोलाची आहे आणि ती सहजासहजी जाऊ द्यायची नाही ही समज. वर्चस्व गाजवायच्या बाबतीत विराट हा रिकी पॉन्टिंग आहे. आणि सामन्यामागून सामने जिंकून देण्याच्या बाबतीत स्टीव्ह वो.
२०१० पासून कोहली खेळतोय. त्याच्या शरीरयष्टीतला फरक स्पष्ट समजून येतोय. कमिटमेण्टच्या बाबतीत त्याचा हात धरणारा खेळाडू कदाचित महेंद्रसिंग धोनी असेल. पंजाबी मुंडा असलेल्या दिल्लीच्या विराट कोहलीने शेवटची चिकन करी कधी खाल्लेली हे त्यालाही आठवत नसेल. त्याच्या अंगावर चरबीचा ‘च’ ही दिसत नाही. नवज्योतसिंग सिद्धूने समालोचनावेळी सांगितलेला एक किस्सा आहे.
रणजी सामना खेळतेवेळी विराटला वडिलांचं निधन झाल्याचा फोन आला. विराट कोहली तरीही त्या मॅचमध्ये खेळला. शतक झळकावलं. तो दिवस संपल्यावर विराट अंत्यदर्शनासाठी गेला, वडिलांना अग्नी दिला आणि दुसऱ्या दिवशी सामन्यासाठी पुन्हा मैदानावर हजर!
‘विजेता निकाल पेश करतो आणि पराभूत, सबबी’ या वाक्याला जगणारा कोहली प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा आदर्श ठरावा. तो नवीन पिढीचा आहे, मैदानावर तो स्वतःला हवा तसा व्यक्त होतो, कधी हसतो, जीभ बाहेर काढतो, समोरच्याचा अर्वाच्च भाषेत उद्धार करतो आणि भर मैदानातून भारताच्या झेंड्याला आणि कधीतरी अनुष्काला फ्लायिंग किससुद्धा देतो. सर्व गोष्टींसकट विराट लोकांना पचतो आणि आवडतो. पण हे सगळे त्याचे हावभाव, जितेंद्र आव्हाडांच्या शैलीतला अंगावर येणारा आक्रमकपणा, चमको वृत्ती ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या शत्रूही होऊ शकतात. विराट कोहलीने गेम करून अनिल कुंबळेला राजीनामा द्यायला भाग पाडलं असेल, आणि आपल्या अहंकाराखातर जर नाणेफेकीवेळी उलटा निर्णय घेतला असेल तर विराट कोहलीला नक्कीच काहीतरी धडा शिकवला जावा अशी भारतीयांची इच्छा होत असणार. बरं, ज्या प्रशिक्षकाबरोबर विराटने पंगा घेतलाय तो साक्षात अनिल कुंबळे आहे. सामर्थ्य हे सौंदर्य असतं हे खरं आहे पण जर सामर्थ्याच्या हिऱ्याला सभ्यतेचं कोंदण असेल तर त्याची किंमत कैकपटीने वाढते. आपल्या भारतीयांना एकतर विनयशीलतेचं भयानक कौतुक आहे. पण जगभरातही लो प्रोफाइल राहणं किती महत्वाचं आहे हे समजून येईल. अनिल कुंबळेने एका डावात दहा विकेट्स घेण्याचा विक्रम केला. हा पराक्रम असा आहे की त्याची फक्त बरोबरी होऊ शकते. पण त्यानंतर त्याचदिवशी एका कार्यक्रमात मुलाखत देताना अनिल कुंबळेने प्रणय रॉयना
या गोष्टी आयुष्यात एकदाच होतात, त्यामुळे या क्षणाला आणि आनंदाला हृदयात जपून ठेवताना मला आता पुढच्या सामन्याचा विचार करावा करावा लागणार आहे, कारण शेवटी त्यात मला जो बळी मिळेल तो माझा अकरावा नाही तर पहिलाच बळी असणार आहे.
असं उत्तर दिलं होतं. जबड्याला तडा गेलेल्या अनिल कुंबळेने बँडेजने चेहरा बांधून गोलंदाजी करत लाराला परतीची वाट दाखवली होती, अत्यंत ग्रेट खेळाडू आणि उत्तम माणूस ( वैयक्तिक आयुष्याच्या दाखल्यावरून) असलेल्या अनिल कुंबळेचं कोणाशी टोकाचं भांडण होणं ही अनेकांच्या आकलनापलिकडची गोष्ट आहे.
महेंद्रसिंग धोनी हा मनुष्य आक्रमकता आणि शांतपणाचा मूर्तिमंत संगम आहे. एकाच उदाहरणावरून महेंद्रसिंग धोनीची सभ्यता त्याला किती मोठं संरक्षण देऊन आहे हे समजून जाईल. ‘सर रवींद्र जडेजा’ हा किस्सा कोणाला आठवतो काय?
एका बॉलवर दोन धाव हव्या असताना, एक बॉल राखून विजय मिळवून देण्याचं कसब फक्त सर रवींद्र जडेजा दाखवू शकतो.
हेच ते धोनीचं जगप्रसिद्ध ट्विट. आयपीएलच्या त्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला जिंकायला एका बॉलवर दोन धाव हव्या होत्या. डावखुऱ्या बोलरने बॉल जडेजाच्या छातीपर्यंत उसळवला. मुळातच फालतू फलंदाज असणाऱ्या जडेजाने तो थर्डमॅनला दिला. तिकडच्या खेळाडूने अप्रतिम झेल घेतला. जडेजा बाद. पण हे घडलंच नाही. कारण अक्षरशः अर्धा पाय क्रीझमध्ये असतानाही पंचांनी या बॉलला नो बॉल ठरवला. झालं, बॉल न मोजला जाता सरळ दोन धावा मिळाल्या. तो नो बोल देणारा पंच होता असद रौफ, जो पुढे स्पॉट फिक्सिंगमध्ये काढला गेला, जिंकलेला संघ होता चेन्नई सुपरकिंग्स जो पुढे आयपीएल खेळेनासा झाला. वर हे धोनीचं ट्विट. क्या सिन है बॉस!!
विंदू दारासिंग स्पॉटफिक्सिंगमध्ये अडकला आणि धोनीचे तसेच साक्षीचे त्याच्या बरोबर खंडीभर फोटो प्रसिद्ध होऊनही धोनीला स्पॉटफिक्सिंगबद्दल कधीच कोणी विचारलेले आढळत नाही. कारण धोनी हा खेळाडू हातातले दोनप्रकारचे ग्लोव्ज आणि बॅट सोडून कशातही दिसला नाही. कुठेही वाद नाही, मागे एकदा दीपिका पदुकोनबरोबर त्याचं नाव जोडलं गेलं, त्याची पुढे चर्चाही झाली नाही. योग्य वेळी त्याने कसोटीतून निवृत्ती घेतली आणि धक्का देत संपूर्ण कर्णधारपद सोडलं. एवढं सगळं वादळ घोंघावुनसुद्धा धोनी नामनिराळा राहिला कारण मैदानावर धोनीची वागणूक आणि खेळातली समर्पित वृत्ती. गेल्या अडीच वर्षांत धोनीची सामने जिंकून द्यायची ताकत संपूर्णपणे निघून गेली आहे. दणादण फटके मारत सहाव्या किंवा सातव्या नंबरला येणारा धोनी आता चौथ्या नंबरला यायला बघतोय आणि वर आता शेवटच्या शतकांमध्ये मारझोड करायची ताकद राहिली नाही हे कबूल करतोय. पण आजही तो आपला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे म्हणून तो हवा हवासा आहे कारण धोनी जेंटलमन आहे.
खेळाडू म्हणून निव्वळ स्टॅमिना बघितला तर टेनिसमध्ये राफेल नादालच्या आसपासही कोणी फिरकत नाही. २००५ ते २०१७ पर्यंत नादालने १० फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्या. हे थोर आहे. पण असं असूनसुद्धा चाळीसहून अधिक उपांत्यपूर्व सामने, पंचवीसहून अधिक अंतिम सामने आणि १८ विजेतेपदे नावावर असणारा रॉजर फेडरर आजही लोकांच्या गळ्यातला ताईत आहे. फेडररचा आवाका थक्क करणारा आहे. म्हणजे दुसरं महायुद्ध नसतं झालं तर डॉन ब्रॅडमॅनने काय केलं असतं आणि राफेल नदाल नसता तर फेडररने काय केलं असतं याचा विचार जरी मनात आला तरी अंगावर काटा येतो. मैदानावर फेडरर उडत असतो. त्याने कधीच जोर लावून खेळायचा प्रयत्न केल्याचं जाणवत नाही. त्याची टेनिसची रॅकेट म्हणजे कुंचला असते आणि तो औपचारिकता म्हणून जमिनीवर पाय ठेवून असल्यासारखं वाटत राहतं. फ्रेंच ओपनमध्ये अंतिम फेरीत खेळताना सुद्धा फेडररचे बूट मातकट रंगाचे दिसत नाहीत. लोक त्याच्या ह्याच अंदाजावर फिदा असतात. साडेचार वर्ष फेडरर विजेतेपदापासून दूर होता. वय वाढलेला हालचाली मंदावलेला म्हणावा तर तो उपांत्य किंवा अंतिम सामान्यांपर्यंत एकही सेट न गमावता पोहोचत होता. २०१७ च्या त्याच्या अमेरिकन ओपन विजेतेपदाने चाहत्यांचा उपास संपवला. ऍक्शन रिप्लेमध्ये जेंव्हा फेडररने फाटकावलेला चेंडू रेषेच्या आत पडला त्यावेळी त्या चेंडूंबरोबर जगभरातले चाहतेही रेषेच्या आत पडल्यासारखे उसळले. हे प्रेम ही माया जगभरात कोणालाही मिळाली नाही. अनेकजण फेडररचे वेडे झाले आहेत. साधं सारक कारण म्हणजे राफेल नदाल दांडपट्टा फिरवून मारतो तर फेडरर धारदार गुप्ती घुसवतो. निकाल समान आहे पण फेडरर प्रेमात पाडतो कारण फार आक्रमकता तो दाखवत नाही. नदालबद्दल कमालीचा आदर आहे फेडररची मनापासून मोहिनी आहे.
टेनिस एल्बोच्या दुखापतीत सचिनच्या करियरचा जवळपास अंत झाला होता. अख्या देशाने मनोमन नवस केला. पुढे ग्रेग चॅपेलने सचिनला तू आता काही कामाचा नाहीस तेंव्हा निवृत्त हो असा सल्ला दिला. लोक सचिनच्या मागे उभे राहिले, तोंडाळ वाचाळ चॅपेलमागे नाही. त्यातून चाहत्यांच्या सदिच्छांचं पाठबळ म्हणून सचिन मैदानावर आला. त्याने पुढे ३२ शतकं झळकावली. सचिन काय किंवा वेस्ट इंडिजचा संघ काय, याच्यावर लोकांनी प्रेम केलं. पूर्वी क्रिकेटपटू तयार करणारा वेस्ट इंडिज प्रदेश आज महान ऍथलिट तयार करतो. प्रत्येक क्रीडा प्रकारात हे खेळाडू लोकांना आवडून जातात. कारण खेळाला हे इतके सर्वस्व मानतात की खेळ सोडून त्यांना आयुष्यात दुसरं काही येत असेल किंवा ते दुसरं काही करायचा प्रयत्न करत असतील असं वाटतही नाही. हे उल्लेख केलेले खेळाडू कधीच कोणत्याच वादात अडकले नाहीत. त्यांच्या अपयशाच्या काळात त्यांच्यामागे सदिच्छा उभ्या राहिल्या. त्यांच्या निवडकर्त्यांना त्यांच्यावर विश्वास वाटेल अशी वागणूक त्यांनी ठेवली त्यामुळे अपयशानंतरही त्यांना संधी दिली गेली आणि त्यातून ते उसळून वर आले. राहुल द्रविड सलग चोवीस कसोटी सामने शतक झळकावू शकला नव्हता हे त्याने एकदा शतक झळकावल्यानंतर लक्षात आलं होतं. खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही. जो पर्यंत बॅट आहे तोपर्यंत विराट आहे. सलग तीन महिने जरी विराट कोहली अपयशी ठरला किंवा शारीरिक दुखणी आली तरी तो संघाबाहेर जाईल आणि त्याच्यामागे कोणी उभं राहायला नसेल.
एका सुंदर स्वप्नाचा असा चुरा व्हायला कोणालाच नकोय.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page