प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकाला हार्दिक पंड्याबद्दल या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
हार्दिक पंड्या भारताचा तरुण स्टार अष्टपैलू खेळाडू आता लहानापासून थोरापर्यंत प्रत्येक क्रिकेट रसिकाला माहित झाला आहे. नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने फटकावलेल्या झुंजार ७६ धावांच्या खेळीने सगळ्या भारतीयांची मने जिंकली. जेथे भारताचे सगळे स्टार खेळाडू काहीच न करता तंबूत परतले तेव्हा पंड्याने एकट्याने झुंज देत सामन्यात जीव आणला. असे वाटत होते की पंड्या काही तरी चमत्कार करेल आणि भारताला जिंकवून देईल, पण तेव्हाच एक चोरटी धाव घेताना तो धावचीत झाला आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चरण्याचे भारताचे स्वप्न भंग पावले. तंबूत परतत असताना पंड्याच्या चेहऱ्यावर आउट झाल्याचे दु:ख सहज दिसत होते.

असो, परंतु त्याच्या त्या खेळीने क्रिकेट रसिकांचे मात्र भरपूर मनोरंजन केले. त्याची ही खेळी भारतीय क्रिकेट इतिहासात अजरामर ठरणार यात शंका नाही. आज क्रिकेट जगतात हार्दिकला जी काही प्रसिद्धी लाभली आहे ती केवळ आणि केवळ त्याच्या मेहनतीमुळे! कोणाला वाटत असेल की तो श्रीमंत घरातील मुलगा असेल, त्याच्या मागे क्रिकेटचा वारसा असेल, तर असे बिलकुल नाही. अतिशय कठीण परिस्थितीमधून स्वत:ला सावरत हार्दिकने यशाचे शिखर गाठले आहे.
डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन हार्दिक आणि कृनालचे वडील किरण मोरेंच्या अकादमीत गेले. किरण मोरे हे भारताचे माजी खेळाडू आणि यष्टीरक्षक आहेत. जेव्हा हार्दिकच्या वडिलांनी किरण मोरे यांना आपल्या मुलांना शिकवण्याची विनंती केली तेव्हा किरण मोरे यांनी वयामुळे त्यांचा प्रवेश नाकारला. कारण तेव्हा कृणाल हा ७ आणि हार्दिक फक्त ५ वर्षाचा होता. अकादमीमध्ये प्रवेश घेण्यासठी कमीत कमी १२ वर्ष वय असणे गरजेचे होते. परंतु हार्दिकच्या वडीलांच्या आग्रहापुढे किरण मोरे झुकले आणि त्यांनी या दोघांना फलंदाजी करण्याची एक संधी दिली. या दोन बंधूनी देखील मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि किरण मोरेंना आपल्या जबरदस्त फलंदाजीने प्रभावित केलं. त्यांच्यातली क्रिकेटनिष्ठा ओळखून किरण मोरे यांनी हार्दिक आणि कृनाल दोघांना अकादमीत प्रवेश दिला. तेथून पुढे स्वत:च्या कर्तुत्वाने, जिद्दीने स्वत:ला सिद्ध करत दोन्ही बंधूंनी यशाला गवसणी घातली, पण कृनाल पेक्षा जास्त यशस्वी ठरला, त्याचा लहान धडकेबाज बंधू हार्दिक पंड्या!

चला जाणून घेऊया हार्दिक पंड्याबद्दल अश्या काही गोष्टी, ज्या जास्त क्रिकेटरसिकांना माहित नाहीत, पण त्या त्यांना माहित असायलाच हव्यात.
१. हार्दिक पंड्याचे कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते, कधी कधी तर एक वेळच्या जेवणाची देखील वानवा होत असे.
२. हार्दिकच्या क्रिकेट करियरसाठी त्याच्या वडिलांनी खूप त्याग केला आहे. फक्त मुलांना योग्य असे क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे यासाठी ते परवडत नसून देखील सुरत मधून बांद्रयाला राहायला आले.

३. किरण मोरे यांनी ३ वर्ष त्यांच्या अकादमीत असताना हार्दिक कडून कोणतीच फी आकारली नाही.
४. हार्दिकला त्याचे सह खेळाडू “रॉकस्टार” या नावाने संबोधतात.

५. इरफान पठाण आणि युसुफ पठाण हे दोन त्याचे खूप जवळचे मित्र आहेत.
६. लोक त्याला बडोद्याचा वेस्ट इंडियन म्हणून संबोधतात, कारण त्याचे वर्तन आणि वैशिष्ट्ये तशीच आहेत.

७. २०१५ मध्ये जॉन राईटने हार्दिकमधील टॅलेंट ओळखले होते आणि त्याला मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी करून घेतले.
८. हार्दिक नववी मध्ये नापास झाला होता, त्यानंतर त्याने शिक्षण सोडून फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.
९.सुरुवातीला हार्दिक लेग स्पिनर होता परंतु किरण मोरे यांच्या मदतीने तो मध्यमगतीचा गोलंदाज होऊ शकला.

१०. सय्यद मुश्ताक़ अली ट्रॉफी मध्ये हार्दिकने दिल्ली विरुद्ध जोरात फटकेबाजी करत एकाच षटकात ३९ धावा धावफलकावर झळकावल्या होत्या.
अश्या या तरुण क्रिकेटरची कारकीर्द सदा बहरत जाओ आणि भारतीय क्रिकेटला तो एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाओ हीच सदिच्छा!!!
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page