मुकेश अंबानींच्या अफाट यशामागचे हे २ गुरु आजही अनेकांना ठाऊक नाहीत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
धीरूभाई अंबानी म्हणजे शून्यातून वर येऊन मोठं झालेलं नाव हे आपण सगळेच जाणतो. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी जी संपत्ती कमावली ती सहाजिकच आपल्या पश्चात आपल्या दोन्ही मुलांच्या नावे केली. पण २ भाऊ म्हटले की बहुतेकदा त्यांची आयुष्य एकमेकांपेक्षा फार वेगळी असल्याचं पाहायला मिळतं.
नेमकं हेच अनिल अंबानी आणि मुकेश अंबानींच्याही बाबतीत झालं. मुकेश अंबानी एकामागोमाग एक यशाच्या पायऱ्या चढत राहिले. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर असलेले मुकेश अंबानी आजच्या घडीला केवळ भारतातच नाही तर जगभरात आपलं नाणं खणखणीत वाजवत आहेत.
अपार कष्ट घेऊन त्यांनी आजतागायत इतकं विशाल साम्राज्य साम्राज्य उभं केलं आहे. अनिल अंबानींच्या बाबतीत मात्र नियतीने इतका यशस्वी प्रवास लिहिलेला नसल्याचं आजवर दिसून आलंय.
एखादा माणूस यशस्वी झाला की प्रत्येक वेळी त्या माणसाच्या यशामागे त्याला घडवणारी नेमकी कोण कोण माणसं होती हे आपल्याला माहीत असतंच असं नाही. असंच काहीसं मुकेश अंबानींच्याही बाबतीत म्हणावं लागेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
जगातल्या टॉप १० श्रीमंतांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर असलेले आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांचे दोन महत्त्वाचे गुरू कोण होते हे जाणून घेतलंत तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
“इतकी मोठी माणसं मुकेश अंबानींची गुरू आहेत आणि हे आपल्याला माहीत नाही”, असा विचार मनात येईल तुमच्या. इतक्यातच मुकेश अंबानींनी स्वतःहून आपल्या या दोन गुरूंविषयी खुलासा केला आहे.
मुकेश अंबानी इतक्यातच ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग २०२२’मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. ‘ग्रीन एनर्जी’ ते ‘भारतीय अर्थव्यवस्था’ याविषयीच्या अनेक बाबींवर ते बोलले. २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जगातली सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था बनेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. याखेरीजही अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते मोकळेपणाने बोलले.
तसं बघायला गेलं तर मुकेश अंबानींनी आपल्या यशाचं श्रेय दुसऱ्याला दिल्याचे प्रसंग किरकोळ आहेत. पण ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग २०२२’ दरम्यान मात्र आपल्या यशामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा दोन अतिशय कर्तृत्त्ववान व्यक्तींचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
त्यांच्या ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’च्या या दोन गुरूंविषयी सांगताना ते म्हणाले, “आज त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ‘रियायन्स इंडस्ट्रीज’ नवीन उंची गाठत आहे. या दोन्ही व्यक्तींनी ज्या दृष्टी आणि कृतीने नेतृत्त्व केले, त्यासाठी ते दोघेही आदर आणि कौतुकास पात्र आहेत.”
मुकेश अंबानींच्या पहिल्या गुरूंचं नाव आहे डॉ. रघुनाथ माशेलकर. तर त्यांचे दुसरे गुरू डॉ. विजय केळकर हे आहेत.
गेल्या ५ दशकांपासून डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. विजय केळकर यांनी भारत सरकारच्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचं नेतृत्त्व केलं आहे. भारत सरकारच्या अनेक मोठमोठ्या योजनांचा ही दोन कर्तृत्त्ववान माणसं भाग आहेत. मुकेश अंबानी या दोघांना आपले गुरू मानतात.
डॉ. रघुनाथ माशेलकरांविषयी :
रघुनाथ अनंत माशेलकर यांची रमेश माशेलकर अशीही ओळख आहे. ७९ वर्षांच्या रघुनाथ माशेलकर यांनी देशातील सर्वात मोठे ‘केमिकल इंजिनियर’ म्हणून नावलौकिक मिळवला आहे. डॉ. माशेलकरांनी ‘काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ CSIR चे महासंचालक हे पद भूषवलं आहे.
२००४ ते २००६ दरम्यानच्या काळात ते ‘नॅशनल इंडियन सायन्स अकादमी’चे अध्यक्षही होते. या संस्थांशिवाय डॉ माशेलकर २००७ ते २००९ या काळात ‘इन्स्टिट्यूशन ऑफ केमिकल इंजिनियरिंग’चे अध्यक्ष, ‘ग्लोबल रिसर्च अलायन्स’चे अध्यक्षही होते.
विज्ञान आणि रासायनिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ या तीन अत्यंत सन्मानाच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकरांची ओळख इतक्यावरच संपत नाही. ते ‘अकादमी ऑफ सायंटिफिक अँड इनोवेटिव्ह रिसर्च’ (एसीएसआयआर) चे पहिले अध्यक्षही होते. याखेरीज ते पंतप्रधानांच्या ‘वैज्ञानिक सल्लागार समिती’चे सदस्य आणि सलग सरकारांनी स्थापन केलेल्या मंत्रीमंडळाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचेदेखील सदस्य आहेत.
त्यांनी ‘नॅशनल ऑटो फ्युएल पॉलिसी’ पासून ‘भारतीय औषध नियामक प्रणाली’ मध्ये सुधारणा आणि बनावट औषधांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी विविध मुद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी १२ उच्चस्तरीय समित्यांचं अध्यक्षपद भूषवलं आहे.
याखेरीज त्यांनी ‘भोपाळ गॅस दुर्घटने’संदर्भात (१९८५-८६) चौकशी करण्यासाठी सरकार द्वारे नेमण्यात आलेल्या सदस्यीय चौकशी आयोगासाठी ‘मूल्यांकनकर्ता’ म्हणून काम केलंय तर महाराष्ट्र गॅस क्रॅकर कॉम्प्लेक्स दुर्घटनेच्या (१९९०-९१) चौकशीसाठी त्यांची सरकारद्वारे समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली होती.
—
- एका कॉलवर संपूर्ण माहिती देणाऱ्या या कंपनीचा ताबा आता अंबानी ग्रुपकडे असणार!!
- मुकेश अंबानी किती भ्रष्ट आहे बरं? वाचा ‘अंबानी भ्रष्टाचारा’चा महाअध्याय
—
डॉ. विजय केळकर यांच्याविषयी :
मुकेश अंबानी ज्यांना आपले दुसरे गुरू मानतात ते डॉ. विजय केळकर हेदेखील खूप मोठं नाव. डॉ विजय केळकर यांचा जन्म १५ मे १९४२ रोजी झाला. ७९ वर्षांचे डॉ. केळकर हे देशातील नावाजलेले अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.
सध्या ते ‘फोरम ऑफ फेडरेशन, ओटावा’ आणि ‘इंडिया डेव्हलपमेंट फाउंडेशन, नवी दिल्ली’ चे अध्यक्ष आणि ‘जनवाणी’चे अध्यक्ष आहेत. पुण्यातील महारत्ता चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचा ‘जनवाणी’ हा सामाजिक उपक्रम आहे.
४ जानेवारी २०१४ रोजी आंध्र प्रदेशच्या ‘श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्ट’चे विश्वस्त म्हणून डॉ. विजय केळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
डॉ. विजय केळकर हे जानेवारी २०१० पर्यंत वित्त आयोगाचे अध्यक्षही होते. यापूर्वी ते २००२ ते २००४ या काळात अर्थमंत्र्यांचे सल्लागारही होते. भारतात ज्या आर्थिक सुधारणा झाल्या त्यात त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते.
याआधी १९९८ ते १९९९ पर्यंत डॉ केळकर हे भारत सरकारचे ‘वित्त सचिव’ही होते. सन १९९९ मध्ये, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ (IMF) च्या बोर्डावर त्यांना भारत, बांग्लादेश, भूतान आणि श्रीलंकेचे ‘कार्यकारी संचालक’ म्हणून नामांकित केलं गेलं होतं.
मुकेश अंबानी यांची ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ ही कंपनी ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रात देशातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. विजय केळकर यांनी या क्षेत्रात नैपुण्य संपादन केलं आहे.
गेल्या अनेक दशकांपासून मुकेश अंबानी वेळोवेळी या दोन्ही दिग्गजांची मतं घेत आहेत. याच कारणामुळे ते डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. विजय केळकर यांना आपले गुरू मानतात.
अनुभवी, हुशार आणि यशस्वी व्यक्तींकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळालं की आपल्या यशाचा मार्ग कसा स्पष्ट होत जातो हेच आपल्याला मुकेश अंबानींनी मिळवलेलं यश पाहून आणि त्यांनी ज्यांना गुरू म्हणून डोळ्यांसमोर ठेवलंय ती उदाहरणं पाहून लक्षात येतं.
थोरामोठ्यांचे आदर्श ठेवणं म्हणजे काय हे मुकेश अंबानींकडून कुणीही शिकण्यासारखं आहे. अशा उत्तम गुरूचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याला आपल्या बुद्धीची आणि मेहनतीची जोड मिळाली तर आपापल्या क्षेत्रात सातत्याने प्रगती करत राहणं कुणालाही शक्य आहे हा विश्वास मुकेश अंबानी आपल्याला देतात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.