' हॉटस्टार वर A Thursday हा सिनेमा बघायलाच हवा कारण, थरारक सस्पेन्स आणि… – InMarathi

हॉटस्टार वर A Thursday हा सिनेमा बघायलाच हवा कारण, थरारक सस्पेन्स आणि…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

खरंतर या सिनेमाचं नाव ऐकून बऱ्याच जणांना २००८ साली आलेल्या A Wednesday या सिनेमाची आठवण नक्कीच झाली असेल. A Wednesday हा भारतीय चित्रपटविश्वातला अजवारचा उत्कृष्ट क्राइम थ्रिलर सिनेमा मानला जातो

या सिनेमातून केलं गेलेलं राजकीय भाष्य आणि सामान्य माणसावर लक्षकेंद्रित करून लिहिलेली पटकथा, आणि अनुपम खेर, नसिरूद्दीन शहासारख्या दिग्गजांच्या अभिनयाने समृद्ध असा हा A Wednesday अजूनही लोकांच्या लक्षात आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या सिनेमात जसं एका फोन कॉलवरून मुंबई पोलिसांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या कॉमन मॅनची गोष्ट उलगड जाते अगदी त्याप्रमाणे नुकत्याच हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या A Thursday या सिनेमाची कथासुद्धा काहीशी अशीच आहे.

 

a thursday IM

 

मुंबईच्या कुलाबा परिसरातल्या एका प्ले ग्रुपमध्ये शिकवणारी एक शिक्षिका १६ लहान मुलांना बंदी बनवते आणि मुंबई पोलिसांना फोन करून वाटाघाटी करायला भाग पाडते, ती तिच्या काही मागण्या सरकारसमोर मांडते आणि त्या बदल्यात मुलांना सोडण्याची अट ठेवते.

यात ती यशस्वी होते का? तिच्या मागण्या नेमक्या काय आहेत? या सगळ्याचा तिच्या भूतकाळाशी नेमका काय संबंध आहे? पोलिस आणि सरकार तिच्यापुढे कमकुवत पडतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू आपल्यासमोर उलगडत जातात.

 

a thursday 2 IM

 

वरकरणी बघायला गेलं तर हा एक हॉस्टेज क्राइम ड्रामा आहे, आणि अशाप्रकारचे बरेच सिनेमे आपण पाहिलेदेखील आहेत, नुकतीच आलेली स्पॅनिश सिरिज मनी हाइस्ट याचं धडधडीत उदाहरण आहे, अगदी या सिरीजप्रमाणे नाही पण A Thursday हा सिनेमा तुम्हाला बांधून ठेवण्यात अगदी यशस्वी ठरतो ही मात्र नक्की.

यातले काही काही सीन्स हे म्हणावे तसे प्रभाव टाकण्यात अयशस्वी ठरतात, काही गोष्टी अविश्वसनीय वाटतात, देशाच्या प्रधानमंत्र्याशी चर्चेचा मुद्दा तर आपल्याला बाळबोध वाटतो, पण सिनेमाच्या शेवटच्या २० मिनिटांत जे कथानक वळण घेतं ते बघितल्यावर या सगळ्या गोष्टी नगण्य वाटू लागतात.

पहिले दीड तास आपल्यासमोर घडणारं नाट्य हे तसं सामान्य वाटतं, नैना जैस्वाल हिच्या या कृत्यामागची पार्श्वभूमी जशी उलगडायला सुरुवात होते तसं आपण अगदी सरसावून बसतो आणि क्लायमॅक्स तर आपल्याला पार आतून हेलावून टाकतो.

सिनेमाचा विषय हा बराच गंभीर आहे आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणार आहे, पण सिनेमाची हाताळणी ही बरीचशी कमर्शियल पद्धतीने केल्याने काही काही बाबतीत डायलॉगबाजी गंडलेली दिसून येते.

yami gautam IM

 

विषय गंभीर असला तरी अध्येमध्ये येणारे हलके फुलके संवाद ठीक वाटतात, पण अशाप्रकारच्या कथानकांत त्यांची गरज नसते हे प्रकर्षाने जाणवतं.

“जब तक कानमें जोरसे चिल्लाते नहीं, तब तक कोई सुनता नहीं” असे काही डायलॉग प्रभाव पाडतात, पण सिनेमाचा हा प्लॉट आणि विचार करायला लावणारे डायलॉग सिनेमाच्या शेवटच्या काही मिनिटांत आल्याने सुरुवातीचा सिनेमा हा खूप खेचल्यासारखा वाटू शकतो. 

पण जसं आधी म्हंटलं तसं शेवटच्या २० मिनिटांमध्ये जे काही आपल्यासमोर घडतं ते पाहता या सगळ्या गोष्टी आपण हमखास नजरेआड करू शकतो.

सिनेमाची प्रोडक्शन कॉस्ट आणि बजेट बघता सिनेमा उत्तमरित्या पडद्यावर साकारलाय ही निर्विवाद सत्य आहे. काही काही ठिकाणी येणारं उगाचच कर्कश संगीत आणि काही बाळबोध डायलॉग आणि सीन्स सोडले तर सिनेमा उत्तमरित्या सादर केला आहे.

खरंतर अशा सिनेमात पार्श्वसंगीत ही खूप महत्वाचं असतं त्याबाबतीतसुद्धा सिनेमा तसा फिकाच पडला आहे.

अतुल कुलकर्णी, नेहा धूपिया, डिंपल कपाडिया यांनी त्यांचं काम उत्तम केलंच आहे, पण याहून सर्वात जास्त भाव खाऊन जाते ती यामी गौतम. आजवर तुम्ही यामीला या अवतारात कधीच पाहिलं नसेल.

 

star cast IM

 

आजवर तिने केलेल्या या भूमिका बऱ्याचशा Girl next door अशाच होत्या. पण यात तिने थोडीशी नकारात्मक भूमिका समर्थपणे साकारली आहे. क्षणात चांगली शिक्षिका आणि एका क्षणात १६ मुलांना बंदी बनवून सूत्रं हातात घेणारी गुन्हेगार हे transformation यामीने अगदी अचूक पडद्यावर साकारलं आहे.

शेवटच्या २० मिनिटांत तर तिने स्वतःच्या करियरचा आजवरचा उत्तम परफॉर्मन्स दिला आहे असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही.

 खरंच फिल्म इंडस्ट्रीमधल्या यामीसारख्या अभिनेत्रीला म्हणाव्या तशा आव्हानात्मक भूमिका न मिळणं हे चित्रपटसृष्टिचं आणि पर्यायी आपल्यासारख्या प्रेक्षकांचं खूप मोठं नुकसान आहे.

 

yami gautam 2 IM

 

A Thursday हा काही अभूतपूर्व किंवा मास्टरपीस असा सिनेमा नक्कीच नाही, पण याच्या माध्यमातून जो गंभीर विषय हाताळला गेला आहे आणि तो ज्या पद्धतीने सादर केला आहे त्यासाठी दिग्दर्शक बहजाद खंबाटाचेसुद्धा आभार मानायला पाहिजेत.

हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा सिनेमा बघू शकता आणि आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला तेदेखील आम्हाला कॉमेंटमधून कळवू शकता!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?