' अंत्यविधीत राम कदमांना सूर सापडला आणि अजरामर गाण्याने जन्म घेतला – InMarathi

अंत्यविधीत राम कदमांना सूर सापडला आणि अजरामर गाण्याने जन्म घेतला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखाद्या सशक्त कलाकृतीचा जन्म कधी आणि कुठे होईल याचा नेम नाही. कधी एखाद्या खऱ्याखुऱ्या घटनेवरून सुरपहिट चित्रपट बनतो तर कधी एखाद्या फजितीतून अजरामर विनोद निर्माण होतो. मात्र एखाद्याला अत्यंयात्रेत सूर गवसला आणि त्यातून चीरतरुण गाणं साकारलं गेलं, असं तुम्हाला सांगितलं तर?…तुम्हाला ही थट्टा वाटेल, मात्र  वर्षानुवर्ष घरात गुणगुणलं जाणारं एक असं गाणं ज्याचा जन्म खरंतर दुःखद अशा अंत्ययात्रेत झालाय.

 

funeral im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मराठी संगीतसृष्टीत प्रतिभावंतांनी आपलं योगदान दिलं आणि संगीताचा हा खजिना भरून टाकला. मग ती लावणी असो, भावगीत किंवा भक्तीगीत! शब्द, सुर आणि स्वर यांचा अलौकिक मेळ साधणारी गाणी आजही ऐकली की ‘ही गीतं अजरामर राहणार’ यावर विश्वास बसतो. तुमच्या मनातही अशाच चीरतरुण जुन्या गाण्यांची यादी तयार असेलच ना? मात्र त्यातील प्रत्येक गाण्याच्या जन्माची एक वेगळी कथा आहे.

मराठी सुपरहिट चित्रपटांच्या यादीतील एक महत्वाचं नाव म्हणजे चित्रपट ‘सांगत्ये ऐका!’ १९ मे १९५९ मध्ये पुण्यातील विजयानंद चित्रपटगृहात हा चित्रपट झळकला आणि त्यानंतर महाराष्ट्रभर या चित्रपटाचं वारु चौफेर उधळलं. कथा, अभिनय आणि गाणी अशा तिन्ही आघाड्यांवर सरस ठरणाऱ्या या चित्रपटातील ‘बुगडी माझी सांडली गं’ या गाण्याने इतिहास रचला.

 

sangte aika im

 

मात्र हे गाणं नेमकं सुचलं कसं? कधी? याचा किस्सा गाण्याइतकाच भन्नाट आहे.

पुण्यात चित्रपटाचं शुटिंग सुरु झालं. अवघ्या ३ महिन्यात ही कलाकृती साकारली गेली. मात्र संगीत हा चित्रपटाचा खरा विषय असल्याने ग दि माडगुळकर यांना गाणी लिहीण्याची विनंती केली. गदिमांनी आपली लेखणी उचलली आणि ‘सांगत्ये ऐका’ असं सौदर्य खुलवणाऱ्या एकाहून एक दर्जेदार रचना लिहील्या. या रचनांना चाल लावण्याची जबाबदारी होती संगीतकार वसंत पवार आणि त्यांचे सहकारी राम कदम यांच्या खांद्यावर!

गदिमांची रचना पुर्ण झाली आणि ‘बुगडी माझी सांडली’ हे तीन शब्द राम कदमांच्या कानात घोळू लागले. शब्दांची ताकद लक्षात घेता राम कदमांनी आपली शक्ती पणाला लावली मात्र तरिही मनाजोगी चाल काही मिळेना. विचार करण्यात दिवसामागून दिवस जात होते, मात्र तरिही अजरामर ठरू शकेल अशी चाल काही गवसेना.

 

ga di ma im

 

त्यातच एके दिवशी राम कदम आपल्या घरी विचारात गढले होते. अर्थात गाण्यांच्या चालींवरच विचारमंथन सुरु होतं, तेवढ्यात शेजारील घरात कोलाहल ऐकू आला. चौकशी करताच,”शेजारील घरात कुणीतरी गेलं” अशी बातमी कानावर पडली. हळहळ व्यक्त करून पुन्हा कदम आपल्या दाराकडे वळले. शेजारील घरी नातेवाईक, परिचीत यांचा गोतावळा वाढू लागला आणि रडण्याच्या एकच गोंधळ सुरु झाला.

शेजारील घरात आलेली एक ज्येष्ठ महिला मोठ्याने रडत होती, ग्रामिण भागातून आलेल्या या महिलेचा टिपेचा सूर सगळ्या चाळीत घुमला.”माझा बाबा असा कसा गेला गं, आता मी कुणाकडे पाहू गं, असं कसं झालं गं” म्हणत तिने टाहो फोडला आणि राम कदमांनी क्षणात त्या घराकडे धाव घेतली.

 

funeral 1 im

 

पुन्हा एकदा त्या महिलेचे बारकाईने निरिक्षण केलं. पुन्हा त्या महिलेचे तेच पालुपद सुरु होते. नेमक्या त्याच क्षणी राम कदमांनी तिच्या दुःखावियोगातील ‘गं’ हेरला आणि हा भाव लावणीत हवाच असा हट्ट धरला.

गदिमांच्या शब्दांना या गं ची साथ मिळाली आणि ‘बुगडी माझी सांडली गं’ ही आर्जव महाराष्ट्रभर घुमली. आज नव्या पिढीतही ही लावणी आवडीनेे ऐकली जाते, त्यावर नृत्य सादर होते हेच त्याचे खरे यश म्हणावे लागेल.

एकंदरित प्रतिभावान कलाकाराचे कान, डोळे उघडे असतील तर कोणत्याही प्रसंगातून त्याला प्रेरणा मिळू शकते हेच खरं! अशा अनेक गाण्यांच्या, चित्रपटांच्या पडद्यामागील कथा तुम्हाला वाचायला आवडतील का? कमेंटमध्ये नक्की कळवा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?