' ‘बसपन का प्यार’ नंतर ‘कच्चा बदाम’ : इंटरनेटवर व्हायरल झालेल्या गाण्यामागची गोष्टी – InMarathi

‘बसपन का प्यार’ नंतर ‘कच्चा बदाम’ : इंटरनेटवर व्हायरल झालेल्या गाण्यामागची गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बऱ्याच इंस्टाग्राम युजर्सना हल्ली रिल्सचा नाद लागलाय. बऱ्याच नव्या-जुन्या गाण्यांचे रिल्स लोक इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. मध्यंतरी ‘बचपन का प्यार’ वरच्या कैक रिल्सनी इंस्टाग्राम गाजवलं होतं.

देशाच्या कानाकोपऱ्यातली कुठलीही व्यक्ती करत असलेली एखादी हटके गोष्ट आज इंटरनेटवरून सगळीकडे व्हायरल होते. आपल्याला माहीत नसलेली अनेक प्रतिभावान माणसं त्यामुळे समोर येतात आणि त्यांची वाहवा होते. त्यांच्या मातीतली, त्यांच्या भाषेतली आणि त्यांच्या अनोख्या ढंगात ते करत असलेली अशी एखादी गोष्ट इतर अनेकांचं फार पटकन लक्ष वेधून घेते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अशी एखादी गोष्ट करणं यात त्या व्यक्तींना कदाचित काही विशेष वाटत नसेलही, पण आपल्याला मात्र त्यातलं नावीन्य आणि सहजता खुणावते. आता ‘कच्चा बदाम’ या गाण्याचंच घ्या ना! हे गाणं इंटरनेटवर सध्या तुफान व्हायरल होतंय.

 

kaccha badam im

 

आपल्याला ‘कच्चा बदाम’ हे शब्दच स्पष्ट ऐकू येतात. बाकीचे शब्द धड कळतही नाहीत. तरीही इंस्टाग्रामवर आता जो तो या गाण्यावर सतत ठेका धरत या गाण्याचा आनंद लुटतोय. रिल्स टाकतोय, पण इतका धुमाकूळ घालणारं हे गाणं नेमकं कुणाचं आहे? ते मुळात कशाकरता म्हटलं जातं? ते गाणं कुठून आलं हे आपल्याला माहीत नाही.

या गाण्याची कल्पक निर्मिती भुबन बडयाकर या सामान्य माणसाने केलीये. ते म्हणत असलेलं हे गाणं आज सातासमुद्रापार पोहोचतंय.

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातल्या कुरालजुरी गावात भुबन बडयाकर आपली पत्नी आणि तीन मुलांसोबत राहतात. पोटापाण्यासाठी गावोगाव फिरून ते कच्चे बदाम विकतात.

नव्या गावात पोहोचलं की ‘कच्चा बदाम’ ही जिंगल म्हणायची आणि ग्राहकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता आहे. लोक त्याचं हे गाणं ऐकून प्रभावित होतात आणि बदाम खरेदी करतात. पैशांच्या बरोबरीने टाकाऊ सामान आणि बांगड्यांच्या बदल्यातही ते कच्चे बदाम विकतात.

दिवसाभरात ३-४ किलो बदाम विकून त्यांची साधारण २५० ते ३०० रुपये कमाई होते. गेल्या १० वर्षांपासून ते हे काम करत आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये हे गाणं इंटरनेटवर आलं. इंटरनेटवर हे गाणं कसं व्हायरल झालं, कुणी व्हायरल केलं याविषयी भुबन यांना काहीच माहिती नाही.

इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की एक व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि त्या व्यक्तीने या गाण्याचं खूप कौतुक केलं. त्या व्यक्तीने भुबन यांना ते गाणं म्हणायला सांगितलं आणि भुबन ते गाणं म्हणत असताना त्या व्यक्तीने त्यांचा व्हिडियो रेकॉर्ड केला.

 

kaccha badam im1

 

भुबन यांचं सगळं लक्ष आपल्या कामात असल्यामुळे त्या व्यक्तीचं नावदेखील त्यांनी विचारलं नाही. बंगाली भाषेतल्या या गाण्याचे शब्द काहीसे असे आहेत.

बादाम बादाम दादा कांचा बादाम
आमार काछे नाइतो बुबू वाजा बादाम
आमार काछे पाबे सुधु वाजा बादाम

नज्मू रिचैट नावाच्या एका गायक आणि संगीतकाराने या गाण्यात बिट्स घालून त्याचं रिमिक्स केलं. कुणीतरी या गाण्यावर नाच बसवला. इंस्टाग्रामवर ते खूप व्हायरल झालं.

सध्या इंस्टाग्रामवर ‘कच्चा बादाम डान्स चॅलेंज’ जोरदार सुरू आहे. या गाण्यावर कोरियोग्राफ केलेल्या स्टेप्सवर केवळ भारतातलेच नाही तर परदेशातले अनेक जणही अगदी लीलया नाचत असल्याचे रिल्स बघायला मिळत आहेत. टांझानियातील किली पॉल आणि अमेरिकेतल्या रिकी पॉन्ड यांसारख्या इंफ्लूएन्झर्सनाही या गाण्याने भुरळ घातली आहे.

‘ऑफिशियल बादाम’ या नावाने या गाण्याचं एक वेगळं व्हर्जन युट्युबवर अपलोड केलं गेलंय. या व्हर्जनमध्ये मूळ गाण्यात रॉनइ आणि प्रग्या या कलाकारांनी रॅप आणि बिट्स घातलेत. या व्हर्जनमध्ये कलाकारांसोबत भुबनसुद्धा दिसत आहेत. मात्र हे व्हर्जन इंस्टाग्रामवर व्हायरल झालेलं नाही.

भुबन बडयाकर प्रत्यक्ष आयुष्यात फार साधेसरळ आहेत. सोशल मीडियाची त्यांना फारशी माहिती नाही. मात्र त्यांचं हे गाणं व्हायरल झाल्यावर बरेच युट्युबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत.

 

kaccha badam im2

 

त्यांच्या मुलाखती घ्यायला त्यातले काहीजण उत्सुक आहेत तर काही जणांना त्यांच्याबरोबर गाणं रेकॉर्ड करायची इच्छा आहे. आपल्या गाण्याला प्रसिद्धी मिळेल याचा काहीच अंदाज नसलेले भुबन हे सगळं बघून भांबावून गेले.

आपण किती प्रसिद्ध झालोय हे जेव्हा त्यांना कळलं त्यानंतर लोक आपल्याला काहीच श्रेय न देता आपलं गाणं सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या गाण्यातून लोकांची जी आर्थिक कमाई होत असेल त्यातलाही हिस्सा आपल्याला दिला जात नाहीये याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी पोलिसात तक्रार केली.

बऱ्याच लोकांनी त्यांना पोलिसांकडे न जाण्याविषयी सल्ला दिला होता मात्र यासंदर्भात बोलताना एका मुलाखतीत भुबन यांनी सांगितलं की, “हे गाणं माझं आहे हे लोकांना माहीत व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी सरकारला अशी विनवणी करतो की त्यांनी मला फंड द्यावा ज्यातून माझ्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकेल.”

 

kaccha badam im3

 

या गाण्यासाठी भुबन यांना काही मानधन मिळाली की नाही हे अद्याप समजलेलं नाही. भुबन यांचं हे गाणं इतकं प्रसिद्ध झालंय की ते आता ‘दादागिरी अनलिमिटेड ९’ या सौरभ गांगुलीच्या क्विझ शो मध्ये दिसणार असल्याचं वृत्त समोर आलंय.

अगदी पटकन गोष्टी व्हायरल होण्याच्या आजच्या जमान्यात ज्यांनी त्या गोष्टींची निर्मिती केलेली असते त्या कलाकारांची ओळख हरवून जायला नको हीच मनापासून इच्छा.

वय, वेष, भाषा,आर्थिक स्थिती, व्यवसाय, प्रदेश या सगळ्या बंधनांच्या पलीकडे जाऊन या सच्चा कलाकारांनी लोकांपर्यंत असंच पोहोचत राहायला हवं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?