आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – चंदन विचारे
===
दिवाळीच्या पहिल्या दिवशी लेखक चंदन विचारे यांनी अभिनेते रमेश देव यांची भेट घेतली, त्यानिमित्त लिहिलेला हा लेख
—
काही योग दुर्मिळ असतात तर काही दुग्धशर्करायुक्त. आजचा योग हा दुर्मिळ अन् दुग्धशर्करायुक्तच असा दुहेरी म्हणणे सार्थ ठरेल. या एका योगामुळे माझी आजची दिवाळी ही माझ्यासाठी आजवरची सर्वात सुंदर दिवाळी ठरली. निमित्तही तसेच होते म्हणा. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साक्षात देवांशी माझी त्यांच्या वर्सोवास्थित रहात्या घरी भेट झाली.
याआधी आबासाहेबांशी ( रमेश देव यांस घरात सगळे आबासाहेब म्हणतात) दोनदा फोनवरुन बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांना भेटायची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांनी येण्याविषयी सांगितलेदेखील परंतु नेमका भेटीचा योग जुळून येत होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
काल फोनवरुन दुपारी ३ ची भेटीची वेळ मिळाली होती, परंतु काही कारणास्तव ती सकाळी ११ वाजता ठरवण्यात आली. मी म्हटलं चांगलंच आहे. सकाळची वेळ आणि दिवाळीचा पहिलाच दिवस याहून छान योग दुसरा कोणता असू शकेल.
ठरल्याप्रमाणे मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचलो. आबासाहेब बाहेर हाॕलमध्येच बसले होते. आम्ही गेल्यानंतर ते आपल्या खोलीत जाऊन तयार झाले अन् पुन्हा त्यांच्या जुन्या स्टायलिश रुपात बरोबर ११ वाजता आमच्यासमोर अवतरले.
त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पहाताक्षणी आजि सोनियाचा दिनू , वर्ष अमृताचा घनू , हरी पाहिला रे हरी पाहिला रे पाहिला या ओळी ओठांवर आल्या. साक्षात अभिनयातला देव सामोरी बसला होता.
मी ज्या देवांविषयी बोलत आहे ते देव म्हणजे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर दमदार ठसा उमटवणारे , ज्यांचं नाव घेतल्याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास पुर्ण होऊच शकत नाही असे आदरणीय श्री. रमेश देव.
मूळचे कोल्हापूरकर असलेले श्री.रमेश देव आणि सौ.सीमा देव हे जोडपं म्हणजे मराठी सिनेसृष्टीतलं एक आदर्श, दृष्ट लागण्याजोगं असं सुप्रसिद्ध जोडपं.
एक असं जातिवंत कुळवंत घराणं ज्यांनी आपलं सारं कुटुंबच मराठी आणि हिंदी सिने, नाट्यसृष्टीसाठी वाहून घेतलं. रमेशजी आणि सीमाजींनंतर अभिनयाचा हाच वारसा निरंतर जोपासत आहेत ते त्यांचे दोन चिरंजीव श्री. अजिंक्य आणि श्री.अभिनय देव. आता देव घराण्याची तिसरी पिढी आर्य आणि युग दोघेही हळूहळू जाहिरात दिग्दर्शन क्षेत्रात रस घेत आहेत.
रमेशजींचा जन्म ३० जानेवारी १९२६ सालचा. शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम काॕलेजात जुनी १२ वी म्हणजेच इंटर्नपर्यंत. मूळचे राजस्थानचे राजपूत असलेले ठाकूर देव घराणे रमेश देव यांच्या पणजोबांच्या काळात कोल्हापूरात स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा इंजिनियर होते. देव यांचे आडनाव खरे तर ठाकूर देव.
त्यांच्या देव या आडनावामागे अशी कहाणी सांगितली जाते की रमेशजींचे वडील हे फौजदारी वकील होते. राजर्षी शाहू महाराज यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीवरच ते वकील झाले. एका कामात त्यांनी शाहू महाराजांना मदत केली असता शाहू महाराज त्यांना म्हणाले कि, “ठाकूर, तुम्ही देवासारखे भेटलात. तुम्ही आता ठाकूर नाही- देवच !” आणि तेव्हापासून त्यांचे आडनाव देव झाले.
शाहू महाराजांचे नाव निघताच रमेशजी त्यांच्याविषयीच्या आठवणी एक एक करुन सांगू लागले. कोल्हापूरातील देवांच्या घरी शाहू महाराज येत असत त्यावेळी रमेशजींच्या आईच्या हातची लसणाची चटणी, भाकरी आणि लोण्याचा गोळा असा स्वयंपाक त्यांना खूप आवडे.
रमेशजींनी अभिनय, दिग्दर्शन , निर्मिती केलेल्या मराठी हिंदी सिनेमांची,नाटकांची यादी बरीच मोठी आहे अगदी पाचशेच्या पार. त्यांनी बऱ्याच मालिकांमध्ये , नाटकांमध्येही काम केले आहे. त्याकाळी नाटकाच्या प्रयोगाचे ८०० रुपये मिळत असत असे त्यांनी सांगितले.
भालजी पेंढारकर यांच्या एका चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांच्यासमवेत रमेशजींनी १९४७ साली पहिला सीन दिला होता. यासाठी भालजींनी त्यांना त्याकाळी ५ रु. टोकन म्हणून दिले होते. रमेशजींचा पहिला चित्रपट १९५५ सालचा भालजी पेंढारकर दिग्दर्शित ये रे माझ्या मागल्या त्यानंतर श्री. राजा परांजपे दिग्दर्शित १९५६ साली प्रदर्शित झालेलाआंधळा मागतो एक डोळा. कै. राजा परांजपे हे त्यांचे अभिनय क्षेत्रातील गुरु.
हिंदी सिनेसृष्टीतल्या श्री. अमिताभ बच्चन, कै. राजेश खन्ना , श्री. शत्रुघ्न सिन्हा या आणि अशा बऱ्याच दिग्गजांसोबत त्यांनी हिंदी सिनेसृष्टी गाजवली.
रमेशजींनी फक्त मराठीतच नाही तर हिंदी, भोजपुरी तसेच हाॕलिवूडपटांतही काम केले. हाॕलिवूडपटात काम करण्यासाठी त्यांना त्यावेळेस ५०० डाॕलर इतके मानधन मिळाले होते. मराठीत जास्तीत जास्त २५००० आणि हिंदीत ७५००० मानधन त्यावेळी मिळत असे असेही त्यांनी सांगितले.
—
- तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं.. ३०० रूपये खिशात घेऊन आलेल्या ‘यश’चा प्रवास
- सिनेमाच्या वेडापायी खेड्यातील मुलीने घडवला इतिहास! रंगूचा ‘सुलोचना’पर्यंतचा प्रवास
—
रमेशजींच्या बाबतीत एक किस्सा असाही सांगितला जातो कि, दिनकर पाटील यांच्या ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटात रमेशजींची एक छोटीशी भूमिका होती, पण फायनल एडीटिंगच्या वेळी ती कापली गेली परंतु तरीही पडद्यावर सहा कलाकारांच्या यादीत असलेले रमेशजींचे नाव मात्र तसेच राहिले.
राजश्री प्रोडक्शनचा आरती हा १९६२ साली प्रदर्शित झालेला त्यांचा पहिला चरित्र अभिनेत्याची भुमिक असलेला हिंदी चित्रपट. आनंद या हिंदी चित्रपटातील त्यांची डाॕक्टर प्रकाश कुलकर्णी ही भूमिका तर विशेष लक्षात रहाण्याजोगी. सुरुवातीस ते चित्रपटांच्या शुटिंगसाठी कोल्हापूरहून दादरच्या एका लाॕजमध्ये येऊन जाऊन रहात असत. कालांताराने सीमाजी आणि ते माहिमच्या एका खोलीत रहावयास गेले अन् मग वर्सोवा येथे त्यांनी स्वतःचे अलिशान असे घर घेतले.
रमेशजींनी ‘या सुखांनो या’ हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक लिहीले. या पुस्तकाच्या आतापर्यंत २ आवृत्त्या निघाल्या आहेत.
१९५७ च्या सुमारास आलिया भोगासी या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची सीमाजींशी म्हणजेच लग्ना आधीच्या नलिनी सराफ यांच्याशी पहिली भेट झाली. मग त्यांच्यातील सूर जुळत गेले आणि १९६३ साली देवाब्राम्हणांच्या साक्षीने नलिनी सराफ या सीमा देव म्हणून देवांच्या घरात गृहलक्ष्मी बनून आल्या.
रमेशजी आणि सीमाजी यांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले. रमेशजी आणि सीमाजी ज्या चित्रपटात असतील तो चित्रपट हिटच असं त्याकाळी समीकरण होतं. चित्रपटांत हिट ठरलेली हि जोडी वैयक्तिक आयुष्यातही सुपर डुपर हिटच ठरली. त्यांचा जोडीने काम केलेला अन् पहिला यशस्वी चित्रपट म्हणजे सुवासिनी.
२०१४ साली रमेशजी आणि सीमाजींना राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला. याव्यतिरिक्त त्यांना बरेच पुरस्कार आजवर प्राप्त झाले आहेत.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत दिलेली वेळ पाळणारा नट अशी रमेशजींची विशेष ओळख आजही कायम आहे. त्यांनी स्वतःला केवळ मुख्य नायकाच्या भुमिकेत अडकवून न घेता सहनायक, चरित्र अभिनेता , खलनायक अशा विविध छटा असलेल्या भुमिका केल्या. तसेच निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला. भिंगरी चित्रपटातला त्यांनी रंगविलेला खलनायक तर लाजवाबच.
चित्रपटसृष्टीत सुपरस्टार पदावर पोहोचूनही त्यांनी स्वतःला कुठलेच व्यसन लावून घेतले नाही. नाही म्हणायला त्यांना पत्ते खेळण्याचा नाद आणि पुस्तके वाचण्याचा छंद आहे. त्यांचा पुस्तक संग्रहही मोठा आहे. निर्माता म्हणून त्यांनी दत्तात्रय फिल्म ही चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली.
आदरणीय शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या शेलारखिंड कादंबरीवर आधारित श्री. राजदत्त दिग्दर्शित सर्जा या चित्रपटात रमेशजी, सीमाजी आणि अजिंक्यजी देव यांनी सहकुटुंब काम केले. हा चित्रपट खूप गाजलाही. सर्जाच्या प्रमोशनसाठी रमेश देव यांनी पुण्यात ५० घोडे आणि १०० मावळ्यांसहित मिरवणूक काढली होती.
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी १० हजार रुपये खर्चून दोन मोठ्या तोफांची प्रतिकृती दादरच्या गुरुबंधू कारखान्यातून बनवून घेतली होती. प्लाझा थिएटरबाहेरचं सर्जा चित्रपटावेळचं डेकोरेशन फारच सुंदर आणि बघण्यासारखं होतं. चित्रपट, नाटक यात सर्वात जास्त कुठे काम करायला आवडते असे विचारले असता त्यांनी चित्रपट हे उत्तर दिले.
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता यातली कोणती भूमिका अधिक आवडते यावर त्यांनी अभिनेता हे उत्तर दिले. त्यांची दोन्ही मुले, सुना आणि नातवंडे याबाबतीत ते भरभरुन बोलत होते.
वयाच्या ९५ व्या वर्षी अभिनय करत असल्याचे त्यांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी एका मालिकेत छोटीशी भुमिका केल्याचे सांगितले. तसेच ते रोज सकाळी वर्तमानपत्रे वाचतात. वर्तमानपत्रे ही जगाशी असलेला संबंध जोडण्याचे माध्यम आहेत असं ते सांगतात.
पूर्वीच्या काळी निती होती, सत्यवचन होते, दिलेल्या शब्दाला किंमत होती आता हे सारे दुर्मिळ झालं आहे तसेच पूर्वीसारखे आता दोस्तही नाहीत अशीही रमेशजींनी बोलून दाखवली. चित्रपटसृष्टीत अभिनयासोबतच तुम्हाला नशिबाची साथ असायलाच हवी तरच यश लाभते असं त्यांच मत.
राजबिंडं रुप अन् व्यक्तिमत्त्व लाभलेले आ. श्री. रमेशजी वयाच्या ९५ वर्षीही तितकेच चिरतरुण होते. त्यांच्या अपराध चित्रपटातील सूर तेच छेडीता या गीताने त्याकाळी कैक तरुणींच्या हृदयाचे तार छेडले असतील. त्यांच्या देखण्या रुपावर त्याकाळी कैक तरुणी फिदा होत्या.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत इतका मोठा नावलौकीक असतानाही त्यांच्याशी बोलताना त्यांच्या बोलण्यात कुठलाही बडेजाव, अहंभाव आढळला नाही. अतिशय मधाळ, लाघवी बोलणं. खूप छान वाटलं बोलून त्यांच्याशी. या ही वयात तल्लख स्मरणशक्ती आणि तोच उत्साह बोलताना जाणवत होता.
रमेश देव यांच्या काही चित्रपटांची यादी- ये रे माझ्या मागल्या, आंधळा मागतो एक डोळा, अपराध, भिंगरी, दोस्त असा असावा, देवघर, भिंगरी, भैरवी, एक धागा सुखाचा,आधी कळस मग पाया, पाटलाचा पोर, आकाशगंगा, ग्यानबा तुकाराम , यासुखांनो या , बाप माझा ब्रम्हचारी, क्षण आला भाग्याचा, आलिया भोगासी, राम राम पाव्हणं, आई मला क्षमा कर, अवघाची संसार, यंदा कर्तव्य आहे, जगाच्या पाठीवर, सात जन्माचे सोबती,आलय दर्याला तुफान, सर्जा, जिवा सखा जेता , आनंद , सरस्वतीचंद्र आरती वगैरे वगैरे…
हल्लीच्या तरुणांनी आदर्श घ्यावा तो अशांचा.आज दिवाळीचा पहिला दिवस महद् भाग्याचा होता यात तीळमात्रही शंका नाही. आ. रमेशजींना भावपूर्ण श्रद्धांजली..
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.