' दहावी-बारावीचे निकाल आणि सोशल मीडियावरील “अपयशाची” कौतुकं! – InMarathi

दहावी-बारावीचे निकाल आणि सोशल मीडियावरील “अपयशाची” कौतुकं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दरवर्षी दहावी बारावी चे निकाल लागले की “मार्क्स महत्वाचे नाहीत” हे सांगणाऱ्या मेसेजेसचा धबधबा सुरू होत असतो.

आज जे इयत्ता नववी आणि अकरावी मध्ये आहेत – त्यांना एक आवर्जून सांगावंसं वाटतंय – “असल्या मेसेजेसकडे दुर्लक्ष करा.”

हे सांगावंसं वाटतंय कारण बारावी नापसांना, कमी मार्क्स मिवलेल्यांना धीर देणाऱ्या पोस्ट्स वाचतोय. काय एकाहूनएक कथा आहेत लोकांच्या! आज त्यांची credentials बघितली तर त्यांना “नापास” म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. “लढ रे पठ्ठया, अजून जिंदगी बाकी आहे” असा संदेश देण्याची पात्रता कमावलेले अस्सल हिरे आहेत जगात. आपण त्यांच्या संपर्कात असणं हे आपलं भाग्यच!

पण अपयशी विद्यार्थ्यांना धीर देतानाच, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीवसुद्धा करून द्यायला हवी असं वाटतं. १० वी, १२ वी ला अवाजवी महत्व आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्याला ही वर्षं महत्वाची आहेत हे पक्कं ठाऊक असतं. ते माहित असूनही हलगर्जीपणा केलास – हे तू चूक केलंयस — हे शांतपणे पण ठामपणे सांगायला हवं.

 

fear-student-looking-at-exam-paper
isha.sadhguru.org

“कमी मार्क्स मिळाल्याने काही फरक पडत नाही” – ही सर्वात घातक अंधश्रद्धांपैकी एक आहे. “पैसा सर्वस्व नाही” ही त्याच पठडीतील दुसरी अंधश्रद्धा.

मार्क्स हे लक्षण आहे. अभ्यास कमी केल्याचं.

मार्क्स कमी मिळाले म्हणजे तुम्ही गणित, मराठी, इंग्रजी “व्यवस्थित” शिकला नाही आहात. विज्ञानाचे मूलभूत नियम नीट पाठ करून घेतले नाहीत. इतिहास भूगोल समजला नाहीये तुम्हाला.

घोकंपट्टी करून मिळालेलं ज्ञान काय कामाचं – हे विचारणं टाळ्या मिळवायला आणि मान डोलवायला छान आहे.

पण हीच घोकंपट्टी कितीतरी स्किल्स डेव्हलप करत असते हे कुणी सांगत नाही.

ट्रिग्नोमेट्रीचा फायदा काय हा प्रश्न ठीक आहे. पण तो चार्ट पाठ करून त्यावरील गणितं सोडवताना स्मरणशक्ती आणि लॉजिकल रिझनिंगचं नातं मजबूत होत असतं. फार मोठी जमेची बाजू आहे ही. भूगोल धड असेल तर चारचौघात गप्पा मारताना ग्लोबल रेफरन्सेस पटापट उलगडत जातात. मराठी व्याकरण नीट असणं ओव्हरऑल संभाषण कौशल्यासाठी किती महत्वाचं आहे हे सांगायला हवं का? इंग्लिश स्किल्स व्यवस्थित आहेत म्हणून करिअर बूस्ट झालेले कमी लोक बघितलेत का आपण?

एमबीए एन्ट्रान्सची तयारी करताना हे सगळं खूप खूप जाणवलं मला. १२ वी धड न केल्याचे परिणाम इंजिनिअरिंगमध्ये भोगले. पण १० वी पर्यंत स्टार परफॉर्मर असल्याचा फायदा थेट मुंबईतील टॉप १० एमबीए कॉलेजेसपैकी एकाचं प्रवेशद्वार उघडण्यात झाला. स्पोकन इंग्लिश चांगलं असल्यामुळे एमबीए गाजवू शकलो. पुढे नोकऱ्या करताना हेच कमावलेले कित्येक स्किल्स सतत कमी येत गेले.

अर्थात, हे सगळं ज्यांना जमलं नाही, ते आज अपयशी आहेत का? अर्थातच नाही. पण आज मिळालेलं यश कमावण्यासाठी त्यांना मोजावी लागलेली किंमत दुर्लक्षित करता येणारे का?!

सतत नकारांना सामोरं जावं लागणं, सहज उपलब्ध होऊ शकणारे पर्याय बंद होणं – हे सगळं “काहीच नुकसान नाही” प्रकारात टाकून द्यायचं का?

इंजिनीअरिंगमधे, १२ वीच्या मार्क्समुळे campus ची कवाडं बंद होती, असे खूप मित्र कुरकुर करायचे. मी त्यांना हेच सांगायचो की त्या मार्कांचा आपल्या इंजिनीअरिंगच्या स्किलशी संबंध नसला तरी “त्या महत्वाच्या वर्षात तुमच्यात सिरियसनेस नव्हता” हे त्यावरून दिसतं. मोठ्या कम्पनीज ते बघतात.

परिक्षांमधील मार्क्स एक खूप मोठं पब्लिक स्टेटमेंट असतं.

तुम्ही स्वतःला, स्वतःच्या करिअरला किती सिरियसली घेता – याचं जगाला दिलेलं डिक्लेरेशन असतं. इंजिनिअरिंगमध्ये कॅपम्स रिकृटमेन्टला येणाऱ्या कम्पनी १०वी – १२वी चे मार्क्स बघण्यामागे हेच कारण असतं.

 

frustrated-man-marathipizza01
indianhusbands.blogspot.in

 

परीक्षा होऊन गेल्यावर, निकाल हातात पडल्यावर नाऊमेद होऊ नये, “आता सगळं संपलं” असं वाटू नये म्हणून असे संदेश दिले जातात. जे योग्यच नव्हे, आवश्यक सुद्धा आहेत. पण हे बघून ज्यांनी परीक्षा यायची आहे, त्यांनी रिलॅक्स होऊन चालणार नाहीये. मार्क्स कमी मिळाले तर जग संपत नसतं – फक्त जगात जगणं अतिशय अवघड होऊन बसतं. हा त्रास वाचवायचा असेल तर कंबरकसून तयारीला लागायला हवं.

अपयशाची कौतुकं तेव्हाच होतात जेव्हा शेवट दणदणीत यशात होतो. पण यशासाठी सुरूवातीपासूनच मेहनत घेऊ नये, असं थोडीच आहे?

परीक्षेतील अपयश म्हणजे “सगळं संपलं” असं अजिबात नाही. पण –

“राजा, तुला माहिती होतं १०वी/१२वी चं महत्व…तरी तू इतके कमी मार्क्स मिळवलेस…हे तुझं चुकलं आहे…तू कमी पडला आहेस” – हे पण सांगायचं नाही का?

तुझ्यासाठी आईवडील, बहीणभाऊ खूप ऍडजस्ट करत होते, त्याग करत होते – त्याची किंमत तू ठेवली नाहीस – ही जाणीव करून द्यायची नाही का?

लक्षात घ्या – जर मुलांना आताच ही जाणीव करून दिली नाही तर ते आज भानावर येऊन उद्या सिरियसली पुढचा विचार करणार नाहीयेत.

“१० वी १२ वी म्हणजे सर्वस्व नव्हे” – हे कुणासाठी? जो त्या नंतर खूप मेहनत घेतो, त्याच्यासाठी! पण नंतर मेहनत घेण्यासाठी आज त्याला परिस्थितीचं भान यायला नको का? माणूस भविष्यात मेहनत घेऊन दणदणीत यश कधी मिळवेल? – तो आळसामुळे, कमी पडल्यामुळे आज अयशस्वी झालाय – याची त्याला जाणीव झाली तरच ना?! पण आपल्या “१२ वी म्हणजे सर्वस्व नव्हे! बिनधास्त रहा! मजा कर!” संदेशांमुळे त्याला हे गंभीर्यच येणार नाही – हे कळायला नको का आपल्याला!

आपल्या आजूबाजूला १२वीत अपयशी होऊनही पुढे यशस्वी झालेले जितके लोक आहेत – त्याहून अधिक लोक क्षमता असूनही बिलो अॅव्हरेज जीवन जगणारे आहेत.

कशामुळे? कारण हे गांभीर्य त्यांना कधीच आलं नाही. हेच हवंय का आपल्याला?!

 

successfull man02-marathipizza
iStock.com

शेवटी, सर्वात महत्वाचा मुद्दा.

आज १०वी/१२ वी होऊन गेलेल्या मुलांना धीर देण्यासाठी तुम्ही हे म्हणताय खरं. पण तुमचं हे म्हणणं ऐकणारे-वाचणारे ८वी, ९वीतले पोरं काय शिकताहेत यातून? त्यांना काय सिग्नल्स देतोय आपण?!

“काही फरक पडत नाही मार्क्स कमी मिळाल्याने” असं म्हटल्याने आपण मोठया मेहनतीने, विचार करून उभारलेली अख्खी सिस्टीम आपण एका फटक्यात रद्द करून बसतो – हे कळू नये का आपल्याला?!

कोवळ्या जीवांनी परीक्षेतील अपयशामुळे आयुष्य संपवू नये हे योग्यच. पण पुढील आयुष्य घडवण्यासाठी परीक्षा महत्वाच्या असतात – याचं भान ही आवश्यक आहे, हे नाकारून कसं चालेल?!

आजची परीक्षापद्धत फारशी योग्य नाही, शिक्षणपद्धतीत सुधारणा आवश्यक आहे – हे सगळं खरंच आहे. पण सध्या आहे ते वास्तव स्वीकारावं लागणार – हेही सत्यचआहे. सध्याची शिक्षणपद्धत आहे ती आहे तशी accept करण्याशिवाय विद्यार्थ्यांकडे पर्याय नाही. पुढे चांगले दरवाजे उघडायला मार्क्स लागणार हे अप्रिय पण सत्य आहे. ते नाकारून पायावर धोंडा पाडून घ्यायला नको. सोबत शिक्षणपद्धत सुधारण्याचे प्रयत्न सुरु ठेवूच – पण ते सुधार होत नाहीत तो पर्यंत आहे त्या सिस्टीममध्ये अधिकाधिक उंच जाण्याचा प्रयत्न करणंच इष्ट आहे.

स्पर्धा जीवघेणी नको. मान्य. पण स्पर्धाच नको म्हणून कसं चालेल?! स्पर्धा असणारच! तुम्ही त्यात उतरायचंच नाही असं ठरवलं तरी स्पर्धा तुम्हाला जज करणारच.

मानवी अस्तित्वच उत्क्रांतीची स्पर्धा जिंकत जिंकत उभं राहिलं आहे.

स्पर्धा नाकारून जाणार कुठे आपण?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?