छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा : जाणून घ्या “खरा” इतिहास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : (इतिहासाच्या पाऊलखुणा) आणि संचालक मंडळ (इतिहासाच्या पाऊलखुणा facebook group).
===
महाराष्ट्रात जातीय अस्मिता फार टोकदार होऊ लागल्या आहेत. अशातच व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मिडीया साईट्स आणि अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून पद्धतशीरपणे तरुणांची माथी भडकवण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अशातच, ज्यांना सत्य काय माहित नसते अशांना या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात आणि समाजात आणखी तेढ निर्माण होते.
–
हे ही वाचा – शिवरायांना मिळालेला खजिन्याचा संकेत आणि संभाजी राजांचं कवित्व यांचा साक्षीदार!
–
गुढीपाडवा जवळ आला की उठणारी आवई म्हणजे “छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा मनुस्मृतीनुसार झाला, आणि राजांच्या हत्येच्या आनंदात ब्राह्मणांनी गुढ्या उभारण्यास सुरुवात केली. त्यामूळे गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण साजरा करू नये” ही !
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
पण – गुढीपाडव्याचे उल्लेख शंभूराजांच्या मृत्यूपूर्वीच्या अनेक ऐतिहासिक कागदपत्रात असल्याने असल्या गैरप्रचाराला बळी पडण्यास काही कारण आहे असं वाटत नाही.
गुढीपाडव्याचे १६८९ पूर्वीचे उल्लेख आपण पाहूया –
१) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत ! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा” असा स्पष्ट उल्लेख आहे.
म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.
२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा –
“शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात.”
म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.
३) श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात-
“ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।”
अर्थात “राम आल्यावर गुढ्या” इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.
–
हे ही वाचा – “वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक पराक्रमी”: गनिमांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज!
–
४) शिवकालीन पत्रसारसंग्रह या पुस्तकात पृ ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहीलेले चैत्र शुद्ध ८ शके १५९६ म्हणजेच दि. ४ एप्रिल १६७४ रोजीचे पत्र दिले आहे. या पत्रात नारायण शेणवी
“निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला”
असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी “पाडव्याचा सण” महत्वाचा होता असे दिसते.
एकूणच काय, हे सगळे स्पष्ट असताना आम्ही अजूनही अशा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवायचा का? किमान सुज्ञ लोकांस तरी हे सांगणे न लगे!
बहुत काय लिहीणे? अगत्य असु द्यावे.
===
फिचर्ड इमेज: प्रितेश शिंदे
हे ही वाचा – छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्यांना ‘हे’ सत्य दिसत नाही की मान्य नाही?
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.