‘देवमाणूस २’ बाबत उत्सुकता आहे? मग त्यापुर्वी कथेतील ‘खऱ्या’ खलनायकाबाबत जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
देवमाणूस ही झी मराठी वर प्रदर्शित होणारी मालिका लोकांनी खूप डोक्यावर घेतली. त्यातील सरू आजी, डिम्पल, टोण्या, बाबू, डॉक्टर अजितकुमार देव ह्या पात्रांना लोकांचे खूप प्रेम मिळाले. क्रूर, विक्षिप्त आणि बदमाश डॉक्टरची ही सत्यकथा लोकांना बघायला मजा आली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
प्रेक्षकांची ही भरभरून मिळणारी दाद लक्षात घेऊन आता झी मराठीने देवमाणूस मालिकेचा दुसरा सिझन अर्थात पुढचा भाग प्रेक्षकांसाठी आणलाय. यात तोतया डॉक्टर अजितकुमार देवचे काय होते हे आपल्याला बघायला मिळेल. ज्या सत्यघटनेवर ही मालिका आधारित आहे तो खलनायक प्रत्यक्षात कोण होता याबद्दल देखील लोकांच्या मनात उत्सुकता आहे.
ही भयंकर घटना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे. सातारा जिल्ह्यात काम करणारी एक अंगणवाडी सेविका अचानक बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांच्या संशयावरून पोलिसांनी तपास केला असता, तिचा मृतदेह गावातील प्रसिद्ध डॉक्टर संतोष पोळच्या अंगणात पुरलेला पोलिसांना आढळून आला.
धक्कादायक बाब अशी की क्रूरतेची सीमा गाठणाऱ्या ह्या विक्षिप्त माणसाचा हा पहिला गुन्हा नव्हता. पोलिसांच्या मते त्याने एकूण २२ खून केले. असे असले तरीही त्याच्यावर केवळ ६ लोकांच्या खुनाचा गुन्हा आजवर सिद्ध झाला आहे. या सिरीयल किलरने पाच महिला व एका पुरुषाची हत्या केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे.
कोण आहे पडद्यामागील खरा सुत्रधार?
आपण सर्वसामान्य लोक डॉक्टरांना देवदूत मानतो. ते आपल्याला जीवावरच्या संकटांतून बरे करतात म्हणून डॉक्टरांना समाजात खूप मानाचे स्थान आहे. पण अशा प्रकारच्या घटना समोर आल्या की आपला भीतीने थरकाप उडतो आणि आपला विश्वास डळमळीत होतो.
डॉ. संतोष पोळचे कारनामे हे याचेच एक जिवंत उदाहरण आहे. होमिओपॅथीची पदवी घेतलेला हा विक्षिप्त विचित्र तोतया डॉक्टर साताऱ्यात राहून त्याच्याकडे उपचारांसाठी आलेल्या महिला रुग्णांना टार्गेट करून त्यांचा पद्धतशीरपणे जीव घेत असे.
पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांना असे आढळून आले की, संतोष स्वत: एमबीबीएस डॉक्टर असल्याचे सांगत असे पण त्याच्याकडे इलेक्ट्रोहोमिओपॅथीची पदवी होती. याशिवाय त्याने अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये काम केले होते आणि शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्या सर्व औषधांची त्याला चांगलीच माहिती होती.
संतोष त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णांपैकी निराधार किंवा सामाजिकदृष्ट्या एकट्या अशा महिला रुग्णांना टार्गेट करत असे.
तो उपचाराच्या सुरुवातीला गोड गोड बोलून, चांगुलपणाचा आव आणून स्त्रियांचा विश्वास संपादन करत असे आणि नंतर उपचारादरम्यान एक दिवस तो त्यांना एक इंजेक्शन देत असे. या इंजेक्शनमध्ये succinylcholine नावाचे एक औषध होते. हे एक प्रकारचे न्यूरोमस्क्युलर पॅरालिटिक औषध आहे ज्यामुळे आपल्या शरीरातील स्नायू निष्क्रिय होतात.
ह्या औषधाचा परिणाम इतका जलद होतो की आपल्या शरीरातील सर्व स्नायू काम करणे थांबवतात आणि रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होऊ शकतो. सामान्यपणे डॉक्टर शस्त्रक्रियेच्यावेळी भूल म्हणून ह्या औषधाचा वापर करतात, परंतु त्याच वेळी रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते जेणेकरून त्याचा श्वासोच्छ्वास चालू राहील आणि शस्त्रक्रियेदरम्यान काही गुंतागुंत होणार नाही.
हा बदमाश डॉक्टर आणि त्याची सहाय्यक, गर्लफ्रेंड नर्स या दोघांनाही या औषधाच्या परिणामांबद्दल चांगलीच कल्पना होती आणि त्यांनी हे तंत्र वापरून महिला रुग्णांचे खून केले. म्हणजे हे इंजेक्शन देऊन तो रुग्णांना पॅरलाईज करायचा व ते जिवंत असतानाच त्यांना खड्ड्यात पुरायचा. पण या विक्षिप्त डॉक्टरने महिला रुग्णांना जीवानिशी नेमके का मारले, हे मात्र तपासात स्पष्ट होऊ शकले नाही.
असा लागला शोध
अंगणवाडी सेविका अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. कुटुंबियांना संतोष पोळवर संशय होता. त्यावरून जून २०१६ मध्ये पोलिसांनी मध्ये पहिल्यांदा तपास सुरू केला. तपासासाठी पोलीस ह्या बनावट डॉक्टरच्या फार्म हाऊसवर पोहोचले पण त्यांना तिथे काहीही सापडले नाही.
पोलीस रिकाम्या हाती परतणार होते तितक्यात तपासासाठी आणलेल्या श्वानांनी पोलिसांन इशारा दिला. ते अंगणातल्या नारळाच्या झाडाखाली जाऊन भुंकत होते. पोलिसांना काहीतरी घातपात झाल्याचा संशय आला आणि त्यांनी जेसीबी मशिनच्या सहाय्याने नारळाचे झाड काढले असता, बेपत्ता अंगणवाडी सेविका मंगला जेधे हिचा मृतदेह तेथे आढळून आला.
यानंतर संतोष पोळने तपासादरम्यान धक्कादायक खुलासा केला की मंगला जेधे पूर्वी त्याने अनेक रुग्णांना मारले व त्या सर्व महिला होत्या. संतोष पोळ त्या महिला रुग्णांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने फसवायचा आणि नंतर त्यांना भूल देण्याचे इंजेक्शन देऊन जीवे मारायचा. त्यानंतर मृतदेह कुजल्यावर दुर्गंधी सगळीकडे पसरू नये व कुणालाही संशय येऊ नये म्हणून संतोषने त्याच्या घरात कोंबड्या पाळल्या होत्या. कोंबड्यांच्या उग्र वासात कुजलेल्या प्रेतांचा वास दाबला गेला.
प्रत्येक महिलेच्या हत्येनंतर तो त्याच्या फार्म हाऊसमध्ये खड्डा उघडण्यासाठी जेसीबी बोलावून तेथे नारळाचे झाड लावायचे असल्याचे सांगून खड्डा खणून घ्यायचा. आणि रात्री कुणीही नसताना त्या खड्ड्यात प्रेत पुरायचा व त्यावर नारळाचे झाड लावायचा.
कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने आणखी एक मार्ग वापरला. संतोष स्वत:ला डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेत असे आणि अनेक घोटाळे त्याने अनेकदा उघड केले होते. ह्या स्थितीत संपूर्ण गावातील लोक त्याचा खूप आदर करत असत आणि त्यामुळे त्याच्यावर संशय असूनही पोलिस तपास करण्यास घाबरत होते. विशेष म्हणजे प्रत्येक हत्येनंतर लगेचच संतोष भ्रष्टाचाराविरोधात कुठली तरी मोहीम राबवायचा.
या सगळ्या हत्या करण्यात, त्यांचे पुरावे नष्ट करण्यात संतोषला त्याची मैत्रीण व नर्स असलेल्या ज्योती मांद्रेने मदत केली होती. तिच्याच मदतीने नंतर संतोषचे कृष्णकृत्य जगापुढे उघड झाले. वाई पोलिसांनी संतोष पोळ ह्यास ११ ऑगस्ट २०१६ रोजी अटक केली आणि तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. संतोषने सहा हत्यांची कबुली दिली आहे. पण त्याने अजूनही अनेक गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे.
संतोष ऑर्गन रॅकेट चालवत असल्याचा देखील पोलिसांना संशय होता पण त्याच्या घाणेरड्या फार्म हाऊसमध्ये कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. संतोषच्या फार्म हाऊसध्ये त्याने ज्यांची हत्या केली त्या सर्वांच्या मृतदेहाचे अवशेष, ईसीजी मशीन, आरटीईची अनेक कागदपत्रे पोलिसांना सापडली. या कागदपत्रांचा वापर करून तो भ्रष्टाचाराची प्रकरणे जाणून घेत असे व स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेत असे.
तर अश्या ह्या संतोष पोळ प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. कोर्टात त्याला योग्य ती शिक्षा होईल ह्याची आशा करूया. तोवर देवमाणूस सिझन दुसरा यात काय दाखवतात हे बघूया.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.