' जगात सर्वत्र सेमीकंडक्टरचा तुटवडा; टाटा ग्रुप पुन्हा एकदा धावून आला मदतीला… – InMarathi

जगात सर्वत्र सेमीकंडक्टरचा तुटवडा; टाटा ग्रुप पुन्हा एकदा धावून आला मदतीला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकीकडे भारतीय वंशाची मंडळी मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओ पदावर विराजमान होत आहेत. सोशल मीडियावर तर वेगळाच सूर पाहायला मिळतोय. भारतीय वंशाच्या यशवंतांचं कौतुक करणारी हीच मंडळी अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या व्यवसायिकांना मात्र नावं ठेवतात, मग भारतात व्यवसाय वृद्धी होईल कशी असाही प्रश्न एकीकडे या सोशल मीडियावर विचारला जातो.

 

indian CEO inmarathi

 

सोशल मीडियावरील उलटसुलट चर्चांमध्ये सुद्धा आपण भारतीय नागरिक टाटा, बिर्ला, अंबानी यांची नावं मोठ्या अभिमानाने घेत असतो. त्यांचं कर्तृत्व, त्यांनी मिळवलेलं यश, दुर्लक्षित करून चालत नाही.

 

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला. तो यशस्वी करण्यासाठी सगळेजण झटत असलेले पाहायला मिळतात. भारताने आत्मनिर्भर बनावं अशी हाक विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली असली, तरी टाटा समुहासारखे अनेक व्यवसायिक अनेक वर्षं भारताच्या यशासाठी झटत असलेले दिसून येतात.

 

make in india inmarathi
rediff.com

 

निसंशयपणे यात टाटा समुहाचा मोठा वाटा आहे. आजही भारतासमोर एक कठीण प्रसंग उभा राहिलेला असताना टाटा ग्रुप पुन्हा एकदा मदतीला धावून आलाय.

कुठल्याही इंडस्ट्रीसाठी कच्चा माल ही एक अत्यंत महत्त्वाची गरज असते. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीचा विचार केला, तर सेमीकंडक्टर हा असाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग ठरतो. कोरोनाकाळात बदललेली परिस्थिती आणि एकंदरच जगभरातील उद्योग क्षेत्रात झालेले बदल, यामुळे सध्या सेमीकंडक्टरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी, टाटा समूहाने सुद्धा कंबर कसली आहे.

सेमीकंडक्टरचा तुटवडा नक्की कशामुळे?

इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा घटक असणाऱ्या सेमीकंडक्टरचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात निर्माण झाला आहे. याचा मोठा फटका या उद्योगक्षेत्राला बसत आहे. हा तुटवडा नेमका का निर्माण झाला, हे आधी समजून घेणं आवश्यक आहे.

सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण, कोविड-१९ मुळे अस्तित्वात आलेली महामारी हेच आहे, हे वेगळं सांगणायची गरज नाही. या महामारीचा सेमीकंडक्टर निर्मितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे पुरवठा कमी झाला.

 

semi inmarathi

 

उद्योगधंदे हळूहळू मार्गी लागू लागल्यावर सेमीकंडक्टरची मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढत गेली. वाढती मागणी आणि तोकडा पुरवठा यामुळे सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण होणं साहजिक होतं. त्यातच अनेक देशांमधील नैसर्गिक आपत्ती सुद्धा या तुटवड्याला कारणीभूत ठरल्या आहेत. तैवानमध्ये आलेला कोरडा दुष्काळ, वादळं, थंड वातावरण यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला.

अमेरिकेतील पूरस्थिती सुद्धा या तुटवड्यासाठी कारणीभूत ठरली. सेमीकंडक्टर चिप्स बनवणाऱ्या जपानमधील रेनेसास या प्लॅन्टला लागलेली भयानक आग सुद्धा सेमीकंडक्टरची सप्लाय चेन विस्कळीत होण्यासाठी महत्त्वाचं कारण बनली असं अनेक जाणकारांचं मत आहे.

या आणि अशा एकंदर सगळ्या घटनांचा एकत्रित परिणाम म्हणून सेमीकंडक्टरचा पुरवठा कमी होत गेला. इलेक्ट्रॉनिक उद्योग मात्र सुरळीत होऊ लागले होते, त्यामुळे मागणी वाढतच होती. या परिस्थितीत सेमिकंडक्टरचा तुटवडा निर्माण होणं साहजिक होतं.

टाटा समूह नेमकं काय करणार?

सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झालेला असताना, टाटा समूहाने या व्यवसायात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ३०० मिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

tata motors company InMarathi

 

दक्षिणेकडील काही राज्यांना सेमीकंडक्टर चिप्स बनवण्याच्या या उद्योगाच्या दृष्टीने शॉर्टलिस्ट केलं गेलं असल्याचं म्हटलं जातंय. कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांचा या यादीत समावेश असून, या महिन्याअखेरीस प्रकल्पाची जागा निश्चित करण्याचा टाटा समूहाचा इरादा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पुढच्या वर्षअखेरीस सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन, सेमीकंडक्टर चिप्सची निर्मिती सुरु झालेली असेल, अशी आशा करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये सेमीकंडक्टर चिपची निर्मिती आणि टेस्टिंग केली जाणार आहे.

 

south-indian-languages-marathipizza
southreport.com

 

टाटा समूह आणि भारतातील सॉफ्टवेअर सर्व्हिसेस यांचं नातं फारच दृढ आहे. सॉफ्टवेअरच्या बरोबरीनेच हार्डवेअर क्षेत्रात सुद्धा पाऊल टाकत, आपलं स्थान प्रस्थापित करणं हादेखील टाटा समूहाचा उद्देश असल्याचं म्हटलं जातंय. टाटा समूह हे स्वप्न साकार करण्यासाठी सेमीकंडक्टर उद्योगाच्या मैदानात उतरत असेल, तरी ती गोष्ट भारतासाठी फायदेशीर आणि अभिमानाची ठरण्याची शक्यता नक्कीच आहे.

टाटा समूहासमोरील आव्हानं…

सेमीकंडक्टर हा एका मोठ्या उद्योगाचा कच्चा माल आहे, मात्र या सेमीकंडक्टरची सुद्धा असेम्ब्ली करावी लागते. त्यासाठी सिलिकॉन या धातूच्या वेफर्ससारख्या पातळ चकत्यांची गरज असते. यासाठी मात्र टाटा समूहाला इतर उद्योगसमूहांवर आणि इतर देशांतील कंपन्यांवर अवलंबून राहावं लागण्याची शक्यता आहे.

 

semi inmarathi 2

हे अवलंबित्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलं, तर मात्र टाटा समूहासाठी ते फार मोठं आव्हान असेल. सध्याच्या कोविड परिस्थितीचा परिणाम सेमीकंडक्टर उद्योगावर मोठ्या प्रमाणावर झालेला आढळतोय. ही परिस्थिती २०२२ च्या मध्यापर्यंत तशीच राहण्याची शक्यता आहे. त्यातच कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट तयार होतात असल्याने, ही कठीण स्थिती २०२३ पर्यंत सुद्धा काही प्रमाणात तशीच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

covid warriors inmarathi 2

 

चीन, तैवान, कोरिया अशा आशियाई देशांचा या उद्योगावर मोठा पगडा आहे. सध्याची कोरोना स्थिती, सातत्याने बदलणारी नियमावली, निर्बंध, विविध देशातील सीमाबांदी अथवा त्यासंदर्भातील नियम या सगळ्याच गोष्टींचा प्रभाव पडताना दिसतोय.

जागतिक स्थिती नियमित होत नाही, तोपर्यंत या सगळ्याच आव्हानांचा सामना सेमीकंडक्टर उद्योगाला करावा लागणार आहे. टाटा समूहाचा या क्षेत्रातील अनुभव कमी असल्याने, त्यांच्यासाठी या परिस्थितीचा सामना करणं अधिक आव्हानात्मक ठरू शकतं.
हे सत्य असलं तरीही टाटा समूहाने उचललेलं हे पाऊल भारतासाठी महत्त्वपूर्ण आणि अभिमानस्पद आहे, हे निश्चित!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?