Site icon InMarathi

हिंदुजा कुटुंबातील आपापसातील भांडणांमुळे त्यांचीच करोडोंची संपत्ती धोक्यात…!

hinduja featured 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात बिजनेस फॅमिलीजची काही कमी नाहीये. टाटा, बिर्ला, अंबानी हे असे परिवार आहेत ज्यांच्या पिढीने एक व्यवसाय उभारण्यात आपलं योगदान दिलं आहे. प्रत्येक नवीन उद्योजकाला या यशस्वी व्यवसायिक परिवाराने नेहमीच प्रेरणा दिली आहे.

‘हिंदुजा’ परिवारसुद्धा याच श्रेणीमधला येतो. फरक इतकाच की, प्रेमानंद हिंदुजा यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात इंग्लंडला जाऊन केली आणि पूर्ण परिवाराने त्यांचा व्यवसाय वाढवण्यात सहकार्य केलं.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हिंदुजा उद्योग समूहाची धुरा आज ८६ वर्षीय श्रीचंद परमानंद हिंदुजा यांच्याकडे आहे. आज ते इंग्लंडचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा हे श्रीचंद हिंदुजा यांचे तिन्ही भाऊसुद्धा या उद्योग समूहाचे महत्वाचे भाग आहेत. पण, एकेकाळी चौघांनी एकत्र सुरू केलेल्या ‘अशोक लेलँड’, ‘इंडसइंड बँक’, ‘हिंदुजा ग्लोबल’ आणि अजून कित्येक कंपन्यांच्या या मालकांमध्ये सध्या सारं काही अलबेल नाहीये असं चित्र समोर आलं आहे.

एखाद्या टीव्ही मालिकेत दाखवतात तसं सध्या या परिवारात कौटुंबिक कलह सुरु आहेत अशी बातमी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये गाजत आहे. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात.

करम हिंदुजा हा सध्या हुंदुजा परिवाराच्या चौथ्या पिढीचा प्रतिनिधी आहे. करम हा लहान असताना आपले आजोबा ‘श्रीचंद हिंदुजा’ यांच्यासोबत प्रत्येक आठवड्यात एक बॉलीवूड सिनेमा आवडीने बघायचा.

 

 

आज त्या सिनेमाप्रमाणे एक कथानक करम हिंदुजा आणि परिवारात घडत आहे हे या १०७ वर्ष जुन्या ‘बिजनेस फॅमिली’चं दुर्दैव म्हणावं लागेल.

१८००० करोड टर्नओवर असलेल्या हिंदुजा परिवाराने नेहमीच “कोणी एक मालक नाही आणि नफ्याचे भागीदार सर्व” या तत्वाला धरून काम केलं आहे. पण, आज हाच परिवार लंडन आणि स्वित्झर्लंडच्या कोर्टात संपत्तीसाठी भांडत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

३८ देशांमध्ये हिंदुजा उद्योग समूहात काम करणारे १५००० लोकसुद्धा या कौटुंबिक संघर्षात भरडले जात आहेत अशी माहिती इंडियन स्कुल ऑफ बिजनेस येथील व्यवसाय विश्लेषक कविल रामचंद्रन यांनी दिली आहे.

१९१४ मध्ये स्थापन झालेल्या हिंदुजा उद्योग समूहाचा मूळ व्यवसाय हा भारतीय वस्तूंची इंग्लंडमध्ये विक्री (‘ट्रेडिंग’) आणि त्याबरोबरच बॉलीवूड सिनेमाचे जगभरात वितरण असा होता.

दोन्ही व्यवसायात हिंदुजा भावंडांनी नेहमीच यश कमावलं. श्रीमंती इतकी वाढली की, आज ते लंडनची राणी एलिझाबेथचे शेजारी आहेत.

 

जगप्रसिद्ध ‘बकिंगहॅम’ पॅलेसच्या रस्त्यावर हिंदुजाचे जोडून ४ घरं आहेत. श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा या तिथल्या श्रीमंत व्यक्तींना इंग्लंडचं राष्ट्रीयत्व सुद्धा देण्यात आलं आहे.

वादाची ठिणगी कधी पडली?

२०१४ मध्ये चार भावांनी एकत्र येऊन “जी संपत्ती आहे ती सर्वांची आहे” या आशयाच्या पत्रावर सह्या केल्या होत्या. पण, श्रीचंद हिंदुजा आणि त्यांची मुलगी वेणू हिंदुजा यांनी असा दावा केला की, जिनिव्हा येथील ‘हिंदुजा बँक’ ही या दोघांच्या मालकीची आहे.

श्रीचंद हिंदुजा यांनी लंडन कोर्टात हा सुद्धा दावा केला आहे की, “चार भावांनी एकत्र येऊन सही केलेल्या ‘त्या’ पत्राचं कायद्याच्या बाबतीत कोणतंही महत्व नाहीये. माझी संपत्ती ही केवळ माझी मुलगी वेणू आणि शानु यांनाच मिळावी.” श्रीचंद हिंदुजा विरुद्ध गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा ही केस सध्या स्वित्झर्लंड कोर्टात सुरू आहे.

शानु आणि वेणू हिंदुजा या दोन्ही मुलींना आपल्या वडिलांनी ठरवलेली ‘सर्वजण मालक’ हे तत्व मान्य नाहीये आणि त्यामुळे पूर्ण हिंदुजा परिवार हा सध्या दोन भागात विभागला गेला आहे.

२०१८ मध्येसुद्धा हा वाद झाला होता जेव्हा ‘अशोक लेलँड लिमिटेड’ या कंपनीचे १०० करोड रुपये हे हिंदुजा उद्योग समूहातील इतर कंपन्यांनी वापरले होते. पण, हा वाद कमी वेळात निवळला होता.

 

 

हिंदुजा समूहाचा व्यापार जगभरात पसरल्याने त्यांचं ‘भौगोलिक वास्तव्य’ हा सुद्धा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण, चार भावांपैकी श्रीचंद आणि गोपीचंद हे लंडनमध्ये राहतात, प्रकाश हे मोनॅको इथे राहतात तर अशोक हिंदुजा हे मुंबईत वास्तव्यास आहेत.

करम हिंदुजा यांना नुकतंच स्वित्झर्लंड मधील हिंदुजा बँकेच्या सीईओ पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. या बँकेचं नाव ‘एसपी हिंदुजा प्रायव्हेट लिमिटेड’ करायचं ठरवलं आहे.

करम हा शानु श्रीचंद आहुजा यांचा मुलगा आहे ज्या की या बँकेच्या ‘चेअरवूमन’ आहे. या नामांतराला त्यांचा पूर्ण पाठींबा आहे.

कायदा काय सांगतो?

हिंदुजा उद्योग समूहाच्या जनरल कौंसेलर अभिजित मुखोपाध्याय यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे की, “हिंदुजा समूहाला इतके भागीदार आहेत की त्यांची कायदेशीर विभागणी ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण, सर्वांना समान वाटणी करून आनंदी ठेवणं ही कोर्टासाठी सुद्धा कठीण आहे.”

१९८० मधील ‘बोफोर्स’ कंपनीला लाच देण्याचा वाद असेल किंवा २००० साली प्रकाश हिंदुजा यांच्यावर झालेला कर चुकवण्याचा खटला असेल या दोन्ही प्रकरणातून हिंदुजा उद्योग समूह संपत्तीच्या जोरावर लवकर बाहेर पडला होता.

 

 

एवढं होऊनही घरातील वादांवर तोडगा काढणं हे हिंदुजा परिवारातील सदस्यांना कित्येक वर्षात शक्य होत नाहीये. कारण, त्यांचं बलस्थान असलेली त्यांच्यातील एकी आता नाहीशी झाली आहे.

अशोक लेलँड ही बस तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी उभी करणारा हा समूह आज कुटुंबातील सर्वांना एकत्र बसवून त्यांच्यातील वाद सोडवू शकत नाहीये ही सध्या सर्वात मोठी समस्या आहे.

उद्योग समूहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत या वादाची झळ पोहोचण्यापूर्वीच त्यावर तोडगा निघावा अशी आशा करूयात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version