' अंडरवर्ल्ड स्पेशॅलिस्ट ते मालेगाव केस: परमबीर सिंहबद्दल ठाऊक नसलेल्या गोष्टी – InMarathi

अंडरवर्ल्ड स्पेशॅलिस्ट ते मालेगाव केस: परमबीर सिंहबद्दल ठाऊक नसलेल्या गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जून २०२१ मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष झालं. सर्वांच्या मनाला चटका लावणाऱ्या या घटनेची तपासणी करणारे मुंबईचे माजी पोलीस कमिशनर ‘परमबीर सिंह’ हे नाव आता पूर्ण भारताच्या परिचयाचं झालं आहे. सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या व्यक्तिमत्वाचं २०२० पूर्वी करिअर कसं होतं ? परमबीर सिंह यांच्यात राजकारणी लोकांसोबत नडायची हिंमत कुठून आली ? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आधी त्यांनी अजून कोणाची विकेट काढली आहे ? या थरारक प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.

परमबीर सिंह यांचा जन्म १९६२ मध्ये चंदिगढ येथे झाला होता. त्यांचे वडील होशीयार सिंह हे देखील ‘सिव्हिल सर्व्हिस’ मध्ये काम करत होते. १९८३ मध्ये परमबीर सिंह यांनी पंजाब विद्यापीठातून एम ए – समाजशास्त्राचं शिक्षण पूर्ण केलं.

१९८८ मध्ये पोलीस दलात सामिल झाल्यानंतर परमबीर सिंह हे महाराष्ट्र आयपीएस क्रिकेट संघाचे कर्णधार होते. आपल्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी कित्येक पद भूषवली आहेत ज्यामध्ये अँटी करप्शन ब्युरो आणि नक्षलवादी लोकांविरुद्ध केलेली कारवाई यांचा समावेश होतो.

 

param bir iinmarathi

 

२०२२ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या परमबीर सिंह यांना प्रेरणास्थान मानणारे कित्येक लोक सध्या पोलीस संस्थेत कार्यरत आहेत. राजकीय दबाव स्वतःवर घेणे आणि आपल्या सहकाऱ्यांना कामात नेहमीच प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे हे त्यांचे सर्वात चांगले गुण मानले जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एन्काऊन्टर स्पेशॅलिस्ट

९० च्या दशकात काम करत असतांना परमबीर सिंह हे ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जायचे. परमबीर सिंह यांच्या कामाच्या पद्धतीची तुलना ‘अब तक छप्पन’ मधील नाना पाटेकर यांच्या पात्रासोबत केली जाऊ शकते. एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व्यक्तीला त्या सिनेमात ज्याप्रमाणे एक भ्रष्ट संस्था भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकवते आणि त्याचं करिअर संपवते तसेच चित्र सध्या दिसत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे परमबीर सिंह एका वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चेत आले. थेट गृहमंत्र्यावर खंडणी वसूलीचा आरोप करणाऱ्या परमवीर यांच्यामागे आरोपांचे दुष्टचक्र लागलं. त्यानंतर सिंह फरार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आणि त्यांच्याकडेच संशयाची सुई वळली.

 

parambir singh inmarathi

 

मात्र काल सुप्रिम कोर्टाने सिंह यांना दिलासा दिला. त्यांच्या अटकेस स्थगिती दिल्यानंतर परमबीर हे ४८ तासात हजर होत असल्याचे कबुल केल्याने या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे.

मात्र यापुर्वी परमबीर सिंह यांनी नेमकी कोणकोणती हायप्रोफाईल प्रकरणं हाताळली? कोणत्या केसेस त्यांच्या नावावर आहेत? अंडरवर्ल्ड असो वा ड्रगमाफिया… अनेकांच्या कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परमबीर यांची काही महत्वाची प्रकरणं जाणून घेऊयात.

१. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आरडीएक्स भरून ठेवलेली गाडी सापडली. सचिन वझे या पोलीस अधिकाऱ्याला अटक झाली. या तपासात परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढत गेल्या.

 

vaze parambir inmarathi

 

सचिन वाझे यांच्या बचावासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली फौज उभी केली, त्यांना उत्तर म्हणून परमबीर सिंह यांनी चक्क मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं आणि अनिल देशमुख यांच्या कामाची पद्धत त्यांनी जनतेसमोर आणली.

२. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सुरू असलेल्या सिंचन घोटाळ्यात सुद्धा परमबीर सिंह यांनी सर्व माहिती मीडिया समोर आणली आणि आपला हेतू उघड केला.

३. दाऊद इब्राहिम, अरुण गवळी आणि छोटा राजन या सर्व अंडरवर्ल्ड डॉन लोकांच्या मुंबईतील सक्रिय टोळ्यांचा तपास करून सर्व प्रमुख आरोपींना गजाआड करणे हे परमबीर सिंह यांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झालं आहे.

 

rajan inmarathi

 

आपलं पोलिसी करिअर सुरू करतांना ‘अंडरवर्ल्डचा खात्मा करणे’ हाच उद्देश परमबीर सिंह यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता.

४. मुंबईत २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याची चौकशी करतांना परमबीर सिंह यांनी यंत्रणेला केलेली मदत फायदेशीर ठरली.

५. एटीएसच्या डीआयजी पदी असतांना परमबीर सिंह यांनी ‘मालेगाव साखळी बॉम्बस्फोट’ प्रकरणाची सखोल चौकशी केली होती.

 

sadhvi pradhnya inmarathi

 

साध्वी प्रज्ञा यांना या प्रकरणात अटक करून त्यांनी लोकांचा विरोध पत्करून आपण कामाशी प्रामाणिक राहू शकतो हे दाखवून दिलं होतं.

६. ‘ठाणे पोलीस कमिशनर’ या पदाचा पदभार सांभाळल्यावर त्यांनी लगेच ड्रग्स रॅकेट ची चौकशी केली. बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती ‘विकी गोस्वामी’ यांच्यावर केलेली कारवाई ही इतर कित्येक ड्रग्जची तस्करी करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणारी ठरली होती.

७. ‘खोट्या टीआरपी’ आकड्यांचा घोटाळा उघडकीस आणणे हे सुद्धा परमबीर सिंह यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या तपासांपैकी एक मानली जाते.

 

arnab inmarathi

 

२९ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबई पोलीस कमिशनर पदाचा पदभार सांभाळतांनाच परमबीर सिंह यांनी आपली प्राथमिक जबाबदारी ही ‘कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे’ आणि ‘स्ट्रीट क्राईम’ संपवणे अशी घोषणा करून मुंबईकरांची मनं जिंकली होती.

आजपर्यंत अनेक गुन्हेगारांना बेड्या ठोकत मोठमोठ्या केसेसचा निकाल लावणारे परमबीर सिंह सध्या स्वतःच एका विचित्र केसमध्ये गुंतले गेले आहेत. आता फरार असलेले परमबीर कोर्टासमोर येणार का? पोलिस की राजकारणी-यामध्ये नेमका कोणाचा विजय होणार? कोणाची बाजु खरी ठरणार? याची उत्तरे येणारा काळच देईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?