' सलमानने ‘डोळे बंद करून’ एक रिमेक केला आणि बॉलिवूडची सगळी गणितंच बदलली – InMarathi

सलमानने ‘डोळे बंद करून’ एक रिमेक केला आणि बॉलिवूडची सगळी गणितंच बदलली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतीच अंतिम या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पुन्हा ढासू एंट्री घेणाऱ्या सलमान खानसाठी मागचं वर्षं एवढं खास नव्हतं. राधेसारखा सिनेमा देऊन सलमानने त्याच्या चाहत्यांनासुद्धा निराश केलं.

महामारीच्या काळात थिएटर तसेच ओटीटीवर सिनेमा रिलीज करून सलमानने त्याची तिजोरी भरली खरी पण सलमानच्या फॅन्सनीसुद्धा त्याच्या या सिनेमाकडे पाठ फिरवली.

सलमानच्या याच ‘राधे’भाईला बघण्यासाठी एकेकाळी लोकांनी बॉक्स ऑफिसवर तुफान गर्दी केली होती, तो सिनेमा म्हणजे २००९ सालचा वॉन्टेड. या सिनेमाने सलमानच्या करियरची दिशा तर बदललीच, शिवाय वेगवेगळे रेकॉर्ड सेट करून टेलिव्हिजनवर सूर्यवंशम नंतर सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट म्हणूनसुद्धा या सिनेमाने नाव कामावलं.

 

wanted inmarathi

 

वॉन्टेडने फिल्म इंडस्ट्रीला एक नवा सलमान दिला ही अतिशयोक्ती वाटत असली तरी ते सत्य आहे. कारण २००८ च्या दरम्यान शाहरुख आणि आमीरच्या ‘ओम शांती ओम’ आणि ‘गजनी’ या दोन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

देशातच नव्हे तर जगभरात मंदी असतानासुद्धा शाहरुखने साऱ्या फिल्म इंडस्ट्रीला एका गाण्यात एकत्र आणून आणि आमीरने रस्त्यावर उतरून लोकांना हेयरकट देऊन प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे आकर्षित केलं होतं, आणि त्यात त्यांना चांगलंच यश मिळालं होतं.

या सगळ्या गर्दीत खानावळीतला हुकमाचा एक्का सलमान खान कुठेच दिसत नव्हता. एक पार्टनर सोडला तर त्याचे सगळे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आदळत होते. अशातच प्रभूदेवाने हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करायचं ठरवलं आणि २००९ साली त्याने सलमान सोबत वॉन्टेड रिलीज करून कित्येकांचे दात घशात घातले.

 

prabhudeva inmarathi

 

प्रभूदेवाच्या दिग्दर्शनाचं कौतुक तर झालंच पण याबरोबरच सलमानला त्याचा हरवलेला मार्ग गवसला आणि मग सलमानची गाडी रुळावर आली. भले साऊथच्या सिनेमाचा रिमेक जरी असला तरी यात सलमानने स्वतःचं असं काहीतरी दिलं होतं आणि त्यामुळेच सलमानचा राधे हा सगळ्यांचा लाडका भाईजान बनला.

सलमानचा स्वॅग, त्याचे डायलॉग डिलीवरी, त्याच्या भन्नाट डान्स स्टेप आणि खिळवून ठेवणारे अॅक्शन सिक्वेन्सनी पुरेपूर अशा वॉन्टेडचे काही धम्माल किस्से आपण जाणून घेणार आहोत.

 १. अडचणीत अडकलेला वॉन्टेड :

तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही, पण आर्थिक मंदीमुळे सुरुवातीला वॉन्टेड हा सिनेमा कोणताही distributor घ्यायला तयार नव्हता. सलमानच्या फ्लॉपच्या यादीमुळे कोणीच या सिनेमावर रिस्क घ्यायला तयार नव्हतं.

अखेर बोनी कपूरनी पुढे येऊन वॉन्टेड स्वतः distribute करायचा निर्णय घेतला. एक समस्या दूर झाली तर दुसरी समोर उभी ठाकली. सिनेमा रमजानच्या दरम्यान रिलीज झाला आणि त्या महिन्यादरम्यान बहुतांश मुस्लिम परिवारातली लोक बाहेर सिनेमा बघायला जात नाहीत असा एक अंदाज आहे.

याबरोबरच जेव्हा वॉन्टेड रिलीज होणार होता तेव्हा मल्टीप्लेक्स मालकांचा संप सुरू होता आणि तो संप संपल्यावर जे मोठे सिनेमे पडद्यावर झळकले त्यातलाच एक वॉन्टेड होता.

 

salman khan inmarathi

 

शिवाय याबरोबरच सिनेमाला मिळालेलं ए सर्टिफिकेट आणि यश राज बॅनरच्या सिनेमाशी टक्कर यामुळे वॉन्टेडच्या प्रवासातली विघ्नं काही केल्या कमी होत नव्हती, तर सलमानची स्टार पॉवर चांगलीच चालली आणि वॉन्टेडने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली.

२. ओरिजिनल सिनेमा बघताना सलमानने चक्क डोळे बंद करून सिनेमा पाहिला :

सगळ्यांना माहिती आहे की वॉन्टेड हा साऊथचा स्टार महेश बाबूच्या पोक्कीरी या सिनेमाचा रिमेक आहे, जेव्हा सलमानकडे या सिनेमासाठी विचारणा झाली तेव्हा सलमानचे रोमॅंटिक सिनेमे बॉक्स ऑफिसवर आदळत होते, सलमानला अॅक्शन फिल्मची खुप गरज होती जी वॉन्टेडने पूर्ण केली.

वॉन्टेडच्या तयारीसाठी प्रभूदेवाने सलमानला महेश बाबूचा सिनेमा दाखवायचा ठरवलं, तेव्हा सलमान हे जाणून होता की जर त्याने हा सिनेमा पाहिला तर तो महेश बाबूची कॉपी करू शकतो.

जेव्हा सलमानने हा सिनेमा बघितला तेव्हा त्याने स्वतःचे डोळे बंद केले आणि फक्त डायलॉगच्या माध्यमातून सिनेमा समजून घेतला, आणि महेश बाबूचे डायलॉग आपल्या अंदाजात घोळवण्याचा प्रयत्न केला, आणि पुढे जे घडलं त्याने इतिहास रचला.

 

mahesh babu pokiri inmarathi

 

ओरिजिनल सिनेमापेक्षा वॉन्टेड हा खूप वेगळा ठरला,  बॉलिवूडमध्ये रिमेकचे वारे वॉन्टेड नंतरच वाहू लागले आणि वॉन्टेडमुळेच लोकांना वेगळा सलमान बघायला मिळाला.

३. वॉन्टेडसाठी शाहरुखला विचारणा झाली होती :

प्रभूदेवाने जेव्हा पोक्किरीचा रिमेक करायचं ठरवलं तेव्हा त्याच्यासमोर पहिलं नाव आलं ते बॉलिवूड किंग शाहरुख खानचं… खास शाहरुखसाठी प्रभूदेवाने पोक्किरीचं स्क्रीनिंग ठेवलं होतं, शाहरुखने सिनेमा पूर्ण बघितला आणि त्याला आवडलासुद्धा पण त्याने वॉन्टेडसाठी साफ नकार दिला.

 

young shahrukh khan inmarathi

 

प्रभूदेवाने शाहरुखला याबद्दल विचारणा केली तेव्हा, शाहरुख म्हणाला की “ही भूमिका महेश बाबूपेक्षा चांगलं कुणीच करू शकत नाही, त्याच्या एनर्जीला मॅच करणं मला जमणार नाही!”

४. आयेशा टाकीयाच्या लग्नामुळे शुटींग रखडलं :

बॉलिवूडमध्ये अभिनयासाठी नव्हे तर केवळ लुक्स आणि फिगरसाठी ओळखली जाणारी आयेशा टाकीया वॉन्टेडमध्ये दिसली आणि तिचं काम लोकांनी पसंत केलं.

वॉन्टेड फिल्मच्या शुटींग दरम्यान १ मार्च २००९ रोजी आयेशा समाजवादी पार्टीचे नेता अबू आजमी यांच्या मुलासोबत लग्नबंधनात अडकली, आणि नंतर तिने सिनेसृष्टीमधून एक्जिट घेतली.

 

wanted ayesha takia inmarathi

५. अखेर सलमानने कमिटमेंट पूर्ण केली :

“एक बार जो मैने कमिटमेंट करदी तो मै अपनेआप की भी नहि सुनता” वॉन्टेडमधल्या या डायलॉगला सलमान जागला. २००९ मध्ये डान्स इंडिया डान्स या रीयालिटि शोचा पहिला सीझन सुरू झाला. मिथुन चक्रवर्ती या शोचे जज होते.

सलमान जेव्हा डान्स इंडिया डान्सच्या सेटवर वॉन्टेडच्या प्रमोशनसाठी गेला तेव्हा त्याने एक कमिटमेंट केली की या शोच्या विजेत्याला तो वॉन्टेडच्या एका गाण्यात नाचण्याची संधी देईल, आणि सिनेमातल्या डायलॉगप्रमाणे सलमानने त्याची कमिटमेंट पूर्ण केली.

या कार्यक्रमाचा विजेता सलमान यूसुफ खानला सलमानने वॉन्टेडच्या गाण्यात डान्सची संधी दिली.

 

salman khan wanted inmarathi

६. ईदचा ट्रेंड सेट करणारा वॉन्टेड :

ईद म्हणजे भाईजानचा सिनेमा हे समीकरण झालं ते वॉन्टेडमुळेच, आणि यामुळेच ईदच्या दिवशी सलमानचा सिनेमा हा ट्रेंड बनला आणि २००९ नंतर सलमानचे आलेले बरेचसे सिनेमे ईदच्या मुहूर्तावरच प्रदर्शित झाले आणि त्यांना घवघवीत यश मिळालं!

७. हीरोपेक्षा व्हिलन जास्त भाव खाऊन गेला :

वॉन्टेडने फक्त सलमानच नव्हे तर साऊथचा एक तगडा अॅक्टर प्रकाश राजसुद्धा चर्चेत आला. प्रकाश राजने साकारलेला गनी भाई हा व्हिलन लोकांनी चांगलाच पसंत केला. त्यांची खास कॉमेडी शैली आणि व्हिलनगिरी हा अंदाज लोकांनी चांगलाच डोक्यावर घेतला.

 

prakash raj inmarathi

 

याआधीदेखील ‘खाकी’ आणि ‘शक्ति’सारख्या हिंदी सिनेमातून प्रकाश राज यांची ओळख निर्माण झाली, पण वॉन्टेडमधल्या व्हिलनमुळेच प्रकाश राज प्रकाशझोतात आले. त्यानंतर सिंघम, दबंद २, गोलमालसारख्या सिनेमातून प्रकाश राज यांनी काम केलं.

वॉन्टेडसारख्या सिनेमानंतर सलमानने मागे वळून पाहिलं नाही, पण राधेसारखा सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या सलमानने पुन्हा एकदा मागे वळून पाहायची गरज आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी फॉलो करा :

 

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?