Site icon InMarathi

पिळगावकर ते कोठारे : मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘घराणेशाहीची’ धडधडीत उदाहरणं!

pilgaonakar kothare inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणानंतर एकंदरच एका चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे ते म्हणजे नेपोटीजम. बॉलिवूडमध्ये गेली कित्येक वर्षं नेपोटीजम आहे आणि यामुळे कित्येक होतकरू कलाकारांचे नुकसान झाले आहे हेसुद्धा आपण ऐकून आहोत.

सध्या तर फिल्म इंडस्ट्री ही स्टार लोकांची पुढची पिढीच चालवते आहे असं चित्र आपल्याला बघायला मिळेल. मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी, नवाज सारखे काही हातावर मोजता येतील एवढे आउटसायडर्स यशस्वी झाले खरे पण त्यांनाही या नेपोटीजमचा सामना करावाच लागला आहे.

नेपोटीजम कोणत्या क्षेत्रात नसतं? कोणता बाप आपल्या मुलाला पुढे करणार नाही? असे प्रश्न आपण विचारतो आणि त्याची उत्तरंसुद्धा आपल्याकडे आहेत, पण सिनेसृष्टीतलं नेपोटीजम लोकांच्या नजरेस पडतं आणि म्हणून त्यावर चर्चा होते हे एवढं सोप्पं आहे.

 

 

मध्यंतरी संगीत दिग्दर्शक आणि गायक अवधूत गुप्ते यांनी मराठी चित्रपटसृष्टीतल्या नेपोटीजमबद्दल एक स्टेटमेंट केलं होतं की “मराठी इंडस्ट्री ही तशी छोटी आहे, आणि इथे कुटुंबासारखंच सगळं असतं, त्यामुळे नेपोटीजम मराठी इंडस्ट्रीत यायला अजून बराच वेळ आहे!”

अवधूतचं हे स्टेटमेंट तेव्हा जरी कितीही योग्य वाटत असलं तरी बॉलिवूडला नावं ठेवणाऱ्यांनी आपल्या बुडाखाली काय जळतंय याचा अंदाजसुद्धा घ्यायला हवा.

कुणी कितीही म्हंटलं तरी मराठी चित्रपटसृष्टीतही काही प्रमाणात नेपोटीजम, कंपूशाही बघायला मिळतेच. आज आपण अशाच काही मराठी स्टारकिड्सची उदाहरणं बघणार आहोत!

१. अभिनय बेर्डे :

 

 

विनोदाचा बादशाह आणि आपल्या सगळ्यांचा लाडका लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव लावणाऱ्या अभिनय बेर्डेला कोण ओळखत नाही. आज लक्ष्या मामा जरी या जगात नसले तरी त्यांनी कमवून ठेवलेलं नाव हेच त्यांच्या मुलासाठी फायदेशीर ठरतंय.

२०१६ साली सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ या सुपरहीट चित्रपटातून अभिनय बेर्डेला लॉंच केलं गेलं. चित्रपट बऱ्यापैकी चालला, लोकांनी अभिनयची तारीफही केली.

अभिनयचा रोल छोटा पण महत्वपूर्ण असला तरी त्यात असं ग्रेट काहीच नव्हतं, पण केवळ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा म्हणूनच त्याला ही संधी मिळाली आणि त्याला पहिला ब्रेकसुद्धा मिळाला.

२. श्रीया पिळगावकर :

 

 

ज्या मुलीचे वडील सचिन पिळगावकर आहेत तिला अभिनयाचे बाळकडू लहानपणापासूनच दिले गेले असणार हे नक्कीच आहे. सचिन पिळगावकर यांची लेगसी आपल्याला काही नवीन नाही.

भलीमोठी कारकीर्द आणि त्या कारकीर्दीतले उत्कृष्ट सिनेमे तसेच हिंदी चित्रपटसृष्टीलासुद्धा दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या सचिन पिळगावकर यांच्या मुलीने या क्षेत्रात करियर घडवलं नसतं तर नवल!

एका हिंदी सिरियलमधून पदार्पण करणाऱ्या श्रीयाला नंतर सचिन यांनी एकुलती एक या सिनेमातसुद्धा चान्स दिला, शिवाय फॅनसारख्या सिनेमातून ती खुद्द शाहरुखसमोर उभी होती, वेबसिरिज या माध्यमातूनसुद्धा तिने स्वतःची छाप सोडली, मिर्झापुरमधल्या तिच्या पात्राची लोकांनी चांगलीच दखल घेतली.

श्रीयाला दिग्दर्शनात फारच रस आहे शिवाय तिला याच क्षेत्रात काम करायचं होतं हेदेखील आपल्याला ठाऊक आहे पण तिला या सगळ्या संधी उपलब्ध होण्यामागे आणखीन एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे सचिन पिळगावकर हे नाव आणि त्या नावाभोवतालचं वलय!

३. आदिनाथ कोठारे :

 

 

लक्ष्याची ओळख निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या महेश कोठारे यांचं इंडस्ट्रीतलं योगदान तर न विसारण्यासारखंच आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळा प्रयोग करून तो यशस्वी करण्यात महेश कोठारे यांचा मोठा सहभाग आहे.

महेश यांचा मुलगा आदिनाथ कोठारेसुद्धा सध्या मराठी इंडस्ट्रीतलं चर्चेत असलेलं नाव आहे. माझा छकुला या सिनेमात आदिनाथ कोठारे याने बालकलाकार म्हणून भूमिका निभावली.

त्यांनंतर त्याने संजय सुरकरच्या सिनेमातून पदार्पणही केलं, याशिवाय काही छोट्या मोठ्या शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातूनही त्याने त्याचं अभिनय कौशल्य दाखवलं. याबरोबरच महेश कोठारे यांच्या सिनेमासाठी तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनसुद्धा काम करत होता.

अर्थात आदिनाथ कोठारेला एवढ्या संधी उपलब्ध झाल्या कारण आधीपासूनच घरचं वातावरण आणि वडिलांचा आशीर्वाद यामुळेच, हेदेखील कुणीच नाकारू शकत नाहीत.

४. सत्या मांजरेकर :

 

 

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःचा डंका वाजवणाऱ्या महेश मांजरेकर यांनासुद्धा स्वतःच्या मुलाला पुढे आणण्याचा मोह आवरता आलेला नाही. १९९५ सालच्या आई या सिनेमात महेश यांच्या सत्या मांजरेकर याने छोटीशी भूमिक केली होती.

तसेच शहीद कपूरच्या ‘वाह लाईफ हो तो ऐसी’ या सिनेमातसुद्धा काम केलं आहे. २०१७ साली आलेल्या F.U या सिनेमात महेश मांजरेकर यांनी त्यांच्या मुलाला पद्धतशीर लॉंच केलं.

सत्याबरोबरच या सिनेमात आकाश ठोसर, संस्कृति बालगुडे, वैदेही परशुरामी असे तरुण कलाकारसुद्धा होते. कोणालाही हा सिनेमा कधी आला कधी गेला माहीत नाही, पण सत्या मांजरेकरच्या करियरला सेट करण्यासाठी महेश यांनी केलेला अट्टहास त्यांना चांगलाच भोवला!

५. विराजस कुलकर्णी :

 

 

फक्त सिनेमातच आपल्याला हा प्रकार दिसतो असं नाहीये. काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरच्या प्रसिद्ध मालिकेत काम करणारा अभिनेतासुद्धा एक स्टारकीडच होता. माझा होशील ना या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करणारा विराजस कुलकर्णी हा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा आहे.

विराजस याने मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ या मालिकेसाठी सहाय्यक म्हणून काम केलं आहे.

६. आशुतोष पत्की :

 

 

संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या सिरियलची चांगली तसेच वाईट अंगाने चर्चा व्हायची ती म्हणजे ‘अगबाई सासूबाई’. याच सिरियलमध्ये मुख्य भूमिकेत काम करणारा अभिनेतासुद्धा एका प्रसिद्ध गीतकाराचा मुलगा होता.

आशुतोष पत्की हे नाव मराठी टेलिव्हिजनसाठी चर्चेतलं नाव आहे. आशुतोष हा सुप्रसिद्ध गीतकार अशोक पत्की यांचा मुलगा. याआधी त्याने कुठे काम केलं ते एवढं माहीत नसलं तरी सिरियलमध्ये एवढा मोठा ब्रेक मिळण्यामागे वडिलांच्या नावाचा आशीर्वाद असणारच.

७. स्वानंदी टीकेकर :

 

 

मराठी फ्रेंड्स म्हणून एकेकाळी या मालिकेकडे बघितलं जायचं अशी दिल दोस्ती दुनियादारी या सिरियलने बरेच तरुण कलाकार मराठी सिनेसृष्टीला दिले, त्यातलंच एक सर्वात मोठं नाव म्हणजे स्वानंदी टीकेकर.

आरती अंकलीकर आणि उदय टीकेकर यांचं कन्यारत्न म्हणजेच स्वानंदी टीकेकर या सिरियलमधून लोकांच्या समोर आली. सिरियल चांगलीच गाजली आणि यातली प्रत्येक पात्र लोकांच्या पसंतीस उतरली.

स्वानंदीच्या अभिनयाचीसुद्धा लोकांनी चांगलीच तारीफ केली, पण अखेर मोठ्या कलाकारांचं नाव आणि त्याचं वजन असल्यावर स्टारकिड्सना काम मिळणं आणखीन सोप्पं होतं.

८. गश्मीर महाजनी :

 

 

मराठी चित्रपटसृष्टी ज्यांनी एकेकाळी गाजवली अशा रवींद्र महाजनी यांच्या मुलानेसुद्धा देऊळ बंद या मराठी सिनेमातून पदार्पण केलं. उत्तम शरीरयष्टी, हीरो टाइप लूक्स आणि डान्स यामुळे सगळीकडेच गश्मीरची चांगलीच हवा झाली.

वडिलांकडून अभिनयाचे बाळकडू घेऊन आज गश्मीर इंडस्ट्रीत टिकून आहे त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे वडिलांचं नाव!

अर्थात वर उल्लेख केलेल्या कोणत्याही कलाकाराच्या अभिनयाबद्दल खोट काढायला वाव नाही, कारण त्यांनी स्वतःच्या अभिनयानेच लोकांना भुरळ पाडली आहे हेदेखील तितकंच खरं आहे.

या कलाकारांचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं नाव. आणि अर्थात आधी म्हंटलं तसं कोणत्या आई-बापाला वाटणार नाही त्यांच्या मुलाने पुढे जावं?

त्यामुळे मराठीत तरी नेपोटीजम यायला वेळ आहे किंवा ते नाहीच आहे अशा वल्गना कुणीच करू नये, कारण कोणत्याही क्षेत्रात नेपोटीजम नाही असं होणार नाही. बॉलिवूडइतका हा प्रकार मराठीत फोफावला नसेल, पण मराठीतही बऱ्यापैकी घराणेशाही किंवा कंपूशाही अस्तित्वात आहे हे आपण मान्य करायलाच हवं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version