आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – सुरज उदगीरकर
===
कात्रजच्या प्राणी संग्रहालयात भाच्यांना फिरवून आणायला गेलो होतो. तिथे एका enclosure मध्ये एक पांढरा वाघ ठेवलाय. भला दांडगा आहे. वाघाचा पांढरा रंग “अल्बिनो” म्हणजे कोड वगैरेमुळे नसून जनुकीय बदलांमुळे येतो. त्या पांढऱ्या अक्राळविक्राळ धुडाकडे बघून दीड वर्षांचा माझा भाचा “हात..आठ..हाठ” म्हणून मारायला पाहत होता. अनेक लोक फोटो घेत उभे होते.
वाघोबा आमच्याकडे तुच्छतेने पाहत निवांत पाण्यात डुंबत होते. Enclosure आणि आम्ही उभे होतो त्या जागेमधला खड्डा पुरेसा रुंद असला तरी माझ्या मनात यायचे ते विचार आलेच. दोन-अडीचशे किलोच्या ह्या जनावराने मनात आणून तब्येतीने एक झेप घेतली तर?!
तरी हा ‘झू’ मधला होता. एकदा श्रीशैलमला जाताना आमची गाडी भर जंगलात पंक्चर झाली होती. संध्याकाळची वेळ होती. किर्र झाडी. ड्रायव्हर टायर बदलत असताना बाजूच्या दरीतून वाघाच्या गर्जना ऐकू आल्या. पूर्ण घाटात तो आवाज घुमत होता. कसंतरी थरथर कापत टायर बदलून आम्ही काढता पाय घेतला. २ दिवसांनी परत येताना रात्र झाली होती. पेंगूळलेले डोळे घेऊन समोर पाहत असताना हेडलाईटच्या उजेडात एक भला मोठा वाघ रस्ता ओलांडून जाताना दिसला!! बेदरकार!
वाघ..!! भीती आणि उत्सुकता एकाच वेळी वाटायला लावणारा प्राणी. वाघ हा मार्जार कुळातला सर्वात भव्य आणि शक्तिशाली प्राणी. सिंह नव्हे. सिंहाला आयाळ असल्याकारणाने तो मोठा दिसतो.
साधारण नाकापासून शेपटीच्या टोकापर्यंत वाघाची लांबी मोजतात आणि जमीनीपासून कानापर्यंत उंची. एक पूर्ण वाढलेला वाघ ११ फुटांपर्यंत लांब आणि ४ फुटांपर्यंत उंच असू शकतो. याउलट सिंह साधारण 9 फूट लांब असतो.
वाघ जास्त ताकदवान, हुशार, चांगला शिकारी आणि तितकाच लाजाळू असतो. बुजरा म्हणा हवंतर. याचं कारण वाघ हा निबिड जंगलात एकट्याने वावरणारा प्राणी आहे. कळपात राहायला वाघाला आवडत नाही. प्रत्येक वाघ/वाघीण जंगलातला एक ठराविक भाग झाडांवर मूत्र शिंपडून आखून घेतात. हा भाग शंभर-सव्वाशे चौरस किलोमीटर पर्यंत मोठा असू शकतो.
वाघ तसा आळशी असल्याने त्याचा दिवस झोपा काढण्यातच जात असतो. वाघ उत्तम पोहू शकतो. आपल्या क्षेत्रातल्या एखाद्या पाणावठ्यावर तास न् तास डुंबत राहणे हा त्याचा आवडता उद्योग. एक वाघ जर दुसऱ्याच्या क्षेत्रात घुसला तर दोघात लढत होते.
पराभूत वाघाला तो भाग सोडून द्यावा लागतो. फक्त मिलनकाळात वाघ आणि वाघीण एकत्र येतात. प्रजननानंतर वाघ अपत्यांचे संगोपन-संरक्षण वगैरे भानगडीत पडत नाही. ते काम वाघीण एकटीच करते. वाघ आपल्या क्षेत्रात निघून जातो.
शिकार देखील वाघ आपल्याच क्षेत्रात करतो. दुसऱ्या वाघांच्या इलाख्यात नाही. हरीण-सांबर-नीलगाय-रानडुक्कर ही वाघाची आवडती शिकार. पण वेळ आल्यास रानगव्यासारख्या अत्यंत शक्तिशाली आणि चिडखोर जनावरावर चाल करून जायला देखील डगमगत नाही.
वाघ सहसा रात्री शिकार करतो. पिवळसर केशरी रंग आणि पट्टे त्याला झुडपात बेमालूम लपवतात. शिकार करताना वाघ वाऱ्याच्या उलट्या दिशेने चाल करतो, जेणेकरून वाघाचा वास सावजाला मिळणार नाही. दबत दबत एका ठराविक अंतरावर पोचल्यावर वाघ पूर्ण वेगाने सावजावर झेप घेऊन त्याच्या मानेत सुळे उतरवतो.
सिंह चित्ता किंवा बिबळ्याप्रमाणे वाघ प्राण्यांचा दम कोंडून मारत नाही. सुळे उतरवून तो मानेतला मणकाच एका क्षणात तोडून टाकतो, जर शिकार रानगवा किंवा रेड्यासारखे मोठे जनावर असेल तर मान जबड्यात पकडून ती मुरगळुन टाकतो. हे करताना सावज सुटू नये म्हणून नख्यांनी त्याला गच्च धरून ठेवतो.
एका बैठकीत ४०-५० किलो मांस चट्ट करून जाणारा वाघ हा सर्वात सभ्य शिकारी समजला जातो. विनाकारण किंवा मजा म्हणून वाघ कधीच जनावरे मारत नाही. एखादं चितळ किंवा सांबर मारल्यास वाघ पोटभर मांस खाऊन उरलेलं ‘कलेवर’ कोल्हे-तरस-गिधाडे इत्यादींपासून वाचवण्यासाठी एखाद्या झाडीत पालापाचोळ्याने झाकून टाकतो आणि भूक लागल्यास पुन्हा येऊन ते खातो. जर शिकार लपवण्याची जागा नसेल तर ते वजनदार कलेवर मैलोगणती सहज फरफटत नेतो. शक्यतो वाघ दुसऱ्याने मारलेलं जनावर खात नाही.
वाघ हा एक अत्यंत शक्तीशाली आणि खुंखार प्राणी आहे. ४ ते ५ इंची अणकुचीदार सुळे, ३ ते ४ इंची नखं, अत्यंत तिखट कान-नाक आणि अंधारात देखील स्वच्छ पाहू शकणारी नज़र यामुळे वाघ कुशल शिकारी म्हणवतो. एखादा पाच-सातशे किलोचा रानरेडा मारून त्याला एका रात्रीत ८-१० किलोमीटर सहज ओढत घेऊन जाऊ शकेल इतकी त्याच्यात क्षमता असते.
वाघाची डरकाळी नेहमीच सिनेमात दाखवतात तशी नसते. वाघ जेंव्हा इतर वाघांवर चाल करतो किंवा बचावासाठी आक्रमक पवित्रा घेतो तेंव्हाच तो सिनेमात दाखवतात तशी डरकाळी फोडतो. इतर वेळी इतर वाघाना आपला इलाका आहे हे दाखवण्यासाठी किंवा वाघिणीला साद घालण्यासाठी तो “आsssउँह..” अशी गर्जना करतो. हि गर्जना ऐकून इतर वाघांना आपले अस्तित्व जाणवावे आणि संभाव्य संघर्ष टाळावा म्हणून हा खटाटोप. ही गर्जना एवढी दमदार आहे शांत जंगलात ४-५ किलोमीटर पर्यंत आवाज घुमत जातो.
वाघ सहसा माणसांवर हल्ला करत नाही. बुजरा असल्याने माणूस दिसताच तो रस्ता बदलतो किंवा दाबून बसतो. वाघाला पाहून तुम्ही जितके भ्यालेले असता तितकाच तो आश्चर्यचकित झालेला असतो.
तुम्हीजर कधी रस्त्याने जाताना वाघ समोर आला तर तो तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता कमीच. बहुतकरून तो रस्ता सोडून निघून जाईल. वाघाला जोपर्यंत शिकार उपलब्ध आहे तोपर्यंत तो कधीही माणसाच्या वाटेला जाणार नाही.
वाघ फारच थोड्या परिस्थितीत माणसांवर हल्ला करतो. त्यातही जास्त करून हल्ले हे फक्त घाबरवण्याकरता केलेले असतात. वाघ माणसांवर हल्ला करून जीव घेतो त्यात एखादा अपवाद सोडला माणसाचीच चूक असते. गरज नसताना वाघाला डिवचणे, त्याच्या पिल्लांच्या नको तितके जवळ जाणे, त्याला जखमी करणे किंवा त्याला घाबरवणे वगैरे प्रकार केल्याखेरीज वाघ तुमच्या नादाला लागेल याची शक्यता जवळपास नाहीच.
–
हे ही वाचा – आणि घनदाट जंगलात चक्क वाघ आमच्या समोर आला…
–
जर कधी चुकून माकून तुमचा एखाद्या वाघाची जंगलात सामना झालाच तर…सर्वात महत्वाचे म्हणजे कधीही त्याच्याकडे पाठ करू नका. पळू तर बिलकूलच नका. पाठलाग करणे हा वन्य जनावरांचा नैसर्गिक स्थायीभाव आहे. गाडीच्या मागे कुत्रे लागतात ते याच कारणास्तव.
शक्यतो आपल्या जागेवर पाय रोवून उभे राहा आणि तुमचं लक्षच नाही असं दाखवा. काही सेकंदात वाघ रस्ता बदलून निघून जाईल. समजा नाहीच गेला आणि तुम्हाला वाटलं तो तुमच्यावर हल्ला करेल तर शक्य तितके मोठे दिसण्याचा प्रयत्न करा.
हात वर करून वाघाच्या डोळ्यात डोळे घालून जमेल तितक्या मोठ्याने ओरडा. हातात एखादी वस्तू असेल तर ती जोराने वाघाजवळ फेका. तुमच्याकडून वाघाला जबर धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव होताच वाघ निघून जाईल. जर नशीब फारच तकलादू असेल तर वाघ हल्ला करेलच…मग मात्र शक्य झाल्यास झाडावर चढा आणि ते ही जमत नसल्यास हल्ला होताना दोन्ही हात मानेवर चेहऱ्यावर गच्च ठेऊन पडून राहा. कारण वाघ तुमच्या मानेचाच चावा घ्यायला बघेल.
तुम्ही काहीच धडपड दाखवली नाहीत, नशीबवान असाल आणि वाघाने फक्त खेळ म्हणून हल्ला केलेला असेल तर वाघाचा तुमच्यातील रस निघून जाईल आणि तो तुम्हाला सोडेल. शेवटचा उपाय म्हणजे हल्ला झाल्यावर वाघाच्या नाकावर ठोसा मारणे आणि जोराने ओरडत राहणे. कारण वाघाच्या हल्ल्यात फक्त वाघाने माघार घेतली तरच तुम्ही इहलोकी राहण्याची शक्यता आहे. अन्यथा वैकुंठी स्वागत होणारच! तुम्ही म्हणाल समोर वाघ असताना हे सगळं सुचेल का…बरोबर आहे. पण दुसरा उपाय आहे पळ काढणे आणि तुम्ही ६०-७० किमी प्रतितास पळू शकणाऱ्या अडीच-तीनशे किलोच्या जनावराला पळण्यात हरवू शकत नाही.
पट्टेदार वाघ, ज्याला आपण ढाण्या वाघ म्हणतो ते संख्येने इतर “big cats”च्या तुलनेत संख्येने सर्वात कमी उरलेत. भारतात साधारण अडीच हजार तर जगात साधारण ४-५ हजार. याचं कारण वाघाला वावरण्यासाठी लागणारी आणि वरचेवर आकुंचित होत जाणारी जागा, कातडीसाठी आणि केवळ खेळ म्हणून केलं गेलेलं शिरकाण.
भारतात सध्या रणथंभोर, ताडोबा, कान्हा, राजाजी, कॉर्बेट, नल्लामल्ला, सुंदरबन वगैरे राष्ट्रीय उद्यानात ढाण्या वाघ आहेत. ह्या जंगलात उघड्या जीपमधून सफर करवतात तेंव्हा वाघ जीपच्या आजूबाजूने निर्धास्त वावरतो. रॉयल बंगाल नंतर सायबेरियन वाघ सर्वात प्रसिद्ध आहे. सायबेरियन वाघ रॉयल बंगाल वाघापेक्षा आकाराने जरासा मोठा असतो.
सभ्य, लाजाळू, गरजेपुरती शिकार करणारा आणि माणसाच्या वाटेला न जाणारा हा जंगलचा शेहेनशाह कधी कधी नरभक्षक बनतो. आणि इतका भयंकर कि बस..!
ह्या भागात फक्त प्रस्तावना केली आहे – जगभरातील चित्तथरारक नरभक्षकांच्या कथा पुढील ३ भागांत.
क्रमशः
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.