बच्चनच्या ‘कुली’मधल्या अपघातामुळे या अभिनेत्याच्या फिल्मी करियरचे तीन तेरा वाजले!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आपल्या देशात सिनेमा आणि क्रिकेट या दोन गोष्टी लोकं डोळे बंद करून फॉलो करतात आणि त्या सेलिब्रिटीजना आपली लोकं डोक्यावर घेतात. सिनेमाचा तर भलताच पगडा आपल्या देशवासीयांवर आपल्याला बघायला मिळतो.
अशाच एका कलाकाराला जनता जनार्दनने महानायक बनवला, याची क्रेज आजच्या तरुण पिढीतही आहे, मोठ्या पडद्यावर तर त्याने लोकांना भुरळ घातलीच, पण जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने टेलिव्हिजनच्या माध्यमातूनही स्वतःचा ग्रेटनेस सिद्ध केला.
तुम्हाला समजलं असेलच, आपण बोलतोय महानायक अमिताभ बच्चन यांच्याविषयी. हिंदीवरचं अनन्यसाधारण प्रभुत्व, व्यक्तशीरपणा, एनर्जी आणि अभिनयातलं वैविध्य यामुळेच अमिताभ बच्चन हे नाव नावारूपाला आलं.
एकेकाळी फिल्म सिटीचं गेट उघडण्यासाठी वॉचमनच्याही आधी हजर असणारे बच्चन साहेब यशाच्या शिखरावर विराजमान असतानासुद्धा तितक्याच तत्परतेने सेटवर हजर राहतात.
बच्चन यांच्या याच स्वभावामुळे लोकं त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकायलासुद्धा कमी करणार नाही. असाच एक अनुभव आपण बघितला आहे तो १९८३ साली. जेव्हा कुली चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एका अॅक्शनसीन दरम्यान बच्चन यांना गंभीर दुखापत झाली तेव्हा देशभरातून त्यांच्यासाठी प्रार्थन होऊ लागली.
बरेच ठिकाणी यज्ञ, होम हवन नवस, अभिषेक, उपास तापास होऊ लागले, आणि करोडो लोकांच्या प्रार्थनेचं चीज झालं, देवाने लोकांची साद ऐकली आणि अमिताभ यांना त्या अपघातातून सुखरूप बाहेर आणलं.
–
- फिल्म स्टुडिओत वॉचमनच्याही आधी हजर असणारा वक्तशीर ‘महानायक’!
- अमिताभ बच्चनच्या बॉडीगार्डची सॅलरी कित्येक कंपन्यांच्या CEO पेक्षाही जास्त…
–
नंतर बच्चन यांनी पुन्हा जोमाने काम सुरू केलं, लोकांनी त्यांना आधीपेक्षा अधिक पसंती दिली, पण त्या भीषण अपघातामुळे एका कलाकाराचं मोठं नुकसान झालं, त्याच्या करियरचे तीन तेरा वाजले.
त्या कलाकाराचे नाव पुनीत ईस्सर, तेव्हा कुली सिनेमात पुनीत ईस्सर हे खलनायकाच्या भूमिकेत काम करत होते, सिनेमात एक अॅक्शन सीन होता जिथे पुनीत आणि अमिताभ यांच्यातल्या एका झटापटीत पुनीत यांना अमिताभला एक बुक्का मारायचा होता.
एका मुलाखतीत पुनित यांनी या घटनेबद्दल स्पष्टीकरण देत सांगितले की, तो सीन खोटा वाटू नये म्हणून अमिताभ यांनी स्वतःच पुनीत यांना बुक्का मारताना हात पोटाला लागला पाहिजे असे सांगितले होते.
याची तालिमसुद्धा झाली, पण शूट करत असताना अमिताभ हे एका बोर्डवर आदळून पुढे आले आणि पुनीतचा बुक्का त्यांच्या पोटाला स्पर्श न करता जोरात पोटात लागला. या सीनच्या शूटनंतर अमिताभ तातडीने घरी निघून गेले.
या घटनेचं गांभीर्य लोकांच्या ध्यानात तेव्हा आलं जेव्हा अमिताभ यांना दुसऱ्या दिवशी ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं गेलं. या सिनेमाच्या दरम्यान अमिताभ यांच्या वजनात घट झालेली असल्याने त्यांची परिस्थिती चांगलीच नाजूक होती.
संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता, पण यादरम्यान पुनीत ईस्सरबद्दल सगळीकडेच उलट सुलट छापून यायला सुरुवात झाली होती, ज्याचा त्यांच्या करियरवर परिणाम झाला.
या सगळ्या प्रकरणात पुनीत हे स्वतःलाच दोष देत होते, तेव्हा दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी पुनीतला अमिताभची भेट घेण्यास हॉस्पिटलमध्ये पाठवलं, तेव्हा अमिताभ यांनी पुनीत यांच्या मनातला हा गैरसमज दूर केला.
“जे काही घडलं त्यात तुझी चूक काहीच नव्हती, मीडिया काहीही बोलत असली तरी मी तुमच्यासोबत आहे” असं म्हणत अमिताभ यांनी पुनीतची समजूत काढली खरी, पण या एका घटनेनंतर पुनीतचं करियर म्हणावं तसं पुढे आलं नाही.
या घटनेमुळे पुनीत हे इंडस्ट्रीतून काहीकाळ तरी बाहेर फेकले गेले. एका मुलाखतीत पुनीतनी सांगितल्याप्रमाणे कुलीच्या अपघातानंतर त्यांच्या हातातून तब्बल ७ ते ८ फिल्म्स सुटल्या, बरीच वर्षं वाट बघितल्यानंतर त्यांना टेलिव्हिजनवर महाभारत या मेगासिरियलमध्ये काम मिळालं.
आज या घटनेला इतकी वर्षं उलटून गेली तरी बच्चनचा हा अपघात कुणीही विसरलेलं नाही. या अपघातातून बाहेर येऊन अमिताभ यांनी पुनश्च हरी ओम म्हणत काम करायला सुरुवात केली, पण पुनीतसारख्या कलाकाराला मात्र लोकांचा रोष पत्करून महाभारतातल्या चांगल्या रोलसाठी ताटकळत राहावं लागलं!
===
- किशोर कुमारने ग्रीन सिग्नल दिला आणि ‘कुली’चं ते गाणं त्यांच्याऐवजी या गायकाने गायलं!
- बिग बींच्या त्या एका चुकीमुळे विनोद खन्ना यांनी अमिताभ सोबत काम करणं टाळलं!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.