Site icon InMarathi

जेव्हा शाहरुखने अबू सालेमला ठणकावले, “मी कोणत्या फिल्म्स करायच्या हे शिकवू नकोस”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही महिन्यांपूर्वी आर्यन खानच्या ड्रग्स केसमुळे बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन चांगलंच उघडंपडलं होत. एकंदरच या ‘उडत्या बॉलिवूड’वर सगळेच नाराज आहेत. पण ड्रग्सशिवाय आणखीन एक समीकरण इंडस्ट्रीत सर्वात जास्त चर्चिलं जातं, ते म्हणजे बॉलिवूड आणि अन्डरवर्ल्ड!

खासकरून ८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अन्डरवर्ल्डची लुडबूड वाढली आणि त्यामुळेच आज बॉलिवूड ही एवढी मोठी इंडस्ट्री उदयाला आली असंही म्हंटलं जातं, आजही या बॉलिवूडकरांचे हफ्ते दुबईच्या डॉनपर्यंत पोहोचतात हे आपण ऐकून आहोत.

 

 

गुलशन कुमार यांच्या दिवसाढवळ्या केलेल्या हत्येनंतर तर सिद्ध झालं की अन्डरवर्ल्डचे बॉलिवूडमध्ये खोलवर पाय रुतले आहेत. कित्येक अभिनेत्रींचे नाव डी कंपनीशी जोडले गेले, संजय दत्तपासून सलमान खानपर्यंत कित्येक मोठ्या अभिनेत्यांचे डॉनबरोबरचे फोटोज व्हायरल झाले.

असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जेव्हा इंडस्ट्रीतल्या बादशाहने खुद्द एका डॉनला दम भरला होता आणि त्यामुळे त्याची चांगलीच गोची झाली होती.

अगदी बरोबर ओळखलंत, हा किस्सा आहे शाहरुख खान आणि अबू सालेम यांच्यातल्या संबंधांचा. ९० चं दशक होतं, शाहरुख नावाचं वादळ सिनेइंडस्ट्रीत आणि देशभरात घोंगावत होतं, याबरोबरच फिल्मी दुनियेच्या अन्डरवर्ल्ड कनेक्शनच्यासुद्धा बऱ्याच बातम्या बाहेर पडत होत्या.

 

१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर तर कित्येक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची पोलिसांनी कसून चौकशी केली होती, हा तो काळ होता जेव्हा फिल्मस्टार्सपासून मोठमोठ्या बिझनेसमनला डी कंपनीकडून खंडणीसाठी धमक्यांचे फोन जायचे.

याबरोबरच कोणत्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने कोणत्या सिनेमात काम करायचं हेसुद्धा डी कंपनी ठरवते असं म्हंटलं जायचं. मोस्ट वॉन्टेड डॉनवर चित्रपट काढून त्यात मोठमोठ्या अॅक्टरना कास्ट केलं जात असे.

शाहरुख आणि अबू सालेम यांच्यातला हा किस्सा अनुपम चोप्रा हिने एका पुस्तकातून चांगलाच रंगवून सांगितला आहे. याचदरम्यान म्हणजे १९९७ मध्ये सीनियर पोलिस ऑफिसर राकेश मारिया यांनी दिग्दर्शक महेश भट यांच्या कानावर घातलं की सध्याच्या सुपरस्टारच्या जीवाला धोका आहे.

तेव्हा महेश भट शाहरुखसोबत चाहत या चित्रपटाच्या कामात व्यस्त होते. आपण अन्डरवर्ल्डच्या रडारवर आहोत याची काहीच कल्पना शाहरुखला नव्हती. महेश भट यांनी सांगितल्यावर शाहरुखने राकेश मारिया यांची भेट घेतली आणि सुरक्षेसाठी लागणारी सगळी खबरदारी घ्यायला सुरुवात केली.

 

 

जायचे यायचे रस्ते, तसेच गाड्यांची अदलाबदल करून शाहरुख वावरू लागला. अन्डरवर्ल्डच्या रडारवर असल्याने शाहरुख सतत एका तणावाखाली वावरत होता. एका इव्हेंटमध्ये गर्दीत कुणीतरी त्याच्याकडे ऑटोग्राफसाठी मागणी केली, जेव्हा समोरच्या व्यक्तीने पेन काढण्यासाठी खिशात हात घातला तेव्हा शाहरुखने बाजूलाच उभ्या असलेल्या गौरीला बाजूला सारलं, यावरून आपल्याला अंदाज येईल की अन्डरवर्ल्डचा बॉलिवूडमध्ये केवढा दबदबा होता ते!

एके दिवशी ‘दिल तो पागल है’ या सिनेमाचं शुटींग संपवून शाहरुख खंडाळावरून घरी परतत असताना त्याला अबू सालेमचा फोन आला. सुरुवातीला त्याने शिवीगाळ करून शाहरुखशी बोलायला सुरुवात केली पण थोड्याच वेळात तो वरमला.

शाहरुखने अबू सालेमच्या ओळखीतल्या मुस्लिम निर्मात्यासोबत काम करण्यास नकार दिला होता म्हणून अबू सालेम चांगलाच चिडला होता, शिवाय त्याच्या मते शाहरुखने त्याच्या लोकांसोबत मिळून मिसळून काम करायला हवं असं सालेमचं मत होतं.

 

 

त्यानंतरही अबू सालेम वरचेवर शाहरुखला फोन करून गप्पा गोष्टी करत असे. शाहरुखने मात्र राकेश मारिया यांनी सांगितल्याप्रमाणेच वागायला सुरुवात केली. जीवाला धोका असल्या कारणाने शाहरुख सालेमशी फोनवर सभ्य भाषेत आणि साधेपणानेच बोलत होता.

अबू सालेम फोनवर बोलताना शाहरुखला कोणती फिल्म कर आणि करू नको याबद्दल सांगायचा, यावरून एक दिवस शाहरुखने त्याला त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं की “मी तुला कोणाला मारायचं ते सांगत नाही, त्यामुळे तूसुद्धा मला माझ्या सिनेमाच्या निवडीबद्दल शिकवू नको.”

यानंतर मात्र फक्त अबू सालेमच नव्हे तर छोटा राजनचे सुद्धा शाहरुखला फोन यायला सुरुवात झाली.

 

हा सगळा प्रकार तब्बल ४ वर्षं सुरू होता, अर्थात यात मुंबई पोलिस राकेश मारिया यांनीसुद्धा शाहरुखला पदोपदी सहाय्य केलं, आणि त्यांच्या सल्ल्यामुळेच शाहरुख या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडू शकला.

शाहरुख हा एक मुस्लिम सुपरस्टार असल्या कारणाने त्याला इजा पोहोचेल म्हणूनसुद्धा ही डॉन मंडळी त्याच्यापासून ४ हात लांब होती असाही एक तर्क मांडला जातो.

खरंतर अबू सालेमला असं बोलल्यावर शाहरुखचासुद्धा गुलशन कुमार करण्यात डी कंपनीला जास्त वेळ लागला नसता पण, केवळ धर्म आणि शाहरुखची इमेज या कारणामुळे तेंव्हाच्या या कुख्यात गॅंगस्टर्सनीसुद्धा शाहरुखचे हे असले नखरे सहन केले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version