' सदमा, अस्तूसारख्या या ७ सिनेमांमध्ये कॉमन असलेली ही गोष्ट तुम्हाला माहितीये का? – InMarathi

सदमा, अस्तूसारख्या या ७ सिनेमांमध्ये कॉमन असलेली ही गोष्ट तुम्हाला माहितीये का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

शरीराला झालेली दुखापत दिसते, त्यामुळे होणार्‍या वेदना समजतात आणि त्यावर औषधोपचारही केले जातात मात्र दुर्दैवानं मनाला झालेल्या जखमा पटकन दिसत नाहीत, दिसल्या तरिही समजून घेतल्या जात नाहीत आणि समजल्या तरिही दूर्लक्ष करण्याची वृत्ती आहे. याच मनाच्या जखमा पुढे जात कुरूप बनत गंभीर आजार धारण करतात तेंव्हा मात्र परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते.

सर्वच मानसिक बिघाडांना “वेड” ठरवून मोकळा होणारा आपला समाज सिझोफ़्रेनिया, डिन्मेशिया, क्लिनिकल डिप्रेशन, अशी वर्गवारी असू शकते हे समजण्याइतका समंजस अद्याप झालेला नाही. समाजापुढे या आजारपणांना आपल्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न रुपेरी पडद्यानं नेहमीच केलेला आहे.

 

mental health inmarathi

 

मग तो कृष्णधवल खामोशी असो, फूजीकलर खिलौना असो, ईस्टमन कलर संजोग असो की अगदी अलिकडचा तमाशा किंवा डिअर जिंगदी असो. मेनस्ट्रीम सिनेमातून थोडा भडकपणे तर कधी आर्ट फिल्ममधून हळूवार पणे हा विषय प्रेक्षकांसमोर मांडला गेला आहे.

अलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!

१. खामोशी :

 

khamoshi inmarathi

 

कधी कधी आयुष्यात अशा काही घटना घडतात की मनातली खळबळ त्या व्यक्तिचं आयुष्य स्थिर डोहासारखं थिजवून टाकते. अशा पेशंटना गरज असते ती एका समंजस साथीदाराची जी केवळ औषधंच देणार नाही तर त्यांना यातून हळूवारपणे बाहेर काढेल. नर्स राधा (वहिदा रेहमान) अशीच एक कोमल मनाची परिचारिका आहे.

कर्नल साहेब (नजीर हुसैन) हे एक निष्णात असे मिलिट्री डॉक्टर आहेत जे मानसोपचार विभागाचे प्रमुख आहेत. एका पेशंटला (धर्मेंद्र) बरं करण्यासाठी ते राधाची मदत घेतात आणि राधा मनापासून त्याच्यावर उपचार करते त्यासाठी ती त्याची प्रेमिका बनते मात्र कधी खरोखरच गुंतते तिला कळतही नाही.

हा पेशंट खडखडीत बरा होऊन घरी जातो. आता राधा त्याच्यासाठी पुसला गेलेला भूतकाळ असते. त्याच्याजागी दुसरा पेशंट येतो (राजेश खन्ना) त्यायाच्यावरही उपचार करता करता राधा पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडते. एका वळणावर व्यावसायिक कर्तव्य आणि प्रेम या गुंतागुंतीत राधा अडकते. तिचं मन कमकुवत बनतं.

अरूण चौधरी बरा होऊन घरी जातो मात्र राधा यावेळेस मनानं पूर्णपणे कोलमडते आणि दुर्दैवानं तिला त्याच खोलीत पेशंट म्हणून ठेवलं जातं.

२. सदमा :

 

sadma inmarathi

 

८० च्या दशकात बसेरासारखाच आलेला एक नितांत सुंदर चित्रपट म्हणजे सदमा. श्रीदेवी, कमल हसन यांचा हा चित्रपट म्हणजे मास्टरपीस आहे.

मेंदूवर झालेल्या आघातानं नायिकेला तात्पुरतं विस्मरण होतं. नाव गाव काहीही आठवत नसणारी आणि अल्लड वयात जाऊन पोहोचलेली ही नायिका नायक प्रेमानं सांभाळतो मात्र तिची स्मृती परतल्यावर ती त्या वयातून वास्तवात येते आणि नायकाला न ओळखता निघून जाते.

ती ताटातूट बघताना नायिकेचं बरं होणं प्रेक्षकांना कुठेतरी खुपतं.

३. बर्फी :

 

barfi inmarathi

 

अलिकडच्या काळातला हा चित्रपट. नायिका मानसिक वाढ खुंटलेली आणि आणि नायक मुका बहिरा आहे. या दोघांत असणार्‍या या शारीरिक कमतरता त्यांच्या आयुष्यात कुठेही कडू चव आणत नाहीत तर बर्फीसारखे गोड क्षण हे दोघे जगतात.

आजाराच्या पलिकडे पेशंटचं जग दाखविणारा हा चित्रपट. एरवी आजार म्हंटलं की जो एक करूण रस दिसतो तो बर्फीमध्ये तुम्हाला दिसणार नाही.

३. कौन :

 

kaun inmarathi

 

बर्फीच्या अगदी विरुध्दचा जॉनर असणारा असा हा मानसिक विकृती दाखविणारा चित्रपट. संपूर्ण चित्रपटात केवळ तीन व्यक्ती आपल्याला दिसतात. नायिकेचं संतुलन बिघडलेलं असणं हा थरार चित्रपटभर जाणवत रहातो.

४. डिअर जिंदगी :

 

dear zindagi inmarathi

 

हा चित्रपट मानसिक अस्वास्थ्यावर भाष्य न करता तो मानसिक अस्वास्थायवर बोलायला पाहिजे यावर भाष्य करतो. इटस ओके टु बी नॉट नॉर्मल. मानसिक स्वास्थ्य हरवू शकतं, डिप्रेशन, ॲन्क्झायटी हे आजार असू शकतात पण जसे शरीराचे आजार असतात तसेच मनाचे असतात आणि ते स्विकारून त्यावर योग्य वेळी योग्य ते उपचारही केले पाहिजेत.

आधुनिक जिवनशैलीचा अविभाज्य घटक बनू पहाणारा हा मानसिक अस्वास्थ्याचा मुद्दा डिअर जिंदगी उचलून धरते. थेरपिस्टकडे जाणं कमीपणाचं नाही हे मनापासून मांडणारा आणि आयुष्याला डिअर जिंदगी म्हणून हाक मारायला लावणारा असा हा फार सुंदर चित्रपट.

हिंदी प्रमाणेच मराठीतही मानसिक अस्वास्थ्यावर अनेक सुंदर चित्रपट निर्माण झाले. मात्र हिंदी प्रमाणे मुख्य प्रवाहातील चित्रपट फ़ार कमी बनले आहेत. समांतर सिनेमात मात्र हा विषय अगदी भरपूर प्रमाणात हाताळला गेला आहे. प्रामुख्यानं सुनिल सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांनी सातत्यानं मानसिक आरोग्य हा विषय हाताळला आहे.

५. देवराई :

 

devrai inmarathi

 

समिक्षक, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली अशी ही फिल्म. ही गोष्ट आहे शेष (अतुल कुलकर्णी) याची. जंगलात रहायला आवडणारा शेष माणसांच्या गर्दीला भीत असतो. एक दिवस त्याचं मानसिक अस्वास्थ्य समोर येतं.

सगळेजण त्याचं हे रूप बघून लाजिरवाणे होतात आणि त्याला वेडा ठरवून मोकळे होतात मात्र त्याची बहिण त्याला समजावून घेत कायम त्याला सांभाळते. अत्यंत हळूवारपणे देवराई आपल्याला शेषच्या मनातल्या बिघाडाची गोष्ट सांगते.

६. कासव :

 

kaasav inmarathi

 

सुकथनकर-भावे जोडीचा हा अलिकडचा चित्रपट. अलिकडे फॅन्सी बनलेला शब्द म्हणजे डिप्रेशन. अगदी इतक्या तितक्या गोष्टीतही लोकांना डिप्रेशन येत असतं मात्र खरोखरच क्लिनिकल डिप्रेशनकडे चाललेली व्यक्ती पटकन ओळखू येत नाही ही या आजारातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे.

वरवर हसता खेळता माणूस आतून डिप्रेशनच्या वाटेला लागलेला असतो हे त्याचं त्याला कळायला खूप वेळ लागतो. कासव ही डिप्रेशनवर भाष्य करणारी फिल्म असली तरीही ती वेगळ्या पध्दतीने हा विषय मांडते. ती याचा इलाज सांगत बसण्याच्या उद्योगात पडत नाही तर ती हे सांगते की प्रत्येक व्यक्तिचं डिप्रेशन हे वेगळं असतं आणि त्याच्याशी सामना करण्याचे मार्गही वेगळे असतात.

७. अस्तू –

 

astu inmarathi

 

सुकथन –भावे जोडीचा डिमेंशियावर भाष्य करणारा हा चित्रपट. तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात एखादी वयस्कर व्यक्ती अशी असते जिला “वयोमानानुसार” कमी ऐकायला येत असतं किंवा लोकांना ओळखणं कमी झालेलं असतं.

अनेक वर्षांनंतर जेव्हा कोणी त्यांच्यासमोर उभं राहतं तेव्हा ओळख हरवलेली नजर समोरच्याला न्याहाळत असते. कोणीतरी सांगतं की ही अमूक तमूक तेंव्हा बरेचदा आठवलेलं नसूनही कसंनुसं हसत ओळख असल्याचं भासविलं जातं.

वयोमानानुसार असं होणारच हे सहजपणे बोललं जातं. बरेचदा या वयोमानानुसार विस्मरणाचा हा रोग अलगद आयुष्यात आलेला असतो. पेशंट्चं नविन जग तयार झालेलं असतं मात्र त्याच्या आजूबाजूच्या लोकांची फरफट चालू होते. कारण पेशंटच्या जगात जाण्याचा कोणताच मार्ग नसतो.

क्षणात या जगात तर क्षणत त्या जगात जाणारे पेशंट सांभाळणं ही तारेवरची कसरत होऊन बसते. अशाच एका डिमेंशिया झालेल्या मात्र आनंदी वडिलांची आणि त्यांच्या मुलीच्या तगमगीची ही गोष्ट. या गोष्टिला एक करूण झालर असली तरीही गोष्ट मात्र पेशंटला सुख दु:खाच्या पलिकडे घेऊन जाणार्‍या डिमेंशियाची आहे.

मानसिक अस्वास्थ्य या दोन शब्दांत न मावणार्‍या अशा मानसिक बिघाडांशी आत्ताशी आपली ओळख होत आहे. एरवी मानसिक स्वास्थ्य ठीक नसणं म्हणजेच वेड लागलेलं असणं इतकीच संकुचित ओळख आपल्याला होती. या विविध मनोविकांरांशी ओळख करून देण्याचं काम चित्रपटांनी चोख बजावलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?