Site icon InMarathi

“परदेशात गेल्यावर गर्वाने सांग, गांधींच्या नव्हे गोडसेंच्या भूमीतून आलोय…”

nathuram godse movie mahesh manjrekar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

महेश मांजरेकर यांनी नुकतीच एका नव्या चित्रपटाची घोषणा केली. राष्ट्र्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.

गांधी जयंतीचा मुहूर्त साधून महेश मांजरेकर यांनी गोडसे यांच्यावर चित्रपट करणार असल्याचं जाहीर केलं आणि रंगकर्मी राजू तुलालवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून महेश मांजरेकर यांचे कान पकडले, असं म्हणायला हरकत नाही. राजू तुलालवार नेमकं काय म्हणाले, आणि काय आहे ही पोस्ट बघूया…

 

 

 

 

===

लेखक – राजू तुलालवार

===

गांधी जयंतीचा मुहूर्त गोडसे जयंतीपेक्षा अधिक शुभ आणि लाभदायक असावा, म्हणून महेशने त्याच्या dream project ची घोषणा काल केली.
गांधी असुर होते, म्हणून त्यांचा वध गोडसे नामक देवाने केला, असे जी जमात मानते… त्या जमातीने एका असुराचा जन्मदिवस शुभ मानून त्यांच्या देवाच्या सिनेमाची घोषणा कशी काय केली? त्यांच्या देवाची जयंती आणि पुण्यतिथी किती जणांना ठाऊक आहे?

गांधी नावाच्या असुराचा वध करण्याआधी आधी गोडसे नामक देवाने हाथ जोडून नमस्कार का बरं केला? (याची गमतीदार उत्तरे ही जमात तयार करून नक्कीच देतील. ही जमात हुशार आहे) महेशचे कालचे कृत्य अविवेकी आहे, असे मला वाटते.

 

 

देशात लोकशाही आहे. विचार स्वातंत्र्य आहे. हे सर्व कबूल. पण मिळालेलं स्वातंत्र्य कसं वापरायचं, याचा विवेक निदान महेशला हवा.

नथुरामला भारतीय कायद्याने गुन्हेगार मानून त्याला शिक्षा दिलेली असताना, सिनेमा काढून त्याला हिरो साबित करणं आणि त्याच्या कृत्याचे समर्थन करणं, ही सिनेमॅटिक लिबर्टी असेल; कायद्याने ते चूकही नसेल, पण हे अनैतिक नक्कीच आहे.

नथुरामला शिक्षा देताना भारतीय न्याय व्यवस्थेने नथुरामने कोर्टात मांडलेली त्याची भूमिका अमान्य केली होती. भारतीय न्याय व्यवस्थेला जी भूमिका त्याज्य वाटली, ती महेश आणि त्याच्या विचारसरणीच्या जमातीला अलौकिक शौर्याची आणि बलिदानाची वाटत असेल तर, ही गोष्ट निषेधार्ह आहेच.

हिटलरची जर्मनीत छी-थूच होते. जर्मनीत त्याच्या विषयी बोलणे टाळतात आणि तोच हिटलर भारत भूमीतील वरील जमातीला आकर्षित करतो.

नथूच्या नावातच राम होता. त्याने रोज रामाचं भजन करणाऱ्या, राष्ट्रप्रेमी वृद्धाला, पातकी ठरवून, त्यांना ” हे राम” म्हणावयास लावलं…. येथे कोणता राम जिंकला, कोणता राम हरला? गांधी नावाचा हिंदू हरला आणि नत्थु रामाचं हिंदुत्व जिंकलं.

 

 

कालचं महेशचं कृत्य अनुचित होतंच, पण ते निश्चितपणे अतिरेकी सुद्धा होत. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करून, दंगल सदृश्य वातावरण निर्मिती करायची, हा फंडा या पूर्वी वापरला गेला आहे… सामाजिक भावना दुखावण्याचं कार्य, पुतळ्यांची विटंबना करून केलं जातं.
काल, गांधी नावाच्या वलयाची, त्यांच्या बलिदानाची विटंबना झाली.

काल गांधी यांच्या पुतळ्याला हार घातले जात असताना…. हार घालणाऱ्या लोकांच्या भावनेला ठेच पोहचेल, असं मन दुखावणारं कार्य महेशने केलं…. तीन वर्षापूर्वी गांधी स्मृती दिनाचे दिवशी, एका महिलेने गांधीजी यांच्या तसबिरीला गोळ्या घालतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून असाच गांधी भक्तांच्या भावना दुखावण्याचा टाळीबाज कार्य केलेलं, त्याची आठवण काल झाली.

 

गांधी यांना मानणारे अशा कृत्यांना दाद देत नाहीत, हे खरं…. पण अविवेकी कृत्याचा निषेध गरजेचा आहे.

महेश… तू सिनेमा काढ. तो हक्क तुला आहे. तुझ्या जमातीतील लोक गर्दी करून तो बघतील, हे तुलाही ठाऊक आहे. कारण, यशाचे गणित मांडण्यात तू पक्का आहेस. गांधी जयंतीला तू सिनेमाची घोषणा केलीस, कारण या दिवसाचे महत्त्व तू जाणतोस… सिनेमा ३० जानेवारी रोजी तू रिलीज करशील हे ठाऊक आहे. असो…

या सिनेमातून मिळालेल्या पैशाने जेंव्हा तू परदेशवारी करशील… तेंव्हा, परदेशातील लोकांना मी गांधींच्या देशातून आलोय… असे न सांगता
मी गोडसेच्या पावन भूमीतून आलोय… असे गर्वाने सांग…. तिथे नाटक किंवा ढोंग करू नकोस.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version