आज तिच्या ‘फलंदाजीचे’ चाहते सुद्धा लाखोंनी वाढले असतील…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
महिला संघाचे क्रिकेट सामने कधीही न पाहणाऱ्या भारतीय व्यक्तीला सुद्धा स्मृती मंधाना हे नाव अगदी नक्कीच ठाऊक असेल. आज भारतीय महिला क्रिकेट संघाचा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण हिस्सा असणारी स्मृती एक दर्जेदार आणि गुणी खेळाडू आहे.
एक अप्रतिम खेळाडू असूनही स्मृतीची एक वेगळीच ओळख आज फार प्रसिद्ध आहे, आणि ती म्हणजे ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया’!
भारतीय महिला संघाची सलामीवीर म्हणून ती मैदानावर उतरली, तिच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर ती घराघरात जाऊन पोचली. त्यावेळी ऐन तारुण्यात पंचविशीच्या उंबरठ्यावर असलेली, दिसायला गोड आणि सुंदर असणारी स्मृती मंधाना तरुणांच्या गळ्यातील ताईत झाली नसती तरच नवल.
या सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट मात्र ही ठरली, की काही मोजकी क्रिकेटप्रेमी मंडळी सोडली तर इतरांसाठी स्मृतीच्या फलंदाजीपेक्षा स्मृतीचं सौंदर्य हा अधिक चर्चेचा विषय ठरू लागला. भारतात महिला क्रिकेटकडे आजही हवं तेवढं गांभीर्याने पाहिलं जात नाही, असं म्हणायला वाव आहे. कारण तसं नसतं तर तिच्या फलंदाजीचं अधिक कौतुक झालं असतं.
–
- पुरुष संघ तुपाशी… महिला संघ उपाशी… हे दुटप्पी धोरण कधीपर्यंत सुरु राहणार?
- …आणि हे असंच सुरु राहिलं, तर भारताचा नाही ‘फक्त IPL चा’ हिरो बनून राहशील वेड्या
–
तिच्या फलंदाजीचं कौतुक झालं नाही, होत नाही अशातला भाग नाही. तिच्या फलंदाजीचे प्रशंसक सुद्धा अनेक सापडतील. पण, विराट, रोहित किंवा इतर मंडळींची फलंदाजी आवर्जून पाहण्यासाठी, कामधंदे सोडून टीव्हीसमोर बसणारे क्रिकेट चाहते पाहायला मिळतात. त्या तुलनेत स्मृतीची फलंदाजी पाहण्यासाठी तितकासा आकडा जमलेला पाहायला मिळत नाही.
तिने शतक झळकावलं, उत्तम फलंदाजी केली, भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली की सगळेच जण तिचं भरभरून कौतुक करू लागतात. पण, ‘त्यातल्या किती जणांनी तिची फलंदाजी प्रत्यक्ष पाहिलेली असते?’ या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र कठीण आहे.
आज भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांचा ‘पहिलावहिला डे-नाईट कसोटी सामना’ खेळतोय. भारताच्या फलंदाजांनी उत्तम सुरुवात केली आहे. मोठी खेळी खेळण्यात शेफालीला अपयश आलं असलं, तरी तिने केलेली पायाभरणी भारतीय संघासाठी महत्त्वाची होती. तिच्या जोडीला सलामीला आलेली स्मृती मात्र नेहमीच्या शैलीत उत्तम खेळली असं नक्कीच म्हणता येईल.
अवघ्या ५१ चेंडूत अर्धशतकी मजल मारणाऱ्या स्मृतीने नंतर संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. खेळपट्टीवर पाय रोवत तिने काहीशा धीम्या गतीने पण संघाला आवश्यक अशी दर्जेदार खेळी साकारली. १२७ धावांच्या या इनिंगमध्ये २२ चौकार आणि १ षटकाराची आतिषबाजी सुद्धा केली.
कसोटी सामन्यात तिने आपलं पहिलं शतक झळकावलं आहे. तिने तिच्या फलंदाजीतून काही प्रश्न उपस्थित केले आहेत असं म्हणता येईल… ‘महिला संघांना फारसे कसोटी सामने खेळण्याची संधी का दिली जात नाही?’, ‘आजही चाहत्यांच्या (आणि BCCI च्या सुद्धा?) मनात महिला क्रिकेटविषयी दुजाभाव का?’ हे त्यातलेच काही प्रश्न म्हणता येतील. या प्रश्नांची आशादायक उत्तरं येत्या काळात मिळावीत अशी अपेक्षा अस्सल क्रिकेटचाहते नक्कीच करत असतील.
–
- खांद्याला चेंडू लागला, अंपायरने सचिनला आऊट दिलं. तो क्षणभर स्तब्ध झाला आणि…
- सचिनने नाही, या खेळाडूने केलाय वनडे मधील पहिलं द्विशतक ठोकण्याचा विश्वविक्रम!
–
महिला क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस कधी येतील आणि अधिक भरभराट कधी होईल, ते आजही सांगता येत नाही. कर्णधार मिताली राजसह अगदी नव्या, पुढच्या पिढीतील मुली सुद्धा उत्तम कामगिरी करत आहेत. महिला क्रिकेट संघाच्या सामन्यांना सुद्धा गर्दी व्हावी याची पुरेपूर काळजी घेत आहेत.
या मुली चांगली कामगिरी बजावत आहेतच, ज्यात स्मृतीने सुद्धा नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तिच्या फलंदाजीची आकडेवारी आणि फलंदाजी पाहिली तर ही गोष्ट अगदी सहज लक्षात येते. तरीही तिची ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया’ ही ओळख अधिक मोठी असावी ही दुर्भाग्याची गोष्ट आहे.
असं असतानाही आजच्या तिच्या इनिंगमध्ये, पहिलंवहिलं कसोटी शतक झळकत असताना तिच्या सुरेख फलंदाजीचा अविष्कार पाहायला मिळाला.
तिच्या चाहत्यांचा आकडा कमी नव्हताच असं म्हटलं तरी ते वावगं ठरत नाही. काही मंडळी तिच्याकडे, तर काही मंडळी तिच्या खेळाकडे पाहून तिच्या प्रेमात पडली होतीच. ती जशी नॅशनल क्रश ठरली तशी अनेकांची लाडकी फलंदाज सुद्धा होती, आहे. आजच्या तिच्या या खास खेळीनंतर तिच्या फलंदाजीचे चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढले असतील, यात मात्र शंकाच नाही…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.