आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘अग्निपरीक्षेचा’ अर्थ आहे अग्नि हातात धरून किंवा त्यावरून चालून आपला खरेपणा किंवा आपले निर्दोषत्व सिद्ध करणे. भारताच्या प्राचीन परंपरेत रामायण काळात सीतेने अशी अग्निपरीक्षा दिल्याचे संदर्भ आहेत. यात आणखी एक नाव आहे ‘द्रौपदी’ चे. असे म्हणतात की द्रौपदी ही अग्नीतून उत्पन्न झालेली अग्नीकन्या आहे.
ती प्रचंड तेजस्वी आणि प्रखर बुद्धिमत्ता असलेली होती. महाभारत काळात तिने भोगलेल्या हालअपेष्टा आणि दिलेल्या परीक्षांचे स्मरण रहावे यासाठी जर कोणी उत्सव साजरा करून तिच्या स्मरणार्थ निखार्यांवरून चालण्याचे दिव्य करत असेल तर?
भारत हा उत्सव आणि परंपरांचा देश आहे. इथे स्त्रीच्या ‘देवीरूपाची’ विविध रूपात उपासना करण्याची हजारो वर्षांपासून परंपरा आहे. या उपासनेतील एक भाग म्हणजे देवीसमोर अग्निदिव्य करणे,ज्यामध्ये देवीप्रती कृतज्ञता तर असतेच पण त्याचबरोबर आपल्याकडून चुकलेल्या गोष्टीचे परिमार्जन आणि देवीची क्षमायाचना देखील असते.
या अग्निदिव्यामधे काही ठिकाणी निखार्यांचे तोबरे भरले जातात तर काही ठिकाणी हातात धरले जातात. तर यल्लम्मा, मरियम्मा, द्रूपथियमा अशा देवींचे उपासक देवीच्या उत्सवादरम्यान गरम, पेटत्या निखर्यावरून चालण्याच्या रूढीचे पालन करताना दिसतात.
यातून देवीने आपल्याला माफ करू आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे हा हेतु असतो. काही असले तरी मित्रांनो कोणतीही संरक्षणाची तजवीज नसताना कोणी कसे अशा निखर्यांवरून चालू शकते? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर मित्रांनो ही कथा आहे विश्वास आणि श्रद्धेची, विलपॉवरची. आणि इतिहासातील द्रौपदी सारख्या महान स्त्रीला मानवंदना देण्याची. म्हणून द्रौपदीच्या सन्मानार्थ आजही अनेक स्त्रिया आगीच्या निखर्यावर चालतात.
द्रौपदी ही ‘वंनियार’ लोकांची देवता आहे. द्रौपदी अम्मान मंदिरांमध्ये ‘फायर वॉकिंग’ किंवा ‘थिमिती’ हा एक लोकप्रिय विधी आहे. तामिळनाडू, सिंगापूर आणि श्रीलंकेत द्रौपदी अम्मानला समर्पित असंख्य मंदिरे आहेत.
–
- विविध समाजांमध्ये ‘पौरुषत्व’ सिद्ध करण्याच्या या ११ प्रथा तुमची झोप उडवतील
- विचित्र नैवेद्य ते सांगाड्यांची पूजा! अत्यंसंस्काराच्या विचित्र पद्धती तुमची झोप उडवतील
–
बेंगलोर कारागा नावाच्या बेंगलुरू पीट या प्राचीन धार्मिक उत्सवात द्रौपदीला नऊ दिवसांच्या कार्यक्रमात आदिशक्ती आणि पार्वतीचा अवतार मानले जाते. हिंदू महाकाव्य, महाभारताच्या काळापासून या सणाची मुळे असल्याचे मानले जाते.
महाकाव्यानुसार, पांडवांनी फासे खेळात कौरवांकडे आपली जमीन, संपत्ती आणि त्यांची पत्नी द्रौपदी गमावली होती असेही मानले जाते की युद्धानंतर द्रौपदीला तिच्या निर्दोषपणाची पुष्टी करण्यासाठी कोळशाच्या जळत्या पलंगावर चालावे लागले. या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ थिमिती हा सण साजरा केला जातो.
हा सण ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो. महाभारताचे युद्ध ४८ दिवस चालले. म्हणून हा उत्सवदेखील ४८ दिवस चालतो. यामध्ये ४६ साव्या दिवशी निखर्यांवर चालण्याचा विधी असतो.
साधारणपणे ५०० वर्षे जुनी ही परंपरा असून बेंगलोरमधील द्रौपथी अम्मान मंदिरात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. द्रौपदीचा जन्म धर्माच्या रक्षणासाठी झाला होता म्हणून हा सण तिच्या पुनर्जन्माचे प्रतीक आहे आणि तिच्या भक्तांसाठी शुद्धीकरणाची संधी आहे.
या २१ दिवसांच्या कालावधीत हे भक्त लोक व्रतस्थ राहतात. शाकाहारी अन्न सेवन करतात. देवीच्या मंदिरात राहतात. स्त्रियांशी संपर्क टाळतात. तर काहीजण द्रौपदीच्या सन्मानार्थ त्यांच्या मिशा आणि दाढी कापतात. साड्या नेसतात आणि तसा मेकअप सुद्धा करतात. जेणेकरून ते द्रौपदीसारखे दिसतील आणि तिचे प्रतिनिधित्व करतात.
मंदिरात या दरम्यान महाभारतावरील प्रवचन आयोजित केले जाते. यातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ५०० पुरुष आणि स्त्रिया द्रौपदीप्रती भक्ति दर्शवण्यासाठी गरम राख आणि निखार्यांनी भरलेल्या २३ फूट लांब खड्ड्यातून चालतात, ते ही अनवाणी पायांनी!
चालण्यापूर्वी या लोकांना हळदीचा लेप लावला जातो. आणि त्याआधी हे भक्त आपले पाय गार पाण्याने धुवून घेतात. तुम्ही जर काही वाईट केले नसेल तर तुम्हाला काहीही होणार नाही,असा भक्तांना विश्वास असतो. त्यासाठी हे भक्त देवी द्रौपदीची प्रार्थना करतात.
उत्सवातील या दिवसासाठी जवळपास ५०,००० भक्त जमा होतात. जगात इतर कुठल्याही ठिकाणी अशा गोष्टीसाठी इतके लोक जमा होत असतील की नाही ही शंकाच आहे. परंपरेला अनुसरून अग्निदिव्य करण्यापूर्वी द्रौपथी अम्मासाठी भक्ति गीते गायली जातात.
सारेजण पिवळे कपडे परिधान करून येतात. आपल्या संपूर्ण अंगाला हळदीची पेस्ट लावतात. कंबरेला कडू निंबाची पाने व ५१ किंवा १०१ लिंबांच्या माळाही बांधतात. तसेच रेशमी साड्याही नेसतात.
निखार्यांचा रस्ता पार केल्यावर ते बांधलेले लिंबू इतर भक्तांना प्रसाद म्हणून दिले जातात. कारण ते लिंबू शुद्ध आणि पवित्र मानले जातात म्हणून मुख्यकरून आजारी लोक, अपत्यहीन आणि अविवाहित लोकांना दिले जाते.
आरोग्यप्राप्ती, प्रजनन आणि विवाह लवकर व्हावा अशी यामागे श्रद्धा आहे. उत्सवतील प्रमुख भक्ताला ‘करगा’ म्हणतात. त्याला चमेलीच्या फुलांनी सजवलेला मुकुट घातला जातो. करगा सर्वात प्रथम अग्नी पार करतो. तेव्हा ढोल ताशांचा कडकडाट होतो. त्यानंतर इतर भक्त निखार्यांचा रस्ता पार करतात.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे निखारे पार करूनही त्यांचे पायाचे तळवे भाजलेले दिसत नाहीत.
–
- मोहरमच्या महिन्यात सुरा आणि तलवारींनी का करतात मुसलमान लोक स्वत:ला जखमी?
- कुठे बियरचा पूर तर कुठे चिखलात अंघोळ – जगातील “१० भन्नाट” सण
–
जगात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या फायर वॉकिंग फेस्टिवलचे आयोजन केले जाते. जपानमध्ये टोकियो जवळ “हिवाटारा मत्सुरी फायर वॉकिंग फेस्टिवल”, स्पेनमध्ये ‘पासो डेल फुएगो ‘ आणि चीनचा ‘ लियनहूया फायर वॉकिंग फेस्टिवल’ हे उत्सव देखील प्रसिद्ध आहेत.
मित्रांनो काही झाले तरी ये इंडिया है! आणि इथे काहीही घडू शकते हो ना!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.